मंगळवार दि. २४ मार्च २०२६


अखेर पारसला
मृत्यूने कवटाळले
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वाढदिवसादिवशी आईचा विरोध असतानाही तो मित्रांसोबत टेम्पोत बसून निघून गेला. मोबाईल पहाण्याचा नादात टेम्पोच्या फाळक्यावरून खाली पडला. डोक्याला गंभीर मार लागला आणि त्यातच त्याचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला. पारस प्रभाकर होलम ( वय १९ वर्षे रा. यरंडोळ ता.आजरा) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.
याबाबत निकटवर्तीयांकडून व ग्रामस्थांकडून मिळालेली माहिती अशी…
पिंपळगाव येथील यात्रेनिमित्त असणारी बैलगाडी शर्यत मित्रांसोबत पहायची व आपली कामे आटोपून परत यायचे असा निर्धार करून मित्रांसोबत पारस टेम्पोतून पिंपळगावच्या दिशेने निघाला होता. वाढदिवस असल्याने आईने घरीच थांबण्याचा सल्ला दिला होता. परंतु लवकर परत येईल असे सांगून तो बाहेर पडला. टेम्पोच्या पाठीमागील फाळक्यावर बसून मोबाईल पहात प्रवास करत असताना अचानक तोल जाऊन उत्तूर – पिंपळगावच्या दरम्यान रस्त्यावर चालत्या टेम्पोमधून खाली पडला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सुरुवातीला गडहिंग्लज येथे तर प्रकृती बिघडतच गेल्याने त्यानंतर कोल्हापुर येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. काल उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
काम करत औद्योगिक प्रशिक्षण घेणाऱ्या शेतकरी कुटुंबातील पारसच्या मित्र परिवारासह संपूर्ण यरंडोळ पंचक्रोशी हळहळत आहे.
त्याच्या पश्चात मोठा भाऊ, आजी, आजोबा, आई-वडील असा परिवार आहे.

अक्षरउत्सव: एकाच वेळी चार पुस्तकांचा प्रकाशन सोहळा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
साहित्याच्या प्रांतात नवनवीन प्रयोग करणाऱ्या चैतन्य सृजन सेवा संस्था संचालित ‘ऋग्वेद चिल्ड्रन रिलीफ फंड, आजरा’ अल्पमूल्य प्रकाशनामार्फत एकाच वेळी चार पुस्तकांचा प्रकाशन समारंभ पार पडला. यामध्ये
’कारटो’ – कल्पना मलये यांनी मालवणी भाषेतून निखळ बालपण, खोडकरपणा आणि गंमतीजमतींची ही रसाळ साठवण रेखाटली आहे.‘गुप्तहेर गब्बू’ – गोविंद गोडबोले मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारे हे एक रहस्यप्रधान पुस्तक..‘मित्र’ -फारूक काझी, मैत्रीची एक हळवी आणि प्राण्यांशी असलेल्या निखळ प्रेमाची गोष्ट सांगणारे हे पुस्तक. ‘गांधीजी नावाचा शूर माणूस’- राजा शिरगुप्पे महात्मा गांधीजींच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारी ही साहित्यकृती आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डाॅ. शिवशंकर उपासे, उपाध्यक्ष सुनील सुतार, खजिनदार सुनील सुतार, बळवंत शिंत्रे, श्रावण जाधव, उत्तम कोकितकर, पुष्पलता घोळसे, वैशाली वडवळेकर तसेच मानद सचिव संतोष जाधव, विलास पोवार, कर्मचारी विवेकानंद निर्मळे, पूजा नेवरेकर आदि उपस्थित होते.

यश फौंडेशनच्या वतीने पेरणोली शाळेला प्रिंटर भेट

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील केंद्रशाळा विद्यामंदिर पेरणोली या शाळेला यश फौंडेशनच्या वतीने प्रिंटर भेट देण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते व फौंडेशनचे संस्थापक संतोष जाधव यांनी प्रिंटर शाळेचे मुख्याध्यापक एकनाथ पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. केंद्रशाळा विद्यामंदिर येथे कार्यक्रम झाला.
तानाजी पावले यांनी स्वागत केले. धनाजी रावण यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. यश फौंडेशनने प्रिंटर भेट दिल्याने शाळेच्या कार्यालयीन कामकाजात मदत होणार आहे. काम सुखकर व सुलभ होणार आहे. अभ्यासाचे साहित्य, प्रश्नपत्रिका व महत्वाची माहीती विद्यार्थ्यांपर्यंत सहज पोहचवता येणार आहे. सदस्य रविंद्र देसाई म्हणाले, यश फौंडेशन हे गेली तीन वर्ष, सामाजिक, सांस्कृतिक व क्रिडा क्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविलेले आहेत. शाळेना भेट वस्तु, गरजूंना आर्थिक मदत, विद्यार्थ्यांना विविध माध्यमातून पाठबळ दिले आहे. फाउंडेशनचे संस्थापक श्री. संतोष जाधव म्हणाले, शाळेसाठी प्रिंटर ही एक भेटवस्तू नाही. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी टाकलेले पहिले पाऊल आहे.
या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अविनाश जोशीलकर, उपाध्यक्षा ज्योती मोहीते, संदिप पारदे विजय सासूलकर, पवन कालेकर, ग्रामपंचायत सदस्य रणजित फगरे, राजेंद्र कळेकर, शेखर कळेकर, अरविंद नावलकर, एकनाथ जोशीलकर, नामदेव सावंत, पिंटू जाधव, संदिप हवालदार, भिमराव आबा दळवी, गीता नाईक, गायत्री नळकांडे, यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी, शाळा व्व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व शिक्षक, विदयार्थी उपस्थित होते. श्री.धनाजी रावण यांनी आभार मानले.

रामनवमीनिमित्त आजऱ्यात उद्यापासून कार्यक्रम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
रामनवमी उत्सव मंडळाच्या वतीने आजरा येथील राम मंदिरात बुधवार व गुरुवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दिनांक २५ मार्च रोजी सायंकाळी चार वाजता श्री राम रक्षा स्त्रोतपठण, गुरुवार दिनांक २६ रोजी सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत पंचसूक्त पवमान व पंचायतन सूक्त अभिषेक, दुपारी बारा वाजता जन्म काळ व आरती, दुपारी १२.३० ते ३.३० वाजेपर्यंत महाप्रसाद व दुपारी ४.३० ते ७.०० वाजेपर्यंत योगी चॅरिटेबल ट्रस्ट प्रस्तुत रामगान हा प्रभू श्रीरामांची भजने व गाण्याचा कार्यक्रम होणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.

निधन वार्ता
पार्वती देऊसकर
होण्याळी ता. आजरा येथील पार्वती तुकाराम देऊसकर ( वय १०० ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले .त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना ,नातवंडे असा परिवार आहे.
येथील सेवा निवृत्त केंद्र प्रमुख प्रकाश देऊसकर , सेवा निवृत्त शाखा अभियंता रमेश देऊसकर यांच्या त्या आई होत. तर छत्रपती शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीधर देऊसकर याच्या त्या चुलती होत.
पांडुरंग देसाई

उत्तूर ता.आजरा येथील पांडुरंग तुकाराम देसाई ( वय ७५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहीत मुलगी असा परिवार आहे. पोलीस उप निरीक्षक स्नेहराज देसाई यांचे ते वडील होत.

छाया वृत्त

गुढीपाडवा झाला रमजान ईदही झाला… आता आजरा शहरात गॅस सिलेंडरसाठी रांगा वाढू लागल्या आहेत.


आजचे पंचांग
दिनांक : २४ मार्च २०२६
वार : मंगळवार
माह (अमावस्यांत) : चैत्र
माह (पूर्णिमांत) : चैत्र
ऋतु : वसंत
आयन : उत्तरायण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : षष्ठी तिथी (दुपारी ०४.०७ पर्यंत) त्यानंतर सप्तमी तिथी
नक्षत्र : रोहिणी नक्षत्र (सायंकाळी ०७.०४ पर्यंत) त्यानंतर मृगशीर्ष नक्षत्र
योग : प्रीति योग (सकाळी ०९.०६ पर्यंत) त्यानंतर आयुष्मान योग
करण : तैतुला करण (दुपारी ०४.०७ पर्यंत) त्यानंतर गराजा करण
चंद्र राशी : वृषभ राशी (२५ मार्च सकाळी ०६.१६ पर्यंत) त्यानंतर मिथुन राशी
सूर्य राशी : मीन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सायंकाळी ०३.४७ ते सायंकाळी ०५.१८ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी
१२.२१ ते दुपारी ०१.०९
सूर्योदय : सकाळी ०६.४१
सूर्यास्त : सायंकाळी ०६.४९
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत



