mrityunjaymahanews
अन्य

हात्तीवडे येथे महिला नदीत बुडाली…?

हात्तीवडे येथे महिला नदीत बुडाली…?

हात्तीवडे ता. आजरा येथील  ३६ वर्षीय विवाहित महिला हिरण्यकेशी नदीपात्रात बुडाल्याचा संशय व्यक्त होत असून नातेवाईकांसह हात्तीवडे ग्रामस्थ रात्री उशिरापर्यंत तिचा शोध घेत होते.

मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हात्तीवडे घाट येथे सदर प्रकार घडला असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.

संबंधित महिलेच्या  पश्चात पती व मुलगा असून त्या गेले काही दिवस मानसिक दृष्ट्या त्रस्त असल्याचेही सांगण्यात येते. सध्या जोरदार पाऊस झाला असल्याने हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे सदर महिला पाण्याच्या वेगवान प्रवाहातून पुढे वहात गेली असल्याची शक्यता आहे.

 

बोगस बिगर शेती आदेशांचा

आज-यामध्ये सुळसुळाट…?
सखोल चौकशीची मागणी…

आजरा येथील तत्कालीन नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असणारे डी. डी. कोळी हे बदली झाल्यानंतरही मागील तारखेचे बिगर शेती आदेश देत आहेत. महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने लाखो रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार करून आपल्या अधिकार क्षेत्राबाहेरील व UDCPR चे सर्व नियम डावलून आजरा व परिसरातील गावांमध्ये बिगरशेतीचे आदेश होत आहेत. या प्रकरणांमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार असून याची सखोल चौकशी करावी अशी मागणी आजरा तहसीलदारांसह उपविभागीय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

याबाबत बोलताना तक्रारदार अजयकुमार देशमुख म्हणाले, तालुक्यात अनेक जमिनींचे बेकायदेशीररित्या बिगर शेतीकरण करण्यात आले आहे. खरेदी दस्त होण्याआधीच खरेदी घेणाऱ्याच्या नावे बिगर शेती आदेश करणे, नगररचना विभागाकडून रेखांकन मंजुरी अथवा परवानगी न घेता परस्पर प्रकरणे करणे, उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालयाकडून अंतरीम अथवा अंतिम रेखांकन मंजूर न करता तसेच कजाप न करता सातबाराचे पोटहीस्से पाडणे, ओपन स्पेस व अमीनिटी तसेच अंतर्गत रस्ते आवश्यक असताना नियमानुसार ओपन स्पेस न सोडणे, ग्रीन झोन मधील जमिनींबाबत संबंधित विभागाचे ना हरकत दाखले न घेणे अशा विविध बाबी अनेक प्रकरणांमध्ये घडल्या आहेत. बिगर शेती आदेश करताना शासनाची कोणतीही नजराणा रक्कम चलनाने भरली नसल्याने शासनाचे आर्थिक नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर कोळी यांच्या कालावधीत झालेल्या बिगर शेती प्रकरणांची चौकशी आठ दिवसात करून कार्यवाही करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशाराही अजयकुमार देशमुख यांनी दिला आहे.

देशमुख यांच्या भूमिकेमुळे तालुक्यात यापूर्वी झालेल्या बिगर शेती आदेशांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बिगर शेती प्रकरणांची दबक्या आवाजात चर्चा…

आजरा तालुक्यात गेली काही वर्षे बिनबोभाटपणे बेकायदेशीररित्या जमिनी बिगर शेती करणे व त्या विक्री करणे असे प्रकार सुरू आहेत. तालुका वासियांमध्ये या प्रकरणाची दबक्या आवाजात चर्चा आहे. देशमुख यांनी हा प्रश्न ऐरणीवर आणल्यानंतर पुन्हा एक वेळ बिगर शेती प्रकरणांसह खुल्या भूखंडांचा प्रश्न चर्चेत आला आहे. यामागे लँड माफीयांची मोठी साखळी असल्याचेही समजते.

 कोल्हापूर : ए. एस. ट्रेडर्सचा म्होरक्या लोहितसिंग सुभेदार जेरबंद ; ३ हजार कोटींची फसवणूक

♦️दामदुप्पट परताव्याच्या बहाण्याने महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह सात राज्यांतील १ लाख ८५ हजाराहून अधिक गुंतवणूकदारांची सुमारे ३ हजार कोटीची फसवणूक करून नोव्हेंबर २०२२ पासून फरार झालेल्या बहुचर्चित ए. एस. ट्रेडर्स ॲण्ड डेव्हलपर्स व संलग्न विविध कंपन्यांचा सर्वेसर्वा तथा मॅनेजिंग डायरेक्टर लोहितसिंग धर्मासिंग सुभेदार (वय ३५, रा. किर्लोस्करवाडी रोड, पलूस, जि. सांगली) याला कोल्हापूर पोलिसांनी   अटक केली. संशयित ११ महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत होता.

संशयिताच्या घटस्फोटीत पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेवून आर्थिक गुन्हे शाखेने तिच्याकडून ५० लाखाचे दागिने हस्तगत केल्यानंतर म्होरक्या सुभेदारच्या अडचणी वाढल्या होत्या. पोलिसांना चकवा देणाऱ्या म्होरक्याचा काही दिवसांपासून कोल्हापूर परिसरात वावर वाढला होता. आज पहाटे पुणे- बंगळूर महामार्गावर त्याच्या वास्तव्याचा ठावठिकाणा समजताच विशेष पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडील अलिशान मोटारही पथकाने हस्तगत केली आहे.

शेकडो गुंतवणूकदारांची शाहूपुरी पोलिस ठाण्यांसह आर्थिक गुन्हे शाखेसमाेर गर्दी

लोहितसिंग सुभेदारच्या अटकेबाबत पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दुजोरा दिला. याबाबतची अधिकृत माहिती बुधवारी ( दि. २० ) देण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले. सुभेदारच्या अटकेबाबत तपास यंत्रणेने दुपारपर्यंत कमालीची गोपनियता पाळली होती. सायंकाळनंतर संशयिताच्या अटकेचे वृत्त शहर, जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रासह अन्य राज्यात वाऱ्यासारखे पसरले. कोट्यवधीच्या फसवणूक झालेल्या शेकडो गुंतवणूकदारांनी सायंकाळनंतर शाहूपुरी पोलिस ठाण्यांसह आर्थिक गुन्हे शाखेसमाेर गर्दी केली होती.

लोहितसिंग सुभेदारसह संचालकांनी शाहूपुरी येथील दुसऱ्या गल्लीत चंद्रगंगा अपार्टमेंटमध्ये ए. एस.ट्रेडिंग ॲण्ड डेव्हलपर्स ( एल.एल.पी) कंपनीचे कार्यालय थाटले होते. कंपनीशी सलग्न शहरातील मध्यवर्ती परिसरात विविध शाखाही थाटल्या होत्या. कमी काळात दामदुप्पट कमाईची भुरळ घालून महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह सात राज्यातील व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांसह सरकारी कर्मचाऱ्यांना मोठ्याप्रमाणात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते.

News Source :-
https://chat.whatsapp.com/JdTscwkK04n3RWNSijpnIq

 

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

Crime News

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!