

दरोड्यातील मुद्देमालासह आठ जण पोलिसांच्या ताब्यात
चौघांचा शोध सुरू….
आजरा तालुक्यातील रायवाडा येथे बुधवारी पडलेल्या सशस्त्र दरोड्यातील आठ संशयीतांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. चोरीस गेलेल्या ७० डुकरांसह बऱ्यापैकी मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणातील अन्य ४ जणांना ताब्यात घेण्याच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे.
बुधवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास रायवाडा /खानापूर ता.आजरा येथे माजी सरपंच सौ. पूनम गुरव यांच्यासह त्यांचे पती प्रल्हाद गुरव व मुलगा राजेश गुरव यांना मारहाण करून बांधून घालून शेडमधील तीन लाख रुपये किमतीच्या डुकरांसह साडेसहा तोळे सोन्याचे दागिने, ६० हजार रुपये किमतीची चांदी, रोख २५ हजार रुपये, गुरव यांच्या काजू प्रक्रिया उद्योगातील एक लाख ६२ हजार रुपयांचे २५० किलो काजूगर व पाचशे किलो काजुबिया असा ९ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल दोन पिकअप जीपमध्ये भरून दरोडेखोरांनी पोबारा केला होता. पोलिसांनी तातडीने तपास यंत्रणा सक्रीय करून स्थानिक सीसीटीव्ही फुटेज, दरोडेखोरांचे गुरव कुटुंबीयांनी केलेले वर्णन, यापूर्वी डुकरे खरेदी केलेले खरेदीदार यांची माहिती याच्या आधारे बुधवारी दुपारी रुक्मिणी नगर, बेळगाव येथून रवी लक्ष्मण नाईक याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली. त्याचबरोबर कर्नाटकातील खानापूर जवळ असणाऱ्या जंगलातील गोदामामध्ये व मार्केट यार्ड परिसरात बंदिस्त केलेली डुकरेही दाखवली.
अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने बारा साथीदारांच्या मदतीने सदर दरोडा घातल्याची कबुलीही संशयितांनी दिली. या दरोडा प्रकरणातील संशयित सर्वच गुन्हेगार हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यातील एक जण खून प्रकरणातून नुकतीच शिक्षा भोगून बाहेर आलेला आहे. या दरोड्यात एकूण १२ जण सहभागी असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरीही आणखी तिघेजण असल्याचे संशय पोलिसांना आहे. त्या दिशेनेही तपास सुरू आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेल्या दोन पिकअप जीपही ताब्यात घेतल्या आहेत.
आजऱ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांचा नेसरी, गडहिंग्लज व कर्नाटक पोलिसांच्या मदतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील तपास सुरू आहे.
९ लाख १७ हजार रुपयांचाच मुद्देमाल
गुरव कुटुंबियांचा दरोड्यात चोरीला गेलेला मुद्देमाल हा ९ लाख १७ हजार रुपयांचा असल्याचे स्पष्ट होत असून ७० ते ७७ डुकरांचीच चोरी झाली होती असेही तपासामध्ये स्पष्ट होऊ लागले असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.



स्वामी विवेकानंद पतसंस्थेला ३ कोटी ४५ लाख ढोबळ नफा

येथील स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेने सन २०२२ – २०२३ या
वर्षात ३११ कोटी ७५ लाखाचा व्यवसाय केला आहे. संस्थेला ३ कोटी ४५ लाख ढोबळ नफा झाला, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष जनार्दन टोपले यांनी दिली.
टोपले म्हणाले, संस्था ग्राहकाभिमुख पारदर्शी कारभार करीत ग्रामीण व शहरी भागातही दमदार पावले टाकत सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. ३१ मार्च २०२३ अखेर संस्थचे भागभांडवल ३ कोटी ६६ लाख इतके आहे. यंदा संस्थेच्या ठेवीत १९ कोटी ५२ लाख ५६ हजार ४०२ इतकी वाढ होऊन एकूण ठेवी १७७ कोटी ८८ लाख ०८ हजार ३१२ इतक्या ठेवी झाल्या आहेत. संस्थेने एकूण १३४ कोटी ०८ लाख ८७ हजार २०२ इतके कर्ज वाटप केले. संस्थेची गुंतवणूक ६२ कोटी ६८ लाख २९ हजार ०९० इतकी आहे. यावर्षी ३११ कोटी ७५ लाख ०९ हजार ५३७ इतका व्यवसाय केला. आर्थिक वर्षात आवश्यक त्या सर्व तरतुदी करुन एकूण २ कोटी ०५ लाख इतका निव्वळ नफा झाला आहे. मागिल वर्षी १५० कोटी ते २०० कोटी ठेवी विभागात महाराष्ट्र राज्यात संस्थेला बँको प्रथम पुरस्कार मिळाला आहे.
चालु वर्षी संस्थेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरूआहे. संस्थेने सभासद, ठेवीदार, कर्जदार आणि हितचिंतक यांनी दाखविलेल्या विश्वासा मुळेच संस्थेला विक्रमी नफा झाला असल्याचे संस्थेचे विद्यमान चेअरमन श्री. जनार्दन टोपले यांनी सांगितले आहे.
संस्थेच्या ९ शाखा असुन स्वमालकीच्या जागेत ८ शाखा कार्यरत आहेत, सर्व शाखांकडे सर्व प्रकारची विमा पॉलिसी उतरविण्याची सोय भारतातील प्रमुख शहरांसह डी. डी. काढण्याची सुविधा, सोनेतारण कर्जाची सोय, मनी ट्रान्सफर करण्याची सोय, सभासदांचा अपघात विमा उतरण्याची सोय, एनईएफटी, आरटीजीएस, बीबीपीएस, एसएमएस अशा अनेक सुविधा सभासदांसाठी उपलब्ध केल्या आहेत. या वेळी उपाध्यक्ष दयानंद भुसारी, संचालक, नारायणसावंत, रविंद्र दामले, महेश नार्वेकर, सुधीर कुंभार, रणजित पाटील, गुरुप्रसाद टोपले, मुकुंद कांबळे, राजेंद्र चंदनवाले, विश्वजीत मुंज, सौ. सुनिता कुंभार, सौ. नेहा पाटील, संस्थेचे सरव्यवस्थापक अर्जुन कुंभार व अधिकारी वर्ग उपस्थित होते.

आजरा तहसीलदार विकास अहिर यांची बदली
आजऱ्याचे तहसीलदार विकास अहिर यांची माण(सातारा) येथे बदली झाल्याचे खात्रीलायक वृत्त असून आजर्याच्या तहसीलदार पदी समीर माने यांची नियुक्ती झाल्याचे समजते.





