

निवडणुकीच्या तोंडावरच झालेल्या बैठकीत संचालकांचे धुमशान…

…………..◼️आजरा- प्रतिनिधी◼️…………..
साखर कारखान्याच्या निवडणुकीचे पडसाद मंगळवारी झालेल्या संचालक मंडळाच्या मासिक सभेत उमटले. कर्मचा-यांना हुद्दे देण्याच्या कारणास्तव संचालक मंडळामध्ये वादावादी झाली. या वेळी विरोधी गटाने सभागृह सोडून जाणे पसंद केले. या प्रकाराचा संबंध थेट निवडणुकीशी जोडत दिवसभर कारखाना कार्यस्थळी याची जोरदार चर्चा होती.
अध्यक्ष प्रा. सुनिल शिंत्रे यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याची संचालक मंडळाची बैठक बोलवण्यात आली होती. विषय पत्रिकेवरील विषय चर्चीले जात असतांनाच संचालक जनार्दन टोपले यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत हुद्द्यांच्या प्रश्नाला हात घातला. हाच मुद्दा अशोक चराटी,दशरथ अमृते व त्यांच्या समर्थक संचालकांनी उचलून धरला. सद्य स्थितीला हुद्दा देणे अडचणीचे आहे. पुन्हा हा विषय बैठकीसमोर ठेवून या वर चर्चा करू असे अध्यक्ष प्रा. शिंत्रे यांनी स्पष्ट केले. प्रथम हा प्रश्न निकालात काढा. अशी भूमिका चराटी समर्थक संचालकांनी घेतली. हा विषय विषय पत्रिकेवर नसल्याचे कारण सांगितले गेले अखेर चराटी समर्थक सर्व संचालक बैठकीतून निघून गेले.
निघून जाण्यापूर्वी संचालकांनी आपल्या प्रोसिडिंगवरील केलेल्या सह्या रद्द कराव्यात अशा सूचना प्रभारी कार्यकारी संचालक व्यंकटेश ज्योती यांना केल्या व तसे लेखी पत्रही ज्योती यांच्याकडून त्यांनी घेतले.
टेंडर मंजुरीसाठी आलेले व्यापारी व इतर ठेकेदार यांच्यासमोरच सदर प्रकार चालला होता. या प्रकाराची चर्चा कारखाना कार्यस्थळी जोरात रंगली होती. बैठकीला श्रीमती अंजनाताई रेडेकर, वसंतराव घुरे वगळता सर्व संचालक उपस्थित होते.
सहानुभूती की उट्टे…?
आज ज्या जागेवर हूद्दा देण्यासाठी जो प्रकार झाला त्या हुद्द्यावर इच्छुक असणाऱ्यांपैकी संबंधित एकाचा ठराव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विरोधात गेल्याने त्याला हुद्यापासून रोखण्यासाठी काही संचालक तर त्यालाच हुद्द्यावर बसवण्यासाठी दुसरे काही संचालक प्रयत्नशील होते. ज्येष्ठता व अनुभव हा प्रश्नही चर्चेत आला. यामुळे कर्मचाऱ्या बद्दल सहानुभूती की आपापसातील उट्टे काढण्यासाठी हा खटाटोप सुरू होता ? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
दरम्यान जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणाचा व जिल्हा बँक ठरावाचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.सेवा ज्येष्ठतेनुसार ज्या त्या विभागातील कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना हुद्दे देण्यात यावेत अशी आपली भूमिका आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

डॉल्बी नकोच…
पोलीस प्रशासनाच्या नवरात्र मंडळांना सूचना

……….◼️आजरा- प्रतिनिधी◼️…………..
आजरा तालुक्यामध्ये गणेश उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा झाला. या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याप्रमाणेच नवरात्रोत्सवाममध्येही मंडळांनी सहकार्य करून शांततेने उत्सव पार पाडावा. कोणत्याही परिस्थितीत डॉल्बीला परवानगी दिली जाणार नाही. अशी सक्त सूचना गडहिंग्लजचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी केली.
आजरा येथे पोलीस पाटील व नवरात्र उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
उपस्थितांचे स्वागत अनिल तराळ यांनी केले. यावेळी नवले म्हणाले, उत्सवामध्ये समाजकंटकांना थारा देऊ नका. मिरवणुकांच्या वेळांचे बंधन काटेकोरपणे पाळण्याबरोबरच निवडणुकांच्या मार्गामध्ये बदल करू नयेत. आक्षेपार्ह पोस्टर्स, डॉल्बी यापासून मंडळांनी दूरच रहावे.
तहसीलदार सूरज माने म्हणाले, तालुक्यातील दहा गावच्या ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजीही मंडळांनी घ्यावी घ्यावी. मंडळांना काही अडचण आल्यास थेट प्रशासनाशी संपर्क साधावा. पारंपारिक वाद्यांचा मिरवणुकांकरिता वापर करावा असेही आवाहन केले.

यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीस तालुक्यातील पोलीस पाटील व नवरात्र उत्सव मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंडळांचे कारभारी पेचात…
मिरवणुकीत डॉल्बी नाही तर तरुणाई नाही असा प्रकार अलीकडे दिसू लागल्याने काही मंडळांनी यापूर्वीच डॉल्बीचे बुकिंग केले आहे. पण प्रशासनाने कारवाईचा इशारा दिल्याने मंडळी सुद्धा पेचात आहेत. डॉल्बी वाजली तर कारवाईचा बडगा नाही वाजली तर कार्यकर्त्यांची नाराजी अशा विचित्र परिस्थितीत मंडळांचे कारभारी अडकले आहेत.

दिवाळीपूर्वी हिरण्यकेशी नदीवरून पाणीपुरवठा करण्यास नगरपंचायत प्रयत्नशील : मुख्याधिकारी सुर्वे

………….◼️आजरा- प्रतिनिधी◼️……………
आजरा नगरपंचायतीमार्फत सद्यस्थितीला होत असलेल्या नळपाणी पुरवठ्याबाबत शहरवासीयांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्याधिकारी सुरज सुर्वे, नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी,नगरसेवक अनिरुद्ध केसरकर, विलास नाईक,पत्रकार ज्योतिप्रसाद सावंत व पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. बैठकीमध्ये दिवाळीपूर्वी हिरण्यकेशी नदीवरील जॅकवेलच्या माध्यमातून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यास नगरपंचायत प्रयत्नशील असल्याचे मुख्याधिकारी सुर्वे यांनी सांगितले.
सध्या शहरामध्ये कार्यरत असणाऱ्या पाणीपुरवठा योजनेतून होणारा पुरवठा हा अपुरा व अनियमित स्वरूपाचा होत असून याबाबत शहरवासीयांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्याचे पत्रकार सावंत यांनी सांगितले.
यावेळी बोलताना अशोकअण्णा म्हणाले, नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. शहरवासीयांच्या पाण्याबाबत निश्चितच तक्रारी आहेत.गेले काही महिने पूलाचे सुरू असलेले काम व कोसळलेले जॅकवेल यामुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय येत आहे. नवीन पाणीपुरवठा योजना सुरू होईपर्यंत अडचण होऊ नये म्हणून दिवाळीपूर्वी पूर्ववत पाणीपुरवठा हिरण्यकेशी नदीवरूनही चालू केला जाईल असे स्पष्ट केले.
तातडीने हिरण्यकेशी नदीवरील जॅकवेलमध्ये मोटर्स बसवून पाणीपुरवठा सुरू करण्याच्या हालचाली कराव्यात अशी सूचना नगरसेवक विलास नाईक यांनी मांडली.
यावेळी झालेल्या चर्चेत नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, नगरसेवक अनिरुध्द केसरकर, पाणीपुरवठा विभागाचे अरविंद पारपोलकर यांनी भाग घेतला.
शहरवासीयांची अडचण लक्षात घेऊन पाणी प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन मुख्याधिकारी सुर्वे यांनी दिले.
शहरवासीयांकडून प्रश्नांचा भडिमार…
अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत शहरवासीय वारंवार विविध प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांच्या प्रश्नाना सामोरे जाताना नाकी नऊ येत असल्याचे नगरसेवक विलास नाईक यांनी स्पष्ट केले.

पूजेचा मान द्या अन्यथा धरणे आंदोलन… हरपवडे येथील गुरव समाजाचा इशारा

…………◼️आजरा-प्रतिनिधी◼️…………
हरपवडे गावामध्ये ग्रामदैवत श्री रासूबाई देवीचा पूजेचा मान गुरव पुजारी यांचेकडे परंपरेने चालत आला आहे. परंतु गुरव समाजाला पूजेपासून रोखले जात आहे. हा मान परत न मिळाल्यास आजरा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा गुरव समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. तशा असल्याचे पत्रही महसूल व पोलीस प्रशासनाला दिले आहे.
पुजारी म्हणून देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे नोंद असलेला पुरावा (उतारा) अर्जासोबत जोडत आहे. मुख्यत: गुरव समाजाकडे परंपरेने चालत आलेला पूजेचा मान कोणालाही दादागिरी करून घेता येणार नाही.
देवालयाच्या बांधकामाच्या वेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती मार्फत स्थापन झालेल्या उपसमिती यांना पुजाऱ्यांना हटवण्याचा कोणताही अधिकार नाही. उप समितीच्या लोकांनी पदाचा गैरवापर करून जनतेचा पैशाची लूट केली असल्याचे गावात बोलले जात आहे. व बोगस पावती बुके काढून गैरव्यवहार केला आहे अशा तक्रारी अर्ज वरिष्ठ कार्यालयास दिलेल्या आहेत. त्याची चौकशी चालू आहे. ती चालू राहील. परंतु रविवारपासुन नवरात्र उत्सव चालू होणार असून देवीच्या पूजेचा मान दि १२ पर्यंत मिळावा. या पूर्वीही प्रशासनाला अनेक वेळा अर्ज देऊन चर्चा केली आहे. मात्र अद्याप याबाबत न्याय मिळालेला नाही.
गावात तणाव निर्माण होऊ नये व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कोणतीही वादग्रस्त भूमिका गुरव समाजाने घेतलेली नाही. आजपर्यंत आपल्या सरकारी यंत्रणेकडून योग्य न्याय मिळेल या आशेवर समाज होता. मात्र ज्या लोकांनी पुजाऱ्यांना दमदाटी केली अशाना मंदिरामध्ये पूजा करण्याचा व पुजाऱ्यांना हाकलण्याचा कोणताही अधिकार नाही. अशा लोकांना यंत्रणा पाठीशी घालत आहे हे योग्य नाही.
मंदिराच्या पूजेचा मान दि- १२ पर्यंत न मिळाल्यास नाइलाजाने तहसील कार्यालय, आजरा यांचे कार्यालयाचे दारात दि. १३ ऑक्टोबर पासून बेमुदत धरणे आंदोलन करत असून गावामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सरकारी यंत्रणा जबाबदार राहील. व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कार्यालय जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असेही पत्रात म्हटले आहे.
पत्रावर हरपवडे येथील गुरव समाजातील प्रमुख मंडळींच्या सह्या आहेत.

निवडणूक विभागाकडून ‘मिशन निवडणूक ‘ सुरू …
दहा ग्रामपंचायतीच्या निवडणुका : मतदान यंत्राची तपासणी

………..◼️आजरा- प्रतिनिधी◼️……………
आजरा तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीच्या निवडणूकांच्या रणधुमाळीला आठवडाभरात सुरवात होणार आहे. पुढील महीन्यात (ता. ५) मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागातून जय्यत तयारी सुरु झाली आहे. मतदान यंत्राची चाचपणी निवडणूक विभागाने सुरु केली असून अन्य अनुषंगीक बाबीचीही तयारी करण्यात येत आहे.
तालुक्यातील मसोली, बुरुडे, मेंढोली, हरपवडे, सुलगाव, चांदेवाडी, इटे, देऊळवाडी, वेळवट्टी व पेरणोली या दहा ग्रामपंचायची निवडणूक होत आहे. तर सोहाळे- बाची, खोराटवाडी व जाधेवाडी या ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणुक होत आहे. .या पार्श्वभूमीवर निवडणुक विभाग कार्यरत झाला आहे.
तहसीलदार समीर माने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निवडणूक विभागाचे अधिकारी व महसूल नायब तहसीलदार विकास कोलते यांनी तयारी सुरु केली आहे. मतदान यंत्राची चाचपणी व इतर कामकाज केले जात आहे. निवडणुक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज दिवसभरात ७५ यंत्राची प्राथमिक तपासणी व चाचपणी करण्यात आली. निवडणूक यंत्रात बिघाड होत असल्याने निवडणूक यंत्रणा लागली कामाला अनुषंगाने प्रशासनाकडून कार्यवाही सुरु झाली आहे.
याचा पहिला टप्पा निवडणूक यंत्राची प्राथमिक तपासणी निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्यात आले. तपासणी करण्याचे काम सुरु झाले. एकंदर निवडणूक विभागाचे “मिशन ग्रामपंचायत निवडणूक ‘ सुरू झाले आहे.

निधन वार्ता
सौ.सत्वशीला कांबळे

उत्तूर ता. आजरा येथील सौ. सत्वशीला बाजीराव कांबळे ( वय ५०) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले.
उत्तूर पोलीस आउटपोस्टचे हेड कॉन्स्टेबल बाजीराव कांबळे यांच्या त्या पत्नी होत.


