
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकामध्ये चराटी- शिंपी गटाचे आव्हान राष्ट्रवादीसमोर कायम
.
.. ज्योतिप्रसाद सावंत…
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे नगारे वाजू लागले आहेत. दहा महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने पारंपरिक विरोधक असणारे अशोक अण्णा चराटी व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी एकत्र आले. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सुधिर देसाई यांनी बाजी मारली. एकास एक झालेली लढत व जिल्हा पातळीवरील नेत्यांनी पुरवलेली रसद यामुळे सुधीर देसाई यांना विजयापर्यंत पोहोचता आले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मात्र ही समीकरणे चालतील असे दिसत नाही.
आजरा तालुक्याचा विचार केल्यास तालुक्यामध्ये अशोक अण्णा चराटी व जयवंतराव शिंपी यांचा गावागावात गट आहे. विद्यमान आमदार प्रकाश आबीटकर यांचे बळ शिंपी व चराटी यांना मिळण्याची शक्यता आहे. अण्णा भाऊ संस्था समूहाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे जाळे तालुकाभर पसरले आहे. जयवंतराव शिंपी यांच्या गेल्या पन्नास वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनीही आपले राजकीय अस्तित्व गावागावात टिकवून ठेवले आहे. प्राधान्याने तालुक्याच्या पश्चिम भागात जयवंतराव शिंपी यांना मानणारा मोठा गट आहे. मुळातच महाविकास आघाडी एकत्रित निवडणुकीला सामोरे जाणार की घटक पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढती होणार हा मुद्दा देखील महत्त्वाचा आहे. घटक पक्षांनी स्वतंत्र उमेदवार उभा करून निवडणुकीमध्ये कौल आजमावण्याचा प्रयत्न केला तर याचा निश्चितच फायदा चराटी- शिंपी यांच्या उमेदवारांना होणार आहे. होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली आहे. या पुनर्ररचनेमध्ये आजरा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील मतदान हे पूर्णपणे बाजूला झाले आहे. राहता राहिला प्रश्न तो उर्वरित तालुक्याचा. उर्वरित तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे परंतु जर घटक पक्षानी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला तर मात्र राष्ट्रवादी अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा परिषद निवडणुका व पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक कार्यकर्त्यांनी गेली पाच वर्षे मतदारसंघांची चांगलीच मशागत केली आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या ही मोठी आहे. याचा परिणाम म्हणून महाविकास आघाडीला बंडखोरीचे ग्रहण लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अण्णा- भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक अण्णा चराटी यांचा झालेला पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी निश्चितच लागला आहे. या निवडणुकीत शिंपी यांच्या कांही कार्यकर्त्यांनी चराटी यांच्या उमेदवारीला थेट विरोध दर्शवत सुधीर देसाई यांना मदत केली होती. परंतु हे कार्यकर्ते भविष्यात जर शिंपी हे निवडणूक रिंगणात राहिले तर त्यांच्या पाठीशी राहुन मूळ प्रवाहात सामील होतील असेही दिसते. राज्यस्तरावर तीन महिन्यापूर्वी मोठ्या घडामोडी होऊन राष्ट्रवादीला सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे. यामुळेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक यांची राजकीय समीकरणे ही वेगळी राहणार आहेत.
येत्या दोन-तीन महिन्यात निवडणुका होणार असे गृहोत धरून इच्छुकांनी मतदार संघात आपला संपर्क वाढवून मतदारांच्या गाठीभेटीवर जोर देण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषदेकरिता अशोक चराटी व जयवंतराव शिंपी यांच्या गटातर्फे जयवंतराव शिंपी, सौ.अलका शिंपी, समीर पारदे, सौ. सूनिता रेडेकर, यांची नावे पुढे येऊ लागली आहेत. तर पंचायत समितीकरीता इच्छुकांची संख्या प्रचंड आहे. महाविकास आघाडी एकत्रित लढल्यास इच्छुकांच्या संख्येमध्ये निश्चितच वाढ होणार आहे. परंतु सद्यस्थितीत विचार केल्यास चराटी- शिंपी यांची युती महाविकास आघाडीच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरणार आहे हे नक्की….
भाजपाच्या वरिष्ठ मंडळींची भूमिका महत्त्वाची
माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी हे अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक अण्णा चराटी हे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून ‘कमळ’ या चिन्हावरच निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे यामुळे वरिष्ठ नेत्यांची काय भूमिका राहणार? याकडेही भाजपा कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.


💫💫💫T20 WC 2022 इंग्लंड विश्वविजेता!

🏏मेलबर्नमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत इंग्लंडने विश्वविजेता झाला. पाकिस्तानने विजयासाठी दिलेले 138 धावांचे आव्हान 5 गड्यांच्या मोबदल्यात आणि 6 चेंडू बाकी असताना पूर्ण करत इंग्लंडने वर्ल्डकप उंचावला. इंग्लंडने 2010 नंतर पुन्हा टी-20 वर्ल्डकप जिंकला आहे.
पाकिस्तानने विजयासाठी दिलेल्या 138 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली. शाहीनशाह आफ्रिदी आणि हारिस रौफच्या आग ओकणाऱ्या गोलंदाजीसमोर इंग्लंडची त्रेधातिरपीट उडाली. सेमीफायनलमध्ये भारताविरुद्ध नाबाद अर्धशतक झळकावलेल्या ॲलेक्स हेल्सला शाहीनशाह आफ्रिदीने अवघ्या 1 धावांवर बाद केले. त्यानंतर रौफने फिलीप सॉल्टला 10 आणि कर्णधार जोस बटलरला 26 धावांवर बाद करत इंग्लंडची अवस्था 3 बाद 45 अशी केली.
त्यानंतर मैदानात उतरलेल्या बेन स्टोक्स याने अखेरपर्यंत एक बाजू लावून धरली. त्याने हॅरी ब्रुकसोबत आधी छोटी पण महत्त्वाची भागिदारी केली. ब्रुक 20 धावांवर बाद झाल्यानंतर स्टोक्स आणि मोईन अली यांनी मैदानावर शड्डू ठोकत आधी एकेरी-दुहेरी धावसंख्येवर आणि नंतर चौकार-षटकारांची आतषबाजी करत इंग्लंडला विजयासमीत पोहोचवले.
इंग्लंडला विजयासाठी 7 धावांची आवश्यकता असताना मोईन अली 19 धावा काढून बाद झाला. त्यानंतर विजयाची औपचारिकता स्टोक्स आणि लिविंग्स्टनने पूर्ण केली. स्टोक्सने अखेरपर्यंत नाबाद राहत 55 धावा केल्या. पाकिस्तानकडून रौफने सर्वाधिक 2, तर शादाब खान, शाहीनशाह आफ्रिदी आणि मोहम्मद वसीन ज्यूनियरने प्रत्येकी एक बळी घेतला.
तत्पूर्वी नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानला 8 बाद 137 धावांवर रोखले. पाकिस्तानकडून फक्त चार फलंदाज दुहेरी धावांचा आकडा ओलांडू शकले. मसुदने सर्वाधिक 38, तर बाबर आझमने 32 धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून सॅम करणनने सर्वाधिक 3, तर आदिल राशिद आणि क्रिस जॉर्डनने प्रत्येकी दोन बळी घेतले, तर बेन स्टोक्सला एक बळी मिळाला.






