रेंदाळ येथील पर्यटकांकडून आज- यात गोळीबार…?
रेंदाळ/हुपरी येथून गोवा पर्यटनासाठी निघालेल्या चांदी व्यवसायिकांनी आजरा तालुक्यातील हालेवाडी फाट्यानजिक पिस्तुलच्या सहाय्याने हवेत गोळीबार करून पलायन केल्याची माहिती आजरा पोलिसांना जवळच असणाऱ्या हॉटेल व्यवसायीकाने दिल्यानंतर आजरा पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.
पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने संबंधित संशयीतांना आजरा येथील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी सुरू होती.
शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास इनोव्हा गाडीतून आलेल्या रेंदाळ येथील तरुण चांदी व्यावसायिकांनी रस्त्याशेजारी आपली चार चाकी थांबवून तेथे दंगा करण्यास सुरुवात केली. याबाबत जवळच असणाऱ्या हॉटेल चालकाने त्यांना हटकले असता त्यातील एकाने हवेत गोळीबार केला अशी माहिती संबंधित व्यावसायिकाने पोलिसांशी संपर्क साधून दिली. यामुळे संपूर्ण पोलिस यंत्रणा कामाला लागली. या घटनेमागचे तथ्य शोधण्याची काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतले आहे.या घटनेची चर्चा आजरा तालुक्यात सुरू असून संबंधित तरुणांकडून संशयास्पद असे काही सापडले नसल्याचेही समजते.त्यामुळे या प्रकरणाच्या सत्यतेबाबत तूर्तास प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
……
आठवडा बाजारात मच्छी विक्री वरून स्थानिक नगरसेवकांत धुमशान
प्रशासनासह पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तात्पुरता वाद थंडावला

स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी मागणी करूनही आज आठवडा बाजारादिवशी मच्छी विक्रेते थेट रस्त्यात बसल्याने स्थानिक नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत येथे मच्छी विक्री विरोध केला. नगरपंचायत प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही खुल्यावर मच्छी विक्री होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे असे सांगत नगरसेविका सुमैय्या खेडेकर व अमित खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली आज येथे मच्छीविक्रेत्यांना बसण्यास विरोध करण्यात आला.यावेळी खेडेकर व मुजावर या दोन नगरसेवकांच्या पतीनी परस्परविरोधात दंड थोपटले.
नगरसेविका पतींसह नागरिकांच्या या पवित्र्यामुळे मच्छी विक्रीसाठी आलेल्या विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले. कोणत्याही परिस्थितीत उघड्यावर मच्छी विक्री करू देणार नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने येथे नगरसेविका सुमैय्या खेडेकर व मच्छी विक्रेत्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.

खेडेकर यांनी नागरिकांसह भर रस्त्यात ठाण मांडून मच्छी खरेदी करण्यासाठी जाणाऱ्यांना विरोध दर्शविला. या प्रकाराची नगरपंचायत प्रशासनाने दखल घेत नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, प्रभारी मुख्याधिकारी डी.डी. कोळी यांच्यासह नगरपंचायतीचे अधिकारी आंदोलन स्थळी हजर झाले. एकंदर प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलीसही तैनात करण्यात आले. अखेर पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे, डी.डी. कोळी, नगराध्यक्षा चराटी व आंदोलनकर्त्यांनी चर्चा केल्यानंतर केवळ आठवडाभराची मुदत आंदोलनकर्त्यानी नगरपंचायत प्रशासनाला दिली असून तातडीने सदर मच्छी बाजार इतरत्र हलवण्यात यावा या मागणीबाबत आपली ठाम भूमिका व्यक्त केली.
यावेळी बोलताना नगरसेविका सुमैय्या खेडेकर म्हणाल्या, गेली चार वर्षे येथे मच्छी विक्रेत्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरत असून स्थानिक नागरिकांना रोगराईला सामोरे जावे लागत आहे. अनेक आरोग्य विषयक व सामाजिक प्रश्न येथे निर्माण होऊ लागले आहेत. वारंवार विनंती करूनही नगरपंचायत प्रशासनाकडून याबाबत कोणतीही सकारात्मक कार्यवाही होत नसल्याने आंदोलनाचा पवित्रा घेतला असल्याची त्यांनी स्पष्ट केले. तर अमित खेडेकर यांनी केवळ नगरपंचायतीकडून विक्रेत्यामार्फत कर गोळा केला जातो. स्वच्छतेची कोणतीही जबाबदारी नगरपंचायत उचलत नाही याबद्दल नाराजी व्यक्त केली.
तर नगरसेविका यासिराबी मुजवर यांचे पती मंजूर मुजावर यांनी मच्छी विक्रेत्यांची बाजू घेत आपण नगरपंचायतीचा कर भरत असल्याने आम्हाला कुठे बसवायचे याची जबाबदारी नगरपंचायतीची आहे असे त्यांनी स्पष्ट केले. हा वाद नगरपंचायत व मच्छी विक्रेत्यामधला नसून नगरपंचायत व स्थानिक नागरिकांमधील आहे. त्यामुळे नगरपंचायतीनेच यातून मार्ग काढावा व मच्छी विक्रेत्यांना दिलासा द्यावा असे त्यांनी स्पष्ट केले.मुजावर व खेडेकर यांच्यात शाब्दिक चकमकही उडाली.
यावेळी एकमेकांवर धावून जाणे, एकमेकांना शिवीगाळ करणे असे प्रकारही झाले अखेर पोलीस व नगरपंचायत प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर सदर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
आंदोलन प्रसंगी सुधाकर पांडव, छाया पांडव,आरिफ खेडेकर,सुधाकर वंजारे, आशिष खेडेकर, निसार खेडेकर गुड्डू खेडेकर, मंजूर खेडेकर, वसीम मुल्ला,आयुब लमतुरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.








