mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरक्रीडागुन्हाजीवनमंत्रटेक्नोलॉजीठळक बातम्यादेशबिझनेसभारतमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयरोजगारविदेशसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

रविवार   दि. १४ सप्टेंबर २०२५   

कार झाली… आता ट्रॅक्टरही फोडला

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

धनगरमोळा (ता. आजरा) येथील डोंगरवाडी परिसरात टस्कर तळ ठोकून आहे. टस्कराने उपद्रव सुरु केला आहे. चार दिवसांपूर्वी कारचा चुराडा केल्यानंतर टस्कराने शुक्रवार रात्री कृष्णा शेळे यांचा शेतात कामासाठी लावलेला लहान ट्रॅक्टर फोडला. यामुळे शेळे यांचे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

किटवडे परिसरात वावरणारा टस्कराला वनविभागाच्या रेस्कू टिमने आंबोली गेळे परिसराकडे हुसकावून लावला. त्यानंतर आंबोली परिसरातील वनविभाग व ग्रामस्थांनी त्याला परत आजऱ्याकडे पाठविला आहे. त्यांने सध्या घाटकरवाडी पैकी डोंगरवाडी मुक्काम ठोकला आहे. काल मध्यरात्री तो डोंगरवाडीमध्ये आला. त्यांने कृष्णा शेळे, बाळकृष्ण पाटील, रघुनाथ सुतार, शिवाजी यादव, चेतन यादव, भिमराव जाधव यांचे भात व ऊसाचे नुकसान केले. त्याचबरोबर त्यांनी शेतातील ट्रॅक्टरही फोडला आहे. त्याच्या दहशतीने शेतकरी वर्ग वैतागला आहे. त्याला या परिसरातून हुसकावून लावावे अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

 

महाराष्ट्राच्या शाश्वत विकासासाठी सरकार प्रयत्नशील : आम. शिवाजीराव पाटील

आजरा येथे  ‘सुयश’च्या वतीने गुणगौरव समारंभ उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

वाड्या-वस्त्यांवर शिक्षणाची अवस्था दयनीय आहे. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांकडून सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे यामुळे महाराष्ट्राचा शाश्वत विकास करण्याचे मुख्यमंत्री यांचे स्वप्न लवकरच पूर्णत्वास जाईल. यापुढे चांगल्या शाळा ठीक- ठिकाणी दिसू लागतील असा विश्वास आमदार शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केला. आजरा येथे रामतीर्थ प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था व सुयश शिक्षण संस्थेच्या वतीने तालुक्यातील विविध स्पर्धा परीक्षातील यशस्वी विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक यशस्वी शाळा यासह आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण अशा संयुक्त कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
उपस्थितांचे स्वागत सुयश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुभाष चौगुले यांनी केले.

यावेळी आमदार पाटील पुढे म्हणाले शक्तिपीठ मार्ग या भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे कोणत्याही परिस्थितीत हा मार्ग १००% पूर्णत्वास जाणार आहे. यामुळे पर्यटन, रस्ते, उद्योग, शिक्षण यांच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे स्पष्ट केले. शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याकरता आपण बांधील असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर म्हणाले, आजरा तालुक्यातील सहकार निश्चितच आदर्शवत आहे.रामतीर्थ समूहाने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संस्था चालवून सभासद व ठेवीदारांची विश्वासार्हता जपण्याचे काम केले आहे. संस्थांच्या विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून झपाटलेली मंडळी सुंदर पद्धतीने काम करीत आहेत.

कार्यक्रम प्रसंगी विविध पुरस्कार विजेते विद्यार्थी शिक्षक यांचा विशेष गौरव करण्यात आला.

यावेळी रामतीर्थ समूहाचे संस्थापक जनार्दन नेऊंगरे, शिक्षक संघाचे राज्य कोषाध्यक्ष संभाजी बापट, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष मायकल फर्नांडिस, रामतीर्थ शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ.मारुती डेळेकर यांनी विविध संस्थांच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्याचबरोबर प्राथमिक शिक्षकांचे प्रश्नही मांडले.

कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी बसवराज गुरव, मारुती वरेकर, संजय केसरकर, महादेव तेजम, संतोष शिवणे, शिवाजी कुदळे,दशरथ कांबळे, प्रशांत पाटील, शहानवाज मुल्ला, अर्चना पाटील, सुप्रिया पाटील, आशाताई कोंडुसकर, संयोगिता बापट,विजय पताडे विनायक देसाई, मारुती देसाई, युनूस लाडजी,विश्वास येजरे, रवींद्र नवलकर,विष्णू मोरे, सुभाष केसरकर, पांडुरंग आजगेकर, सुभाष घाटगे, शामराव गुरव,संतोष भाटले, विजय थोरवत, रणजीत सरदेसाई,जितेंद्र भोसले, दयानंद नेउंगरे फादर ॲंथोनी,मंदार बिरजे यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टीईटी निर्णयाबाबत फेरविचार व्हावा..

शासनाने सेवानिवृत्तीला पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी असणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता चाचणी सक्तीची केली आहे. मुळातच शिक्षक वेगवेगळ्या शासनाच्या योजना व उपक्रम राबवताना अडचणीत आला आहे. अशावेळी अशी अट ठेवणे चुकीचे असून याबाबत फेरविचार व्हावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 

भारतीय कम्यूनिष्ट पक्षाचे (लेनीनवादी) आजरा तालूका अधिवेशन संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

भाकप ( मार्क्स लेनीन व लिबरेधन )पक्षाचे एक दिवशीय आजरा तालुका अधिवेशन किसान भवन येथे संपन्न झाले, या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी काँ. शांताराम पाटील होते.

स्वागत व प्रास्ताविक नारायण भंडागे यानी केले.प्रमुख मार्गदर्शक काँ. अतुल दिघे यांनी आजरा तालुका अधिवेशन २०२५ हे भारतीय कम्यूनिष्ट पक्षाचे महाराष्ट्रातील पहिलेच अधिवेशन होत असून, या तालुक्यातील विविधा़ंगी चळवळीचा दबदबा राज्यपातळीवर कायमचा आहे.भाकप हा गरीबांचा व राबणाऱ्या कामगारांसाठी लढणारा पक्ष आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने या तालुक्याचे विकास धोरण ठरवणे आवश्यक आहे. शासन मराठा आरक्षणात दुपटी भुमिका घेत असून, मराठ्यांना आरक्षण ओबिसी कोठ्यातून दिले असे म्हणायचे व ओबिसीना सांगताना तुमच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, असे म्हणत ओबीसी व मराठा समाजामध्ये भांडण लावण्याचे काम हे सरकार करत आहे. जनसुरक्षा कायद्याच्या आडून शासनाची हुकमशाही कडे वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले. काँ. शांताराम पाटील यांनी बोलताना संघटने शिवाय गोरगरीबाना न्याय मिळू शकत नाही. गिरणीकामगाराना मुंबईत घरे मिळवण्या बरोबरच,ग्रामीण भागातील भाजी विक्रेत्याना शहरात बसण्याची जागा देत नव्हते, केवळ संघटनेमुळे प्रश्न सोडवता आला. तालुक्यातील अंगणवाडी सेवीका, जेष्ठ नागरिक, निवृत कर्मचारी पेन्शन वाढीचा प्रश्न, शेती पिकाला हमी भाव,जंगली जनावरांचा उपद्रव, वाढती महागाई आणि बेरोजगारी या विषयानुसार तालुक्यातील साधनसामुग्रीचा विचार करून, वनसंवर्धन, बारमाही हक्काचे पाणी आणी उद्योग उभारणी व शैक्षणिक सोई सवलती साठी योग्य वाटचाल या अधिवेशनाच्या निमित्ताने पुढे घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी कांँ. काशिनाथ मोरे यांनी ठरावांचे वाचन केले. जनसुरक्षा कायदा रद्द करा. शक्तीपीठ नको कर्ज माफी करा. वनं संवर्धन करून, वन्य प्राण्याचा बंदोबस्त करा. शेतीमालाला दीडपट हमीभाव द्या यासह विविध ठराव मांडण्यात आले. या अधिवेशन साठी निरीक्षक म्हणून कृष्णा चौगुले राधानगरी, गोपाळ गावडे चंदगड, दीपक दळवी मुंबई व सुनील बारवाडे इचलकरंजी हे उपस्थित होते. बारवाडे यानी यावेळी समाधान व्यक्त करीत, युवक युवतीना सामावून घेणे आवश्यक असलेचे सांगितले. यावेळी गिता पोतदार यानी महीलाचे प्रश्न व अंधश्रध्दा या विषयी मांडणी केली. सभासदाना ओळखपत्र वाटप करण्यात आले.

यावेळी हिंदूराव कांबळे, निवृत्ती मिसाळे, रघूनाथ कातकर, महादेव होडगे, नारायण राणे, अनीता बागवे, राजेश्री कुंभार, सुधाताई कांबळे, सुमन कांबळे, नंदा वाकर, विध्या मस्कर, मनप्पा बोलके याच्यासह गिरणीकामगार व सभासद उपस्थित होते. सुत्रसंचालन व आभार संजय घाटगे यांनी मानले.

 

निधन वार्ता
चंदर पाटील 

आजरा : मृत्युंजय महा न्यूज वृत्तसेवा 

कोरीवडे येथील चंदर गोविंद पाटील ( वय वर्षे ७५ ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सूना,नातवंडे असा परिवार आहे.पाटील वैद्य म्हणून प्रसिद्ध होते. सामाजिक चळवळ व काँग्रेसचे पर्यावरण विभागाचे जिल्हा सदस्य मारूती पाटील यांचे ते वडील होत.

उद्या सोमवारी रक्षाविसर्जन कार्यक्रम आहे.

राधाबाई देसाई


निंगुडगे ता. आजरा येथील राधाबाई आण्णा देसाई यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली,सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. अमृतेश्वर दूध संस्थेचे संचालक रंगराव देसाई यांच्या त्या मातोश्री होत.

पांडुरंग सावंत

पेरणोली येथील कुरकुंदेश्वर देवस्थानचे पुजारी पांडुरंग गुंडू सावंत वय ६८ यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलगे,दोन भाऊ, सूना, नातवंडे असा परिवार आहे..

 

सर्पदंशाने ‘युवराज’चा दुर्दैवी मृत्यू 

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

साळगाव ता. आजरा येथील पांडुरंग शामराव पाटील यांच्या युवराज नावाच्या बैलाचे सर्पदंशाने निधन झाले. विविध शर्यतीमध्ये डझनभर बक्षीस मिळवलेल्या या बैलाच्या निधनाने पाटील कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले आहे.

 

स्मार्ट मीटर स्थापनेला नागरिकांचा विरोध : युवक वर्ग व ग्रामपंचायतीकडून वीज वितरणला निवेदन

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

उत्तूर भागात नवीन आलेल्या स्मार्ट मीटर स्थापनेला नागरिकांनी जोरदार विरोध दर्शविला आहे. काही ठिकाणी नागरिकांची परवानगी न घेताच हे स्मार्ट मीटर बसवले गेल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. याशिवाय स्मार्ट मीटरमुळे अधिक वीज बिल आकारले जाते, असा समज नागरिकांमध्ये पसरल्याने विरोधाची तीव्रता वाढली आहे.या पार्श्वभूमीवर स्थानिक युवक वर्ग आणि ग्रामपंचायतीने एकत्र येत वीज वितरण चे अधिकारी रेडेकर यांना निवेदन दिले. नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन स्मार्ट मीटरची स्थापना तात्पुरती थांबवावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

ग्रामपंचायतीतर्फे निवेदन देताना सरपंच किरण आमणगी, ग्रामपंचायत सदस्य महेश करंबळी व राजू खोराटे उपस्थित होते. तर युवक वर्गातर्फे विठ्ठल उत्तूरकर, प्रवीण लोकरे, सुनिल रावण,अभिजीत आरेकर, सदानंद व्हनबट्टे, रमेश देशमाने आदींनी सहभाग नोंदवला.

पाऊस पाणी...

आजरा शहरासह परिसरात पावसाने हजेरी लावली. 

 

संबंधित पोस्ट

दोन मुलांसह विवाहिता बेपत्ता…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा मार्गे वर्षा पर्यटकांची संख्या रोडावली…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!