


आजरा येथे दंगल काबू प्रात्यक्षिके…
बस स्थानक परिसर बनला पोलिस छावणी

आजरा : प्रतिनिधी
मराठा आरक्षण, आगामी लोकसभा- विधानसभा निवडणुका जत्रा, यात्रा, विविध सण, जयंत्या या पार्श्वभूमीवर आजरा येथे पोलिसांनी संचलन करत दंगल काबू प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. यामुळे आजरा बस स्थानक परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली आजरा शहरांमध्ये संचलन करत पोलिसांचा ताफा आजरा बस स्थानकात दाखल झाला. यावेळी महिला पोलीस कर्मचारी व इतर पोलिसांनी दंगल काबू प्रात्यक्षिके करून दाखवली. शहरासह तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशाराही यावेळी पोलिसांकडून देण्यात आला.
ही प्रात्यक्षिके पहाण्यासाठी प्रवासी वर्ग व शहरवासीयांनी बस स्थानक परिसरात मोठी गर्दी केली होती.


दुचाकी नव्हे…चक्क ट्रक पलटी

आजरा:प्रतिनिधी
महामार्गाचे काम सुरू असल्याने सुलगाव तिठ्ठयापासून आजरा आगारापर्यंत रस्त्यावर पडलेले खड्डे व वारंवार रस्त्यावर पाणी मारले जात असल्याने दुचाकी घसरून अपघात होताना दिसत असतानाच काल रामतीर्थ फाट्यावर उसाने भरलेला ट्रक पलटी झाला. यामध्ये ड्रायव्हरला किरकोळ दुखापत झाली.काल सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सदर प्रकार घडला.
दुचाकी स्वरांसह अवजड वाहन चालकांनीही आता वाहन चालवताना काळजी घेण्याची गरज यामुळे अधोरेखित झाली आहे.

आजऱ्यात कुटुंब रंगलय काव्यात कार्यक्रमाला प्रतिसाद

आजरा : प्रतिनिधी
येथे कुटुंब रंगलय काव्यात या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिक्षणतपस्वी जे. पी. नाईक पतसंस्था व विद्यावर्धिनी पतसंस्थेच्या राौप्यमहोत्सवानिमित्त काव्य मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रा. विसुभाऊ बापट यांनी अनेक कर्वीच्या कविताचे सादरीकरण करून काव्य रसिकांची मन जिंकली. आपल्या खुमासदार शैलीत संवाद साधत खळखळून हसविले. जे. पी. नाईक पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा. डा. शिवशंकर उपासे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. बळवंत शिंत्रे यांनी विसुभाऊंचा परिचय करून दिला. सुभाष विभूते व डा उपासे यांच्या हस्ते बापट यांचा सत्कार झाला.
तबला वादक सोहम सुतार यांचा सुनील सुतार यांच्या हस्ते सत्कार झाला. मंदार बापट, सुनील शिंदे, विद्याधर गुरबे, शेखर बटकड़ली, जी. एम. पाटील, संभाजी बापट, सुनील चव्हाण, नेहा पाटील, शामली वाघ , काव्य रसिक उपस्थित होते.
कार्यक्रमाला दोन्ही संस्थांचे संचालक मंडळ, सल्लागार मंडळ तसेच मंदार बापट, सुनील शिंत्रे, विदयाधर गुरबे, शेखर बटकडली, जी एम पाटील, संभाजी बापट, सुनील चव्हाण, धनाजी चौगुले, नेहा पाटील,शामली वाघ , दोन्ही पतसंस्थांचे मॅनेजर, कर्मचारी उपस्थित होते. एकनाथ गिलबिले यांनी सुत्र संचलन केले तर सौ. मंजिरी यमगेकर यांनी आभार मानले.(छायाचित्र -संग्रहित)

व्यंकटराव ज्युनिअर कॉलेजमधे बारावी परीक्षार्थींचा शुभेच्छा समारंभ संपन्न

आजरा: प्रतिनिधी
व्यंकटराव ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावी परीक्षा फेब्रुवारी २०२४ ला सामोऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न झाला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी होते.
प्राचार्य आर. जी. कुंभार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच संचालक अभिषेक शिंपी यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कोणताही तणाव न घेता परीक्षेला सामोरे कसे जावे,तसेच भावी आयुष्यात शिक्षण घेण्यासाठी अडचण निर्माण होईल त्यांना मदतीचा हात सुद्धा पुढे केला आणि विद्यार्थ्यांना विश्वास दिला.
यावेळी माजी प्राचार्य व संचालक सुनील देसाई यांनी देखील मुलांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात शिंपी यांनी देखील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
शिवाजी पारळे यांच्यासह शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धेश्वर यांनी केले व आभार पी.एस. गुरव यांनी मानले.
कार्यक्रमाला आजरा महाल शिक्षण मंडळाचे सचिव एस.पी, कांबळे, संचालक व माजी प्राचार्य सुनील देसाई , सुनील पाटील , सचिन शिंपी , अभिषेक शिंपी, पांडुरंग जाधव ,प्राचार्य आर. जी.कुंभार सुपरवायझर शेलार व सर्व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.


आयडीयल कॉलनी येथे शिवजयंती कार्यक्रम

आजरा: प्रतिनिधी
आजरा येथील आयडियल कॉलनी रहिवासी यांचेमार्फत शिवजयंती आणि डॉ.मारुती डेळेकर यांचे शिवचरित्र यांचेवर व्याख्यान असा कार्यक्रम पार पडला .
डॉ.मारुती डेळेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील काही प्रसंग सांगून शिवाजीराजांचा इतिहास स्फूर्तीदायक आहे त्यातून अनेक गोष्टी अनुकरणीय अशा असल्याचे सांगितले.
यावेळी संभाजी बापट,कॉलनी अध्यक्ष , रमेश पाटील उपाध्यक्ष , संजय नार्वेकर, कृष्णा यादव , आणि शेजारील कॉलनी तील लोक ही उपस्थित होते आणि आयडीयल परिवार उपस्थित होता.


निवड…
सानिया चौगुले

रायगड येथे झालेल्या २५ व्या ‘अश्वमेध’ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत आजरा येथील कु.सानिया सुधाकर चौगुले हिची शिवाजी विद्यापीठाच्या उपकर्णधार पदी निवड झाली.





