


पेंढारवाडीत दोन जनावरांना ‘लंपी ‘ ची लागण?
गडहिंग्लज उपविभाग हादरला

पेंढारवाडी (ता. आजरा) येथे दोन बैलवर्गीय जनावरांना ‘लम्पी’ची लागण झाल्याची शक्यता असून त्यांमध्ये लम्पी’ची लक्षणे आढळत असल्याने गडहिंग्लज उपविभागातील शेतकरी वर्गात खळबळ उडाली असून पशुधन खात्याने तातडीने लसीकरण मोहीम सुरू केली आहे.
पंधरा दिवसापूर्वी पेेंढारवाडी येथील स्थानिक शेतकरी तानाजी आजगेेेेकर याांनी शेतीकामासाठी संकेश्वर येथील बाजारातून दोन बैल खरेदी , केले दरम्यान गेल्या चार दिवसापासून त्या जनावरांमध्ये लंंपी या आजाराची लक्षणे दिसू लागली. त्यांच्या आवश्यक त्या तपासण्या करून घेण्याचे काम पशुधन विभागाकडून सुरू असून त्यांना लंपीचा संसर्ग झाला असल्याची शक्यता पशुधन विकास अधिकारी डॉ. पी.डी. ढेेकळे यांनी व्यक्त केली आहे. या प्रकारामुळे गडहिंग्लज आजरा व चंदगड येथील शेतकरी वर्गामध्ये खळबळ उडाली आहे.
लसीकरणाचा वेेग वाढला
स्थानिक पशुधन विभागाने पेंढारवाडी गावात लसीकरणाचा वेग वाढवला असून पेंढारवाडी गावासभोवतालच्या पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सर्व गावागावांमध्ये खबरदारीचा इशारा दिला असून या गावांमध्ये लसीकरण मोहीम वेगाने सुरू केली आहे
त्वरित औषधोपचार सुरू करा
लंपीची लक्षणे जनावरांमध्ये आढळल्यास घाबरून न जाता आवश्यक ती दक्षता घेण्याबरोबरच त्वरित औषधोपचार सुरू करण्याचे आवाहन पशुधन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


प्रा. सुनिल शिंत्रेंचा वाढदिवस उत्साहात साजरा

आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष व (कै) केदारी रेडेकर संस्था समुहाचे सचिव प्रा. सुनिल शिंत्रे यांचा वाढदिवस उत्साहात व साध्या पध्दतीने साजरा झाला. आजरा, गडहिंग्लज व चंदगडमध्ये त्यांना विविध संस्थाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिकांनी शुभेच्छा दिल्या.
प्रा. शिंत्रे यांनी गडहिंग्लज निवासस्थानी व आजऱ्यात शुभेच्छा स्विकारल्या. गडहिंग्लज शहरातील मान्यवर व विविध संस्थाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रा. शिंत्रे यांना शुभेच्छा दिल्या. आजरा येथील शिवसेनेच्या कार्यालयात शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील यांनी प्रा. शिंत्रे यांचा सत्कार केला. दयानंद भोपळे म्हणाले, प्रा. शिंत्रे यांनी आजरा कारखान्याला पुनर्जीवन दिले. त्यांनी आमदार व्हावे. आजरा तालुका शिवसेना प्रमुख युवराज पोवार म्हणाले, प्रा. शिंत्रे यांनी दिलदारपणे राजकारण व समाजकारण केले. त्यांचे सर्वच क्षेत्रातील काम उल्लेखनीय आहे. या वेळी महेश पाटील, ओमकार मादयाळकर, दिनेश कांबळे, समिर चान्द, आकलाख मुजावर, अशोक खोत, सुनिल डोंगरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
आजरा कारखाना कार्यस्थळावर कारखाना प्रशासनाच्यावतीने प्रा. शिंत्रे यांना शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यकारी संचालक डा. तानाजी भोसले, जनरल मॅनेजर वसंतराव गुजर, सचिव व्यंकटेश ज्योती यांच्यासह अधिकारी, कामगार संघटनाचे पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.


गोवंश हत्याबंदीमुळे देशात ‘लम्पी’चा प्रसार?
मोकाट, भटक्या, अशक्त जनावरांमध्ये वेगाने संसर्ग झाल्याचे निरीक्षण

♦️उत्तर प्रदेशातील बाधित आणि मृत्युमुखी पडलेल्या जनावरांचा अधिकृत आकडा मिळाली नाही.
पुणे : उत्तर भारतातील अनेक राज्यांत गोवंश हत्याबंदी कायदा लागू आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि गुजरात या राज्यांमध्ये मोकाट, भटक्या आणि अशक्त जनावरांची संख्या जास्त आहे. याच अशक्त गोवंशात वेगाने लम्पी त्वचारोगाचा संसर्ग झाला. परिणामी उत्तर भारतात लम्पी त्वचारोगामुळे मोठ्या प्रमाणावर पशुधन मुत्युमुखी पडले, असे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.
सध्या भारतातील राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व दिल्ली या राज्यात पशुधनामध्ये रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. पण, सर्वाधिक फटका राज्यस्थान, पंजाब, हरियाणा आणि गुजरातला बसला आहे. उत्तर प्रदेशातील बाधित आणि मृत्युमुखी पडलेल्या जनावरांचा अधिकृत आकडा मिळाली नाही.
केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर विविध राज्यांनी गोवंश हत्याबंदी कायदे केले. त्यानंतर काही जनावरे पांजरपोळ, गोशाळेत गेली. पण, या मोकाट, भटक्या आणि गोशाळेत दाखल झालेल्या भाकड जनावरांचे योग्य पोषण होऊ शकले नाही. त्यांना पुरेसा चारा मिळत नाही. उत्तर प्रदेशात तर क्षमतेहून कित्येक पटीने अधिक गोवंश पांजरपोळांमध्ये आहे. ज्या जनावरांना पुरेसा चारा मिळत नाही, त्या जनावरांचे लसीकरण करण्याचे कष्ट कोण घेणार? अशा दुर्लक्षित, अशक्त जनावरांमध्ये लम्पी त्वचा रोगाचा संसर्ग वेगाने झाला. मुळात जनावरे मोकाट असल्यामुळे आणि पांजरपोळांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक जनावरे असल्यामुळे संसर्ग झाल्यानंतरही जनावरांना योग्य उपचार मिळाले नाहीत, त्यामुळे जनावरे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे.
नक्की झाले काय?
राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात गोवंशाची संख्या जास्त आहे. याच राज्यांनी २०१४ नंतर गोवंश हत्याबंदी कायदा करून त्याची काटेकोर अंमलबजावणी केली. याचा परिणाम म्हणून भाकड जनावरांच्या विक्रीवर बंधने आली. शेतकऱ्यांनी ही भाकड जनावरे मोकाट सोडून दिली. यातील कुपोषित, आजारी जनावरांमुळे रोगाचा प्रसार झाला.
आत्तापर्यंत परिणाम..
संबंधित राज्य सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार नऊ सप्टेंबपर्यंत संपूर्ण देशात ७० हजार १८१ जनावरांचा मृत्यू झाला आहे. राज्यनिहाय विचार करता राज्यस्थानमध्ये सर्वाधिक ४५०६३, पंजाबमध्ये १६८६६, गुजरातमध्ये ५३४४ आणि हरियाणात १८१० जनावरांचा मृत्यू झाला आहे.
उत्तरेकडील राज्यांत गोवंश हत्याबंदी कायद्याचा परिणाम म्हणून भाकड जनावरे मोकाट सोडून देण्याचे प्रमाण अधिक आहे. या मोकाट आणि पांजरपोळांमध्ये मोठय़ा संख्येने असलेल्या जनावरांचे योग्य पोषण होत नाही. ही जनावरे अशक्त होतात आणि रोगाला बळी पडतात. ‘लम्पी’बाबत, अशीच परिस्थिती उत्तर भारतात दिसून आली आहे.
(लेखक : विजय जावंधिया, शेती प्रश्नाचे अभ्यासक)


सरकार स्थापण्याचा खर्च वसूल :मुंबई महापालिकेत 5200 कोटींचा रस्ता दुरुस्ती घोटाळा ; काँग्रेस नेते भाई जगताप यांचा आरोप

शिंदे फडणवीस सरकार स्थापन करण्यासाठी झालेला खर्च वसूल करण्यासाठी शिंदे -फडणवीस सरकारने मुंबई महापालिकेतील प्रशासकाला हाताशी धरून 5200 कोटींचा रस्ता दुरुस्ती घोटाळा केला आहे, असा आरोप गुरुवारी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना खूश करण्यासाठी व गुजरातच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्रात येणारा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प शिंदे-फडणवीस सरकारने गुजरातला पळवल्याची टीकाही त्यांनी केली.
अन् टेंडर काढले…
भाई जगताप म्हणाले की, मुंबई महापालिकेकडून प्रशासकाची नेमणूक झाल्यानंतर मुंबईतील रस्त्यांच्या दुरुस्तीकरिता मुंबई महापालिकेकडून निविदा (टेंडर) काढण्यात आली. पण मुंबई महापालिका प्रशासक इकबालसिंह चहल यांनी 5200 कोटींची निविदा काढली व त्यासाठी 500 ते 600 कोटी एकत्रीकरण (मोबिलाइझेशन) अॅडव्हान्स म्हणून कंत्राटदाराला देण्याचे जाहीर केले.
अधिकाराविना निर्णय…
जगताप पुढे म्हणाले, मुळात प्रशासकाला एवढा मोठा टेंडर काढण्याचा अधिकारच नसतो. हा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेतला जातो. तसेच मोबिलायझेशन अॅडव्हान्स देणे हे महापालिकेच्या कायद्यात बसत नाही. ही संपूर्ण प्रक्रिया बेकायदेशीर व नियमबाह्य रित्या करण्यात आलेली आहे आणि हा एक मोठा रस्ता दुरुस्ती टेंडर घोटाळा आहे. मागील 5 वर्षांत 4,500 ते 5,000 कोटी रुपये इतका रस्ते दुरुस्तीसाठी खर्च करण्यात आला. मग आता पुन्हा 5200 कोटी रुपयांचे टेंडर काढण्याची काय गरज होती, असा सवाल त्यांनी केले.
दोषी कंपनीला कंत्राट…
जगताप म्हणाले, हे काम 2015-16 साली रस्ते घोटाळ्यामध्ये दोषी असलेल्या व महापालिकेच्या काळ्या यादीत असलेल्या जे. कुमार या कंत्राटदार कंपनीलाच का देण्यात आले? हा सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे व ही जनतेच्या पैशाची लूट सुरू आहे. हा खूप मोठा रस्ता दुरुस्ती घोटाळा आहे. शिंदे फडणवीस सरकार स्थापन करण्यासाठी झालेला खर्च वसूल करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारचा मुंबई महानगरपालिकेतील प्रशासकाला हाताशी धरून हा रस्ता दुरुस्ती घोटाळा आहे असा आमचा आरोप आहे.
न्यायालयीन चौकशी करा…
जगताप म्हणाले, या प्रकरणाची सखोल न्यायालयीन चौकशी व्हावी. यासाठी मुंबई काँग्रेसतर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महापालिका प्रशासक इकबाल सिंह चहल यांना पत्र देण्यात आले आहे. येत्या सात दिवसांमध्ये या प्रकरणामध्ये कोणतीही कारवाई झाली नाही, तर आम्ही या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत असलेल्या सीसीआय (Competition Commission of India) मध्ये जाऊन याबाबत तक्रार दाखल करणार आहोत. तसेच सखोल चौकशीची मागणी करणार आहोत.
प्रशासकाला धरले हाताशी…
भाई जगताप पुढे म्हणाले की, मुंबई महापालिकेत प्रशासकाची नेमणूक करून पाच ते सहा महिने झाले आहेत. परंतु महाराष्ट्रात हे ईडी सरकार म्हणजेच हे एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर एका महिन्यातच मुंबई महानगरपालिकेत रस्ते दुरुस्तीचा 5200 कोटींचा घोटाळा प्रशासक इकबाल सिंह चहल यांना हाताशी धरून करण्यात आला आहे. हा घोटाळा कोणाच्या सांगण्यावरून किंवा दबावाखाली करण्यात आला आहे का? याची सखोल न्यायालयीन चौकशी ही झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
(source : chat.whatsapp.com)



