
बिबट्याच्या हल्ल्यात गाय व शेळी ठार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली धनगर वाडा येथे चरण्यासाठी सोडलेल्या दादू येडगे यांच्या मालकीच्या गायीसह शेळीवर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये गाय व शेळी मृत पावली आहे. या प्रकारामुळे पेरणी धनगरवाडा परिसरात भीतीचे वातावरण आहे.

याबाबत स्थानिक नागरिकांकडून मिळालेली माहिती अशी की, रविवारी सायंकाळच्या सुमारास करण्यासाठी सोडलेल्या जनावरांपैकी गाय व शेळी आढळून न आल्याने त्यांचा शोध घेतला असता दोन्ही मृतावस्थेत सापडली. हल्ल्याची पद्धत व जवळ असणारे पायाच्या पंजाचे ठसे पाहता सदर हल्ला हा बिबट्याकडून झाल्याचे स्पष्ट होत आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता याबाबत आपणाला कांहीही कल्पना नाही असे सांगण्यात आले. तर या परिसरात बिबट्याचा कित्येक दिवसांपासून वावर असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात.

टोल प्रश्नी २२ जुलै रोजी तहसील समोर धरणे आंदोलन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
२२ जुलै रोजी टोलमुक्ती संघर्ष समिती तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत.याबाबतचे निवेदन आज तहसीलदारांना टोलसंघर्ष समितीतर्फे देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, संकेश्वर -बांदा महामार्ग हे तांत्रिकदृष्ट्या व कायदेशीररित्या टोलसाठी पात्र नसतानासुद्धा तालुक्यातील तसेच आसपाससच्या तालुक्यातील जनतेला टोल का लादला जात आहे. या टोल नाक्याला जनतेचा तिव्र विरोध असून २४ जून रोजी प्रस्तावीत टोल नाक्यावर आजरा तालुक्यातील जनतेने मोर्चाने जात आपल्या तिव्र भावना व्यक्त केल्या होत्या. या मोर्चावेळी सर्व पक्षीय नेते, आजी माजी आमदार उपस्थित होते त्यांनीसुद्धा या टोलसाठी विरोध केला आहे.
त्याचप्रमाणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी मोबाईलवरून आंदोलनकर्त्याशी संपर्क साधून केंद्रीय दळणवळण मंत्री यांचेसोबत बैठक घेऊन टोलचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. याला जवळ जवळ २० दिवस लोटून गेले तरी आजअखेर कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला दिसत नाही.
टोल हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा संघर्ष समितीने निर्धार करीत लढ्याला आणखीन तिव्र करण्यासाठी या लढ्याचाच एक भाग म्हणून सोमवार २२ जुलै रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याबाबत निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर परशुराम बामणे (भाऊजी), कॉ. संपत देसाई, प्रभाकर कोरवी (जिल्हाध्यक्ष, आखिल भारतीय जनहित पार्टी), पांडुरंग सावरतकर,
बंडोपंत चव्हाण, प्रकाश मोरुस्कर, मुकुंदादा देसाई, संभाजी पाटील (शिवसेना उ बा ठा), किरण के के , परशुराम शेटगे, रवींद्र भाटले, सुरेश होडगे, डॉ. उल्हास त्रिरत्ने, सुरेश दिवेकर आदिंच्या सह्या आहेत.

गणेश जाधव याची प्रशासकीय अधिकारी पदी निवड

आजरा मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिवाजीनगर, आजरा येथील गणेश प्रभाकर जाधव यांची केंद्र सरकारच्या वित्त विभागामध्ये प्रशासकीय अधिकारी पदी निवड झाली आहे.
गणेश याचे माध्यमिक शिक्षण आजरा हायस्कूलमध्ये तर बीई (स्थापत्य) चे शिक्षण संत गजानन शिक्षण समूहामध्ये झाले आहे.
वडिलांच्या पश्चात बेताची परिस्थिती असणाऱ्या गणेश याने मोठ्या जिद्दीने या पदापर्यंत मजल मारली आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. यापूर्वी त्याची ‘ कोण बनणार करोडपती ?’या सुप्रसिद्ध कार्यक्रमांमध्ये निवड झाली होती.

छ. शिवराय पुतळा कमिटीने जमा रक्कम खर्चाचा हिशोब सादर करावा
अन्याय निवारण समितीची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
चार वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज परिसर सुशोभीकरण व पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीचे काम सुरु असून यासाठी ज्यांनी ज्यांनी देणग्या दिलेल्या आहेत त्यांची नावे प्रसिद्ध करून जमाखर्चाचे फलक लावून पारदर्शी व्यवहार करावेत अशा मागणीचे निवेदन अन्याय निवारण समितीमार्फत जीर्णोद्धार समितीला देण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा उभारून तेथील परिसर सुशोभीत करण्याचे काम सुरु आहे. हा उपक्रम सार्वजनिक वर्गणीतून राबविला जात असल्यामुळे या उपक्रमासाठी देणगी देणाऱ्या देणगीदारांची नावे, संस्थांची नावे त्याचप्रमाणे मंडळाची नावे त्यांनी दिलेल्या देणगी रक्कमांसह व या कामाकरिता आजतागायत किती रक्कम जमा झाली व किती खर्च झाली आहे याची सविस्तर माहिती जीर्णोद्धार समितीकडून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात प्रसिद्ध करावी. जेणेकरुन यामधील पारदर्शकता वाढेल आणि आणखी काही दानशूर व्यक्ती उर्वरित कामाकरीता मदत करतील व जीर्णोद्धाराचे काम पूर्ण करण्यास मदत होईल असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
हे निवेदन जीर्णोद्धार समितीला देण्यात आले असून या निवेदनावर परशुराम बामणे, सुधीर कुंभार, पांडुरंग सावरतकर, विजय
थोरवत, दिनकर जाधव, गौरव देशपांडे, जोतिबा आजगेकर, दत्तात्रय मोहिते, सुरेश गावडे, रविंद्र नेवरेकर, संजय जोशी, बंडोपंत चव्हाण,आदींच्या सह्या आहेत.

पाऊस पाणी

काल दिवसभर पावसाचा जोर ओसरला असून आजरा मंडल मध्ये गेल्या २४ तासात ७ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. चित्री मध्यम प्रकल्पामध्ये ६८.८१% ( १२९८ दशलक्ष घनफूट) तर आंबेओहोळ प्रकल्पामध्ये ८४ टक्के (१०४५ दशलक्ष घनफूट ) इतका पाणीसाठा आहे. उचंगी मध्यम प्रकल्पामध्ये ४२.३२ %( १४१.९७ दशलक्ष घनफूट )इतका पाणीसाठा झाला आहे.

