
उचंगी प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतीकडे जाणारा रस्ता शेतकऱ्याने केला बंद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोळींद्रे (ता. आजरा) येथील उचंगी प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतीमध्ये जाणारा रस्ता शेतकऱ्यांने आज बंद केला. रस्त्यासाठी अकरा गुंठे जागा देवून पाटबंधारे विभागाने मोबदला दिला नाही. मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज शेतकरी भानुदास विष्णु पाटील यांनी पाऊल उचलले आहे. कार्यकारी अभियंता, प्रांताधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देवून देखील कार्यवाही झाली नसल्याने रस्ता बंद केल्याचे शेतकरी पाटील यांनी सांगीतले.
लघु पाटबंधारे विभाग उचंगी अंतर्गत कोळींद्रे येथे नवीन वसाहत तयार करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी या वसाहतीकडे जाण्यासाठी रस्ता करण्यात आला आहे. यासाठी शेतकरी श्री. पाटील यांनी त्यांची जमिन गट नंबर १५०/ अ मधून अकरा गुंठे जमीन देवून रस्ता दिला आहे. रस्त्यासाठी जमिन प्रदान करून देखील त्यांना अद्याप जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. याबाबत वारंवार लेखी व तोंडी मागणी करून देखील दुर्लक्ष केल्याचा आरोप श्री. पाटील केला आहे. पंधरा दिवसांपूर्वी याबाबत कार्यकारी अभियंता, कालवे विभाग यांना निवेदन देवून मोबदल्याची मागणी केली होती. याच्या प्रति प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना देण्यात आल्या होत्या. संबंधीत निवेदनात पंधरा दिवसात याबाबत मार्ग न काढल्यास रस्ता बंद करण्याचा इशारा दिला होता.
काल विविध विभागांचे अधिकारी पाटील, मंडल अधिकारी , तलाठी यांनी येवून शेतकरी भानुदास विष्णू पाटील यांना विनंती केली. श्री. पाटील यांनी मोबदल्याबाबत लेखी मागणी केली. त्यानंतर रस्ता बंद केला.

विशाळगड घटना निंदनीय
मुस्लिम समाजाकडून निषेध

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली विशाळगड ही ऐतिहासिक भूमी आहे. या ऐतिहासिक गडावर काहींनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेले आहे. अतिक्रमणाबाबतचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहे. दरम्यान या पवित्र भूमीवर दारू पिणे, मांसाहार करणे, जुगार खेळणे, अश्लील चाळे करणे असे निंदनीय प्रकार राजरोस घडत आहेत. त्यामुळे या अवैध गोष्टी कायमच्या बंद होण्यासाठी विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करणे ही शासनाची सर्वस्वी जबाबदारी आहे.
परंतु अतिक्रमणाच्या नावाखाली रविवार दि. १४/७/२०२४ रोजी काही समाजकंटकांनी विशाळगडावर आणि पायथ्याशी गावातील मुस्लिम समुदायाला पूर्वनियोजित लक्ष्य बनवून भ्याड हल्ला केला आहे. दगडफेक आणि जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला आहे. मशिदीची व दर्ग्याची तसेच घरांची, दुकानांची व वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करून दगडफेक केलेली आहे. महिला व लहान मुलांवर तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या वर सुद्धा जीव घेणे हल्ले केले आहेत.
ही घटना अत्यंत निंदनीय असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेचा समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने जाहीर निषेध करत असून कायदा हातात घेऊन दहशत माजविणाऱ्या व भ्याड हल्ले करणाऱ्या समाजकंटकावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. या विकृत प्रवृत्तीच्या मागे असणाऱ्या सूत्रधारांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत. या दुर्दैवी घटनेत झालेली नुकसान भरपाई हल्लेखोर समाजकंटकांच्याकडून वसुल केली पाहिजे. अन्यथा न्याय हक्कासाठी सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडावे लागेल अशा आशयाचे निवेदन आजरा तहसीलदारांना देण्यात आले आहे. निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांनी निवेदन स्विकारले.
यावेळी अरिफ खेडेकर, अमजद माणगावकर ,जुबेर माणगावकर, समीर चांद, कुदरत लतीफ, मोईन काकतीकर ,गौस मुल्ला, इरफान काजी, समीर खेडेकर यांच्यासह मुस्लिम बांधव उपस्थित होते.
हल्लेखोरांवर कडक कारवाई करा…पुरोगामी पक्ष, संघटनांची मागणी..
विशाळगड येथे घडलेली घटना ही कायदा धाब्यावर बसवणारी असून कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई करा अशी मागणी पत्रकाद्वारे आजरा तालुक्यतील पुरोगामी पक्ष संघटनांनी केली आहे.
विशाळगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा एक महत्वाचा साक्षीदार आहे. त्याचे संवर्धन आणि जतन करण्याची जबाबदारी पुरातत्व विभागाबरोबर शासनाचीही आहे. त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण असू नये असे आमचेही मत आहे. ते अतिक्रमण पुरातत्व विभाग आणि महाराष्ट्र शासनाने संयुक्तीतपणे कायदेशीर मार्गाने काढणे गरजेचे होते. पण पुरातत्व विभागाने आणि शासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले कि काय अशी आम्हाला शंका येते. खरतरं संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने त्यांच्याशी संवाद करणे गरजेचे होते. पण प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. आंदोलन गांभीर्याने घेतले नाही. याचाच फायदा घेत कांही समाजकंटकांनी कायदा हातात घेत विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या मुस्लीम व इतर समाजातील कुटुंबावर हल्ला केला.
खरतर गजापूर या गावाचा अतिक्रमणाशी अर्थाअर्थी कांही संबंध नसतांना आंदोलनाचा गैरफायदा घेत हे कृत्य घडवलं गेलं. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि हल्लेखोरांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी करतो. हा किल्ला जसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा साक्षीदार तर तसाच तो हिंदू-मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या मलिक रेहान बाबाच्या दर्ग्यासाठीही प्रसिध्द आहे. लाखो हिंदू भाविक देखील या दर्ग्याच्या दर्शनासाठी जात असतात. त्यामुळे या गडाचे संवर्धन आणि जतन करणे महत्वाचे आहे. त्यासाठी अतिक्रमण मुक्त विशाळगड झाला पाहिजे, यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करून हे अतिक्रमण काढून टाकले पाहिजे. पऱंतु घटना ज्या पध्दतशीरपणे घडवली गेली त्यामागे कोणाचा हात आहे हे सुध्दा पोलीस प्रशासनाने शोधले पाहिजे. सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या आणि कायदा हातात घेऊन हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशा मागणी कॉ संपत देसाई, डॉ नवनाथ शिंदे, कॉ शांताराम पाटील, संतोष मासोळे, प्रकाश मोरुस्कर, प्रकाश मोरुस्कर, संजय घाटगे, काशिनाथ मोरे, अजय देशमुख, शिवाजी सम्राट, डी के कांबळे, दशरथ घुरे, व्ही डी जाधव, नारायण भडांगे, बाळू जाधव, शिवाजी भगूत्रे इत्यादींनी पत्रकाद्वारे केली आहे.

व्यंकटराव हायस्कूलमध्ये पारितोषिक व सत्कार समारंभ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेतील इयत्ता दहावी परीक्षेतील गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ व विविध परीक्षा, सामाजिक व शैक्षणिक कार्यात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या प्रतिभावान शिक्षकांचाही गुणगौरव सोहळा संपन्न झाला.
प्रशालेतील पहिले पाच विद्यार्थी कु.खवरे कादंबरी जयदीप. ९८.६०%(आजरा तालुक्यात प्रथम), नवार राखी राजू ९७.४०% (आजरा तालुक्यात द्वितीय), पाटील आदित्यराज दीपक९५.८०% (आजरा केंद्रात तृतीय),कु येरूडकर मेघा श्रीधर ९५.६०%, कु. शिवणे समृद्धी सुरेश ९३.८०%. या पाच विद्यार्थ्यांना व विषयवार प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांसह सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष श्री जयवंतराव शिंपी , संचालक मंडळ तसेच दाते मंडळी यांची हस्ते करण्यात आला.
गुणवंत विद्यार्थ्यांबरोबरच गुणवंत व यशवंत शिक्षकांचाही सत्कार सोहळा संपन्न झाला.मुख्याध्यापक संघाच्या अभ्यासक्रम समितीवर व्यंकटराव प्रशालेतील चार शिक्षकांची निवड झाली श्री कृष्णा दावणे, श्री प्रशांत गुरव, श्री संजय भोये व सौ. एस.डी.इलगे व विविध परीक्षांमधील मार्गदर्शक शिक्षकांचा अध्यक्ष श्री. जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्राचार्य श्री आर.जी कुंभार यांनी प्रास्ताविकामध्ये शाळेतील राबविलेल्या विविध उपक्रमातील, परीक्षेतील प्रशालेने मिळवलेले यश आणि या यशामध्ये सहभागी शिक्षक विद्यार्थी यांची यशोगाथा कथन केली. स्कॉलरशिप, एन एम एम एस, एम टी एस, एन टी एस, एन सी सी विभाग, क्रीडा विभागातील यश, शासकीय चित्रकला परीक्षेतील विद्यार्थ्यांचे यश, शाळासिद्धि मधील शिक्षक वृंदांचे योगदान व यश, इ. दहावी व वरील सर्व परीक्षांसाठी शिक्षकांनी घेतलेल्या जादा तासातील मेहनतीचे कौतुक केले.
शिक्षक मनोगतामध्ये सौ.ए.डी.पुंडपळ, पालक मनोगतामध्ये श्री संजय भोसले सर यांनी आपले विचार मांडले.अध्यक्षीय भाषणात श्री जयवंतराव शिंपी साहेब यांनी सांगितले की, आजरा तालुक्यातील बहुजन समाजातील ,खेडोपाड्यातील सर्वसामान्य कुटुंबातील मुला- मुलींना शिक्षणाची व अभ्यासाची गोडी लावून शिक्षण देणाऱ्या या आमच्या व्यंकटराव प्रशालेतील शिक्षकांचा वाटा महत्त्वाचा आहे. म्हणूनच आज सामान्य कुटुंबातील मुलीही आजच्या या पारितोषिक वितरण समारंभात आजरा तालुक्यात प्रथम, द्वितीय येण्याचा मान मिळवताना दिसत आहेत. यामध्ये त्यांची अभ्यासातील जिद्द पालकांची व शिक्षकांची मेहनतीला फळ आल्याचे दिसत आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीमधील येणाऱ्या प्रत्येक अडचणी आपण आपल्या परीने सोडवणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव श्री. एस.पी. कांबळे, संचालक श्री. पांडुरंग जाधव, माजी प्राचार्य व संचालक श्री सुनील देसाई, श्री सचिन शिंपी, श्री. अभिषेक शिंपी, श्री. ए. के. पावले , श्री संभाजी इंजल , श्रीमती माद्याळकर, तसेच भादवण हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. संजयकुमार पाटील, देवर्डे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री सुभाष सावंत , उपस्थित होते.
सूत्रसंचालन श्री. विलास गवारी व श्री. संजय भोये यांनी आभार मानले.

स्वामी विवेकानंद विद्यामंदिरात विठ्ठल नामाचा जागर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला स्वामी विवेकानंद विद्यामंदिरात विठ्ठल नामाचा जागर करण्यात आला. या निमित्ताने विठ्ठल व रखुमाईच्या वेषातील दोन विद्यार्थ्यांसह अनेक विद्यार्थी वारकऱ्यांच्या पारंपरिक वेषात आले होते. परिपाठाच्या वेळी खांद्यावर पताका आणि डोक्यावर तुळस घेऊन टाळ व टाळ्यांच्या गजरात विठ्ठलनामाचा घोष करण्यात आला.
चिमुकल्या वारकऱ्यांची प्रथम राम मंदिर व नंतर विठ्ठल मंदिरापर्यंत दिंडी काढण्यात आली. दोन्ही मंदिरांत विठ्ठलनाम जयघोषाबरोबर मनसोक्त फुगडी खेळ रंगला. समारोपापूर्वी विठ्ठल मंदिरामध्ये मुख्याध्यापक सुनील सुतार यांनी मार्गदर्शनपर मनोगतातून विठ्ठलनामाबरोबर अभ्यासाची लिंक कशी जोडायची हे स्पष्ट केले.
मुख्याध्यापक सुनील सुतार यांच्यासह विजयालक्ष्मी देसाई, संयोगिता सुतार, राजाराम गाडीवड्ड, संतोषी कुंभार व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

पाऊस – पाणी
आजरा मंडल मध्ये गेल्या २४ तासात १७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून आंबेओहोळ मध्यम प्रकल्पात ८४% (१०५७ दशलक्ष घनफूट) इतका तर चित्री मध्यम प्रकल्पात ७०.८% ( १३३७ दशलक्ष घनफूट) इतका पाणीसाठा झाला आहे. उचंगी मध्यम प्रकल्पामध्ये ४४.७३ % ( १५०.०४ दशलक्ष घनफूट) इतका पाणी साठा झाला आहे
कला




