गुरुवार दि. ९ जानेवारी २०२५

राजेंद्र देसाई यांचे निधन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील राजेंद्र उर्फ अजय गोवींद देसाई (वय ६० वर्षे) यांचे अल्पश: आजाराने आज गुरुवारी दुपारी एक वाजता कोल्हापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुलगे, असा परिवार आहे. येथील आजरा अर्बन बँकेच्या माजी संचालिका श्रीमती उषा देसाई यांचे ते चिरंजीव व उद्योजक मानसिंगराव खोराटे यांचे मेहुणे होत. जय शिवराय क्रीडा मंडळ व आजरा शिवसेनेचे ते संस्थापक सदस्य होते. क्रशर चालक म्हणूनही ते परिचित होते.
सायं. पाच वाजता आजरा येथे अंत्यसंस्कार विधी होणार आहेत.

सूडबुद्धीने आग… उसासह आंबा व नारळ बाग उध्वस्त

उत्तुर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिप्पूर ता. आजरा येथे आंबेओहोळ धरणाशेजारी असणाऱ्या म्हारकी नावाच्या शेतातील गट नंबर ८३४, ८३५, ८३७ व ८३८ मध्ये असणाऱ्या निवृत्ती थळु कांबळे, वसंत श्रीपती कांबळे, दत्तात्रय पिराजी कांबळे व श्रीकांत पिराजी कांबळे यांच्या शेतातील उभ्या ऊस पिकासह आंब्याची कलमे व नारळाच्या बागेला अज्ञातांनी सूडबुद्धीने लावलेल्या आगीत सुमारे दोन लाख १८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
आगीमध्ये केवळ झाडांचेच नाही तर पाईपलाईनच्या पाईपचे मोठे नुकसान झाले आहे. या बाबतची तक्रार वसंत श्रीपती कांबळे यांनी आजरा पोलिसात दिली आहे.

देवर्डे येथे अपघातात दोघे जखमी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दुचाकी दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पोला धडकून आजरा- आंबोली मार्गावरील देवर्डे फाट्यानजीक झालेल्या अपघातात मेढेवाडी येथील आप्पासाहेब बळीराम बागडी व दर्डेवाडी येथील जयसिंग तेजम हे दोघेजण जखमी झाले आहेत.
यापैकी बागडी यांना उपचारासाठी गडहिंग्लज येथे खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले असून तेजम हे किरकोळ जखमी झाले आहेत.
बुधवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सदर अपघात झाला.

संकेश्वर बांदा महामार्ग बाधित शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांना १० कोटी ७६ लाख रुपये मिळणार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संकेश्वर- बांदा महामार्ग बाधीत आजरा तालुक्यातील १२ गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या निवाडा रक्कमेच्या दुसऱ्या टप्प्यातील रक्कमेचे वाटप भुसंपादन विभागाच्यावतीने सुरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांना १० कोटी ७६ लाख रुपये मिळणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाची भावना आहे.
संकेश्वर- बांदा महामार्ग हा आजरा तालुक्यातून सुमारे ३० किलोमीटर जातो. यामध्ये १२ गावातील बाधीत झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई भुसंपादन विभागाच्यावतीने देण्यात येत आहे. यामध्ये शेती, घरे, फळझाडे, जंगली झाडे, कुपनलिका, विहीरी हे बाधीत झाले आहेत. खोराटवाडी, भादवण, मडिलगे, खेडे, मुंगुसवाडी, सुलगाव, आजरा, मसोली, हाळोली, वेळवट्टी, गवसे सुळेरान या गावातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. शासनाच्या प्रत्येक गावातील रेडिरेकनरच्या दराच्या दुप्पट भरपाई देण्यात येत आहे. यापुर्वीच्या पहिल्या टप्प्यात सुमारे १४ कोटीची निवाडा रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली. आता दुसऱ्या टप्प्यातील रक्कमेचे वाटप करण्यात येत आहे. महामार्ग बाधीत शेतकऱ्यांनी यासाठी शासनाबरोबर लोकशाही मार्गाने संघर्ष केला होता. यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु होता.

दुस-यांची स्वप्नं पूर्ण करणं हे पुण्याचं काम – नामदार प्रकाशराव आबिटकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
स्वतःची स्वप्नं पूर्ण करताना माणसाची अक्षरशः दमछाक होते. जीव मेटाकुटीला येतो. आयुष्यामध्ये स्वतःच्या घराचं स्वप्नं प्रत्येकजण पाहत असतो. स्वतःचं घर व्हावं यासाठी माणूस रात्रंदिवस झटत असतो. अशा परिस्थितीत एक खंबीर आधार देण्याचं काम जनता सहकारी गृहतारण संस्था नेहमीच करत आली आहे. दुस-याचं घर व्हावं अशी मनीषा बाळगून ते प्रत्यक्षात उतरविण्याचं पुण्याचं कार्य संस्था करीत आहे. असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाशराव आबिटकर यांनी काढले.
जनता गृहतारण संस्थेच्या स्थलांतरीत नवीन कार्यालयाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून चंदगड विधानसभेचे नूतन आमदार शिवाजीराव पाटील व अण्णा-भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी व सहायक निबंधक एस. बी. येजरे उपस्थित होते.संस्थाध्यक्ष मारूती मोरे अध्यक्षस्थानी होते.
आमदार शिवाजीराव पाटील म्हणाले, सप्टेंबर २००१ मध्ये स्थापन झालेल्या संस्थेची रौप्यमहात्सवाकडे वाटचाल सुरु असताना संस्थेला राज्य कार्यक्षेत्र व आयएसओ मानांकन मिळणे हे संस्थेच्या प्रगतीचे द्योतक आहे.
अशोकअण्णा चराटी यांनी सभासद, ठेवीदार आणि कर्जदार यांच्या विश्वासास पात्र ठरलेली संस्था संचालक मंडळाचा पारदर्शी कारभार, काटकसरीचे धोरण, घरपोच, तत्पर व विनम्र सेवा यामुळे ‘माणसं जोडणारी संस्था’ म्हणून अल्पावधितच नावारूपाला आली आहे.
स्वागत व प्रास्ताविक प्रा. अशोक बाचुळकर यांनी केले. आभार व्हाईस चेअरमन गणपतराव अरळगुंडकर यांनी मानले. तर सूत्रसंचालन प्रा. आनंद चव्हाण यांनी केले.
कार्यक्रमासाठी संचालक प्राचार्य अशोक सादळे, प्रा. तानाजी कावळे, शिवाजी पाटील, प्रा. संजय गायकवाड, प्रा. तानाजी पाटील, प्राचार्य बाळकृष्ण चौगुले, डॉ. टी. एन. पवार, डॉ. अशोक दोरूगडे, डॉ. संजय पाटील, सौ. एल. डी. शेटे, सौ. नेहा पेडणेकर, महादेव मोरूस्कर, बी. एस. कडवाले, प्रा. विनायक प्रा. मनोज देसाई, सुभाष डोंगरे, मैंनेजर मधुकर खवरे, प्रशासकीय अधिकारी, दत्तात्रय मोहिते, शिवाजी बिद्रे, डॉ. रवींद्र गुरव, सिद्धेश नाईक, सागर कुंभार आदि मान्यवर उपस्थित होते.

हंदेवाडी येथे एकदिवशीय कला महोत्सव उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हंदेवाडी ता. आजरा येथे एक दिवशीय कला महोत्सव उत्साहात पार पडला.श्री विठ्ठल रुक्मिणी प्रतिमा पूजन व ह.भ.प. सत्तुराम लोहार व मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास राम कृष्ण हरी भजनी मंडळ हंदेवाडी यांच्या भजन गायनाने सुरुवात झाली.
यानंतर नुल येथील श्री लक्ष्मी शिव भजनी मंडळाने भजन सादर केले.यानंतर क्रमशः महागाव येथील शाहीर मारुती केसरकर व पार्टी,उत्तुर व होनेवाडी येथील शाहिरी कार्यक्रम, पांगिरे येथील शाहीर व गायक व कवी परशुराम गुरव ,शाहीर पंतोजी भाटले यांचे शाहिरी गायन,अवधूत भजनी मंडळ पांगीरे,पुढे निटुर येथील श्री ज्योतिर्लिंग महिला हरिपाठ मंडळाने उत्कृष्ठ हरिपाठ सादर केला,नंतर केंचेवाडी येथील श्री देव चव्हाटा महिला हरिपाठ मंडळाने उत्कृष्ठ हरिपाठ व गायक परसू निंबाळकर यांच्या ग्रुपने भजन सादर केले.
तसेच यानंतर हंदेवाडी येथील श्री ब्रम्हदेव भजनी मंडळाने हरिपाठ सादर केला.यावेळी सहभागी गायक व कोरस याना पत्रकार पुंडलिक सुतार यांनी प्रसिध्द शिवव्याख्याते अखलाकभाई मुजावर व आदर्श समाजसेविका सौ. मोनिका पिटर डांटस व त्यांचे पती पिटर डांटस,सुरेश बुगडे ,मुख्याध्यापक पांडुरंग शिवूडकर, माजी प्राचार्य एम. डी. कदम,लोक कलाकार संघटनेचे तालुका अध्यक्ष शाहीर राजाराम कोपटकर,भुदरगडथछ लोक कलाकार संघटनेचे तालुका अध्यक्ष गायक कलाकार भैरवनाथ भराडे, माजी उपसरपंच व सदस्य सदाशिव हेब्बाकर, मंगल हेब्बाळकर, माया जाधव , ग्रामस्थ, मान्यवर यांच्या हस्ते सन्मानपत्र वाटप झाले.यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रसिध्द शिवव्याख्याते अखलाकभाई मुजावर म्हणाले , अशा महोत्सवातून गायकांना गायनाची संधी मिळते व त्यांची ख्याती सर्वदूर पोहचते तसेच लोक कलाकार यांच्या समस्या समजतात व त्यांचे निराकरण करता येते. पत्रकार पुंडलिक सुतार यांनी दरवर्षी असे कार्यक्रम घेवून कलाकार याना प्रोत्साहन देणार असल्याचे सांगितले.
सूत्रसंचालन सुरेश बुगडे व वाय.व्ही. तराळ यांनी केले.आभार पुंडलिक सुतार यांनी मानले.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विज्ञान प्रज्ञा परिक्षेत केदारी रेडेकर हायस्कूलचे यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
विज्ञान प्रज्ञा पात्र परिक्षेत कु. जान्हवी सुनिल चव्हाण हिला १०० पैकी ८८ गुण मिळाले असून ती तालुक्यात प्रथम आली आहे. याबरोबरच समृद्धी कांबळे, पल्लवी कांबळे, आर्या येसणे या विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय परिक्षेसाठी निवड झाली आहे. कु. जान्हवी सुनिल चव्हाण शिष्यवृत्ती- धारक असून तिने MTS परिक्षेमध्ये राज्यात १६ व्या स्थानी झेप घेतली आहे. तिला मुख्याध्यापक व विषय शिक्षक श्री सुनिल चव्हाण व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले .


‘ व्यंकटराव ‘चे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत यश…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व विज्ञान विषय समितीमार्फत घेण्यात आलेल्या प्रज्ञा शोध परीक्षेत (नववी) व्यंकटराव हायस्कूलचे तब्बल १५ विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी प्रज्ञापत्र झाले आहेत.
सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रज्ञा परीक्षेसाठी निवड झाली आहे.
प्रज्ञापात्र गुणवंत विद्यार्थी…
अंशुमन हिम्मत भोसले ,यश बाळकृष्ण नातलेकर , प्रणव भगवान पाटील, जुवेरीया समीर शेख,माधवी जीवन आजगेकर, शार्दुल गजानन आजरेकर, शलाका ओंकार गिरी, ऋतुजा दयानंद गिलबिले, भूषण दिग्विजय पाटील, संभाजी पांडुरंग पाटील, प्रेम रमेश येसणे, अनुष्का अजित हरेर, आर्या उदय हेब्बाळकर, श्लोक काडय्या हिरेमठ, अवधूत अमित सावंत
या विद्यार्थ्यांना विभागप्रमुख प्रशांत गुरव,व्ही.ए. वडवळेकर यांचे मार्गदर्शन लाभले.प्राचार्य आर. जी. कुंभार,पर्यवेक्षिका व्ही.जे.शेलार,आजरा महाल शिक्षण मंडळ अध्यक्ष जयवंतराव शिंपी,सर्व संचालक यांचे प्रोत्साहन लाभले.

दिलगिरी…
गेले चार दिवस काही तांत्रिक अडचणीमुळे बातमीपत्र देण्यास उशीर होत आहे. कृपया वाचक व हितचिंतकांनी याची नोंद घ्यावी. या प्रकाराबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत असून लवकरच ही अडचण दूर करत आहोत.
…मृत्युंजय महान्यूज परिवार





