mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

बुधवार   दि. ८ जानेवारी २०२५    

विष प्राशन केलेल्या विवाहीतेचा मृत्यू

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      वेळवट्टी (ता. आजरा) येथे कौटुंबिक वादातून विष प्राशन केलेल्या सीमा रविंद्र कुंभार (वय २४) वर्षीय विवाहीतेचा सोमवारी रात्री उशीरा सांगली येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सीमा हीने २ जानेवारी रोजी विष प्राशन केले होते. तिला उपचारासाठी प्रथम उपजिल्हा रुग्णालय त्यानंतर सांगली येथे हलवले होते.

       याबाबत आजरा पोलिसातून मिळालेली माहिती अशी की…

      प्रेम विवाह केलेल्या व कुंभार गल्ली, आजरा हे माहेर असणाऱ्या सीमा व सासरच्या मंडळींमध्ये कौटुंबिक वाद होत होते. यामुळे १८ फेब्रुवारी २०२४ पासून सीमा माहेरी होती. या वादातून तिने २ जानेवारी रोजी गवतावर मारण्याचे औषध प्राशन केले होते. उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.

     सीमा हिने दिलेल्या मृत्यूपूर्व जबाबावरुन पती रविंद्र, सासरे अशोक यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

     पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल सरंबळे करीत आहेत.

वाघ घरात… साहित्य काढण्यात अडचण

पारपोलीतील प्रकार

 कामगारांची पाठ, भितीचे वातावरण

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     पारपोली सर्फनाला प्रकल्प बाधित परिसर यावर्षी पूर्णपणे पाण्याखाली जाणार असल्याने वापराविना असलेल्या जून्या घरांचे शक्य ते साहित्य मूळ मालकांकडून काढून हलवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या कामगारांना या घरांच्या परिसरात वाघांचे दर्शन झाल्याने कामगारांनी कामाकडे पाठ फिरवली आहे यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

      सर्फनाला प्रकल्प झाल्यावर आंबोलीला थेट भिडलेली पारपोली, खेडगे व गावठाण ही गावे बाधीत झाली. या गावांचे शासनाने शेळप, देवर्डे परिसरात पुनर्वसन केले आहे. तेथे धरणग्रस्तांसाठी नवीन वसाहती तयार करण्यात आल्या आहेत. सर्फनालामध्ये यंदा सत्तर टक्के पाणी साठा केला आहे. पुढील वर्षी पाटबंधारे विभागाकडून साठ्यात वाढ केली जाणार आहे. येथील जून्या घरांचे लाकडी सामान, चिरे व अन्य  वस्तु हलवण्याचे काम धरणग्रस्त करीत आहेत. पण या परिसरात वाघांचा वावर सुरु असल्याने त्यांना कामासाठी कामगार मिळेना झाले आहेत. 

       याबाबत धरणग्रस्त मारुती शेटगे म्हणाले, पारपोली हे गाव ओस पडले आहे. घरांवर वानरांचा कळप वावरत आहेत. वानरांची शिकार करण्यासाठी वाघ या परिसरात आला आहे. जून्या घराचे चिरे काढण्यासाठी कामगारांना घेवून गेलो असतांना वाघ शंभर फुटावर उभा होता. आम्हा सर्वाची घाबरगुंडी उडाली त्यामुळे काम आवरते घेवून परिसर सोडला. त्यानंतर परत या कामावर कामगार जाण्यास तयार नाहीत. कामगार नसल्याने काम बंद पडले आहे. अजून पंधरा वीस घरांचे साहित्य आवरायचे आहे.

डंपर चालकाने ठोकली धूम…

      पारपोली परिसरातील प्रकल्पाजवळ रस्त्याचे काम सुरु होते. चार दिवसांपूर्वी चालक डंपर घेवून गेला होता. त्याला समोर वाघीण व दोन पिल्ले दिसल्याने त्यांने डंपर सोडून पळ काढला.

आजरा- गारगोटी रस्त्याचे काम पाडले बंद

शेतकऱ्यांची अधिकाऱ्यासोबत बैठकीची मागणी तहसीलदार, बांधकामला निवेदन

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा देवकांडगावमार्गे गारगोटी रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण आणि कॉक्रीटीकरण करण्याचे काम सुरु झाले आहे. रस्त्याकडील शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता वेगाने काम सुरू असल्याचे सांगत आज शेतकऱ्यांनी रस्त्याचे काम बंद पाडले. रस्त्यामुळे बाधीत होणाऱ्या शेतकऱ्यांची तहसीलदारांच्या समवेत बैठक होवून निर्णय होत नाही तोपर्यंत काम बंद
ठेवण्याचा इशारा दिला आहे. काम घेतलेल्या कंपनीचे अधिकारी, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबतचे निवेदन देण्यात आले.

      आजरा- गारगोटी रस्त्यासाठी २४६ कोटी रुपये खर्च होणार आहेत. या रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण व कॉंक्रीटीकरणाचे काम सुरु झाले आहे. याकरीता मशिनरी पण उतरली आहे. शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता मनमानी पध्दतीने कंपनीने काम सुरू केल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. याबाबत पेरणोली येथील हनुमान मंदिरात हरपवडे, कोरीवडे, देवकांडगाव, साळगाव येथील शेतकऱ्यांची बैठक झाली.

      कॉ. संपत देसाई यांनी मार्गदर्शन केले. तहसीलदार यांचे उपस्थितीत जबाबदार अधिकाऱ्यांसोबत बैठक होऊन निर्णय होत नाही तोपर्यंत काम बंद ठेवावे. कंपनीच्या व्यवस्थापकाला निवेदन देवून काम बंद करण्यास सांगितले. तहसीलदार समीर माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आजऱ्याचे प्रभारी उपअभियंता आदित्य भोसले यांनाही निवेदन देण्यात आले. श्री. भोसले यांनी लवकरच बैठक घेतली जाईल असे सांगितले. या वेळी पांडुरंग लोंढे, तानाजी देसाई, सुभाष देसाई, उल्हास त्रिरत्ने, सचिन देसाई, मारुती पाटील, सुरेश पाटील, बंटी दत्तात्रय देसाई, रामचंद्र नातलेकर, हनमंत कळेकर, शिरीष पवार, मुकुंद कांबळे, गजनान नलगे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

सीएच्या अंतिम परीक्षेत हर्षवर्धन जाधव (मोकाशी)चे यश

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा येथील हर्षवर्धन जयदिप जाधव/मोकाशी याने शैक्षणिक प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.सी.ए. फायनलमध्ये ६०० पैकी ३९७ गुण मिळवून सातारा जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवला.

     रोजरी इंग्रजी हायस्कूल, आजरा येथून दहावी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर, धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स, सातारा येथून ११ वी व १२ वी ९५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केली, त्यानंतर चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) च्या फाउंडेशन व इंटरमीडिएट परीक्षाही पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण केल्या.

    कंपनी सेक्रेटरी (सीएस) च्या सर्व टप्प्यांमध्येही त्याने पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होऊन शैक्षणिक क्षमता सिध्द केल्या आहेत. या यशाबद्दल विविध स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे.

आजरा एमआयडीसीतील ट्रान्सफॉर्मर क्षमता वाढवा..
काजू प्रक्रिया उद्योजकांची मागणी


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा येथील एमआयडीसी स्थापन झाल्यापासून २५ एच पी चा विद्युत ट्रान्सफॉर्मर आहे. येथील उद्योजकांनी वारंवार ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवण्यासाठी मागणी करूनही त्याची क्षमता वाढवण्यात येत नाही. मात्र उद्योजकांना स्वतःच्या पैशातून स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर बसवण्यास भाग पाडले जात आहे. आजरा एमआयडीसीमध्ये शेतीपूरक उद्योगधंदे आहेत. ट्रान्सफॉर्मर कमी क्षमतेचा असल्यामुळे येथील व्यवसायाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे या ठिकाणी १०० एचपी चा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात यावा अशी मागणी करणारे निवेदन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने देण्यात आले आहे.

      यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश कोंडुस्कर, उपाध्यक्ष दयानंद भुसारी, जयसिंगराव खोराटे, विकास फळणेकर, दयानंद देवलकर विकास बागडी, मनोहर पाटील, परेश पोतदार बाळासाहेब जोशी उपस्थित होते.

मलिग्रे ग्रामपंचायत उपसरपंच पदी चाळू केंगारे यांची निवड

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      मलिग्रे ता . आजरा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी चाळू केंगारे यांची निवड करणेत आली. या निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. शारदा गुरव होत्या. माजी सरपंच समीर पारदे यांनी अनुमोदन दिले. या निवडी नंतर केंगारे यांचा जल्लोषी सत्कार करणेत आला. यावेळी हालगीच्या तालावर गुलालाची उधळण व फटाके वाजवत उघड्या जीपमधून गावात मिरवणूक काढण्यात आली.

      यावेळी ग्रामपंचायत सदस्या रेश्मा बुगडे, कल्पना बुगडे, सचिन सावंत उपस्थित होते. आभार ग्रामसेवक धनाजी पाटील यानी मानले.

निधन वार्ता
नागेश पाटील

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      उचंगी ता. आजरा येथील नागेश मलगोंडा पाटील ( वय ४० वर्षे )यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

     अण्णाभाऊ सहकारी सूतगिरण आजरा येथे सूतगिरणीच्या वाहनावर चालक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील, असा परिवार आहे.

       गुरुवार दि ९ रोजी रक्षाविसर्जन आहे.

दिलगिरी…

   गेले दोन दिवस काही तांत्रिक अडचणीमुळे बातमीपत्र देण्यास उशीर होत आहे. कृपया वाचक व हितचिंतकांनी याची नोंद घ्यावी. या प्रकाराबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत असून लवकरच ही अडचण दूर करत आहोत.

             …मृत्युंजय महान्यूज परिवार

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

भावेवाडी येथे अपघातात जेऊर येथील एक जण ठार

mrityunjay mahanews

तरुणाची आत्महत्या

mrityunjay mahanews

संजय कडोली यांचे निधन

mrityunjay mahanews

चाफवडे हायस्कूल स्थलांतरास विरोध कायम…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!