
संजय कडोली यांचे निधन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गोवास्थित आजरा येथील शिवाजीनगर मधील रहिवासी व गोवा पोलीस दलातील फौजदार संजय उर्फ शिवानंद श्रीकांत कडोली यांचे गोवा येथे उपचारादरम्यान निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ५४ वर्षे होते.
शिवाजीनगर, आजरा येथील मूळचे रहिवासी असणारे संजय कडोली हे मधुमेहाच्या विकाराने गेली तीन वर्षे त्रस्त होते. दरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना गोवा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेच त्यांचा काल शुक्रवार दिनांक १० रोजी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. गोवा पोलीस दलामध्ये ते कुस्ती प्रशिक्षक म्हणून दाखल झाले होते. गेले तेहतीस वर्षे ते सेवा बजावत आहेत.
त्यांच्या पश्चात वडील, पत्नी व मुलगी असा परिवार आहे. गेल्याच महिन्यात त्यांचे कनिष्ठ बंधू धनंजय यांचेही मधुमेहाने निधन झाले.

वळीव पावसाचा तडाखा
झाड पेटले…
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरासह परिसरात काल वळीव पावसाने हजेरी लावली. पावसामुळे आजरा येथील आठवडा बाजारामध्ये व्यत्यय निर्माण झाला. तर हाजगोळी खुर्द येथे आनंदा दत्तू हरेर यांच्या मालकीच्या नारळाच्या झाडावर वीज पडल्याने उभ्या झाडाने पेट घेतला. विजेमुळे आजूबाजूच्या घरातील विद्युत उपकरणांचेही नुकसान झाले आहे.
दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आजरा शहरात पावसाने अचानक हजेरी लावली. यामुळे आठवडा बाजारासाठी आलेल्या व्यापारी व तालुकावासीयांची चांगलीच धांदल उडाली.
आज-यासह परिसरातही पाऊस झाला आहे. पावसामुळे बळीराजा सुखावला असून पेरणीपूर्व मशागत वेगावली आहे.

गव्यांचा धुमाकूळ…
ऊस पिकाचे प्रचंड नुकसान

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हाजगोळी बु|| (ता.आजरा) येथे गेले दोन दिवस वीस ते पंचवीस गव्यांच्या कळपाने शेतीमध्ये धुमाकूळ घालत एकनाथ येसादे, नामदेव निकम, पांडुरंग मांगले, संजय येसादे,अरुण देशपांडे, मारुती पंडित आदींच्या ऊस पिकाचे मोठे नुकसान केले आहे.
हाजगोळी बु|| येथे भर दुपारी गवे शेतामध्ये घुसून पिकांचे नुकसान करू लागले आहेत. एकाच वेळी मोठ्या संख्येने शेती पिकामध्ये गव्यांचा होत असलेला वावर व त्यामुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करताना शेतकरी वर्गावर प्रचंड मर्यादा येत आहेत. वनविभागाने झाल्या नुकसानीची भरपाई तर द्यावीच परंतु गव्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

काजू बियांचा दर वाढेना…
मजुरीही निघताना अडचणी

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
काजू बियांचा हंगाम संपत आला असून बियांची आवक वाढली असली तरीही दर मात्र प्रतिक्विंटल दहा हजार ते दहा हजार पाचशे रुपयांपर्यंत स्थिरावला आहे. सलग तीन वर्षे अल्प दराचा फटका काजू उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून हमीभावाचा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे. दरवाढ होत नसल्याने काजू बिया गोळा करण्यासाठी पगारावर घेतल्या जाणाऱ्या मजुरांची मजुरीही भागेना अशी अवस्था आता उत्पादकांची होऊ लागली आहे.
काल आठवडा बाजारामध्ये काजूबियांचे दर वाढतील अशा अपेक्षेने तालुक्यातील काजू उत्पादकांनी काजू बिया विक्रीसाठी आणल्या होत्या परंतु एकीकडे १०५/- रुपये प्रति किलो दर असं सांगितलं जात असले तरीही प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या पदरात शंभर रुपये प्रति किलो प्रमाणेच दर मिळत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात होते.
शेतकऱ्याच्या आर्थिक उत्पन्नातील काजू बिया हे महत्त्वाचे साधन असून काजू बियांना किमान प्रति किलो १३०/- रुपये हमीभाव मिळावा अशी मागणी वारंवार केली जात होती. याकरिता मेळावे, परिषदाही घेण्यात आल्या. परंतु यावर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नसून नाईलाजाने शेतकऱ्यांना मिळेल त्या दराने काजू बिया व्यापाऱ्यांना घालण्याशिवाय सध्यातरी पर्याय राहिलेला नाही.

रस्ता होईना…
वाहतुकीचा बोजवारा

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा बस स्थानकासमोरील राष्ट्रीय महामार्गाचे काम रेंगाळल्याचा फटका वाहनधारकांना बसू लागला असून मुळातच रस्त्याचे काम रेंगाळले असताना सायंकाळच्या वेळी मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लक्झरी बसेसचा त्रासही इतर वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. यामुळे वारंवार वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे.
महागाव मार्गावरून येणारी वाहने, आजरा मार्गे आंबोलीकडे जाणारी वाहने व कोकणातून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी वाहने यांची संख्या सुट्ट्यामुळे प्रचंड वाढली आहे. वाहनचालक मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्किंग करू लागले आहेत. दुचाकी व चार चाकी पार्किंग मुळे मुळातच अरूंद असणाऱ्या या रस्त्यावर जागाच राहत नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे. दोन अवजड वाहने एकमेकांसमोर आल्यास वाहतुकीची कोंडी निर्माण होते. परिणामी सर्वच वाहने जागेला थांबून वाहतूक ठप्प होताना दिसत आहे.
महामार्गाचे हे रेंगाळलेले काम पूर्ण होणार तरी कधी? असा प्रश्न आता स्थानिक नागरिक व बाहेरगावाहून येणारे वाहनधारक करू लागले आहेत.


