

पंचनामा गव्याच्या हल्ल्याचा की आरसा वन विभागाच्या कारभाराचा..?

……………ज्योतिप्रसाद सावंत……………….
आजरा तालुक्यातील पेरणोली येथील शालन विष्णू दारडकर या महिलेवर गव्याचा हल्ला झाल्यानंतर वनविभागाने या प्रकरणाबाबत दाखवलेली उदासीनता, प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून आपल्याच मर्जीतील कर्मचाऱ्यांना घेऊन केलेला चुकीचा पंचनामा व या पंचनामावर मुख्य वन संरक्षक व उप वनसंरक्षक यांच्यासमोर आमदार प्रकाश आबीटकर यांच्या उपस्थितीत झालेले काथ्याकुट व त्यानंतर पंचनामा चुकीच्या पद्धतीने झाला असल्याची अधिकाऱ्यांची अप्रत्यक्ष कबुली पाहता हा गव्याच्या हल्ल्याचा पंचनामा नसून तो वनखात्याच्या एकंदर कारभाराचा पंचनामा आहे असे म्हणावे लागेल.

गेले साडेतीन महिने संबंधित महिला, तिचे नातेवाईक व पेरणोली येथील काही संवेदनशील मंडळी संबंधित महिलेला नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील होती. पोलिसी जबाब व आरोग्य अधिकार्याच्या दाखल्यामध्ये हल्ला केल्याचे स्पष्ट नमूद असूनही नुकसान भरपाई चा प्रस्ताव धूडकावून लावण्यात आला होता. स्थानिक मंडळींनी वरिष्ठांची दिशाभूल केल्याने प्रस्ताव मंजुरीत अडचणी निर्माण झाल्या होत्या.
एकीकडे वैद्यकीय उपचाराचे बिल वाढत असताना दुसरीकडे मात्र नुकसान भरपाई मिळण्याची आशा दुरावत चालली होती. यामुळे कुटुंबीय हतबल झाले होते होते. अखेर आम. आबीटकर यांनी यामध्ये स्वतः लक्ष घालून वनविभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक लावली. बैठकीमध्ये केवळ वनविभागाच्या पंचनाम्यामध्ये गव्याने हल्ला केल्याचे स्पष्ट होत नसल्याचे नमूद करण्यात आल्याने या पंचनाम्याचेच पोस्टमार्टम करण्यात आले. स्थानिक पोलीस पाटील, सरपंच अथवा अन्य मान्यवरांना बाजूला ठेवून पंचनाम्याचा कागद रंगवण्यात आल्याचेही स्पष्ट झाले.
वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात या सर्व प्रकारचे गांभीर्य आल्यानंतर त्यांनी तातडीने संबंधित महिलेला मदत करण्याचे आश्वासन दिले व तशा सूचनाही केल्या. केवळ एका पंचनाम्याच्या कागदामुळे तब्बल साडेतीन महिने जखमी महिलेला त्रास सहन करावा लागला. यामध्ये दोष कोणाचा ? असा सवाल उपस्थित होत आहे.वन विभागाने केलेला हा पंचनामा केवळ जखमी महिले संदर्भातील घटनेचा होता की वनखात्याच्या एकंदर कारभाराचा होता? याचे उत्तर आता वन विभागानेच देण्याची गरज आहे.
सब चलता है…
तालुक्यामध्ये सद्यस्थितीला सुरू असणारी वृक्षतोड, हत्ती नुकसानीसह गव्यांच्या नुकसानीचे होणारे पंचनामे कितपत खरे आहेत हे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनाही चांगलेच माहित आहे. वन विभागात सब चलता है… अशी परिस्थिती असताना एका सामान्य कुटुंबातील महिलेला नुकसान भरपाई मिळवण्यासाठी करावा लागलेला संघर्ष निश्चितच क्लेशदायक आहे.

महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे तहसीलसमोर ठिय्या आंदोलन सुरू

……………..आजरा – प्रतिनिधी……………..
संकेश्वर-बांदा महामार्ग प्रश्नी आजरा तालुक्यातील महामार्गबाधित शेतकऱ्यांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यावेळी महामार्गावरील बाधित शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
यावेळी काँ. शिवाजी गुरव म्हणाले, शासन मोबदला न देता महामार्ग बनवत आहे. शेतकरी नुकसान सहन करून महामार्गासाठी जमीन देत आहे. त्या प्रमाणात त्याला नुकसानभरपाई देणे आवश्यक असताना शासन चालढकल करत आहे. जाहीर नोटीसीला उत्तर देण्याची मुदत दिनांक १२ ऑक्टोंबरपर्यंत दिली आहे, परंतु अशा डावपेच करणाऱ्या यंत्रणेचा निषेध करण्यात आला.
यावेळी कॉ. संजय तर्डेकर,दशराज आजगेकर, संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते शिवाजी इंगळे, आनंदा येसणे, गणपती येसणे, अनिल शिंदे आदींनी मार्गदर्शन केले. नुकसानभरपाई मिळेपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी ताकदीनिशी लढण्याचा यावेळी निर्धार करण्यात आला.
याप्रसंगी शिवाजी पाटील, तातोबा पाटील, रघूनाथ कवळेकर,शिवाजी डोंगरे, शिवाजी कदम, धोंडीबा खोराटे, दिगंबर होरंबळे, पांडुरंग कुंभार,शिवाजी पाटील, आदी शेतकरी उपस्थित होते.

विद्युत दाब वाढल्याने लाखाची उपकरणे जळाली

…………….आजरा – प्रतिनिधी……………..
आजरा शहरातील काही भागांमध्ये अचानक विद्युत दाब वाढल्याने लाखावर रकमेची विद्युत उपकरणे जळाली आहेत.
बुधवारी दुपारी अचानक विद्युत दाब वाढल्याने कुंभार गल्लीतील सुरेश कुंभार,दिलीप गुरव,नितीन गुरव,बाळू कुंभार, विद्याधर शिंदे आदींचे टी. व्ही.संच,प्रिंटिंग मशीन व इतर साहित्य जळाले आहे.

पाचवी व आठवी शिष्यवृत्ती मानधन- रक्कम वाढ मिळावी…
डॉ.पोवार ट्रस्टची मागणी

……………..आजरा- प्रतिनिधी………………
पाचवी व आठवी शिष्यवृत्ती मानधन- रक्कम वाढ मिळावी अशी मागणी डॉ.पोवार चॅरिटेबल ट्रस्ट,विद्यार्थी विकास परिषद कोल्हापूर यांच्या वतीने वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्यता मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने दरवर्षी इयत्ता पाचवी व आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. यामध्ये ग्रामीण व शहरी विभागात ही परीक्षा घेतली जाते. मोठ्या संख्येने विद्यार्थी या परीक्षेत बसतात. त्यासाठी ते नव-नवीन खाजगी प्रकाशनाची पुस्तके अभ्यासासाठी नोट्स चा वाचन व पठण करून वेगवेगळे सराव पेपर सेट चा वापर करून अहोरात्र मेहनत घेऊन अभ्यास करतात. त्या मोबदल्यात मिळणारी सध्याची शिष्यवृत्ती रक्कम वार्षिक पाच हजार रुपये आहे ती खूपच कमी असून वाढवून ती सुमारे वार्षिक बारा हजार रुपये इतकी करावी व इयत्ता १२ वी पर्यत मिळत राहावी.
वाढत्या महागाईने वह्या पुस्तकांचे दर गगनाला भिडले आहेत. निदान पुढील वर्षाचा मुलांचा स्वखर्च व शिक्षणासाठी चे इतर अभ्यासाचे साहित्य घेता येईल. तसेच स्वतःच्या बाचतीचीही सवय लागेलz व मुले स्वावलंबी बनतील. वाढलेल्या शिष्यवृत्तीमुळे मुलांचे अभ्यास करण्याचे धाडस वाढवून अभ्यासाकडे जास्त वळतील. जेणेकरून अभ्यास करून ग्रामीण भागातील मुलांना पुढे स्पर्धा परीक्षेत शहरात जाताना कोणतीही अडचण येणार नाही. यामुळे मुलांना प्रोत्साहनच मिळेल.
या सर्व पार्श्वभूमीवर शिष्यवृत्ती रक्कम वाढ करवी अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी सचिन पोवार (अध्यक्ष),सौ. शितल कुदळे, विजय पाटील, गणपती नगरपोळे, विठ्ठल कदम,सौ. प्रीती कांबळे, नितीन पाटील उपस्थित होते.

लोकशाहीचे महत्व समजून घ्या : प्राचार्य डॉ.अशोक सादळे

……………..आजरा :प्रतिनिधी……………..
भारतीय लोकशाही ही जगातील सर्वश्रेष्ठ लोकशाही आहे.संसदीय लोकशाही पध्दतीने देशाचा कारभार चालवणारा भारत आहे जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांनी लोकशाही शासनव्यवस्था आणि लोकशाहीतील मताधिकाराचे महत्व समजून घ्यावे,असे आवाहन प्राचार्य डॉ.अशोक सादळे यांनी केले.
आजरा महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातर्फे आयोजित “लोकशाही, निवडणुका व सुशासन” या विषयावरील कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.साधन व्यक्ती म्हणून डॉ.एस.एस.कुचेकर,प्रा.एस.जी.खानापूरे उपस्थित होते.
डॉ.कुचेकर म्हणाले, लोकशाही हे लोकसंमतीने चालणारे शासन आहे.म्हणूनच,प्रत्येकांने मतदानाचा अधिकार जबाबदारीने वापरायला हवा.
प्रा.खानापूरे यांनी केंद्रीय व राज्य पातळीवर होणाऱ्या निवडणुकांचे स्वरुप, लोकप्रतिनिधींची निवडणूक पात्रता, घटना दुरूस्ती व घटनेतील महत्त्वाचे कलम आणि निवडणूक आयोगाची कार्यपद्धती विशद केली.
यावेळी कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील,प्रा.लता शेटे,प्रा.बाळासाहेब कांबळे,प्रा.शेरेकर आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा.अनुराधा मगदूम यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचलन केले.प्रा.राम मधाळे यांनी आभार मानले.
आज तालुक्यात….
♦️ आज दुपारी ३.३० वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ च्या रुंदीकरण, मजबूती करणासाठी संपादित होणाऱ्या जमिनीच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रकाश आबीटकर यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.
♦️ पेरणोली आरोग्य उपकेंद्र येथे मोफत डोळे तपासणी व १८ वर्षावरील पुरुषांचे आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे.

निधन वार्ता…
◼️रवींद्र दळवी◼️
आजरा येथील भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त जवान रवींद्र गुंडोपंत दळवी (वय ५८ वर्षे) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,भाऊ,बहीण असा परिवार आहे.
◼️आक्कुबाई केसरकर◼️
कोवाडे ता.आजरा येथील श्रीमती आक्कुबाई धोंडीबा केसरकर (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार असून भाजपाचे आजरा तालुका उपाध्यक्ष किरण मारुती केसरकर यांच्या त्या आजी होत.




