बुधवार दि.११ जून २०२५

नगरपंचायतीकरता १७ प्रभाग १७ सदस्य
राज्य शासनाचा आदेश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सर्वोच्च न्यायालयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आदेशाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या हालचाली सुरू झाल्या असून नगरपंचायतीकरता एका प्रभागाकरिता एक सदस्य असे एकूण १७ सदस्यांकरीता १७ प्रभाग होणार आहेत. प्रभाग रचनाही बदलण्यात येणार असून सर्व प्रभागात समान मतदान राहील याची दक्षता घेण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.
यामुळे आजरा नगरपंचायतीकरीता १७ स्वतंत्र प्रभाग रहाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

श्रीयन व जहेद यांची शूटिंग चॅम्पियनशिप मध्ये यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
२८ वी कॅप्टन एस जे इझेकाइल मेमोरियल महाराष्ट्र स्टेट शूटिंग चॅम्पियनशिप नोविसेस २०२५ मुंबई अंतर्गत झालेल्या ५० मीटर रायफल ०.२२ शूटिंग स्पर्धेत अचूक निशाणा साधून वेस्ट झोन स्पर्धेसाठी श्रीयन सचिन बिर्जे व जहेद हसन मकानदार यांची निवड झाली आहे.
ज्ञदोघांनाही अमन शिकलगार यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

आजरा साखर कारखान्याच्या शिष्टमंडळाने घेतली खा. शरद पवार यांची भेट

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी आज पुणे येथे खा. शरदचंद्र पवार यांची भेट घेऊन आजरा साखर कारखान्याचे कार्यस्थळ असलेल्या गवसे व दर्डेवाडी ही गावे इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये येत असलेने कारखान्यास उपपदार्थ निर्मिती प्रकल्प उभारण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे सदर गावे इको सेन्सिटिव्ह झोन मधून वगळणेत यावी यासाठी सहकार्य करावे अशी विनंती केली.
यावर खा. पवार यांनी सविस्तर माहिती घेऊन केंद्रीय पर्यावरण मंत्री ना. भुपेंद्रसिंग यांची पुढील आठवड्यात दिल्ली येथे भेट घेऊन हा विषय मार्गी लावूयात त्यासाठी कारखान्याचे शिष्टमंडळास दिल्ली येथे येणेबाबत सुचना केल्या आहेत.
यावेळी मा. जयंत पाटील, कारखान्याचे संचालक श्री. उदय पवार, श्री. अशोक तर्डेकर, श्री. दिगंबर देसाई, कार्यकारी संचालक श्री. संभाजी सावंत, मुख्य शेती अधिकारी श्री. विक्रमसिंह देसाई इत्यादी उपस्थित होते.

क्षय रोगाचे समूळ उच्चाटन करण्यास कटिबद्ध : डॉ. अमोल पाटील

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत निक्षय मित्र डॉक्टर अमोल पाटील वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय आजरा व श्री. विक्रम गंधाडे वैज्ञानिक प्रयोगशाळा अधिकारी ग्रामीण रुग्णालय, आजरा यांनी आजरा तालुक्यातील तीन क्षय रुग्ण दत्तक घेतले. या रुग्णांना उपचार समुपदेशन व पोषण आहाराचे वाटप त्यांनी केले. लवकर व अचूक निदान, समूळ उपचार व पोषण आहार घेतल्यास क्षयरोग पूर्णपणे बरा होतो. २०२९ पर्यंत संपूर्ण भारत क्षय मुक्त होईल यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे त्यांनी सांगितले. आजरा तालुक्यातील सर्व शासकीय संस्थांतील अधिकारी व कर्मचारी यांनी” निक्षय मित्र” व्हावे व अजरा तालुक्यातील क्षय रुग्ण दत्तक घ्यावेत. त्यांना मानसिक आर्थिक आधार द्यावा असे आवाहन डॉ. अमोल पाटील यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाला वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक श्री. संग्राम पाटील, श्री. रोहित पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. ब्रम्हनाथ देशमाने, डॉ .स्वाती पाटील, श्री. सोपान बुधवंत, सौ. ऊर्जादेवी पाटील रुग्ण व नातेवाईक तसेच आजरा तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.
आभार प्रदर्शन सहाय्यक अधीक्षक श्री. कुराडे यांनी केले.

छाया वृत्त

आजरा साखर कारखाना सेवकांची सह.पतसंस्था मर्या. गवसे या संस्थेच्या नूतन चेअरमनपदी श्री.विजय कृष्णा माने तसेच व्हा.चेअरमनपदी श्री.दयानंद मारुती लोहार यांची बिनविरोध निवड झाली.

फोटो क्लिक…(वटपौर्णिमा)



