

एसटी अडवली…
एका विरोधात गुन्हा नोंद…

……………..आजरा- प्रतिनिधी…………,…..
कोरीवडे ता. आजरा येथे एस.टी. अडवून शासकीय कामात अडथळा आणण्याबरोबरच एस. टी. महामंडळाचे पुढील फेऱ्यांचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी बबन परसू चौगुले रा. कोरिवडे ता.आजरा यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
सदर प्रकार शुक्रवारी सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास कोरिवडे फाटा येथे घडला. याबाबतची फिर्याद एस.टी. चालक संजय यशवंत लोहार यांनी आजरा पोलिसात दिली आहे.

ऑनलाइन नोकरी… एकाला गंडवले

……………..आजरा – प्रतिनिधी……………….
अमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या ऑनलाईन मार्केटिंगच्या कंपनीमध्ये नोकरी लावतो म्हणून आजरा येथील निरज पंढारे या महाविद्यालयीन तरुणाला सात हजार रुपयांना गंडवण्यात आले आहे.
फ्लिपकार्ड,ॲमेझॉन यासारख्या कंपनीमध्ये मार्केटिंगचे काम देतो अशा अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या फोनला भाळून निरज याने त्यानी मागणी केल्याप्रमाणे सात हजार रुपयांची रक्कम ऑनलाईन पद्धतीने संबंधितांना अदा केली. रक्कम मिळाल्यानंतर त्याला ओळखपत्रही देण्यात आले. पुन्हा पैशांची मागणी करण्यात येऊ लागली प्रत्यक्षात मात्र अशी कोणतीही नेमणूक झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.सध्या संबंधित मंडळींकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.
अशा फसवणूक करणाऱ्या मंडळींपासून सावध राहण्याची गरज प्रकर्षाने अधोरेखित होऊ लागली आहे.

अधिकारी वर्गाचा दबाव आणून काम …
नवीन राष्ट्रीय महामार्गबाधित शेतक-यांचा आरोप

……………….आजरा- प्रतिनिधी………………
संकेश्वर – बांदा महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे या मार्गावरील शेतकऱ्यांच्या संपादित जमिनी, होणारे नुकसान, मिळणारी नुकसान भरपाई याबाबत संभ्रमावस्था आहे. अशातच अधिकारी वर्ग दबाव आणून काम पुढे रेटत आहे. हा प्रकार कदापिही खपवून घेतला जाणार नाही असा इशारा संकेश्वर- बांदा महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या वतीने आजरा येथील बैठकीत देण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश आबीटकर होते.
यावेळी महामार्गबाधित शेतकऱ्यांच्या वतीने कॉ. संजय तर्डेकर, कॉ. शिवाजी गुरव यांनी विविध प्रश्न मांडले. चुकीच्या पद्धतीने नोटिसा प्रसिद्ध करून संपादनाबाबत अपुरी माहिती दिली आहे. संबंधितांकडे माहिती मागितल्यास प्रसंगी दादागिरी केली जाते. महामार्गाचे काम सुरू होऊन सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला तरी अद्यापही वनखात्याच्या हद्दीला हात घालण्याचे धाडस संबंधितांना झालेले नाही. दडपण आणून कोणतेही काम होणार नाही. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांची फसवणूक होणार नाही. अशा पद्धतीने काम करावे अशी मागणीही करण्यात आली.
जास्तीत जास्त नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यासाठी प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी अशी सूचना आमदार आबीटकर यांनी यावेळी केली.
नवीन कायद्यानुसार भूसंपादन व नुकसान भरपाईचे काम सुरू असून संपादित केलेल्या प्रत्येक गोष्टीचा मोबदला संबंधित शेतकऱ्यांना दिला जाईल, असे यावेळी उपविभागीय अधिकारी वसुधा बारवे यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत शिवाजी येसणे, गणपती येसणे,समीर मोरजकर,अमानुल्ला आगलावे,इंद्रजीत देसाई यांनी भाग घेतला.
बैठकीस तहसीलदार सुरज माने,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे, विकास कोलते, आर.एस. सावंत, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी,तालुक्यातील महामार्ग बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खोराटवाडी येथील एकाचा मृत्यू
महामार्गाच्या कामात हलगर्जीपणा दाखवला जात असल्याने ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. काढलेले खड्डे मुजवलेले नाहीत. याचाच परिणाम म्हणून खोराटवाडी येथील एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. किमान काढलेले खड्डे तरी बुजवावेत अशी मागणी यावेळी दशराज आजगेकर यांनी केली.

देव बसण्यापूर्वीच गुरव मंडळी तहसीलदार कार्यालयासमोर बसली…?
हरपवडे येथील मंदिर प्रश्र्नी आंदोलन

……………..आजरा – प्रतिनिधी……………….
हरपवडे गावामध्ये ग्रामदैवत श्री रासूबाई देवीचा पूजेचा मान गुरव पुजारी यांचेकडे परंपरेने चालत आला आहे. परंतु गुरव समाजाला पूजेपासून रोखले जात आहे आरोप करत आज गुरव समाजाने आजरा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले. एकीकडे नवरात्रीच्या घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी देव बसवण्याची धांदल उडाली असताना चक्क गुरव समाज तहसील कार्यालयासमोर बसल्याने याची चर्चा दिवसभर तालुक्यात होती.
पुजारी म्हणून देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे नोंद असलेला पुरावा (उतारा) आहे. मुख्यत: गुरव समाजाकडे परंपरेने चालत आलेला पूजेचा मान कोणालाही दादागिरी करून घेता येणार नाही.
देवालयाच्या बांधकामाच्या वेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती मार्फत स्थापन झालेल्या उपसमिती यांना पुजाऱ्यांना हटवण्याचा कोणताही अधिकार नाही. उप समितीच्या लोकांनी पदाचा गैरवापर करून जनतेचा पैशाची लूट केली असल्याचे गावात बोलले जात आहे. व बोगस पावती बुके काढून गैरव्यवहार केला आहे अशा तक्रारी अर्ज वरिष्ठ कार्यालयास दिलेल्या आहेत. त्याची चौकशी चालू आहे. ती चालू राहील. परंतु रविवारपासुन नवरात्र उत्सव चालू होणार असून देवीच्या पूजेचा मान दि १२ पर्यंत मिळावा अशी मागणीही करण्यात आली.

यापूर्वीही प्रशासनाला अनेक वेळा अर्ज देऊन चर्चा केली आहे. मात्र अद्याप याबाबत न्याय मिळालेला नाही असा आरोप यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.मनीषा गुरव यांनी केला
गावात तणाव निर्माण होऊ नये व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कोणतीही वादग्रस्त भूमिका गुरव समाजाने घेतलेली नाही. आजपर्यंत आपल्या सरकारी यंत्रणेकडून योग्य न्याय मिळेल या आशेवर समाज होता. मात्र ज्या लोकांनी पुजाऱ्यांना दमदाटी केली अशाना मंदिरामध्ये पूजा करण्याचा व पुजाऱ्यांना हाकलण्याचा कोणताही अधिकार नाही. अशा लोकांना यंत्रणा पाठीशी घालत आहे हे योग्य नाही असे शिवाजी गुरव यांनी स्पष्ट केले.
आंदोलनामध्ये गोविंद गुरव,कृष्णा पाटील,देवदास गुरव,संजय गुरव, सुनील गुरव (खोची), चंदगडसह विविध तालुक्यातील गुरव समाजातील कार्यकर्ते,स्थानिक गुरव समाजातील प्रमुख मंडळीं यावेळी उपस्थित होती.

घळभरणीपूर्वी सर्फनाला प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावा…
आमदार प्रकाश आबीटकर यांच्या प्रशासनाला सूचना

…………..आजरा – प्रतिनिधी………………..
सर्फनाला प्रकल्पाची घरभरणी यावर्षी करण्यात येणार आहे. घळभरणीपूर्वी प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांची निर्गत करावी. तहसीलदार व उपविभागीय अधिकारी पातळीवरील अथवा धोरणात्मक व अडचणीचे विषय असतील ते संपवण्याच्या दृष्टीने विशेष बैठका घेण्यात याव्यात. शासनाची प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत सकारात्मक भूमिका राहील असे प्रतिपादन आमदार प्रकाश आबीटकर यांनी केले. आजरा येथे सर्फनाला प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत ते बोलत होते.
बैठकीमध्ये गावठाण- पारपोली जंगलामध्ये असणाऱ्या रामलिंग मंदिराचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. शेकडो वर्षापासून सदर मंदिर असून नवीन वन हक्क कायद्यानुसार या मंदिराचे अतिक्रमण कायम करून मंदिराचे पैसे द्यावेत असे यावेळी कॉ. संपत देसाई यांनी सुचवले. ज्या- ज्या नवीन वसाहती तयार करण्यात आल्या आहेत त्या वसाहतीमध्ये प्रकल्पग्रस्तांची घर बांधणी सुरू होणार आहे. याकरिता प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या वसाहतींच्या जमिनींची संपूर्ण नवीन मोजणी करण्यात येऊन भूखंड ताब्यात द्यावेत अशी मागणी करण्यात आली. बुधवारपासून ही प्रक्रिया सुरू करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

विज, पाणी, रस्ता या नागरी सुविधा १५ नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करून द्याव्यात जेणेकरून घर बांधणी करता अडचणी येणार नाहीत व इतर अठरा सुविधा टप्प्याटप्प्याने देण्यात याव्यात, जमिनीचे सपाटीकरण करून द्यावे, यासह गट नंबर १२५ मध्ये शिल्लक असणाऱ्या जमिनी करता तिसरी वसाहत तयार करण्यात यावी. नवीन गावठाण निर्माण करावे अशी मागणीही प्रकल्पग्रस्तांनी केली. याबाबतचा निर्णय पुन्हा बैठक घेऊन तांत्रिक अडचणी दूर करून कसा घेता येईल यासाठी प्रयत्न करू असे आम. आबीटकर यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेमध्ये कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, उपविभागीय अधिकारी वसुधा बारवे, तहसीलदार सुरज माने व अन्य अधिकारी वर्गासह प्रकल्पग्रस्तांनी भाग घेतला.
बैठकीस नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारूगडे, निवासी नायक तहसीलदार विकास कोलते, अशोक मालव, प्रकाश शेटगे,सुरेश मिटके, गोविंद पाटील, पुंडलिक शेटगे, श्रावण पवार, प्रकाश कविटकर संतोष पाटील यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

पं.दीनदयाळ विद्यालयात हादगा बोळवण कार्यक्रम

………………. आजरा- प्रतिनिधी ……………
पंडित दीनदयाळ विद्यालयात हादगा बोळवण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या सौ. भैरवी सावंत होत्या.
प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते हत्तीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. भैरवी सावंत यांचे मुख्याध्यापक संजीव देसाई यांनी स्वागत केले. हस्त नक्षत्रांमध्ये हादगा येतो. या हस्त नक्षत्राची माहिती, त्याचबरोबर निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे तसेच आपली संस्कृती ,रूढी ,परंपरांचे जतन करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे असे मुख्याध्यापक यांनी आपल्या प्रस्ताविकामध्ये सांगितले.
आहार- विहार आणि विचार ही त्रिसूत्री अंगी बाळगण्याचे मुलींना आवाहन करण्यात आले. प्रत्येक मुलीने आपल्या आहाराकडे लक्ष दिले पाहिजे कारण आहारावरतीच आपले आरोग्य अवलंबून असते, प्रत्येकाने आपल्या शालेय जीवनातच ध्येय निश्चित केले पाहिजे आणि त्यानुसार आपली वाटचाल केली पाहिजे .मोबाईलचा वापर योग्य रीतीने कराव कारण त्याचा आपल्या आरोग्यावर त्याचबरोबर व्यक्तिमत्त्वावर सुद्धा परिणाम होतो. पालकांनी आपल्या पाल्याबरोबर मनमोकळेपणाने बोलण्याची गरज आहे असे आपल्या मनोगतातून सौ.भैरवी सावंत यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने माता पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शिवसेनेच्या वतीने आज-यात होऊ द्या चर्चा …

………………..आजरा – प्रतिनिधी……………
आजऱ्यातील आठवडा बाजारामध्ये शिवसेनेच्या वतीने ‘ होऊ द्या चर्चा ‘ हा उपक्रम राबवण्यात आला.
तालुकाभरातून आलेल्या मंडळींकडून सध्याच्या राजकीय घडामोडी व केंद्र व राज्यातील सरकार बाबत मते जाणून घेण्यात आली.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख, नगरसेवक संभाजी पाटील,शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार,शिवसेना शहर प्रमुख ओंकार माद्याळकर, युवासेना उपजिल्हा प्रमुख, आजरा तालुका संघ संचालक महेश पाटील,युवासेना जिल्हा चिटणीस कृष्णा पाटील,उत्तम कांबळे,दिनेश कांबळे , शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

गवसे येथे केन्द्र शासनाचे व्यसनमुक्त अभियान संपन्न

……………….आजरा- प्रतिनिधी……………..
बापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कूल, गवसे येथे ब्रह्माकुमारी सेवा संस्थेचा वैद्यकीय विभाग व केन्द्र शासनाचा न्याय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात येत असून केंद्र सरकारचा हा उपक्रम ब्रम्हाकुमारी या संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक चंद्रकांत घुणे होते.
यावेळी ब्रम्हाकुमारी जयश्री बहनजी, कोल्हापूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सध्या तरुण वर्गामध्ये व्यसन वाढले आहे.तंबाखू ,गुटखा,सिगरेट,ड्रग, दारु,याच बरोबर मोबाईल सारख्या साधनाचे व्यसन लागले आहे. यामुळे लोकांना सामाजिक, आरोग्य, आर्थिक विषयक समस्याचा सामना करावा लागत आहे. भारतात दररोज १४ ते १८ वयोगटातील ५५०० मुले व्यसनाधीन होत आहेत. तर साडे तेरा लाख लोकांचा मृत्यू तंबाखूच्या सेवनामुळे होत आहे. यावर उपाय म्हणून कोणाशी संगत करावी, कोणाशी संगत करु नये, व्यसनाधीन व्यक्तीला निर्व्यसनी कसे करावे याचे विविध उदाहरणासह मार्गदर्शन केले.
यावेळी ब्रम्हाकुमारी मनिषा बहनजी यांनी संस्थेचा परिचय करून दिला व शासनाचा उद्देश स्पष्ट केला त्याबरोबर विद्यार्थ्यांना शारीरिक व्यायाम व प्रार्थना शिकविण्यात आल्या.
या कार्यक्रमास ब्रम्हाकुमारी सरस्वती बहनजी, विनायक भैयाजी, संजय भोसले, रणजित सावंत, संदीप वाटवे, अनिल कांबळे, विवियन मस्कारनेस, प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सी. डी. घुणे यांनी केले.सुत्रसंचलन संतोष कालेकर यांनी केले.
निधन वार्ता
इंदुताई डोणकर

नाईक गल्ली, आजरा येथील सौ. इंदुताई पांडुरंग डोणकर यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, तीन विवाहित मुले, सूना, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
येथील हिंदुत्ववादी कार्यकर्ते शिवाजी डोणकर, व माजी सैनिक तानाजी डोणकर यांच्या त्या मातोश्री होत.


