


बनावट दागिने ठेऊन २१ लाखांची फसवणूक :
दोघांविरोधात गुन्हा नोंद

.. ………….आजरा प्रतिनिधी…………
मुत्थुट फिनकॉर्प या सोने तारण देऊन कर्ज प्रकरणे करणाऱ्या कंपनीमध्ये बनावट सोने तारण ठेवून २१ लाख १७ हजार ३८० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आजरा पोलीस ठाणे येथे विशाल वसंतराव देसाई राहणार नेवरेकर कॉलनी, आजरा व ऋतेश सुरेश माजीक रा. प्लॉट नंबर 7, एलोरा गार्डन, सम्राट नगर, कोल्हापूर या दोघाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत आजरा पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, देसाई व माजिक यांनी मुथूट फिनकॉर्प, आजरा शाखेतून १९ जुलै २०२२ रोजी बनावट सोने ठेवून कर्ज प्रकरणाद्वारे लाखोंच्या घरात रक्कम उचलली. सदर रकमेची परतफेड न केल्याने सोने तपासणी केली असता सदर सोने बनावट असल्याचे आढळले. ही फसवणूक २१ लाख १७ हजार ३८० रुपयांची आहे. यापैकी माजित याच्यावर फसवणूक प्रकरणी यापूर्वी सावंतवाडी येथे गुन्हा नोंद आहे.
याप्रकरणी मुथ्ठूत फिनकॉर्पचे आजरा शाखा व्यवस्थापक दिनकर रामचंद्र वडर रा. कानडेवाडी, तालुका गडहिंग्लज यांनी आजरा पोलिसात फिर्याद दिल्याने संबंधितांवर गुन्हा नोंद झाला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक के. डी.ढेरे पुढील तपास करीत आहेत.

तिसऱ्या दिवशी ५५ उमेदवारी अर्ज दाखल
सरपंच पदासाठी १० अर्ज

आजरा :प्रतिनिधी
सर्व्हर डाऊनची समस्या संपुष्टात आल्यानंतर आजरा तालुक्यातील १० ग्रामपंचायत निवडणूकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी एकूण ५५ अर्ज दाखल करण्यात आले आहेत . यामध्ये सदस्य पदासाठी ४५ तर सरपंचपदासाठी १० अर्ज दाखल करण्यात आले आहेत .
सर्व्हर डाउन असल्यामुळे पहिले दोन दिवस अर्ज दाखल झाले नव्हते . अखेर प्रशासनाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेतला.
काल बुधवारी काही प्रमाणात अर्ज दाखल झाले असले तरी गुरुवार व शुक्रवारी मोठ्या संख्येने अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे . शुक्रवार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने ऑनलाईन अर्ज भरून तो निवडणूक अधिकार्याकडे दाखल करण्यासाठी गटप्रमुख तसेच इच्छुकांची धावाधाव सुरु असल्याचे चित्र पहावयास मिळाले.

गावनिहाय दाखल अर्ज :-
सरपंच पद –
बुरुडे, पेरणोली, सुलगाव , चांदेवाडी या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी प्रत्येकी -१, हरपवडे ग्रा.पं.साठी -२, मेंढोली – ४, अर्ज दाखल झाले आहेत .
सदस्य पद –
बुरुडे -१०, इटे, पेरणोली प्रत्येकी २, सुलगांव -१, चांदेवाडी – ५, वेळवट्टी – ३, हरपवडे .७, मेंढोली – १४, मसोली – १ असे एकूण ४५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
मेंढोली, बुरुडे व हरपवडे येथील ग्रामस्थांनी आज तहसील कार्यालयात अर्ज दाखल करण्याकरता गर्दी केली होती.


हक्क आणि घामाच्या पैशासाठी स्वाभिमानी चा लढा : राजेंद्र गड्ड्यानवर

आजरा : प्रतिनिधी
देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये साखरेचे दर वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्क व घामाचे पैसे मिळावेत यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली शेवटपर्यंत लढा दिला जाईल . आजरा साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाले आहे. संचालकांना अडवण्याची हीच संधी असून येत्या पंधरवड्यापर्यंत मागील उसाच्या बिलाचे चारशे रुपये प्रतिटन प्रमाणे देणे द्यावे व त्यानंतरच मते मागायला संचालक मंडळाने यावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्ड्यांवर यांनी केले.ते आजरा येथील सभेत बोलत होते.
यावेळी बोलताना गड्ड्यानवर म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे अर्थकारण हे उसावर अवलंबून आहे चांगला उतारा असतानाही योग्य दर मिळत नाही ही शेतकऱ्याची शोकांतिका आहे यासाठीच व्यापक आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
प्रा. जालिंदर पाटील म्हणाले, गतवर्षीच्या चारशे रुपये येणे मिळवण्यासाठी सुरू असलेला संघर्ष सर्वसामान्य करिता नवा नाही. यासाठी प्रस्थापित राजकारणी रस्त्यावर उतरू शकत नाही. गेली सलग तीन ते चार वर्षे प्रति टन दर तीन हजार रुपयांच्या आसपास आहे. आम्ही अभ्यास करून दर मागत आहोत. कारखान्यावर असणारा कर्जाचा डोंगर हे कारण पुढे करणाऱ्या संचालक मंडळाने चार पिढ्या जातील एवढी कमाई कारखान्याच्या माध्यमातून केली आहे.एकदा आमच्याही जगण्याचे ऑडिट करा म्हणजे शेतकरी कसा जगतो हे तुम्हाला कळेल असेही कारखानदारांना उद्देशून आवाहन केले.
सभेमध्ये तानाजी देसाई,कृष्णा पाटील यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी सखाराम केसरकर, माजी पंचायत समिती उपसभापती निवृत्ती कांबळे, आनंदराव पाटील, आनंदराव कोरगावकर, पांडुरंग गाडे, सुरेश पाटील,अमानुल्ला आगलावे, संजय देसाई तुळसाप्पा पोवार,शामराव बोलके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
गेले कार्यकर्ते कुणीकडे…?
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या पदयात्रेस आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांसह संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याचे दिसत होते.काही मोजकेच कार्यकर्ते गड्ड्यानवर व पाटील यांच्यासोबत दिसत होते. त्यामुळे गेले कार्यकर्ते कुणीकडे ? असा प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र होते.


जनता बँकेला क्रेडिट ग्रोथ पुरस्कार

आजरा : प्रतिनिधी
जनता बँक आजराचा बॅकींग फ्रंटीअर अँड नॅबकप यांचेमार्फत गोवा येथे राष्ट्रीय पातळीवरील बेस्ट क्रेडीट ग्रोथ पुरस्कार देवून गौरव करणेत आला. बँकींग फ्रंटीअर कडून यापूर्वी ही बेस्ट बँक, बेस्ट टर्नराऊंड बँक, बेस्ट एन पी ए मॅनेजमेन्ट व बेस्ट सीईओ असे सलग पाचव्यांदा पुरस्कार मिळविलेली जिल्हयातील अग्रगण्य बँक म्हणून बँकेचा लौकिक आहे. सदर पुरस्कार रिझर्व बँकेचे चीफ जनरल मॅनेजर रत्नाकर देवळे, बँकिंग फ्रंटीअरचे ज्यूरी व्ही. बाबु, बाबु नायर व मनोज तिवारी यांचे हस्ते बँकेचे चेअरमन मुकुंदराव देसाई व बँकेचे सीईओ एम. बी. पाटील यांनी सदर पुरस्कार स्विकारला.
बँकेकडे आज अखेर रु. ३३० कोटीच्या ठेवी, रु. २३० कोटीची कर्जे व रु. १२६ कोटीची गुंतवणूक असून बँकेने सलग ० टक्के नेट एन पी ए ठेवण्यामध्ये सातत्य राखले आहे. बँकेच्या एकूण १७ शाखा कार्यरत असून बँकेचे कार्यक्षेत्र कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, ठाणे, मुंबई व उपनगरे असून नुकतेच रिझर्व बँकेने नवीन तीन शाखा नेसरी, ता गडहिंग्लज, कळंबा, ता करवीर, पेठवडगांव, ता हातकणंगले या ठिकाणी शाखा उघडणेस परवानगी दिलेली आहे. सदरच्या तीनही शाखा लवकरच आपल्या सेवेत येतील असे बँकेचे चेअरमन मुकुंदराव देसाई यांनी सांगितले.
बँकेकडे अद्ययावत सर्व तंत्रज्ञानयुक्त डी सी व डी आर सेंटर असून बँकेच्या १७ शाखांपैकी १२ शाखा स्वमालकीच्या इमारतीध्ये कार्यरत आहेत. तसेच बँकेकडे सर्व प्रकारची अत्याधुनिक मोबाईल बँकींग, एस एम एस सुविधा व यु पी आय यासारख्या सुविधा देवून ग्राहकांना उत्तम प्रकारची टेकनॉलॉजी, आर टी जी एस, एन ई एफ टी. आय एम पी एस, पॉज, ई कॉम, रिसायकलर ए टी एम. सेवा बँक देत आहे.
बँकेने आजपर्यंत ४७५ लोकांना जवळपास रु. ४८ कोटीची कर्ज आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेमार्फत बिनव्याजी आदा केलेले आहेत. त्याचा सर्व मराठा समाजातील तरुण उद्योजकांनी लाभ घ्यावा, तसेच पंतप्रधान सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगाअंतर्गत रु. १० लाखाच्या सबसिडीची कर्जेही देवून बहुजन समाजातील उद्योजकांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम बँकेने केलेले आहे. याचा फायदा उद्योजकांनी घ्यावा असे आवाहन बँकेचे चेअरमन मुकुंदराव देसाई, व्हा.चेअरमन महादेव टोपले, सीईओ एम.बी.पाटील व सर्व संचालक यांनी केले आहे.


गर्जना प्रतिष्ठान चे कार्य कौतुस्पद -संग्रामसिंह कुपेकर

आजरा : प्रतिनिधी
आजरा येथे स्त्रियांच्या गर्भाशय कर्करोगापासून आजरा तालुका मुक्त करण्याचे अभियान कँसर पेशंट असोसिएशन व गर्जना प्रतिष्ठान च्या वतीने लस देण्याचे कार्य सुरु केले आहे. या अभियानाची सुरुवात करण्यात आली. त्या कार्यक्रम प्रसंगी संग्रामसिंह कुपेकर यांनी प्रतिपादन केले.
यावेळी गर्जना प्रतिष्ठान चे प्रमुख प्रकाश बेलवाडे, योगेश पाटील, डॉ.नूपूर खरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल हारुगडे, प्रतिष्ठानचे सचिव संतोष बेलवाडे, प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.


शासकीय जिल्हास्तर मैदानी स्पर्धेत आजरा महाविद्यालयाचे यश

आजरा : प्रतिनिधी
वारणानगर येथे झालेल्या शासकीय जिल्हास्तर मैदानी स्पर्धेत आजरा महाविद्यालयाच्या ज्युनिअर विभागातील खेळाडूंनी खालील यश संपादन केले कुमारी संस्कृती प्रभु हिने ८०० मीटर धावणे स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला तसेच सुमित पाटील यांने १५०० मीटर धावणे स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळविला त्याचबरोबर मुलांच्या ४ x १०० व ४ x ४०० धावणे रिले स्पर्धेत अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला.
यामध्ये शुभम मळगेकर, श्रेयश चिमणे, किशोर लाड, सिद्धांत कांबळे, विघ्नेश जाधव, शुभम सुतार यांचा समावेश होता.कुमारी संस्कृती प्रभू हीची सांगली येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे .
या खेळाडूंना जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक चराटी, उपाध्यक्ष विलास नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल देशपांडे सर्व संचालक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए. एन. सादळे, उपप्राचार्य डी .पी. संकपाळ, व्होकेशनल प्रमुख मनोज देसाई कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील यांचे प्रोत्साहन मिळाले .तर क्रीडाशिक्षक अल्बर्ट फर्नांडिस व डॉ. डी. जे. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.


– : संक्षिप्त :-
प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन अण्णाभाऊ सांस्कृतिक हॉल,आजरा हायस्कूल, आजरा येथे आज गुरुवार दिनांक १९ रोजी दुपारी ३.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.


निवड…
अंबाजी गुरव

धामणे ता. आजरा येथील अंबाजी वसंत गुरव यांची गिरणी कामगार तरुण स्वराज्य सेवा संस्थेच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तेजस कुंभार यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले आहे.


आज शहरात…
नवरात्र विशेष
♦श्री रवळनाथ नवरात्र उत्सव समिती :- दत्तपंक्ती भजनी मंडळ, कडगाव यांचे भजन ( वेळ – रात्री ९ वाजता )
♦लायन्स किंग नवरात्र उत्सव मंडळ:-रास दांडिया (वेळ- सायं. ७ वाजता)
♦भगवा रक्षक नवरात्र उत्सव मंडळ :- हिप्नॉटिझम (वेळ- रात्री ८ वाजता )
♦छत्रपती शिवाजीनगर नवरात्र उत्सव मंडळ :- सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद (वेळ – रात्री ८ नंतर )
♦क्रांतिकारी नवरात्र उत्सव मंडळ :- सूगम संगीत कार्यक्रम (वेळ – रात्री ८ वाजता)


दुर्गामाता दर्शन
लायन्स किंग फ्रेंड सर्कल,आजरा

अध्यक्ष : ओंकार माद्याळकर
उपाध्यक्ष : स्वप्नील रांगणेकर
सचिव : सौरभ देसाई
खजिनदार : केदार महाजन
क्रांतिकारी तरुण मंडळ,आजरा

अध्यक्ष : अशोक पोवार
उपाध्यक्ष : भिकाजी पाटील
सचिव : विक्रम पटेकर
खजिनदार : विशाल पटेकर
मूर्ती देणगीदार : पांडुरंग आप्पा सांबरेकर



