mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरक्रीडागुन्हाजीवनमंत्रटेक्नोलॉजीठळक बातम्यादेशबिझनेसभारतमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयरोजगारविदेशसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

गुरूवार   दि. २५  डिसेंबर २०२५

रोझरी चर्च, आजरा येथे नाताळ सण प्रारंभ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

आजरा येथे ख्रिस्ती बांधवांच्या वतीने रोजरी चर्चमध्ये नाताळ सणास उत्साहात सुरुवात झाली.

शांतता, करुणा व ख्रिस्ती मूल्यांचा समाजात प्रसार करत भक्तिभावाने व उत्साहात सुरु करण्यात आला. या प्रसंगी चर्चचे पॅरिश प्रीस्ट फादर मेल्विन पायस यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना नाताळ सणाचा खरा अर्थ स्पष्ट केला.फादर मेल्विन पायस यांनी आपल्या संदेशात सांगितले की, आपण चर्चला काय देतो यापेक्षा आपण समाजाला, गरजू व दुर्लक्षित घटकांना काय देतो हे अधिक महत्त्वाचे आहे. येशू ख्रिस्ताच्या जीवनातून शांतता, प्रेम, करुणा, क्षमाशीलता व त्याग ही मूल्ये आत्मसात केल्यासच खरे समाधान व आनंद प्राप्त होतो. दीनदुबळ्यांमध्येच ख्रिस्त आपल्याला भेटतो, ही भावना जोपासणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

नाताळ सणाच्या निमित्ताने  कॅरोल सिंगिंग व समाजभेटीचा विशेष उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात सर्व फादर्स, सिस्टर्स तसेच युवक युतीने उत्स्फूर्त सहभाग घेतला. वाटंगी, गवसे, दाभिल, शेळप, भादवण, खानापूर, साळगाव, पेरणोली तसेच आजरा शहरातील विविध समुदायांतील गटांना प्रत्यक्ष भेटी देऊन कॅरोल गायनाच्या माध्यमातून ख्रिस्त जन्माच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

ख्रिस्त बालक म्हणून पृथ्वीवर अवतरून सर्वांसाठी शांतता व मानवतेची मूल्ये देण्यासाठी जन्माला आला, हा संदेश खेडोपाडी व शहरातील समाजघटकांपर्यंत पोहोचविण्यात आला. या प्रत्यक्ष भेटींमुळे सामाजिक ऐक्य, बंधुभाव व परस्पर प्रेम अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.
या उपक्रमास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नाताळ सणाचा आनंद सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न धार्मिक ऐक्य, सामाजिक सलोखा व माणुसकीची भावना वृद्धिंगत करणारा ठरला.

झेप ॲकॅडमी आजरा शाखेचा प्रथम वर्धापनदिन उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

ज्ञानदीप प्रबोधिनी गडहिंग्लज संचलित झेप ॲकॅडमीचा पहिला वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला. आजरा महाविद्यालय येथील सेवानिवृत्त प्राध्यापक श्री. जनार्दन दळवी यांच्याहस्ते श्री रवळनाथ व श्री सरस्वती प्रतिमापूजन करण्यात आले. ज्ञानदीपचे प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष श्री. एम. एल. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली हा वर्धापन दिन समारंभ पार पडला.

प्रा. जनार्दन दळवी म्हणाले, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपले करिअर घडवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी शॉर्टकट मार्गाचा अवलंब न करता जिद्दीने कठोर परिश्रम घ्यायला हवेत. आपले उद्दिष्ठ, ध्येय डोळयासमोर ठेवून प्रयत्न करीत राहील्यास यशाचे शिखर नक्की गाठता येते.

याप्रसंगी श्री रवळनाथ हौसिंग फायनान्स आजरा शाखेचे सल्लागार प्रा. डॉ. नवनाथ शिंदे, श्री. गौतम सुतार यांच्यासह झेप ॲकॅडमीचे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी झेपचे प्रशिक्षक श्री. अजिंक्य कोकितकर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

श्री रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटी आजरा शाखेचे सल्लागार व आजरा ज्युनिअर कॉलेजचे माजी प्राचार्य राजीव टोपले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. झेप ॲकॅडमीच्या अधीक्षक गौरी बेळगुद्री यांनी सुत्रसंचलन केले. प्रशिक्षक विवेक दड्डी यांनी आभार मानले.

उत्तूरमध्ये मनरेगा कामांचे सामाजिक अंकेक्षण. विशेष ग्रामसभा संपन्न

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना २०२४-२५ अंतर्गत राबविण्यात आलेल्या कामांचे सामाजिक अंकेक्षण उत्तूर येथे विशेष ग्रामसभेत करण्यात आले. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी आबाजी पाटील होते. शासन प्रतिनिधी म्हणून संध्या परीट व अश्विनी सूर्यवंशी यांनी अंकेक्षण प्रक्रिया पार पाडली, तर ग्राम समिती निरीक्षक म्हणून बाळगोंडा कोकितकर उपस्थित होते. सरपंच किरण आमणगी, उपसरपंच समीक्षा देसाई आणि ग्रामसेवक प्रकाश पाटील व्यासपीठावर होते.

यावेळी सिंचन विहिरी, फळबागा, पाणंद रस्ते, घरकुल योजना व शौचालयांच्या कामांचा तपशील वाचनाद्वारे मांडण्यात आला. अंकेक्षणादरम्यान तीन त्रुटी निदर्शनास आल्याचे परिक्षकांनी सांगितले. यापैकी दोन त्रुटी दुरुस्त करण्यात आल्याचे ग्राम रोजगार सहाय्यक दादासो सावंत यांनी स्पष्ट केले.ग्रामसभेस ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

उत्तूर ग्रामपंचायतीच्या बहुपर्यायी विकासकामांचा लोकार्पण सोहळा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

उत्तूर ग्रामपंचायतीच्या वतीने पूर्ण झालेल्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा पार पडला. गावाची सुरक्षितता, स्वच्छता व नागरी सुविधा वाढविण्याच्या उद्देशाने ही कामे राबवण्यात आली आहेत.

ग्रामपंचायतीकडून बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही प्रकल्पाचा लोकार्पण शेतकरी निवृत्ती चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. गावात माईकसह ३२ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याने गैरप्रकारांना आळा बसणार आहे.

स्वच्छ भारत मिशन व १५ वा वित्त आयोगांतर्गत उभारण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालय व पाणीपुरवठा सुविधांचे लोकार्पण उपसरपंच समीक्षा देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे ग्रामस्थ, व्यापारी व बाहेरील नागरिकांची सोय होणार आहे.तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या प्लॅस्टिक संकलन कक्षाचे उद्घाटन सरपंच किरण अमणगी यांच्या हस्ते करण्यात आले. ओला व सुका कचरा वर्गीकरण करून खतनिर्मिती व प्लॅस्टिक प्रक्रियेचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

या लोकार्पण सोहळ्यावेळी सरपंच किरण अमणगी, उपसरपंच समीक्षा देसाई, ग्रामसेवक प्रकाश पाटील, सदस्य महेश करंबळी, संदेश रायकर, भैरू कुंभार, अनिता घोडके, सुनिता केसरकर, सुनिता हत्तीरगे, लता गुरव, सरिता गुरव, राजू खोराटे, संभाजी कुराडे, तसेच कल्लाप्पा नाईक, व्यंकटेश मुळीक, धनाजी उत्तुरकर, प्रविण लोकरे, ग्रामपंचायत कर्मचारी सचिन फाळके व महादेव मोरवाडकर उपस्थित होते.

सुलगाव फाट्यावर अपघातात दोघे ठार

महिला जखमी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

आजरा जवळील सुलगांव फाट्यावर बुधवारी पहाटे झालेल्या ओमनी चारचाकी व आयशर टेंम्पोचा अपघातात  गडहिंग्लजचे दोन भाजी व्यापारी ठार झाले आहेत तर एक महिला जखमी झालीं आहे. ठार झालेल्या मध्ये चालक व एका पुरुषाचा समावेश आहे.हा अपघात रात्री दीडच्या सुमारास घडला.

मनिष श्रीकांत सोलापुरे रा गडहिंग्लज (चालक),गीता कृष्णा कांबळे (रा गडहिंग्लज) व कृष्णा कलाप्पा कांबळे (रा गडहिंग्लज) हे  सावंतवाडीचा भाजीपाला व्यापार करुन परत गडहिंग्लजकडे जात होते.रात्री दीडच्या सुमारास आजऱ्याजवळील सुलगांव फाट्याजवळ ओमनी चालक याचा गाडी चालवत असताना चूकीच्या दिशेने जाऊन गाडी  आयशरवर आदळली यामध्ये कृष्णा कलाप्पा कांबळे हे जागीच ठार झाले तर चालक मनिष सोलापूरे व गीता कांबळे जखमी झाले.

दोघानाही उपचारासाठी गडहिंग्लज नंतर कोल्हापूर येथे नेण्यात आले मात्र यातील चालकाचाही मृत्यू झाला आहे. गीता कांबळे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मोटरसायकल स्वाराची धडक…
एक जखमी …

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

भरधाव मोटरसायकलने जोरदार धडक दिल्याने महादेव जोती कापसे रा. बहिरेवाडी ता. आजरा हे वृद्ध गंभीर जखमी झाले असून याप्रकरणी पोलिसांनी प्रवीण बाबू पालकर रा. राशिंग ता. हुक्केरी, जि. बेळगाव यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

कापसे हे डेअरीला दूध घालून पायी चालत घरी जात असताना पालकर याने मोटरसायकल भरधाव आणून पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये कापसे हे गंभीर जखमी झाले आहेत. शिवाजी जोंधळे यांच्या निपाणी – उत्तूर मार्गावरील घरासमोर असणाऱ्या रस्त्यावर सदर प्रकार घडला.

आवंडी धनगरवाड्यावर वाघाच्या हल्ल्यात बैल ठार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आवंडी ता. आजरा येथील धनगरवाडा क्रमांक ३ मध्ये वाघाने केलेल्या हल्यात बैल ठार झाला आहे. धनगरवाड्याच्या जंगलात सोमवार दि. २२ रोजी घटना घडली.

जानू कोकरे या शेतकऱ्याचा हा बैल आहे.दक्षिण आजराचे वनपाल संदिप शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.कोकरे यांनी नेहमी प्रमाणे जनावरे चरावयास सोडली होती. दरम्यान झाडीत दबा धरून बसलेल्या वाघाने जनावरांच्या कळपावर हल्ला केला. त्याच्या हल्यात बैल जागीच ठार झाला.

वारंवार वाघांकडून होणाऱ्या हल्ल्यांमुळे जनावरे चारण्यासाठी सोडण्यावर मर्यादा येऊ लागलेल्या आहेत.

विशेष सूचना…

मृत्युंजय महान्यूजच्या बातम्या बऱ्याच वेळा link ओपन होत नसल्याने पहावयास मिळत नाहीत अशा तक्रारी येत आहेत. याकरिता कृपया आपल्याकडे 96 37 59 88 66 हा नंबर “मृत्युंजय महान्यूज’ या नावाने save असणे गरजेचे आहे. सदर नंबर आपल्याकडे save नसल्यास आपणाला बातम्या ओपन करताना अडचण येईल. नंबर save करूनही ज्यांना बातम्या मिळणार नाहीत त्यांच्याकरता या नंबरच्या व्हाट्सअप स्टेटस वर बातम्यांची लिंक टाकण्याची व्यवस्था केली आहे. याचबरोबर jyotiprasad savant या Facebook account वरही बातम्या link द्वारे पहावयास मिळतील. बरेच मोबाईल नंबर मृत्युंजय महान्यूजकडे सेव आहेत परंतु  संबंधितांकडे मृत्युंजय महान्यूज चा नंबर save नसल्याने अशा वाचकांना लिंक पाठवल्यास व्हाट्सअप अकाउंट बंद होत आहे. कसा व्हाट्सअप ने नवीन नियम केला आहे.

यापुढे हळूहळू ग्रुप वर बातम्या लिंक पाठवणे बंद/कमी केले जाणार आहे. कृपया सर्वांनी याची नोंद घ्यावी. 

…मुख्य संपादक 

(काल दुपारनंतर अशीच तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे बऱ्याच जणांना कालच्या बातम्या पाहता आल्या नाहीत. त्यातील कांही महत्त्वाच्या बातम्या आज पुन्हा एक वेळ दिलेल्या आहेत.)

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

लक्ष्मीपूजन पडले चोरट्यांच्या पथ्यावर…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

गवसेत आमदार आबिटकर यांच्या हस्ते आरोग्यकेंद्राचे उद्या भूमीपूजन

mrityunjay mahanews

डॉ. सोमशेट्टी यांचे निधन

mrityunjay mahanews
error: Content is protected !!