mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरगुन्हाठळक बातम्यामहाराष्ट्रराजकीयसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

रवीवार  दि.२८ सप्टेंबर २०२५

अखेर मृत्यूने शुभमला कवटाळले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्यातील खानापूर येथील शुभम जयसिंग जाधव या अठरा वर्षीय महाविद्यालयीन तरुणाला वाचवण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थाची व पंचक्रोशीची सुरू असणारी धडपड फारशी कामी आली नाही. शनिवारी सकाळी त्याचे उपचारादरम्यान निधन झाले. अखेर मृत्यूने त्याला कवटाळले.

सुरुवातीला आलेला किरकोळ ताप, त्या तापामुळे स्थानिक पातळीवर केलेले उपचार, त्यातूनच पुन्हा पुढे निष्पन्न झालेला दुर्मिळ आजार व त्या आजारातून शुभमला बाहेर काढण्यासाठी कुटुंबीयांसह ग्रामस्थांची गडहिंग्लज व कोल्हापूर येथील रुग्णालयात त्याला दाखल करून जीवदान मिळवण्यासाठी धडपड सुरू होती. प्रसंगी उपचारासाठी दात्यांचे, हितचिंतकांचे आर्थिक मदतीचे हात पुढे येत होते. परंतु नियतीपुढे शुभमचे काहीही चालले नाही. अखेर त्याची शनिवारी सकाळी प्राणज्योत मावळली.

शेतकरी कौटुंबिक पार्श्वभूमी असणाऱ्या शुभमच्या पश्चात वृद्ध आजी – आजोबा,आई- वडील व अविवाहित बहीण असा परिवार आहे.

कथा टग्यांच्या…
व्यथा बांधकाम कामगारांच्या…
भाग : १

♦♦♦ ज्योतिप्रसाद सावंत…

असुरक्षित बांधकाम कामगारांना आर्थिक स्थैर्य व सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर शासनाने शहरी व ग्रामीण भागातील बांधकाम घ विविध योजना सुरू केल्या. केवळ योजना सुरू केल्या नाहीत तर त्यांच्याकरिता कायमस्वरूपी भर भक्कम स्वरूपात निधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तरतुदीही केल्या. संरक्षक किट,संसारोपयोगी साहित्य, विमा संरक्षण, भोजन, पाल्यांना शिष्यवृत्ती यासह विविध योजना पाहून पांढरपेशी नोकरदार वर्गाच्या तोंडाला पाणी सुटले. आणि इथूनच बांधकाम कामगारांच्या पुढ्यातील ताट हिसकावून घेण्यासाठी एक यंत्रणा सक्रिय झाली. कधी हातात खोरे अथवा डोक्यावर वाळूची बुट्टी न घेतलेले शासकीय- निमशासकीय कर्मचाऱ्यांसह सहकार, शिक्षण, राजकारण या क्षेत्रातील काम करणाऱ्या मंडळींचे कुटुंबीय बांधकाम कामगार बनले, आणि बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करणाऱ्यांची राजकीय मंडळींचा वरदहस्त असणारी एक यंत्रणाच सक्रिय झाली. ज्यामध्ये लाखो रूपयांची शासकीय लुट करण्याबरोबरच विविध योजनांच्या माध्यमातून संसारोपयोगी साहित्यसह इतर लाभ उठवण्याच़े उद्योग सुरू झाले.

सर्वसाधारणपणे ९० दिवस बांधकाम कामगार म्हणून करावे लागणारे काम,रहिवासी दाखला, ओळखपत्र, पासपोर्ट साईज फोटो सह नोंदणी प्रक्रिया सुरुवातीला ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांच्याकडे सोपवण्यात आली. कालांतराने राजकीय मंडळींच्या कार्यकर्त्यांची फाउंडेशन्सचे ‘थम’ लागू लागले . यामध्ये असणाऱ्या पैशाकडे बगलबच्चे मंडळी पाहून सक्रिय झाली. वर्षभरात पाच-पन्नास लाखाची चिरीमिरी कामे करणाऱ्यांचे दाखले घेऊन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली. शेकडो दाखले असे ठेकेदार मंडळींनी आपल्या सही शिक्क्यांची दिले. तर काहींचे बोगस सही शिक्केच संबंधित ठेकेदारांना व कंत्राटदारांना माहीत नसतानाच तयार करून घेऊन दाखल्यावर येत गेले. यातूनच आर्थिक सुस्थितीत असणाऱ्या अनेक मंडळींची नावे या बांधकाम कामगारांच्या यादीमध्ये येत गेली. कालांतराने मूळ बांधकाम कामगार बाजूला राहिले व अशीच मंडळी बांधकाम कामगारांचे फायदे उठवताना दिसू लागली. सध्याच्या याद्या पाहिल्या तर त्या निश्चितच धक्कादायक आहेत.

एकाच वेळी लाडकी बहीण योजना, बांधकाम कामगार योजनेसह विविध शासकीय योजना पात्र नसतानाही उचलणाऱ्यांची संख्या वाढत गेली. कामगार कल्याण मंडळ म्हणजे केवळ कार्यकर्त्यांच्या सोयी करता राजकीय मंडळींनी काढलेली योजना असाच प्रकार सुरू झाला आहे. कामगारांसाठीच्या या योजनेसाठी किती पैसा जमा होतो याचा लेखाजोखा निश्चितपणे कोणीही सांगू शकत नाही हे वास्तव आहे.

हजार – दीड हजार रुपये खर्चून बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करा आणि संसार उपयोगी साहित्य, शिष्यवृत्तीवर डल्ला मारा असाच काहींसा प्रकार सध्या सुरू आहे.

नोंदणी करणारे खुश… नोंदणी करून घेणारेही खुश… आणि सढळ हाताने लाभ देणारे अधिकारीही खुश असाच सगळा प्रकार.

क्रमश :

( उद्या…आम्ही नाही त्यातले …)

माहीतच नाही…?
सरबंळवाडीत आहे दुर्गा देवीचे भव्य मंदिर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्यातील सरबंळवाडी या गावचे ग्रामदैवतच दुर्गामाता आहे. या देवीचे गावच्या मध्यभागी भव्य असे मंदीर असून, दसरा या सणानिमित्ताने, घटस्थापणेपासून नवरात्र ऊत्सवामध्ये नऊ दिवस धार्मिक सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

या देवीचे आजरा तालूक्यातील एकाही गावात मंदीर नाही. जागरादिवशी ओटी भरण्याच्या निमित्ताने बाहेरगावी असणाऱ्या माहेरवासीनी गावात दाखल होतात.

कानोली पैकी असणारी सरबंळवाडी ही पुर्वी शेतीवाडी, गाई-गुरांनी समृद्ध अशी होती. या देवीच्या निमित्ताने एक अख्यायिका सांगितली जाते…

या ठिकाणच्या गाई चारण्यासाठी जंगलात जात होत्या, पण एका गुराख्याची गाय घरी दुध देत नव्हती. त्या दुभत्या गायीवर पाळत ठेवल्यानंतर आढळले की ही गाय जंगलातील एका पाषाणावर आपल्या दुधाच्या धारा नेहमीच सोडते आहे. याची काही जाणकार व्यक्तींकडे चौकशी केल्यावर तेथे दुर्गामातेचे अस्तित्व असून गावात दुर्गामातेची स्थापना करण्याचा सल्ला दिला.

त्या प्रमाणे गावात दुर्गादेवीची स्थापना केली. या देवीचा भाऊ भैरवनाथ याचे जवळच असणाऱ्या कानोली येथे मंदिर आहे़. गावात छोटे,साध्या कौलांचे असणारे हे मंदिर सर्वासाठी वस्तीस्थान होते. पूढे ते कौलारु केले होते.

साधारण १९९४-९५ पासून या देवीचे महत्व वाढत गेले, सुरुवातीला हरभऱ्याची भाजलेली डाळ, खडीसाखर या नैवेद्याने सुरूवात झाली. आता भावीक केळी, सफरचंद, मिठाई व महाप्रसादही देणगी रूपाने देत आहेत. या मंदीरासाठी कै. वसंतराव किल्लेदार व तंटामुक्ती अध्यक्ष गणपती भैरू पाटील याच्या प्रेरणेतून लोक सहभागातून व देणगीतून २००२ ते २००८ साली साठ लाख रूपये खर्च करून आरभावी लाल दगडा मध्ये बांधकाम करुन मंदिराचा जिर्णोध्दार करण्यात आला असून, दुर्गादेवीची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे.

भावीक भक्तांना राहण्याची स्वतंत्र खोली केली आहे.दसरा सणानिमित्ताने मंदिर स्वच्छता करून मंदिराला विद्युत रोषणाई केली जाते. नवरात्री निमित्ताने रोज सायंकाळी आठ वाजता गावातील सर्व महिला घरातून आरती करून देवीच्या पूजेसाठी येतात. या आरतीला आलेल्या महिलाच्यासाठी नऊरंगाच्या साड्या,नऊ दिवसामध्ये लकी ड्राँ मधून रोज एक साडी भाग्यवान महीलेला दिली जाते. रोज विविध धार्मिक व करमणुकीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यामध्ये सोंगी भजन, होम मिनिस्टर, रेकॉर्ड डांन्स, वकृत्व स्पर्धा, रेणूका भक्त जागर व महाप्रसादाचे नियोजन लोक सहभागातून केले जाते.

दुर्गादेवीचे पुजारी हे गावचे पाटील घराणे असून, सरंबळे, मांडेकर, मुरूकटे, कांबळे हे हक्कीमदार आहेत. या गावात ब्रम्हदेव, दत्त, गणपती, मरगुबाई व थळाचे मंदिरे आहेत. यामध्ये दुर्गामाता ही या गावची ग्रामदैवत असून स्त्री संस्कृतीचा पाया म्हणून देवीच्या जागरण निमित्ताने पंचक्रोशीतील भावीक व माहेरवाशीनी देवीच्या दर्शनाला व ओटी भरण्यासाठी आवर्जून येतात. आज सगळीकडे दुर्गामातेच्या मूर्तीची प्रतीस्थापना होत असून या देवीचे मंदिरच सरबंळवाडीत असल्याचे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

बघा तुम्हीही भेट दिला तर तालुक्यातील दुर्गा मातेची ही नवीन माहिती निश्चित मिळेल.

पावसाचे विघ्न कायम…
अनेक कार्यक्रम रद्द

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

गेले दोन दिवस पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे अखेर नाइलाजाने अनेक सार्वजनिक दसरा महोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी महाप्रसाद, करमणुकीसह विविध कार्यक्रम रद्द केले आहेत.

शुक्रवारी रात्रीपासून पावसाने चांगलेच झोडपले आहे. शनिवारी दुपारपर्यंत पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. यामुळे विविध कार्यक्रम घेण्यासाठी मंडळांना जागांच्या मर्यादा स्पष्टपणे जाणवत आहेत. अनेक मंडळांनी सुट्टीचे औचित्य साधून महाप्रसादासह शनिवार व रविवारी करमणुकीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

पावसाने उघडीप न दिल्याने अखेर महाप्रसादासह इतर कार्यक्रम रद्द करण्याची वेळ मंडळावर आली आहे. महाराष्ट्रभर सुरू असणाऱ्या पावसाच्या दणक्याने व तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे.

शूटिंग स्पर्धेत रोझरी हायस्कूलची शिरेल फर्नांडिसचे जिल्हा व विभागीय स्तरावर यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

शालेय शासकीय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत दहा मीटर रायफल शूटिंग प्रकारात रोझरी हायस्कूलची इयत्ता आठवीत शिकणारी विद्यार्थिनी शिरेल फर्नांडिस हिने उत्तम कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. सुरुवातीला तालुकास्तरीय स्पर्धेत विजेतेपद पटकावून तिने जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळवला. त्यानंतर जिल्हास्तरीय स्पर्धेतही प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. शूटिंग या क्रीडाप्रकारात निवड झालेली शिरेल ही तालुक्यातील पहिलीच विद्यार्थिनी ठरली आहे.

तिला मुख्याध्यापक फादर अँथनी डिसोझा, तालुका समन्वयक अल्बर्ट डिसोझा, क्रीडा शिक्षक संतोष कदम, विजय केसरकर व स्टीफन डिसोझा यांचे मार्गदर्शन लाभले.

पं. दीनदयाळ विद्यालयामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

पंडित दीनदयाळ विद्यालयामध्ये पं. दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती विमल भुसारी यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संजीव देसाई यांनी केले. प्रास्ताविकेत थोर देशभक्त , जनसंघाचे संस्थापक ,तत्वनिष्ठ समाजसेवक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची थोडक्यात माहिती सांगितली.

कार्यक्रमाचे वक्ते राष्ट्रीय स्वयंसेवक सेवक संघाचे कार्यकर्ते संदीप रघुनाथ पाटील यांचे स्वागत संस्थेचे संचालक सुधीर कुंभार यांनी केले. एम .पी. एस सी मधून राज्य कर निरीक्षक म्हणून निवड झालेल्या कु. सिद्धी अनिलराव देसाई यांचे स्वागत व सत्कार संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती विमल भुसारी यांच्या हस्ते करण्यात आला.
तालुकास्तरावर शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावर निवड झालेल्या विद्यार्थी भास्कर रघुनाथ चौगुले , कु .मीरा सुनील हरेर यांचा सत्कार संचालक भिकाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

धनाजी मोरे तसेच संस्थेचे संचालक यांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक संजीव देसाई यांनी केले.सिद्धी देसाई यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेतून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होईल, पुढचा प्रवास सोपा होईल, मोबाईलच्या युगात मोबाईलचा उपयोग विधायक करा .असा सल्ला दिला.

वक्ते संदीप पाटील यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे बालपण ,त्यांचे शिक्षण , त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग सांगितले. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी एकात्ममानववाद हा विचार त्यांनी देशाला दिला. त्यांनी सम्राट चंद्रगुप्त आणि आदीशंकराचार्य ही पुस्तके लिहून त्यातून व्यापक विचार जगाला सांगितले. ही पुस्तके विविध भाषांतून प्रसिद्ध झाली. १९५२ च्या अधिवेशनात मुखर्जी यांनी ‘मला अजून एक पंडित दीनदयाळ मिळालाअसता तर देशाचा चेहरा मोहरा बदलला असता’. असे उद्गार काढले होते. साहित्य, राजकारण किंवा मानव कल्याणाचा विषय असो प्रत्येक विषयावर त्यांनी आपले विचार मांडले .हे विचार आजही महत्त्वपूर्ण आहेत .त्यांनी आपल्या देशाचा गौरवशाली इतिहास जगासमोर मांडला . संस्थेचे संचालक सुधीर कुंभार ,भिकाजी पाटील, आनंदा कुंभार, संस्थेचे हितचिंतक प्रकाश पाटील,सौ.निता सोहनी, विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत बुरुड यांनी तर आभार प्रकाश प्रभू यांनी मानले.

आरपीआयच्या आजरा तालुका अध्यक्षपदी सूर्यकांत कांबळे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

बुरुडे ता. आजरा येथील सूर्यकांत बाळकू कांबळे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आजरा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ.राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखाली सदर निवड करण्यात आली असून निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष पांडुरंग कांबळे ( कुरुकलीकर ) व भीमराव दौलत कांबळे जिल्हा सरचिटणीस यांच्या हस्ते नुकतेच देण्यात आले.

दुर्गा माता दर्शन
क्रांतिकारी तरुण मंडळ चाफेगल्ली,आजरा


अध्यक्ष : श्री. अशोक रामचंद्र पोवार
उपाध्यक्ष : श्री. भिकाजी दत्तात्रय पाटील
सचिव : श्री. गोपाळ कृष्णा पाटील
मूर्ती देणगीदार : सागर शंकर जाधव
मूर्तिकार : इंद्रजीत आनंदा कुंभार

अजिंक्य कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कानोली

अध्यक्ष : मनोज भोगण
उपाध्यक्ष : सौरभ गंधवाले
सचिव : चेतन गंधवाले
खजिनदार :- अक्षय पाटील

दुर्गामाता दर्शन

शिव – शंभो कला क्रिडा सांस्कृतीक मंडळ दाभिल

अध्यक्ष : श्री . दत्तात्रय पाटील / भाऊ निवळे उपाध्यक्ष : संभाजी पाटील / प्रकाश पाटील खजिनदार : अजय हसबे
मुर्ती देणगीदार : युवराज पाटील

दुर्गादेवी कला क्रिडा सांस्कृतीक मंडळ, गवसे

अध्यक्ष : श्रीपती पेडणेकर
उपाध्यक्ष : श्रीकांत पाटील
खजिनदार : सुनिल पाटील
मुर्ती देणगीदार : सर्जेराव हेब्बाळकर

आजची वार्षिक सभा

स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, आजरा .

वेळ : दुपारी दोन वाजता 

स्थळ : पंडित दीनदयाळ विद्यालय, आजरा.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

धक्कादायक… रोहन देसाई यांचा अखेर मृत्यू

mrityunjay mahanews

उचंगी प्रकल्पाचे  मेव्हण्या-पाहुण्यांनी  श्रेय लाटू नये : शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!