सोमवार दि.२९ सप्टेंबर २०२५


आम्ही नाही त्यातले…

♦♦♦ज्योतिप्रसाद सावंत
असंघटित बांधकाम कामगारांचे संघटन करण्यासाठी आंदोलने झाली .मोर्चे निघाले. या सर्व आंदोलनांचे नेतृत्व करण्यासह आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्या मंडळींनी प्रसंगी पदरमोड केली, कामाचे खाडे केले व आंदोलने यशस्वी करून शासनाला बांधकाम कामगारांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यास भाग पाडले. कामगार रस्त्यावर उतरून त्याने आंदोलनाचे रान पेटवले जात असताना या सर्व घडामोडीत दलालांमार्फत नोंदणीकृत म्हणून मिरवणाऱ्या व बांधकाम क्षेत्राशी काडीमात्र संबंध नसणाऱ्या हे बोगस कामगार नेमके कुठे होते ? हा संशोधनाचा विषय आहे. कोणत्याही आंदोलनाची झळ न बसलेली मंडळी सध्या आयत्या पिठावर रांगोळ्या ओढू लागली आहेत.
काही चाणाक्ष मंडळींच्या या नोंदणीकृत बांधकाम कामगारांची बोगसगिरी लक्षात आली. विविध गावातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते, यांनी या बोगस कामगारांच्या विरोधात संबंधित विभागाकडे लेखी व तोंडी तक्रारी करून आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. एकीकडे तक्रारी वाढल्या असतानाही दुसरीकडे संबंधित विभागाने या लेखी तक्रारीच्या पत्रांना केराची टोपली दाखवली यामध्येच मोठे गौड बंगाल आहे.
सुरुवातीला कांही मंडळींनी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली आणि हे लोण इतरत्र पसरत गेले. एकमेकांच्या संगतीने यातील नेमकी ‘ गोम ‘ समजलेली अनेक मंडळी कागदावर बांधकाम कामगार होऊ लागली. आम्ही नाही आहोत त्यातले… असे म्हणत एका चांगल्या व सर्वसामान्यांसाठी असणाऱ्या या बांधकाम कामगारांच्या कल्याण मंडळांची अक्षरश: दुर्दशा होत गेली.
प्रत्येक वर्षासाठी या विभागाला नेमका किती निधी येतो ? त्याचा विनियोग कसा होतो ? याबाबत कोणतीच स्पष्ट माहिती देण्यास या विभागाकडून टाळाटाळ होते.
परप्रांतीय कामगार योजनांपासून वंचितच…
झारखंड, बिहारसह ठीक ठिकाणाहून महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामासाठी कामगार म्हणून येणाऱ्या संख्या फार मोठी आहे. ग्रामीण भागात शहरी भागामध्ये बांधकामावर असे अनेक कामगार दिसतात. परंतु आधार कार्ड, रहिवाशी पुरावा सारख्या तांत्रिक अडचणीमुळे असे कामगार या योजनांपासून दूरच आहेत.
क्रमश:

आजरा येथील स्वामी विवेकानंद पतसंस्थेला १ कोटी ७ लाख ७५ हजार नफा
सभासदांना १० टक्के लाभांश मंजूर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेला अहवाल सालात एक कोटी सात लाखांचा निवळ नफा झाला असल्याची माहिती चेअरमन श्री. दयानंद भुसारी यांनी दिली. तसेच सभासदांना १०% लाभांश जाहीर केला. संस्थेच्या ५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
जनरल मॅनेजर श्री अर्जुन रामा कुंभार यांनी सभा नोटीस वाचन ताळेबंद व आर्थिक पत्रकांचे वाचन केले संचालक श्री. सुधीर चोडणकर यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला चेअरमन भुसारी यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला व संस्थेला ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला आहे. सभासद, ठेवीदार, खातेदार व हीतचिंतक यांचा वाढता विश्वास ही संस्थेच्या प्रगतीची खरी ताकद असून सभासदांचा विश्वास व संस्थेचे पदाधिकारी कर्मचारी वर्गाच्या कष्टाच्या जोरावर संस्थेची स्वतःची वेगळी ओळख बनवत स्वामी विवेकानंद पतसंस्थेची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
सभेत सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार तसेच अहवाल सालात ७० वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ सभासदांचे अभिष्टचिंतन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेच्या व्यवहार वाढी व प्रगतीसाठी भैरू शेलार, हेमंत कदम, विजय बांदेकर, इनास फर्नाडिस इ. सभासदांनी सूचना मांडल्या सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे चेअरमन श्री. भुसारी व्हा. चेअरमन श्री.सुधीर बाबुराव कुंभार, संस्थेचे जनरल मॅनेजर अर्जुन रामा कुंभार यांनी दिली.
श्री. विजय बांदेकर यांनी संस्थेच्या चांगल्या पध्दतीच्या कामकाजाबद्दल संचालक मंडळाचा अभिनंदनाचा ठराव मांडला.
सभेला ज्येष्ठ संचालक श्री. नारायण सावंत, श्री. रविंद्र दामले, श्री. रणजीत पाटील, श्री. शिवाजी येसणे, श्री. गणपत धोंडीबा जाधव, श्री. विश्वजीत मुंज, श्री. राजेंद्र चंदनवाले, श्री. मुकुंद कांबळे, संचालिका सौ. सुनिता कुंभार, सौ.सारिका देसाई, शाखा सल्लागार यांच्यासह कर्मचारी व सभासद उपस्थित होते. व्हा. चेअरमन श्री सुधीर बाबुराव कुंभार यांनी आभार मानले.

व्यंकटराव प्राथमिक विद्यामंदिर येथे पोषण आहार सप्ताह उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
व्यंकटराव प्राथमिक मध्ये पोषण आहार सप्ताह उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आजरा महाल शिक्षण मंडळाच्या संचालिका सौ.अलकाताई जयवंतराव शिंपी होत्या.सकस व संतुलित आहारामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य कशा पद्धतीने सुधारते याची माहिती त्यांनी दिली.या कार्यक्रमात १४० महिलांनी उत्फूर्त भाग घेतला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. आर. एच. गजरकर यांनी केले तर , सौ.एन.आर.हरेर, डी.बी. डेळेकर , नगरसेविका सुमैया खेडेकर ,डॉ.पारपोलकर यांनी आपल्या भाषणात आहारात पालेभाज्यांचे महत्व पटवून सांगितले.
या कार्यक्रमाला उपस्थित आजरा महाल शिक्षण मंडळाच्या संचालिका सौ. प्रियंकाताई अभिषेक शिंपी,व्यंकटराव हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या पर्यवेक्षिका सौ. व्हि.जे.शेलार, सौ.ए.एस.गुरव,व्यंकटराव प्राथमिक चे मुख्याध्यापक.श्री.आर. व्ही. देसाई,उपस्थित होते सूत्रसंचालन.सौ.एल.पी.कुंभार यांनी केले तर आभार सौ.एन.आर. हासबे यांनी मानले.

चांदेवाडी येथे कामवीर विकास संस्थेची वार्षिक सभा उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
चांदेवाडी, ता. आजरा येथील श्री. कामवीर विकास सेवा संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी विठ्ठल-रखुमाई मंदिरातील अमृतराव देसाई सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
सभेच्या सुरुवातीला वार्षिक अहवाल सालात मृत्यू पावलेल्या सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर इयत्ता १०वी, १२वी तसेच विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा अभिनंदन ठराव श्री. लक्ष्मण सावंत यांनी मांडला. सचिव श्री. जयवंत येसादे यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग आणि २०२४-२५ या चालू आर्थिक वर्षाचा ताळेबंद अहवालाचे वाचन केले.
सभेदरम्यान २०१७ पासूनचे थकीत सभासदावर कोणती कारवाई केली याबाबत सभासदांनी विचारणा केली. यावर चेअरमन श्री. राजू देसाई यांनी उत्तर दिले. तर व्हाईस चेअरमन श्री. पांडुरंग सावरतकर यांनी संस्था पातळीवर सर्व कारवाई पूर्ण करून ती बँकेकडे पाठवण्यात आल्याचे सांगितले. तरीदेखील जास्तीत जास्त थकबाकी वसुलीसाठी अधिक प्रयत्न करण्यात येईल याचे आश्वासन त्यांनी दिले. संस्थेकडे बँकेचे थकित कर्ज असल्याने सभासदांना लाभांश देण्यात अडचणी येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या सभेला सर्व संचालक तसेच जेष्ठ सभासद श्री. बाबु भाऊ सावरतकर, श्री. जानबा गिलबिले, श्री. शामराव हसबे, श्री. केरबा हसबे, श्री. पांडुरंग जाधव व श्री. शंकर सावरतकर यांच्यासह सभासद उपस्थित होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आजऱ्यात शस्त्रपूजन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संगठना हीच कलियुगात आपली ताकद आहे असे प्रतिपादन केदार जोशी यांनी आजरा येथे झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित शस्त्रपूजन कार्यक्रमामध्ये केले.
आजरा येथे दिनांक २८ सप्टेंबर, २०२५ रोजी विजयादशमी निमित्त आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झालेल्या निमित्ताने भव्य सघोष पथसंचलन आणि शस्त्रपूजन उत्सव पार पडला. आजरा मंडलच्या या उत्सव मध्ये एकूण ७ गावांमधील, ८९ स्वयंसेवक पूर्ण गणवेशात उपस्थित होते.
आजरा तालुक्यामध्ये एकूण अशा प्रकारचे ९ कार्यक्रम होत आहेत. यामध्ये तालुक्यातील सर्व स्वयंसेवक, माता भगिनी, नागरिक सज्जन मोठ्या संख्येने उपस्थिती लावून आपले संघावरील प्रेम व विश्वास दाखवत आहेत.आजरा शहरात झालेल्या शस्त्रपूजन उत्सवामध्ये बोलताना वक्त्यांनी संघ समाजाला सोबत घेऊन समाज परिवर्तनाच्या पाच मुद्द्यांवर प्रतिपादन केले. या पंचपरिवर्तन मध्ये सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, स्व बोध, पर्यावरण आणि नागरिक शिष्टाचार या विषयावर संघ काम करत आहे. या पंचपरिवर्तनासाठी समाजाने सोबत येऊन यात प्रत्यक्ष सहभाग घ्यावा असे आवाहन सुद्धा त्यांनी केले.

शहीद भगत सिंग यांना आदरांजली

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
स्वातंत्र्यसेनानी, शहीद-ए-आझम भगत सिंग यांच्या जयंतीनिमित्त आजरा महाविद्यालय आजरा मधील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने त्यांच्या प्रेरणादायी जीवन आणि कार्यावर आधारित विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख प्रा. डॉ. नवनाथ शिंदे यांनी भगत सिंग यांच्या अतुलनीय देशभक्ती आणि क्रांतिकारी विचारांना उजाळा दिला. त्यांनी आपल्या भाषणात भगत सिंग यांच्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण घटनांवर प्रकाश टाकला. ते केवळ क्रांतिकारक नव्हते, तर एक प्रखर विचारवंत आणि लेखकही होते. ‘मी नास्तिक का आहे?’ हा त्यांचा लेख त्यांच्या वैचारिक खोलीचे दर्शन घडवतो. २३ मार्च १९३१ रोजी वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी त्यांना राजगुरु आणि सुखदेव यांच्यासह फाशी देण्यात आली. त्यांचे बलिदान भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी एक मोठी प्रेरणा ठरले. भगत सिंग यांनी पाहिलेल्या समानता व सामाजिक न्यायावर आधारित भारताच्या निर्मितीसाठी कार्य करण्याची प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन डॉ. नवनाथ शिंदे यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. नवनाथ शिंदे, प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे, कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील व एनएसएस प्रकल्प अधिकारी डॉ. अविनाश वर्धन यांनी भगत सिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. प्रास्ताविक डॉ. अविनाश वर्धन यांनी केले तर सूत्र संचालन व आभार प्रा. रत्नदीप पवार यांनी केले. कार्यक्रमास प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे, प्रा. अनिल निर्मळे, प्रा. विठ्ठल हाक्के, प्रा. अनुराधा मगदूम तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवदुर्गा दर्शन
शारदीय नवरात्र उत्सव छत्रपती संभाजी नगर पेरणोली ( एकता तरुण मंडळ )

अध्यक्ष : राजेंद्र ज्ञानदेव भोकरे
उपाध्यक्ष : रामदास विजय कोडक
खजिनदार : राजेंद्र अशोक कळेकर
सचिव : सोपान निवृत्ती फगरे

निधन वार्ता
आनंदा रेडेकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हारुर (ता. आजरा) येथील आनंदा परसु रेडेकर (वय ५४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे , विवाहीत मुलगी, आई व भाऊ असा परिवार आहे. आजरा साखर कारखान्याचे माजी संचालक सुरेश रेडेकर यांचे ते बंधु होत. सोमवार सकाळी ९ वाजता रक्षाविसर्जन होईल.

आज तालुक्यात…
♦ मडिलगे तालुका आजरा या गावची तहकूब ग्रामसभा आज सकाळी १० वाजता ग्रामपंचायत मडीलगे येथे बोलवण्यात आली आहे.
♦’ स्वच्छ नारी… सशक्त भारत’या अभियानांतर्गत महिलांसाठी वाटंगी येथे विशेष आरोग्य तपासणी शिबिर सकाळी नऊ वाजल्यापासून प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आयोजित केले आहे.

निधन वार्ता
राऊ परीट

घागरवाडी ता. आजरा येथील राऊ सखाराम परीट यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ९२ वर्षे होते. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सूना जावई, नातवंडे असा परिवार आहे.



