मंगळवार दि. ७ जानेवारी २०२५


आजरा तालुक्यात घरफोड्या सुरूच

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरासह तालुक्यामध्ये घरफोड्यांचे सत्र सुरूच असून ठीक ठिकाणी घरफोड्या होत आहेत. घरफोड्यांच्या या प्रकारामुळे पोलीस प्रशासनाची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत आहे
रवळनाथ कॉलनी (आजरा) येथील घराच्या दरवाजाचा कडी-कोंयडा उचकटून तिजोरीतील पाच हजार अज्ञात व्यक्तींनी लंपास केल्याची तक्रार बाळकृष्ण शिवाजी नांदवडेकर यांनी आजरा पोलिसांत दिली आहे.
बाळकृष्ण नांदवडेकर यांचे आई-वडील पुणे येथे गेले आहेत त्यामुळे घर बंद अवस्थेत असल्याने मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी समोरच्या दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला व तिजोरी उचकटून त्यामधील रोख रक्कम पाच हजार रुपये लंपास केले आहेत.
घरफोडीचे हे प्रकार भुरट्या चोरांकडून होत असल्याचे शहरवासीयांमधून बोलले जात आहे. चोरीला जाणारे साहित्य किरकोळ स्वरूपाचे असल्यामुळे अनेक जण पोलिसांची मदत घेण्याचे टाळतानाही दिसत आहे. परंतु याचा फायदा हे चोरटे उचलत असून बंद घरे ‘लक्ष्य’ बनवली जात आहेत.

आजऱ्यात पत्रकार दिन उत्साहात…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरामध्ये पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पत्रकार दिनानिमित्त महसूल विभागाच्या वतीने तहसीलदार समीर माने यांच्या हस्ते व नायब तहसीलदार विकास कोलते आणि म्हाळसाकांत देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकारांचा विशेष गौरव करण्यात आला.
पत्रकारांनी परखडपणे आपली मते मांडावीत व समाजातील विघातक प्रकृतींना रोखण्यासाठी प्रयत्न करावेत असे यावेळी तहसीलदार समीर माने यांनी स्पष्ट केले.
पत्रकार ज्योतिप्रसाद सावंत व रणजीत कालेकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
व्यंकटराव प्रशालेत शुभेच्छा कार्यक्रम….
येथील व्यंकटराव प्रशालेच्या वतीने समारंभपूर्वक पत्रकारांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी आजरा महाल शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष एस. पी. कांबळे, संचालक सचिन शिंपी, कृष्णा पटेकर, सुधीर जाधव मुख्याध्यापक राजेंद्र कुंभार, पर्यवेक्षिका सौ.व.ही.जे. शेलार यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
“पंडित दीनदयाळ’ मध्ये शुभेच्छा कार्यक्रम…
पंडित दीनदयाळ विद्यालयामध्ये संस्थेचे संचालक सुधीर कुंभार यांच्या उपस्थितीत शुभेच्छा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्याध्यापक संजीव देसाई, प्रकाश प्रभू यांच्यासह शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
‘जनता गृहतारणज्ञ’च्या वतीने शुभेच्छा…
येथील जनता गृह तारण संस्थेच्या वतीने स्थानिक पत्रकारांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मारुती मोरे यांच्यासह सरव्यवस्थापक मधुकर खवरे संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.
प्रवासी संघटनेच्या वतीने शुभेच्छा…
आजरा तालुका प्रवासी संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष सचिन इंदलकर यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.
शिवसेना शिंदे गटातर्फे शुभेच्छा…
शिवसेना शिंदे गटातर्फे नामदार प्रकाश आबिटकर यांच्या कार्यकर्त्यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या यावेळी विजय पर्वत धनंजय पाटील, संतोष भाटले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
या सर्व कार्यक्रमास पत्रकार ज्योतिप्रसाद सावंत, रणजीत कालेकर, सुनील पाटील, सदाशिव मोरे, कृष्णा सावंत, विकास सुतार उपस्थित होते.

‘अदानीं’च्या स्मार्ट प्रीपेडला काम स्थगित
उपविभाग आक्रमक झाल्याने निर्णय

गडहिंग्लज : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
स्मार्ट व प्रीपेड मीटर बसविण्याची कार्यवाही तातडीने थांबवावी व कृषिपंपाच्या वीज ओडणीसाठी सौरऊर्जेची सक्ती मागे घ्यावी, या मागणीसाठी गडहिंग्लज, आजरा, चंदगड व भुदरगड तालुक्यांतील वीजग्राहकांनी महावितरण कंपनीच्या येथील विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला मोर्चेकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून अदानी एनर्जी सोल्युशन कंपनीने पुढील आदेशापर्यंत काम स्थगित करावेत, अशी लेखी सूचना कंपनीच्या प्रतिनिधींना देण्यात आली.
येथील लक्ष्मी मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली. ‘महावितरण’च्या विभागीय कार्यालयावर आला. शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता विजयकुमार आडके यांच्याशी चर्चा केली. यावेळी ‘अदानी’चे प्रशांत उगले उपस्थित होते. दरम्यान, अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा झाली. लेखी आश्वासनानंतर मोर्चेकऱ्यांनी घोषणाबाजी केली.
यावेळी ‘ वीज वितरण ‘ च्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेमध्ये चर्चेत कॉ. संपत देसाई, विद्याधर गुरबे, राजेंद्र गड्यान्नावर, नागेश चौगुले, अमर चव्हाण, सुनील शिंत्रे, डॉ. नंदिनी बाभुळकर, प्रा. स्वाती कोरी, बाळेश नाईक, कॉ. धोंडीबा कुंभार, संभाजीपाटील, प्रकाश मोरुसकर, संग्राम सावंत, युवराज पोवार, रमजान अत्तार, रामराजे कुपेकर आदींनी भाग घेतला.
ज्ञमोर्चात किसनराव कुराडे, नितीन देसाई, कॉ. शिवाजी गुरव, मुकुंदराव देसाई, आनंदराव कुंभार,जोतिबा चाळके, मारुती कुंभार, दिलीप माने, राजू होलम, काशिनाथ मोरे, पापा चौगुले, अजित खोत, शिवाजी होडगे, सुरेश कांबळे, आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

डांबरी रस्त्याला मातीची ठिगळे…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
डांबरी रस्त्याला पडलेले खड्डे बुजवण्यासाठी ठेकेदाराकडून चक्क रस्त्याशेजारील मातीचा वापर करण्याचा अजब प्रकार वाटंगी फाटा ते शृंगारवाडी दरम्यानच्या रस्त्यावर सुरू आहे. माती टाकून रस्त्याचा दर्जा झाकणार तरी कसा ? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
तालुक्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्यांची ठेकेदारांच्या जादा मलईच्या अपेक्षेने दुर्दशा झाली आहे. अनेक ठिकाणी डांबरातले पितळ उघडे झाले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य आहे. हे खड्डे पॅचवर्क करून बुजवण्याची गरज असताना वाहनधारकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन चक्क मातीने बुजवले जात आहेत. यामुळे हळूहळू सर्वत्र जोडले धुळीचे साम्राज्य पसरू लागले आहे. खड्डा परवडला पण माती नको अशी अवस्था वाहनचालकांची झाली आहे.

सुळे येथे विविध विकास कामांचा शुभारंभ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सुळे ता. आजरा येथे नूतन आमदार शिवाजीराव पाटील, अण्णाभाऊ संस्था समूह प्रमुख अशोकआण्णा चराटी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष जयवंत सुतार यांच्या माध्यमातून मंजूर असलेल्या एक कोटी पाच लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे उदघाटन अशोकआण्णा चराटी यांचे हस्ते व जयवंत सुतार यांचे प्रमुख उपस्थितीत झाले.
याप्रसंगी सरपंच सौ. शिल्पाताई डोंगरे, उपसरपंच संदीप चव्हाण, भाजप तालुकाध्यक्ष अनिरुद्ध केसरकर, सरपंच संघटना राज्य सचिव राजाराम पोतनीस, शिरसंगी सरपंच संदीप चौगले, मालिग्रे माजी सरपंच समीर पारधे,सि. आर. देसाई ,संदीप सूर्यवंशी, अमित फडके, आनंदा कातकर, प्रकाश पाटील,दीपक डोंगरे, निलेश आजरेकर, माजी सैनिक संघटना अध्यक्ष दिलीप रेडेकर,तंटामुक्ती समिती अध्यक्ष मांगले, पोलीस पाटील सूर्यकांत केसरकर, बाळकू कोकितकर, आनंदा सूर्यवंशी, माजी सरपंच बाबुराव फडके, शिवाजी सुतार, विष्णू रेडेकर, मोहन कांबळे, शशिकांत कांबळे, अमोलकवळीकट्टी, ग्रामसेवक मुरली कुंभार, कंत्राटदार सचिन पवार, भूषण सुरंगे, आकाश पाटील, गणपत पाटील आदी उपस्थित होते.



निधन वार्ता
दत्तू सुतार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
लाटगाव ता. आजरा येथील दत्तू बाबू सुतार (वय ८७ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुले, विवाहित मुली, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
आजरा तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये प्रचंड जनसंपर्क असणारे सुतार हे लाटगावचे विद्यमान सरपंच वामन सुतार यांचे वडील होत.

दिलगिरी…
गेले दोन दिवस काही तांत्रिक अडचणीमुळे बातमीपत्र देण्यास उशीर होत आहे. कृपया वाचक व हितचिंतकांनी याची नोंद घ्यावी. या प्रकाराबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत असून लवकरच ही अडचण दूर करत आहोत.
…मृत्युंजय महान्यूज परिवार





