शुक्रवार दि.३० जानेवारी २०२६


उत्तूर जि. प. मतदार संघात उमेश आपटे यांची कसोटी
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांचे खंदे समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य उमेश आपटे यांनी यावेळी महाडिक गट-भाजपा पुरस्कृत ताराराणी आघाडीतून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. आपटे यांच्या या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हा निर्णय जर अंगलट आला तर आपटे यांची राजकीय कोंडी होऊ शकते. आपटे यांचे जिल्हा परिषद मतदार संघावर असणारे वर्चस्व मोडून काढण्याची ही संधी विरोधकांच्या पथ्यावर पडणार का ? हा प्रश्न लवकरच निकालात निघेल.
उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघ वैद्यकीय शिक्षण मंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नाम. हसन मुश्रीफ यांच्या विधानसभा मतदारसंघाला जोडला आहे. या मतदारसंघात मंत्री मुश्रीफ यांचे काम मोठे आहे. परंतु या कामाचे जिल्हा परिषद मतदानात रूपांतर करण्यास स्थानिक नेते मंडळी अपयशी ठरली आहेत. यामुळे या जिल्हा परिषद मतदार संघात तोडीस तोड काम करत उमेश आपटे यांनी आपली पकड घट्ट केली आहे. यामुळे विधानसभे करता हसन मुश्रीफ तर जिल्हा परिषदे करीता उमेश आपटे असे समीकरण उत्तूर विभागात गेली काही वर्षे दिसत आहे.
यावेळी मात्र आपटे यांनी थेट ताराराणी आघाडीतून उमेदवारी ठेवली आहे. आमदार सतेज पाटील आपटे यांना राजकीय बळ देण्यात कुठेही कमी पडले नसताना आपटे यांनी घेतलेला हा निर्णय धक्कादायक मानला जातो.
राष्ट्रवादीतून पंचायत समितीचे माजी उपसभापती शिरीष देसाई हे निवडणुकीला सामोरे जात आहेत. स्वच्छ प्रतिमेच्या जोरावर मंत्री मुश्रीफ यांच्याकडून ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. गत दोन-तीन निवडणुकांचे अनुभव लक्षात घेऊन उमेदवारी मिळत असतानाही राष्ट्रवादीच्या अनेकांनी निवडणुकीपासून दूर राहणे पसंत केले आहे. अशावेळी देसाई यांनी आपटे यांच्याशी सामना करण्याच्या दृष्टीने पक्षादेश म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदे करीता उमेदवार देसाई असले तरीही त्यांच्या पाठीमागे राष्ट्रवादीचे असणारे लेबल व मंत्री मुश्रीफ यांची असणारी ताकद दुर्लक्ष करून चालणार नाही.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शिवसेना शिंदे गटातर्फे विठ्ठल उत्तूरकर यांना जिल्हा परिषद आखाड्यात उतरवून या निवडणुकीत आणखीनच रंगत आणली आहे. प्रा. अर्जुन आबिटकर यांनी उत्तूरकर यांच्यासाठी घातलेल्या जोडण्या यशस्वी झाल्या तर या मतदारसंघातून धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. उत्तूरकर यांच्यासाठी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी कोळींद्रे जि.प. मतदारसंघात असणारी काही गावे जि.प. मतदारसंघ पुनर्रचनेत उत्तुर मतदार संघात गेली आहेत यामुळे येथील मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.
या सर्व परिस्थितीचा आढावा घेतल्यास उमेश आपटे यांचा ताराराणी आघाडीतून निवडणुकीला सामोरे जाण्याचा घेतलेला निर्णय त्यांची पुढील राजकीय वाटचाल सुखकर करणार की अडसर ठरण्यास कारणीभूत ठरणार ? या प्रश्नाचे उत्तर निकालानंतरच मिळेल.

लाडक्या बहिणींच भाजपला विजयी करणार : जयवंत सुतार;
सुळे येथे प्रचार मेळावा…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महिलांच्या सक्षमीकरणाला भारतीय जनता पार्टीने नेहमीच प्राधान्य दिले आहे. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा यासाठी भारतीय जनता पार्टीने लाडकी बहीण ही योजना राबवली आहे. या योजनेचा फायदा लाखो महिलांना होत आहे. ही योजना पुढील काळातही चालूच राहणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी कमळाला मतदान करून भाजपला बळकटी द्यावी असे आवाहन पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जयवंत सुतार यांनी केले. ते सुळे (ता. आजरा) येथे भारतीय जनता पार्टीच्या प्रचार दौऱ्या दरम्यान बोलत होते. वाटंगी पंचायत समिती मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार समीर पारदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुतार पुढे म्हणाले, पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघातील प्रत्येक गावाचा विकास आराखडा आम्ही तयार केला आहे. त्या माध्यमातून यापूर्वी सुमारे ५० कोटीहून अधिक रकमेची विकास कामे केली आहेत. पुढील काळातही अधिकाधिक विकास निधी आणण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. आमदार शिवाजीराव पाटील यांच्या माध्यमातून भरघोस निधी देण्याचा आमचा मानस आहे. मतदारसंघात भेडसावणारी रोजगार निर्मितीला विशेष प्राधान्य आमदार पाटील यांच्या माध्यमातून राहील. देशात, राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेतही सर्वांनी भाजपला साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सरपंच शिल्पा डोंगरे, उपसरपंच संदीप चव्हाण, बळवंत शिंत्रे, अमित फडके, संदीप कोकितकर, अमृत फडके, दिलीप रेडेकर, संदीप सूर्यवंशी, सागर रेडेकर, अनिल आपके, नारायण रेडेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

निवडणुकीत कर्मचाऱ्यांनी जबाबदारीपूर्वक काम करावे : रुपाली चौगुले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत कर्मचाऱ्यांनी जबाबदारीपूर्वक काम करावे. कोणत्याही प्रकारची हलगर्जी होता कामा नये. आपले कर्तव्य अचुकपणे पार पाडावे. मतदानाची प्रक्रिया योग्य प्रकारे कशी होईल यासाठी प्रयत्न करावेत. कोणत्यही प्रकारची अडचण येवू नये यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल. असे निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रुपाली चौगुले यांनी सांगीतले.
आजरा तालुक्यात जिल्हा परिषदेचे दोन गट व पंचायत समितीचे चार गणासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यासाठी येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या पटांगणात जिल्हा परिषद व पंचायतीसाठी प्रशिक्षण झाले. या वेळी निवडणुक निर्णय अधिकारी रुपाली चागुले यांनी मार्गदर्शन केले. सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार समीर माने या वेळी प्रमुख उपस्थित होते.
लोकसभा व विधानसभा येथे आपण एक मत देतो. येथे दोन मते द्यावी लागतात. याची काळजी घ्यावी. निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त केलेल्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. गैरहजर राहील्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
निवडणुक कामकाजासंदर्भातील नियम, मतदान यंत्र हाताळणे, सिलिंग प्रक्रिया, मतदान केंद्रावर उद्भवणाऱ्या समस्या, मतदान केंद्राध्यक्ष, व मतदान अधिकाऱ्यांची कर्तव्य, जबाबदाऱ्या व अधिकार याबाबत मार्गदर्शन केले. संबंधीत मशिन व साहित्य तपासून निवडणूक प्रक्रिया उतम प्रकारे हाताळावी. निवडणूक पक्रिया पारदर्शक, सुरळीत व शांततेत होण्यासाठी प्रत्येकांने प्रयत्न करावेत. असे आवाहन केले.
तालुक्यात १२७ मतदान केंद्र आहेत. यासाठी १४० केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी ४५० व १४ क्षेत्रीय अधिकारी नेमण्यात आले आहेत. या वेळी निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ईव्हीएममशीनचे प्रात्यक्षिक
या वेळी मतदान प्रक्रिया, ईव्हीएम मशीन हाताळणी, मतदान यादी, मतदान केंद्रावरील शिस्त तसेच आकस्मिक परिस्थिती उद्भवल्यास कोणती दक्षता घ्यावी याबाबत आवश्यक माहीतीही देण्यात आली.
थोडे हटके...
निवडणुकीतील ‘ त्या ‘ प्रचार फलकाची चर्चा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पंचायत समिती निवडणूक पार्श्वभूमीवर आजरा येथील एका अपक्ष उमेदवाराने मतदारांना मतदानाचे आवाहन तर केलेच आहे परंतु त्याचबरोबर विवाहाकरिता मुलगी सुचवण्याचे आवाहनही या फलकाद्वारे तालुका वासियांना केले आहे. मला निवडूनही द्या आणि मला मुलगीही द्या अशा आवाहनाचा फलक हा सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

आजरा साखर कारखान्याची ३१ डिसेंबर अखेरची ऊस बिले जमा….
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गवसे (ता. आजरा) येथील वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चालु स हंगामात आजअखेर ८६ दिवसात २ लाख ६१ हजार मे. टन ऊसाचे गाळप झाले असुन २ लाख ५ हजार क्विटल साखरेचे उत्पादन झाले आहे. कारखान्याकडे दि. १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर अखेर गाळप झालेल्या ४९ हजार मे. टन ऊसाच्या बिलाची प्रतिटन रूपये ३ हजार ४००/- प्रमाणे विनाकपात होणारी रू.१६ कोटी ८६ लाख इतकी रक्कम ऊस पुरवठादार शेतक-यांच्या सेव्हींग खात्यावर जमा करण्यात आली असलेबाबतची माहिती कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव देसाई यांनी दिली आहे.

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरातर्फे सुगम गायन स्पर्धेचे आयोजन
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा तर्फे कै. उर्मिला श्रीपाद मायदेव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कोल्हापूर जिल्हास्तरीय सुगम गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे बुधवार दिनांक ११ फेबुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता वाचन मंदिराच्या सभागृहात स्पर्धा संपन्न होतील. इयत्ता पहिली ते सातवी व आठवी ते बारावी अशा दोन गटात स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेमध्ये सुगम संगीत, नाट्य संगीत, भावगीत, भक्तीगीत इत्यादी गाणी सादर करता येतील. इतर माहिती करता वाचनालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन
वाचन मंदिराचे अध्यक्ष वामन सामंत, उपाध्यक्षा विद्या हरेर, कार्यवाह कुंडलिक नावलकर व सहकार्यवाह रविंद्र हुक्केरी यांनी केले आहे.



