mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शनिवार दि.३१ जानेवारी २०२६

मारामारी प्रकरणी देवकांडगाव येथील दोघां विरोधात गुन्हा नोंद


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

जमिनीच्या वादाचे पर्यवसान मारामारीत होऊन दिलीप संतू कांबळे व गुणाबाई संतू कांबळे यांना मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी दिलीप कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिकेत कुंडलिक कांबळे व अश्विनी सुरेश कांबळे ( दोघे रा. देवकांडगाव ता. आजरा ) यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी…

दिलीप कांबळे व अनिकेत कांबळे कुटुंबीयांमध्ये जमिनीचा वाद आहे.सदर जमिनीच्या वादाचा निकाल हा दिलीप कांबळे यांच्या बाजूने लागल्याने अनिकेत व अश्विनी कांबळे या त्यांच्यावर चिडून असून ते वारंवार त्यांना शिवीगाळ करत असतात. काल दि.३० जानेवारी रोजी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास दिलीप हे नदीवरून घरी जात असताना अनिकेत याने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करू नका असे दिलीप सांगत असताना त्याने हातात आयदान घेऊन जाऊन दिलीपसह सदरचे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या त्याच्या आईला आयदानाने मारहाण केली. याच दरम्यान अश्विनी हिनेदेखील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यामध्ये दिलीप व गुणाबाई जखमी झाल्या आहेत.

पुढील तपास हवालदार पांडुरंग येलकर करीत आहेत.

देसाई, सरदेसाई की पोवार…?

पेरणोली पंचायत समिती मतदारसंघात चुरशीची लढत

आजरा : ज्योतिप्रसाद सावंत

पेरणोली पंचायत समिती मतदार संघातून भाजपाने ऐनवेळी सौ. स्मिता उत्तम देसाई यांची उमेदवारी जाहीर करून धक्का तंत्राचा अवलंब केल्याने निवडणुकीत चुरशीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पंचायत समिती मतदार संघाने गत वेळी राष्ट्रवादीच्या उदय पवार यांना साथ दिली होती. परंतु मध्यंतरीच्या सात वर्षाच्या कालावधीत पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. राष्ट्रवादीमध्ये पडलेली उभी फूट, आमदार प्रकाश आबिटकर यांनी पालकमंत्री पदापर्यंत मारलेली मजल आणि सध्या अनपेक्षितरित्या आमदार शिवाजीराव पाटील यांच्या विधानसभा मतदारसंघात गेलेला कांही भाग अशा विविध घडामोडी घडलेल्या आहेत.

सुरुवातीच्या टप्प्यामध्ये राष्ट्रवादी व शिवसेना उबाठा गट एकत्र आल्याने या निवडणुकीत शिवसेना बाजी मारेल असे वाटत होते. परंतु अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी धक्कादायक घडामोडी घडत भाजपाने सौ. स्मिता देसाई यांना उमेदवारी जाहीर केली. शिवसेनेच्या असूनही सौ. यशोदा पोवार यांना अधिकृत चिन्हापासून बाजूला राहावे लागले. तर देसाई यांना भाजपचे अधिकृत चिन्ह मिळाले. मंत्री आबिटकर समर्थक सौ.श्वेता रणजीत सरदेसाई यांना शिवसेना शिंदे गटातून उमेदवारी मिळाली आहे.

राष्ट्रवादीसह मंत्री आबिटकर यांना मानणाऱ्या मतदारांची संख्या मोठी असली तरी प्रथमच पक्षाच्या चिन्हावर निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या भाजपाने या मतदारसंघात दमदार प्रचार सुरू केला आहे. यामुळे येथे व्यक्ती पेक्षा पक्षाला महत्त्व दिले जात असल्याचे स्पष्ट होत आहे. प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता आपल्या पक्षाच्या अधिकृत उमेदवारासाठी झटताना दिसत आहे.

अजून आठवडाभराचा कालावधी असताना तीनही उमेदवारांच्या प्रचार यंत्रणा सक्रिय झाल्याने संभ्रमावस्था निर्माण होऊ लागली असून अनेकांचे कागदावरचे गणित चुकण्याची शक्यता आता पुढे येऊ लागली आहे. कोणीही छाती ठोकपणे विजयाचा दावा करू शकत नाही हे वास्तव आहे.

शिंदे गटात इन्कमिंग वाढले

या पंचायत समिती मतदारसंघात शिवसेना शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग झाले आहे. याचे मतदानात किती रूपांतर होणार यावरही बरीच गणिते अवलंबून आहेत.

पेरणोली येथील विवाहितेचा मुंबई येथे अपघाती मृत्यू


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

पेरणोली ता. आजरा येथील मुंबईस्थित सौ. भक्ती प्रकाश हळवणकर (वय २८) वर्षे या विवाहितेचा बदलापूर/ मुंबई येथे शुक्रवारी सकाळी रेल्वे मधून उतरताना तोल जाऊन खाली पडून अपघाती मृत्यू झाला.

तिच्या पश्चात सहा महिन्यांचा मुलगा, पती, आई -वडील असा परिवार आहे.

पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघात
भाजपाची प्रचारात मुसंडी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघात भाजपला वाढता पाठिंबा मिळत आहे.अनेक कार्यकर्ते व गट पाठिंबा देत आहेत.भाजपने या जिल्हा परिषद मतदार संघात प्रचारात मुसंडी मारली आहे.

अशोकअण्णा चराटी, उमेदवार जयवंत सुतार, भाजपाचे तालुकाध्यक्ष अनिकेत चराटी व त्यांचे कार्यकर्ते प्रचाराचे उठवले आहे.आमदार शिवाजीराव पाटील यांनी नियोजन करुन कार्यकर्त्यांना प्रचाराला लावले आहे.

मोरेवाडी धनगरवाडा येथील धनगर समाज बांधवांचा पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघाचे भाजपचे उमेदवार जयवंत सुतार यांना पाठिंबा

आजरा तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू आहे. ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. आजरा तालुक्यात पहिल्यांदाच पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघात भाजपच्या कमळ चिन्हावर उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. इतर पक्षांच्या तुलनेने भारतीय जनता पार्टीने निवडणुकीच्या प्रचारात मुसंडी मारत आघाडी घेतली आहे. भारतीय जनता पार्टीचे पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार जयवंत सुतार यांनी कोणतेही पद नसताना वाटंगीपैकी मोरेवाडी धनगरवाडा येथील प्राथमिक शाळेच्या दोन वर्ग खोल्या नवीन बांधकामासाठी ४५ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. यामुळे मोरेवाडी धनगरवाडा येथील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिलेल्या निधीची जाण ठेवून धनगर समाज बांधवांनी या निवडणुकीत जिल्हा परिषद उमेदवार जयवंत सुतार यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अनिकेत चराटी, पेरणोली जिल्हा परिषद उमेदवार जयवंत सुतार, वाटंगी पंचायत समिती उमेदवार समीर पारदे, संदीप देसाई, रवी देसाई, उमेश घोरपडे, उदय सरदेसाई, बळवंत शिंत्रे, अजित हारेर, सचिन पाटील यांच्यासह विठोबा आडुळकर, तातोबा आडुळकर, कोंडीबा आडुळकर, भिकाजी कोकरे, धोंडीबा कोकरे, लखू आडूळकर, पांडुरंग आडुळकर, तुकाराम आडूळकर, जगु कोकरे, भागोजी शेळके, जणू बोडेकर, केशव शेळके, लखोजी शेळके, बाबू पिंगळे, थकोजी पिंगळे, थकलो भुईफोडे, बाबू कोकरे, चिमाजी कोकरे, बिरू बोडेकर, बमू थोरवत, बाबू आडुळकर, धाऊ आडुळकर, मधु कोकरे, जानबा कोकरे, गंगाराम कोकरे, भागोजी शेळके, विष्णू धडाम, अशोक धडाम, एकनाथ गावडे, अरुण ढोकरे, पांडुरंग धडाम, अरुण धडाम, पिंटू धडाम, चंद्रू वांद्रे, आप्पा वांद्रे कृष्णा वांद्रे यांच्यासह धनगर समाज बांधव उपस्थित होते.

लाखो लिटर पाणी वाया


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

शहरात काही ठिकाणी एक दिवसाआड पाणी तर काही ठिकाणी तेही नाही अशी परिस्थिती आहे. मात्र नगरपंचायतीचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे काल शुक्रवारी शिवाजीनगर येथील शासकीय गोदामा जवळ असणाऱ्या मार्ग बाई मंदिराच्या जवळच मुख्य पाईप लाईन मधून लाखो लिटर पाणी सुमारे सहा तास वाहून जात होते.हिच परिस्थिती येथील एकता कॉलनीतील पाण्याच्या टाकी नजीक होती. स्थानिक नागरिकांनी ही बाब पाणीपुरवठा विभागाच्या लक्षात आणून देऊनही पाण्याचा अपव्यय सुरूच होता. शहरवासीयांतून नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाच्या कारभाराबाबत संतप्त प्रतिक्रिया दिवसभर उमटत होत्या.

रस्त्याची दुर्दशा

दुचाकी गेली खड्ड्यात…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा – नेसरी मार्गावर रस्त्यांची पूर्णपणे दुर्दशा झाली असून सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य आहे. वाहनधारकांना या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. अवजड वाहनांच्या नेहमीच्या वर्दळीमुळे दुचाकी स्वरांना वाहने नेताना धुळीसह खड्ड्यांशी सामना करावा लागतो. काल शुक्रवारी आठवडा बाजारासाठी आलेला दुचाकीस्वार खड्ड्यात मोटरसायकल गेल्याने पडून जखमी झाल्याची घटना घडली आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

जमिनीच्या वादातून भाऊ-बहिणीमध्ये हाणामारी चौघे जखमी…

mrityunjay mahanews

डासांसाठी केलेल्या धूमीत पाच म्हैशिंसह शेळ्या व कोंबड्यांचा गुदमरून मृत्यू….

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

गांजा विक्री करणारे रॅकेट उघडकीस

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!