
होनेवाडी येथे एकाची आत्महत्या…?

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
होनेवाडी ता. आजरा येथून काल सोमवार दिनांक १२ ऑगस्ट रोजी संध्याकाळपासून बेपत्ता असलेल्या दीपक दिनकर शेंडे ( वय ३६ वर्षे) यांचा मृतदेह स्थानिक नामदेव शेंडे यांच्या विहिरीमध्ये आज आढळून आला.
दीपक याने आत्महत्या केली असल्याचा संशय स्थानिक ग्रामस्थांमधून व्यक्त केला जात आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील माहिती घेत आहेत.
दीपक याच्या पश्चात पत्नी व लहान दोन मुली आहेत.

समन्यायी पाणी वाटपाच्या लढ्यासाठी सज्ज व्हा…
डॉ.भारत पाटणकर
मलीग्रे येथे मेळावा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालूका पाण्याने समृद्ध झाला आहे. तालुक्यातील धरणांतून दुस-याला पाणी देऊ शकतो एवढा सर्व धरणांमध्ये पाणीसाठा आहे.आटपाडी तालूक्यात पथदर्षी प्रकल्पातून समन्यायी पाणी वाटप सुरू केले.त्यानुसार आजरा तालूक्याला समन्यायी वाटपाने शेवटच्या शेतक-यापर्यंत पाणी देण्यासाठी लढण्यास सज्ज व्हा असे अवाहन पाणी संघर्ष चळवळ व धरणग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी केले.
मलीग्रे ता आजरा येथे आयोजीत पाणी परीषद मेळाव्यात प्रमूख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी सरपंच सौ. शारदा गुरव होत्या.
डॉ.पाटणकर म्हणाले, सार्वजनिक पाणी आमच्या हक्काचे आहे.सार्वजनीक पाण्याच्या जीवावर धंदा करू देणार नाही.वैज्ञानीक अभ्यासाच्या जोरावर चळवळ उभी करावी लागेल. पाण्यावरचा अधिकार प्रत्येक कुटुंबाचा आहे.पाच माणसापाठीमागे ६ हजार घनमीटर पाणी द्यावे.शेतीला ५ हजार घनमीटर पाणी लागते.पिकाला हिशोब करून पाणी द्यावे.
यावेळी डिसेंबरमध्ये आजरा,गडहिंग्लज ,चंदगड तालूक्यासाठी पाणी परीषद घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
आजरा कारखाना संचालक अशोक तर्डेकर म्हणाले, तालूक्यात ५५ हजार हेक्टर क्षेत्र आहे.१६ हजार जंगल आहे.६ हजार ७०० हेक्टर ओलीताखाली आहे.भविष्यात संपूर्ण क्षेत्र ओलीताखाली येण्यासाठी परीषदेचे आयोजन केले.यावेळी सरपंच गुरव,काँ.संपत देसाई,डाँ नंदाताई बाभूळकर,डाँ.यतीन दिवाकर,,डाँ.मेघराज,बाबूराव गुरबे,प्रा.किसनराव कुराडे,रचना होलम यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी उपसरपंच सुरेखा तर्डेकर, काँ शांताराम पाटील,,तातूअण्णा बटकडली,समीर पारदे,संजय देसाई,शिवाजी भुगूत्रे,यासह मोठ्या संख्येने नागरीक उपस्थीत होते.
संजय घाटगे यांनी सूत्रसंचालन केले.अशोक शिंदे यांनी आभार मानले.

परशुराम बामणे यांना अन्वेषण ग्रुप ऑफ मीडियाकडून लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
अन्याय निवारण समिती आजराचे अध्यक्ष परशुराम बामणे यांना केलेल्या सामाजिक कार्य व योगदानाबद्दल अन्वेषण ग्रुप ऑफ मीडियाकडून लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
श्री.बामणे यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना सदर पुरस्कार देण्यात येत असल्याचे अन्वेषण ग्रुप ऑफ मिडियाने म्हटले आहे.

चिमणे येथे रानभाजी
महोत्सव

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
तालुका कृषी अधिकारी कार्यालय आजरा व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कोल्हापूर अंतर्गत मौजे चिमणे, तालुका आजरा येथे रानभाजी महोत्सव कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन समीर माने, तहसीलदार आजरा यांचे हस्ते करण्यात आले. रान भाजी पुस्तिका २०२४ चे प्रकाशन यावेळी तहसीलदार माने यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी डोंगर कपारीत मिळणाऱ्या व आरोग्यासाठी हितकारक असणाऱ्या रान भाज्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.
यावेळी अनिल फोंडे तालुका कृषी अधिकारी आजरा, सुनील कांबळे सरपंच चिमणे, वसंत तारळेकर अध्यक्ष भूमी शेतकरी उत्पादक गट चिमणे, दिनेश शेट्ये कृषी अधिकारी पंचायत समिती आजरा,चंद्रकांत त्रिभुवने शाखाधिकारी बँक ऑफ इंडिया उत्तुर, बाबासाहेब पाटील तज्ञ मार्गदर्शक व सेवानिवृत्त मुख्याध्यापक चिमणे, विजयसिंह दळवी प्रभारी कृषी अधिकारी आजरा, प्रदीप माळी प्रभारी मंडळ कृषी अधिकारी आजरा, प्रकाश पाटील प्रभारी मंडळ कृषी अधिकारी उत्तुर,मा. सागर तारळेकर सदस्य तालुकास्तरीय शेतकरी सल्ला समिती आजरा,सर्व कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक आणि शेतकरी इत्यादी उपस्थित होते.

लोकशाहीर द. ना. गव्हाणकर यांच्या कार्याला उजाळा देणारे गुंडू शाहीर कला मंच : डॉ सचिन पोवार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
लोकशाहीर द. ना. गव्हाणकर यांच्या कार्याला उजाळा देणारे गुंडू शाहीर कला मंच आहे असे प्रतिपादन श्रावणी महत्वाचे उद्घाटक महाराष्ट्र राज्य लोककला महोत्सव समिती कोल्हापूर व डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशनचे संस्थापक डॉ सचिन पोवार यांनी केले .ते उत्तूर येथील श्रावणी महोत्सव उदघाट्न प्रसंगी बोलत होते.
लोककला महोत्सव समितीचे संपर्कप्रमुख गणपती नागरपोळे, लोक कलाकार संघाचे आजरा तालुकाध्यक्ष राजाराम कोपटकर , गुंडू शाहीर कला मंचचे सचिव दत्तात्रय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व गुंडू शाहीर कला, क्रीडा, सांस्कृतिक मंच आरळगुंडी चे संस्थापक शाहीर गुंडू राजाराम अध्यक्षस्थानी होते. शाहीर रामदास सातपुते राधानगरी यांनी स्वागत गीताने सुरुवात केली.
प्रास्ताविक श्रावणी महोत्सव कमिटीचे अध्यक्ष विठ्ठल कदम यांनी करून कलाकार सूचना व माहिती सांगितली. शाहीर मारूती केसरकर, संजय इंगळे, सदानंद शिंदे, पांडुरंग येजरे यांनी विविध पोवाडे व रेणुका देवीचे गाणी मालूबाई सुतार यांनी सादर केली. तबला वादक,सुरपेटी वादक आधी सर्व प्रकारच्या लोक कलाकारानी आपापल्या कला सादर केली. गुंडू शाहीर यांनी ही लोककला टिकवून नवोदित व नव – नवीन कलाकाराना या मंचच्या वतीने हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले असे मत लोककला महोत्सव समितीचे प्रमुख गणपती नागरपोळे यांनी मांडले.
अध्यक्षीय मनोगतात ज्येष्ठ शाहीर गुंडू शाहीर कला मंचचे संस्थापक गुंडू राजाराम म्हणाले, आम्ही ही कला जपली टिकवली तशीच ही कला नवीन पिढीने या लोककलेचा आदर करून पुढील पिढी पर्यत पोहचविण्याचे काम आता तरुण युवकांनी सुरू ठेवून ही लोककला जोपासावी असे मत मांडले. कार्यक्रमाची सांगता ज्ञानदेव रेडेकर यांच्या भजनाने झाली.
यावेळी शाहीर संताजी भाटले, धोंडीराम कांबळे, बयाजी ससाने, सुशांत पाटील,साताप्पा गुरव, दिलीप पाटील, आनंद कांबळे,रोहिदास सातपुते ,दत्तात्रय पाटील, धनाजी शित्रे, पिंटू चौगले, मनीषा सुतार, मालुबाई सुतार आदी सह भुदरगड,राधानगरी , उत्तूर परिसरातील विविध कलाकारांनी हजेरी लावून आपली कलासादर केली.
सूत्रसंचालन श्रीपाल कांबळे यांनी केले तर आभार मंचचे सचिव दत्ता पाटील यांनी मानले.
आजरा एस.टी. आगारात शुक्रवारी प्रवासी राजा दिन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा एस.टी.आगारात शुक्रवार दि १६ ऑगस्ट रोजी प्रवासी राजा दिन व “कामगार पालक दिन” साजरा करणेत येणार आहे. प्रवासी व कामगारांच्या समस्यांचा स्थानिक पातळीवर निपटारा करणेसाठी सदर उपक्रम राबवणेत येणार आहे.
आजरा आगारात शुक्रवार दि १६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत प्रवाशांच्या लेखी तकारी स्विकारल्या जातील व त्यावरील उपाययोजनांबाबत विभाग नियंत्रक मार्गदर्शन करतील. दुपारच्या सत्रात, दुपारी ३ ते ५ या वेळेत आगारातील एसटी कर्मचा-यांच्या व्यक्तीगत अथवा संघटनात्मक समस्या ऐकून घेवून त्यावर तातडीने योग्य ती कार्यवाही केली जाईल.
प्रवासी व कर्मचा-यांनी आपल्या तकारी अथवा समस्या लेखी स्वरुपात नेमून दिलेल्या वेळेत आगारात देणेत याव्यात असे आवाहन आगार व्यवस्थापक प्रवीण पाटील यांनी केले आहे.


