
जनता सहकारी बँक म्हणजे विश्वास : मुकुंदराव देसाई
बँकेची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गेल्या पंधरा वर्षांच्या काळात जनता सहकारी बँकेने नेत्रदिपक प्रगती केली आहे. संचालक मंडळाचा एकमुखी पाठिंबा, कर्मचाऱ्यांचे सहकार्य, सभासदांचा विश्वास यामुळे हे यश मिळविणे शक्य झाले. पश्चिम महाराष्ट्रातील एक अग्रगण्य बँक म्हणून बँकेची ओळख असून जनता सहकारी बँक म्हणजे विश्वास असे समीकरण तयार झाले आहे. बँकेमध्ये आपण बिन पगारी हेडमास्तरची भूमिका बजावत आहे. बँकेच्या आगामी निवडणुकीमध्ये तरुणांना संधी देण्याचा आपला मानस असून आपण निवडणुकीला उभे राहणार नाही असेही अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी स्पष्ट केले. बँकेच्या ६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
स्वागत संभाजी इंजल यांनी केले. श्रद्धांजलीचा ठराव संचालक शिवाजी पाटील यांनी मांडला. यावेळी चेअरमन देसाई म्हणाले, बँकेला राज्य कार्यक्षेत्र मिळाले असून रिझर्व्ह बँकेचे सर्व निकष पूर्ण करून बँक आर्थिकदृष्ट्या भक्कम पायावर उभी आहे. बँकींग क्षेत्रात अमुलाग्र बदल होत असून त्यादृष्टीने बँकेने सर्व तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. रिझर्व्ह बँकेने परवानगी दिल्यानंतर बँकेच्या नव्या शाखा वेळेत सुरू केल्या असून येत्या १६ ऑगस्ट रोजी पेठवडगांव शाखाही सुरू होत असल्याचे त्यांनी सांगितले.
बँकेने अहवाल सालात ५८८ कोटींचा व्यवसाय केला असून बँकेला २ कोटी ७५ लाखांवर निव्वळ नफा झाला आहे. बँकेच्या ठेवी तसेच कर्जामध्ये वाढ झाली असून सभासदांनी जास्तीत जास्त ठेवी बँकेत ठेवून बँकेच्या प्रगतीला हातभार लावावा असे आवाहन त्यांनी केले.
अहवाल वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी एम. बी. पाटील यांनी केले. यावेळी तानाजी देसाई यांच्यासह सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना चेअरमन देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी उत्तरे दिली. यानंतर सभासद तसेच कर्मचाऱ्यांच्या गुणवंत मुलांचा तसेच स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून विविध पदावर कार्यरत असलेल्या तालुक्यातील गुणवंतांचा गौरव यावेळी करण्यात आला.

सभेला व्हा. चेअरमन महादेव टोपले, ज्येष्ठ संचालक जयवंतराव शिंपी, रणजित देसाई, बाबाजी नाईक, शशिकांत नार्वेकर, अमित सामंत, विक्रमसिंह देसाई, रेखा देसाई, नंदा केसरकर, महेश कांबळे, पांडुरंग तोरगले, संतोष पाटील, संभाजी अस्वले, शिवाजीराव पाटील ,व्यवस्थापकीय मंडळाचे चेअरमन काशिनाथ पाटील यांच्यासह बँकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच संघाचे चेअरमन विठ्ठलराव देसाई, सुरेश देसाई, जोतीबा चाळके, संदीप कांबळे, कारखाना संचालक रशिद पठाण, रवी भाटले, तानाजी देसाई, दिगंबर देसाई, माजी नगरसेवक अभिषेक शिंपी, अशोक पोवार, विश्वास जाधव, सुरेश कालेकर यांच्यासह सभासद उपस्थित होते. संचालक जयवंत कोडक यांनी आभार मानले.

धामणे येथून पाण्याचा टँकर लंपास…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
धामणे ता. आजरा येथून ज्ञानदेव बाळू आरेकर यांचा उभा केलेला ट्रॅक्टरला जोडला जाणारा पाण्याचा टँकर अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.
बांधकाम व्यवसायिक आरेकर यांनी हा ट्रॅक्टर धामणे घाटामध्ये उभा केला होता तिथून सदर चोरी झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पुढील तपास पोलीस हवालदार बाजीराव कांबळे करीत आहेत.

वर्ग मैत्रिणीला दिला मदतीचा हात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्री शिवाजी विद्यालय, महागाव एस. एस. सी. बॅच १९९०-९१ च्या सर्व वर्गमित्रांनी मिळुन पतीच्या निधनाने अडचणीत आलेल्या रेखा सदाशिव सुतार रा मडीलगे, ता आजरा या वर्गमैत्रिणीस आर्थिक मातीचा हात दिला.
रेखा यांच्या पतीचे अचानक निधन झाले त्यामुळे त्या आर्थिक अडचणीत आहेत असे समजल्यावर सर्व मित्र व मैत्रिणींनी मिळून सढळ हस्ते मदत जमा करून रोख रु. ६१ हजार ५०० रुपये जमा केले.
श्री, सुभाष खानापुरे, श्री चंद्रकांत केसरकर , हवालदार अनील सरंबळे, कॉ. दत्ता कांबळे, श्री आनंदा पोवार श्री प्रकाश देसाई, प्रभा पाटील, रंजना कागीनकर , संगीता सुतार त्यांनी या कामी विशेष प्रयत्न केले.

मलिग्रे येथे आज पाणी परिषद मेळावा…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील चित्री, उचंगी, आंबेओहोळ, सर्फनाला, एरंडोळ, धनगरमोळा हे सहा मध्यम प्रकल्प पूर्णत्वास जावून देखील, तालुक्यातील एकूण क्षेत्रापैकी फक्त ३० % जमिन ओलिताखाली आलेली आहे आणि तालुक्यातील ५० % गावे पाण्यावाचून वंचित आहेत. त्यांच्या पाण्याचा नैसर्गिक हक्क नाकारला जात आहे, हे वास्तव लक्षात घेता उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करुन तालुक्यातील सर्व गावांची संपूर्ण जमिन ओलिताखाली आणण्याच्या दृष्टीने समन्यायी पद्धतीने पाण्याचे योग्य नियोजन करुन सरकारी खर्चाने शेती करणाऱ्या प्रत्येक कुटूंबाला हक्काचे व आवश्यक तेवढे पाणी मिळाले पाहिजे, यासाठी लढा उभारणे सद्यस्थितीत अत्यंत गरजेचे आहे.
हीच भुमिका घेऊन तालुक्यात पडणाऱ्या सरासरी २००० ते २५०० मिलीमीटर पावसाच्या पाण्याचे नियोजन, पाणलोट विकास क्षेत्राचा कार्यक्रम परिणामकारकरित्या राबविणे, सांगली जिल्ह्यातील आटपाडी या तालुक्यातील कार्यन्वीत असलेल्या समन्यायी पाणी वाटप योजना शासकीय खर्चाने झालेली आहे. याच धर्तीवर शेतकऱ्याला त्याच्या हक्काचे बारमाही पाणी पाईपने शेतीला मिळावे या हेतूने मलिग्रे, ता. आजरा येथे आज सोमवार दि. १२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता, श्री. मल्लिकार्जुन मंदिर येथे पाणी चळवळीचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनपर उपस्थितीत आणि मुंबई आय.आय.टी. सितारा केंद्राच्या प्रमुख डॉ. प्रा. बकुळ राव व डॉ. प्रा. आदित्य खेबूडकर (के.आय.टी. कॉलेज सिव्हिल इंजिनिअरींग खाते प्रमुख), डॉ. यतीन दिवाकर, डॉ. मेघराज, कॉ. संपत देसाई या मान्यवर तज्ञ मंडळींच्या अभ्यासू मार्गदर्शनाखाली मेळावा आयोजित केला आहे.
आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी मलिग्रे येथे होणाऱ्या या पाणी परिषदेकरीता होणाऱ्या मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन सौ. शारदाताई गुरव,सरपंच, ग्रा. पं. मलिग्रे श्री. अशोक तर्डेकर निमंत्रक, पाणी परिषद मेळावा व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


