mrityunjaymahanews
अन्य

GROUND REPORT

आजरा कारखाना वाचविण्यासाठीच आमची धडपड …पालकमंत्री हसन मुश्रीफ
आजरा येथे सभा


                      आजरा:प्रतिनिधी

        प्रचंड आर्थिक संकटात असलेला आजरा सहकारी साखर कारखाना वाचला तरच शेतकऱ्यांना न्याय आणि कामगारांचे कल्याण होईल. श्री. रवळनाथ शेतकरी विकास आघाडी च्या माध्यमातून आजरा सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठीच आमची धडपड आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. आजरा येथे श्री. रवळनाथ शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत पालकमंत्री बोलत होते. सभासद शेतकऱ्यांची बंद पडलेली साखर देण्याचाही प्रयत्न करू, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजेश पाटील होते.

      भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले,
आजरा कारखान्याची या घडीची मालमत्तेसह किंमत १०५ कोटी रुपये आहे आणि कर्ज मात्र दीडशे कोटींच्या पुढे गेले आहे. हा कारखाना सावरायचा असेल तर सहवीज प्रकल्प आणि डिस्टिलरी उभी करावी लागेल. यासाठी या परिसराची फार मोठी अडचण आहे ती इको- सेंसीटीव्ह झोनची. ही बंदी उठविण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमितजी शहा यांना भेटू. त्यानंतर टप्प्याटप्प्याने हा कारखाना कर्जमुक्त होईल आणि खऱ्या अर्थाने शेतकरी आणि कामगारांना न्याय मिळेल.

      आमदार राजेश पाटील म्हणाले, कर्जबाजारीपणामुळे एनपीएमध्ये गेलेला आजरा साखर कारखाना पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी मोठ्या पराकष्ठेने बाहेर काढला. आज विरोधक त्यांच्यावरच नको त्या पातळीवर जाऊन टीका करीत आहेत. मंत्री श्री. मुश्रीफसाहेब यांच्या नेतृत्वाखालीच आजरा स्वयंपूर्ण होईल.

    यावेळी गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे म्हणाले, ज्या मंडळींनी वसंतराव देसाई यांचा अपमान  केला त्या कै. वसंतराव देसाई यांचा फोटो लावून मते मागण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

      सभेमध्ये दिगंबर देसाई , विष्णुपंत केसरकर यांनी अशोकअण्णा चराटी, प्रा. सुनील शिंत्रे, जयवंतराव शिंपी, अंजनाताई रेडेकर यांच्यावर जोरदार टीका केली. संग्राम सिंह कुपेकर संताजी सोले, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांचीही यावेळी मार्गदर्शनपर भाषणे झाली. कारखान्याच्या हितासाठी राष्ट्रवादीच्या रवळनाथ विकास आघाडीला निवडून देण्याचे आवाहन यावेळी सर्वांनी केले.

       सभेस बिद्री साखर कारखान्याचे संचालक उमेश भोईटे, मधु आप्पा देसाई, अबूताहेर तकिलदार, डॉ. राजलक्ष्मी देसाई,रशिद पठाण, माजी पंचायत समिती उपसभापती कामीना पाटील, बी.टी. जाधव, अल्बर्ट डिसोझा, संजय शेणगावे, आदींसह राष्ट्रवादी समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कारखाना सहकारातच, स्वबळावर व सक्षमपणे चालवणार : प्रा.शिंत्रे

आजरा: प्रतिनिधी

      आजरा साखर कारखाना सुरु करण्यासाठी बीनीची भूमिका निभावली आहे. अडचणीच्या काळात कारखाना सुरु करण्यासाठी प्राधान्य दिले. सर्वाच्या सहकार्याने ते यशस्वी करून दाखविले. कारखाना कर्जमुक्त करून पुन्हा सुरळीत व सक्षमपणे चालविण्यासाटी भाजप, काँग्रेस व सेनाप्रणित श्री. चाळोबादेव विकास आघाडी मैदानात आहे. कारखान्यावरील आर्थिक अरिष्ट दूर करण्याबरोबर तो सक्षम कसा होईल यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे कारखान्याचे माजी अध्यक्ष व चाळोबादेव शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार प्रा. सुनिल शिंचे यांनी सांगीतले.

       दोन वर्ष कारखाना बंद होता. तो चालवण्यासाठी देण्याचा प्रयत्न राहीला. पण तसे घडले नाही. अडचणीच्या काळात कारखाना सुरु होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. या काळात कर्मचारी व कामगारांनी पन्नास टक्के वेतन स्विकारून योगदान दिले. हे योगदान आम्ही विसरणार नाही. कामगार, कर्मचान्यांना पुन्हा पूर्ववत वेतन देणेः शेतकऱ्यांना योग्य दर देवून कारखान्याच्या उपपदार्थ निर्मितीवर भर देणे यावर आघाडीचे प्राधान्य राहणार आहे. तालुक्यातील काही सभासदाचे सभासदत्व रद्द करून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला आहे. त्यांचे सभासदत्व कायम ठेवण्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत. कारखान्याच्या

      स्थापनेपासून असणारे सुमारे ४ ते ५ हजार सभासद मयत आहेत. त्यांनी कारखाना उभारणीसाठी आर्थिक सहकार्य करून योगदान दिले आहे. त्यांच्या वारसांना सभासदत्व बहाल करण्याची खात्री आमची आघाडी देत आहे. कारखाना कर्जमुक्तीसाठी एनसीडीसीकडे निधी उपलब्धतेसाठी जाणार आहोत. केंद्र सरकारकडे याकरीता पाठपुरावा सुरु आहे. कारखान्याला निधी मिळाला तर कारखान्याची विस्कटलेली आर्थिक घडी पूर्ववत होण्यास मदत होईल. साखर उत्पादनातुन कारखान्याचे आर्थिक गणीत चालते. त्यामुळे आर्थिक ताण कायम राहतो हा ताण कमी करून कारखाना पूर्णतः सक्षम करण्यासाठी डिस्टलरी, इथेनाल काम्प्रेस बायोगॅस (सीबीजी) या उपपदार्थ निर्मिती करीता विशेष पाठप्रावा करून तो यशस्वीतीकडे नेणार आहे. अडचणीच्या काळात देखील सभासद व शेतकन्यांच्या विश्वासास पात्र राहन सुमारे साडेतीन लाख टन गाळप केले आहे. कारखाना स्वबळाबरोबर सहकारात सुरु ठेवण्याचे काम केले आहे. यासाठी केंद्र, राज्य व जिल्हयातील नेत्यांचे आवश्यकते सहकार्य मिळाले आहे. त्यामुळे कारखाना टिकून राहीला आहे. पुढेही हा कारखाना सहकारात कसा सुरु राहील यासाठी आमच्या आघाडीचा प्रयत्न राहील.

     कारखान्याचे चाक सुरू राहीले तर सभासद, ऊस उत्पादक, तोडणी आढणी यंत्रणा, कामगार यांचे संसार चालतात त्याचबरोबर हजारोच्या संख्यने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतो. नेहमी कारखाना हिताची भूमिका घेतली आहे. या भूमिकेला भविष्यात तडा जावू देणार नाही.

 हाय व्होल्टेज लढाई

                     आजरा:प्रतिनिधी

        पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी रवळनाथ विकास आघाडीची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. विशेषत: आपल्या विधानसभा मतदारसंघातील उत्तूर- मडीलगे उत्पादक गटामध्ये त्यांनी विशेष लक्ष घातल्याने सुरुवातीला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे यांच्यामुळे श्री चाळोबा देव विकास आघाडीला सुरक्षित वाटणारा हा उत्पादक गट मुश्रीफ यांच्या आक्रमकपणामुळे सोपा राहिला नसून या गटात रंगतदार लढत होणार आहे. या ‘ हाय व्होल्टेज ‘ लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

       रवळनाथ विकास आघाडीतून माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी कारखाना चेअरमन, माजी पंचायत समिती सभापती व आजरा साखर कारखान्याचे विद्यमान संचालक अशी विविध पदे भूषवलेले वसंतराव धुरे, पंचायत समितीचे माजी उपसभापती दीपक देसाई व गेले दशकभर संचालक म्हणून काम पाहणारे मारुतीराव घोरपडे यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. तर त्यांच्या विरोधात चाळोबा देव विकास आघाडीने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे, पंचायत समितीचे माजी सभापती भिकाजीराव गुरव व उद्योजक प्रकाश चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे.

        या उत्पादक गटामध्ये पालकमंत्री मुश्रीफ यांचा प्रभाव असला तरीही उमेश आपटे यांना मतदारांनी वेळोवेळी साथ दिली आहे. निवडणूक ग्रामपंचायतची असो,इतर स्थानिक स्वराज्य संस्थेची असो अथवा साखर कारखान्याची असो आपटे यांना वगळून मतदान होताना दिसत नाही. बिनविरोधच्या ऐन धापळीमध्ये आपटे यांच्यासारखा मोहरा तालुका विकास आघाडीला सापडल्याने उत्तूर भागातील या आघाडीची अडचण कमी होण्यास निश्चितच मदत होणार आहे.

सर्वात जास्त ५८५८ इतके’ अ ‘ वर्ग सभासद या उत्पादन गटामध्ये आहेत. दोन्हीही आघाड्यांनी मतदार संख्या विचारात घेऊन मडिलगे गावातून दीपक देसाई व भिकाजी गुरव यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मडिलगे गावातील मतदानाची थेट विभागणी होणार आहे. मारुती घोरपडे हे कारखान्यातील अनुभवी तर प्रकाश चव्हाण हे नवखे उमेदवार असले तरी या दोघांचाही दबदबा निश्चितच आहे.

पालकमंत्री मुश्रीफ यांच्या घरच्या उत्पादक गटात चाळोबा विकास आघाडीने नेटके आव्हान उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या उत्पादक गटात ‘ हाय व्होल्टेज ‘ लढत अटळ आहे.

अंजनाताईंचे राजकीय कौशल्य पणाला

                      आजरा:प्रतिनिधी

        गोकुळच्या विद्यमान संचालिका, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या व आजरा साखर कारखान्याच्या विद्यमान संचालिका,कै. केदारी रेडेकर संस्था समूहाच्या प्रमुख श्रीमती अंजनाताई रेडेकर यांचे राजकीय कौशल्य भादवण- गजरगाव या उत्पादक गटात लागले असून या गटातून चाळोबा देव विकास आघाडीला मताधिक्य देण्यात अंजनाताई यशस्वी होणार का ? या प्रश्नाचे उत्तर निकालानंतर मिळणार आहे. त्यांच्यासमोर श्री रवळनाथ विकास आघाडीचे विद्यमान संचालक व तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष एम.के.देसाई हे आपल्या सहकारी उमेदवारांसोबत उभे ठाकले आहेत.

      अंजनाताई रेडेकर यांच्या साथीला शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष व भादवणचे माजी सरपंच संजय पाटील आणि कानोलीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुधीर पाटील हे आहेत. गत वेळी या मतदारसंघातून नेतृत्व केलेले कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी हे मात्र यावेळी रिंगणाबाहेर आहेत. तर विरोधी आघाडीने नेमके देसाई यांच्या साथीला कानोलीचे माजी सरपंच राजेंद्र मुरकुटे व भादवणचे माजी सरपंच राजेश जोशीलकर यांना उमेदवारी दिली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील व माजी आमदार के.पी. पाटील यांनी कानोली येथे नेटकी प्रचार सभा घेऊन रघुनाथ विकास आघाडीच्या पाठीशी राहण्याचे आव्हान मतदारांना केले आहे.

        एकूण ४४७४ इतके मतदान या उत्पादक गटामध्ये आहे. गत वेळी एकाच आघाडीतून निवडणुकीला सामोरे गेलेल्या श्रीमती रेडेकर व एम.के. देसाई हे दोघे यावेळी मात्र परस्परविरोधी आघाडीतून निवडणुकीला सामोरे जात आहेत. या उत्पादक गटामध्ये दोघांचीही राजकीय मशागत चांगली असल्याने हे दोघेही ‘सेफ झोन ‘ मध्ये असून उर्वरित चार उमेदवारांना विजयासाठी संघर्ष करावा लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

        इतर राजकीय संदर्भ कांहीही असले तरी जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय असणाऱ्या अंजनाताईंच्या दृष्टीने ही लढत त्यांचे राजकीय कौशल्य पणाला लावणारी आहे हे नक्की.

नवखे हरिभाऊ की मुरब्बी मलिककुमार….?


                    आजरा:प्रतिनिधी

        अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून माजी उपसभापती व कारखान्याची विद्यमान संचालक मलिककुमार बुरुड व पेरणोलीचे हरीबा कांबळे यांच्यात थेट लढत होत आहे. ऐनवेळी हरिबा कांबळे यांची उमेदवारी राष्ट्रवादीच्या रवळनाथ विकास आघाडीतून जाहीर झाल्याने सुरुवातीला बुरुड हे एकतर्फी निवडून येतील असे असणारे चित्र पलटवण्यात व या गटामध्ये चुरस निर्माण करण्यात राष्ट्रवादीला निश्चितच यश आले आहे.

      मलिककुमार बुरुड हे भाजपाचे मुरलेले व कसलेले कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे निकटवर्तीय अशी ही त्यांची ओळख आहे. सुरुवातीला निवडणुकीपासून अलिप्त राहणार अशी भूमिका घेतलेल्या बुरुड यांनी अखेर निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेऊन सर्वांना धक्का दिला. सर्व पक्षीयांशी त्यांचे चांगले राजकीय संबंध आहेत. तर दुसरीकडे हरिबा कांबळे हे रस्त्यावरचे लढाऊ कार्यकर्ते म्हणून तालुका वासियांना परिचित आहेत. अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्याची मानसिकता ठेवणारे हरिबा कांबळे यांना राष्ट्रवादीतून संधी मिळाल्याने त्यांनी मतदारांची थेट संपर्क साधण्यावर भर दिला आहे.

          हरिबा कांबळे यांच्या रवळनाथ विकास आघाडीतील इंट्रीमुळे बुरुड यांची मात्र चांगलीच दमछाक झाली आहे हे नाकारता येत नाही. आणि नुकताच झालेला ‘ ब ‘ वर्ग सभासदांना पाच मतदानाच्या अधिकाराचा निर्णय या दोघांपैकी कोणाच्या पथ्यावर पडणार यावर दोघांचेही भवितव्य अवलंबून आहे.

भाजपा व राष्ट्रवादीच्या तुल्यबळ उमेदवारात लढत


                      आजरा:प्रतिनिधी

       आजरा साखर कारखाना निवडणुकीमध्ये इतर मागास गटातून भाजपाचे विद्यमान संचालक व स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष जनार्दन टोपले आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे कट्टर समर्थक काशिनाथ तेली एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. आजरा शहरासह पश्चिम भागात टोपले यांची चांगली बांधणी असली तरी उत्तूर भागात पालकमंत्री मुश्रीफ यांचे पाठबळ असल्याने तेली यांना चाळोबा देव विकास आघाडी हलक्यात घेणार नाही हे स्पष्ट आहे.

       या गटाकरिता पाच उत्पादक गटासह ब वर्ग सभासदांनाही मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे आपापल्या कार्यक्षेत्रातील उत्पादक गटामध्ये दोघांचे वर्चस्व असले तरी या दोघांचेही भवितव्य बऱ्यापैकी ब वर्ग सभासदांच्या हाती असल्याचे दिसत आहे.

       तुलनात्मक दृष्ट्या विचार केल्यास दोघेही उमेदवार  तुल्यबळ असेच आहेत. दोन्ही आघाडींची एकंदर मतदान परिस्थिती काय राहणार यावरही या गटातील उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

प्रचार थंडावला
उद्या मतदान


                   आजरा:प्रतिनिधी

       आजरा साखर कारखान्याकरिता गेले पंधरा दिवस सुरू असणारी प्रचाराची रणधुमाळी शांत झाली असून उद्या रविवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

       गेले आठवडाभर कोपरा सभा, जाहीर सभा, मुलाखती याच्या माध्यमातून प्रचाराचे धुमशान सुरू होते. शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादीने नेटक्या सभा घेऊन वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला तर विरोधी चाळोबा देव विकास आघाडीने मोठ्या व जाहीर सभांना फाटा देत भेट सभासदांशी संपर्क साधून आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

         वृत्तपत्रांमधील बातम्या, सोशल मीडियावरील संदेश यामुळे वातावरण ढवळून निघाले. दोन्ही आघाड्यांनी नेटकी व हायटेक प्रचार यंत्रणा वापरल्याने सभासदांचे तालुकावासीयांचे मात्र नक्कीच मनोरंजन झाले आहे.

पुन्हा बिबट्या…
धनगरमोळा येथून बिबट्याने पळवले कुत्रे


                    आजरा: प्रतिनिधी

         धनगरमोळा धरण परिसरात व जंगल भागात गेले वर्षभर बिबट्याचा वावर सुरु आहे बिबट्याने या परिसरात धुमाकूळ घातला आहे. गुरुवार (ता. १४) रात्री बिबट्याने मधुकर पाटील यांच्या दारात राखणीसाठी बांधलेले कुत्रे पळवले. यामुळे या परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

         या परिसरात अनेकांची शेती असल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी कुटुंबे राहण्यासाठी आहेत बिबट्याच्या वावराने या परिसरात दहशत पसरली आहे गत वर्षभरात सुमारे दहा कुत्री बिबट्याने पळवली आहेत. या भागात हत्ती व गव्यांचा वावर आहे.

संबंधित पोस्ट

GROUND REPORT

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

मडिलगे येथे हत्तीचा धिंगाणा…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

उमेश आपटे यांच्या निर्णयाकडे कागल विधानसभा मतदारसंघासह तालुकावासीयांचे लक्ष

mrityunjay mahanews
error: Content is protected !!