mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

अनुभवी संचालकांचा कस लागणार


                      आजरा:प्रतिनिधी

        साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष उदय पवार, विद्यमान संचालक दशरथ अमृते, राजेंद्र सिंह सावंत, माजी संचालक सहदेव नेवगे, यांच्यासह जनता बँकेचे विद्यमान संचालक रणजीत देसाई, गोविंद पाटील आदी मातब्बर मंडळी रिंगणात असल्याने उत्पादक गटात धक्कादायक निकालाची शक्यता वर्तवली जात आहे.

       भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठ्या असणाऱ्या या उत्पादक गटामध्ये ५५७२ इतके सभासद मतदार आहेत. बिद्री च्या विजयानंतर माजी आमदार के.पी. पाटील यांनी आजरा कारखान्यात लक्ष घातले आहे. या गटामध्ये पाटील यांना विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मशागत करण्याची आयती संधी चालून आली आहे.

        पश्चिम भाग हा जयवंतराव शिंपी यांचा हक्काचा भाग समजला जातो. जयवंतराव शिंपी व अशोकअण्णा चराटी सध्या एकत्र असल्याने या गटामध्ये विरोधकांनी जोर लावला आहे. बहुतांशी मतदान हे बाहेरगावी असल्याने बाहेरगावचे मतदान करून घेण्याचे आव्हानही उमेदवारांसमोर आहे. उमेदवारी डावलल्याने नाराज मंडळींची या गटात महत्त्वाची ठरणार आहे. एकंदर पेरणोली-गवसे उत्पादक गटाचा निकाल हा धक्कादायक लागण्याची शक्यता आहे.

ज्यांची यंत्रणा… त्यांचा विजय…

                       आजरा:प्रतिनिधी

         ब वर्ग अनुत्पादक गटांमध्ये
आजपर्यंतचा निवडणूक इतिहास पाहिल्यास जो उमेदवार मतदारापर्यंत पोहोचू शकेल व ज्याच्याकडे मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याची यंत्रणा सक्षम असेल असाच उमेदवार विजयी झाल्याची परंपरा आहे. यावेळी मात्र उमेदवारापेक्षा नेत्यांनीच हा गट प्रतिष्ठेचा बनवला असल्याचे स्पष्ट होत आहे.

     रवळनाथ शेतकरी विकास आघाडीकडून या गटातून नामदेवराव नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नार्वेकर कोणत्याही परिस्थितीत निवडून आले पाहिजेत अशी पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील व गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांची अटकळ आहे. त्यामुळे नार्वेकर यांच्या पेक्षाही मंत्री मुश्रीफ व आमदार पाटील यांच्या दृष्टीने नार्वेकर यांचा विजय महत्त्वाचा आहे. नार्वेकर यांनी यापूर्वी या गटातून निवडणूक लढवली आहे त्यामुळे ते मतदारांना परिचित आहेत.

       चाळोबा देव विकास आघाडी कडून अशोक तर्डेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर्डेकर हे नवखे वाटत असले तरी त्यांच्या पाठीमागे मोठी यंत्रणा सक्रीय झाली आहे. नुकत्याच झालेल्या निर्णयानुसार ब वर्ग सभासदाला उत्पादक गटातील मतदान वगळता इतर पाच गटांमध्ये मतदान करता येणार आहे यामुळे चाळोबादेव विकास आघाडीने तर्डेकर यांच्या मताधिक्यासाठी कंबर कसली आहे.

      विशेषतः गडहिंग्लज, संकेश्वर भागामध्ये मतदारांची संख्या मोठी आहे, एकूण सात हजार ४३८ व्यक्ती व १६५ संस्था प्रतिनिधी मतदार ब वर्ग गटाकरिता पात्र आहेत. यामध्ये मयत सभासदांचा आकडाही मोठा आहे. दोन्ही आघाड्यांकडून मतदारांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावल्यात आली आहे

     या गटामध्ये पालकमंत्री मुश्रीफ व आमदार राजेश पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

सौ.सुनिता रेडकर यांचे कौशल्य पणाला…

                    आजरा:प्रतिनिधी

      महिला राखीव गटामध्ये विद्यमान संचालिका सौ. सुनिता रमेश रेडेकर या शिवसेनेच्या सौ.संगीता माडभगत यांना सोबत घेऊन पुन्हा एक वेळ निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. चाळोबा देव विकास आघाडी तर्फे निवडणुकीला सामोरे जात असणाऱ्या रेडेकर यांच्यासमोर कारखाना राजकारणात नवख्या असल्या तरीही राजकीय वलय असणाऱ्या पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. रचना होलम व वेळवट्टीच्या माजी सरपंच सौ. मनीषा देसाई यांचे तगडे आव्हान आहे.

       सरपंचपद ते जिल्हा परिषद सदस्यपद असा राजकीय प्रवास करणाऱ्या सौ. रेडेकर यांना तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत मात्र धक्कादायकरीत्या पराभवाला सामोरे जावे लागले.सौ. रेडेकर यांचे या उत्पादक गटातील किंबहुना जिल्हा परिषद मतदार संघातील राजकीय वर्चस्व कमी करण्यासाठी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची लॉबी सक्रिय झाली आहे.

      यामुळेच त्यांच्या विरोधात सौ. देसाई व सौ. होलम यांच्यासारखे नवे असले तरी नेटके चेहरे देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला आहे. सौ. मनीषा देसाई यांची उमेदवारी राष्ट्रवादीचे जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची मानली जाते. त्यामुळे देसाई यांनी या गटामध्ये विशेष लक्ष घातले आहे. शिवसेनेच्या सौ. संगीता माडभगत यांच्यासाठी शिवसैनिक प्रयत्नशील आहेत.

       या गटातील उमेदवारांचे भवितव्य ब वर्ग अनुत्पादक गटातील मतदारांच्या हाती बऱ्यापैकी आहे. एकूण ३२ हजार ७८४ मतदार या गटाकरिता मतदानास पात्र आहेत.

      तालुका खरेदी विक्री संघाची पुनरावृत्ती या गटामध्ये होणार की सौ. रेडेकर या विरोधी आघाडीच्या उमेदवारांवर विजय मिळवण्यात यशस्वी होणार… यावर आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीची समीकरणे बऱ्यापैकी अवलंबून आहेत.

मतदान प्रक्रियेची तयारी सुरू

 ८९ केंद्रावर होणार मतदान

                    आजरा:प्रतिनिधी

        आजरा साखर कारखान्यासाठी रविवार दि. १७ रोजी मतदान होत आहे. निवडणूक प्राधिकरणाकडून निवडणूकीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. कारखान्याच्या पाच उत्पादक गटातील मतदानासाठी ७७ तर ब वर्ग अनुत्पादक व्यक्ती सभासद व संस्था सभासद मतदारांना मतदानासाठी १२ मतदान केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे. निवडणूक अधिकारी गोपाळ मावळे, सहाय्यक निवडणूक अधिकारी सुजयकुमार येजरे, अमित गराडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूकीचे कामकाज सुरू आहे.

        कारखान्याच्या पाच उत्पादक गटात २५ हजार १८१ मतदार असून बिगर उत्पादक ब वर्ग गटात ७४३८ व्यक्ती सभासद तर १६५ संस्था सभासद मतदार असे एकूण ३२ हजार ७८४ इतके मतदार आहेत. उत्तूर मडिलगे गटात ५८५८ इतके मतदार असून या गटात १९ केंद्रावर उत्पादक गटातील मतदारांचे मतदान होणार आहे. तर ब वर्गातील १२६३ मतदारांसाठी उत्तूर येथे दोन केंद्रावर मतदान होणार आहे. आजरा श्रृंगारवाडी गटात ५१९२ मतदार असून या गटात १७ केंद्रावर मतदान होणार आहे. ब वर्गातील १८३० मतदारांकरीता आजरा येथील रोझरी इंग्लिश स्कूल मध्ये तीन केंद्रे तयार करण्यात आली आहेत.

       गवसे-पेरणोली गटात ५५७२ मतदार संख्या असून यासाठी १७ मतदान केंद्रे तर ब वर्गातील १२४९ मतदारांसाठी पेरणोली हायस्कूल येथे १ व केंद्र शाळा गवसे येथे १ अशी दोन मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहे. पेरणोली केंद्रावर ७५० तर गवसे केंद्रावर ४९९ मतदारांची नोंदणी आहे, भादवण गजरगांव गटात ४४७४ मतदार असून या गटात १२ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. त्तर हात्तिवडे-मलिग्रे गटात ४०८५ मतदार असून या गटातही १२ मतदान केंद्रावर हे मतदान होणार आहे. तर ब वर्ग सभासदही या गटात सर्वाधिक ३२१६ इतके असल्याने ब वर्ग समासद मतदानासाठी ५ केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये मलिग्रे केंद्रावर ५०६, हारूर केंद्रावर ६६२, किणे केंद्रावर ६४६, कानोली- ७९६, सरोळी-६०६ अशी मतदार नोंदणी आहे.

ब वर्ग सभासदांना पाच मतांचा अधिकार

     ब वर्गातील बिगर उत्पादक सभासदाला कारखान्याच्या पोटनियमाप्रमाणे केवळ या गटातील एकाच उमेदवाराला मतदान करण्याचा अधिकार होता. मात्र यावरून काही हरकती दाखल झाल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी कायद्याचा आधार घेतला. बिगर उत्पादक सभासदाला कायद्यानेच व वर्गातील एक तसेच इतर आरक्षित गटातील उमेदवारांना मतदान करण्याचा अधिकार दिल्याचे स्पष्ट झाले आहे. भटक्या विमुक्त गटातील उमेदवार संभाजी पाटील बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे ब वर्ग सभासदांना महिला राखीव गटात दोन, इतर मागास व अनुसुचित जाती गटात प्रत्येकी १ व ब वर्गातील १ अशी पाच मते देण्याचा अधिकार कायद्याने प्राप्त झाला आहे.

रवळनाथ विकास आघाडीच्या आजरा व उत्तुर येथे सभा

                आजरा:प्रतिनिधी

       श्री रवळनाथ विकास आघाडीच्या जाहीर सभांचे आज(शुक्रवारी) आजरा व उत्तुर येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांनी दिली.

      आजरा येथे एकता कॉलनी जवळील पोलीस मैदानावर दुपारी चार वाजता तर उत्तूर येथे नेहरू चौकामध्ये सायंकाळी सात वाजता होणाऱ्या या जाहीर सभांना पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार असल्याचेही देसाई यांनी सांगितले.

फटकारे….

🟣दावा : कारखान्यावरील कर्जाचा बोजा आम्ही कमी करणार
….तो कमी करण्यास तुम्हाला कोणी अडवले होते ?


🟣दावा :सत्ताधाऱ्यांनीच कारखाना अडचणीत आणला.
… सत्ताधारी नेमके कोण?


🟣दावा: कारखाना यावर्षीही आर्थिक अडचणीत येणार
…. मग संचालक होण्यासाठी तुमची धडपड का ?


🟣दावा : सभासदांच्या हितासाठीच निवडणूक रिंगणात…
… सभासदांना ना चिमूटभर साखर..ना वेळेत तोडणी यंत्रणा… नेमके हीच कोणाचे?

✍️✍️✍️ ज्योतिप्रसाद सावंत


म्हैशी चोरी प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा नोंद

                    आजरा:प्रतिनिधी

     कासार कांडगाव ता.आजरा येथील बाजीराव बापूसो सरदेसाई यांच्या दोन म्हैशी विक्रीच्या उद्देशाने चोरून नेल्याच्या कारणास्तव आजरा पोलिसात रामचंद्र बापू गावडे, अभिजीत शिवाजी मनगुतकर व लक्ष्मण बापू गावडे रा. गणेशवाडी ता.आजरा या तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली .

       त्यांच्याकडून म्हैशी वाहतुकीकरता वापरण्यात आलेले दोन छोटा हत्ती टेम्पोही हस्तगत करण्यात आले आहेत. बाजीराव सरदेसाई यांनी याबाबत फिर्याद दिली असून आजरा न्यायालयासमोर त्यांना हजर केले असता न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

       पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दत्ता शिंदे करीत आहेत.

गंगामाई वाचन मंदिरा तर्फे बुधवारपासून व्याख्यानमाला


                     आजरा:प्रतिनिधी

        येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरातर्फे बुधवारपासून व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली असून या व्याख्यानमालेत मध्ये दुर्ग अभ्यासक डॉ. अमर आडके यांचे सह्याद्री, स्वराज्य आणि श्री शिवराय या विषयावर, दैनिक लोकमतचे संपादक डॉ. वसंत भोसले यांचे आनंदी जीवन जगण्याची कला या विषयावर व सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ सविनय दामले यांचे बदलता आहार आणि बदलते आरोग्य या विषयावर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.

        ‘ मृत्युंजय ‘ कार शिवाजीराव सावंत सभागृहात दररोज सायंकाळी साडेपाच वाजता सदर व्याख्यान होणार आहे अशी माहिती वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. अशोक बाचूळकर यांनी दिली.

संबंधित पोस्ट

आजच्या ठळक बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

चंदगड संघाप्रमाणे आजरा तालुका खरेदी – विक्री संघाला वैभव प्राप्त करून देणार : जयवंतराव शिंपी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आज आजरा येथील रामतीर्थ यात्रा

mrityunjay mahanews
error: Content is protected !!