
गुरुवार दि.२८ नोव्हेंबर २०२४




दारातील उभी ट्रॅक्स पेटवली

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वझरे तालुका आजरा येथील महादेव धोंडीबा पाटील यांच्या मालकीची ट्रॅक्स दारामध्ये उभी केलेली टेम्पो ट्रॅक्स चार चाकी अज्ञातांनी पेटवल्याची घटना उघडकीस आली आहे.
रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास सदर गाडीच्या खिडकीतून अज्ञातांनी डिझेल अथवा पेट्रोलचा बोळा टाकून ट्रॅक्स पेटवली .यामध्ये ट्रॅक्सचा आतील भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. पहाटेच्या दरम्यान दूध डेअरीकडे चाललेल्या कर्मचाऱ्याच्या लक्षात सदर प्रकार आला.त्यानंतर तातडीने ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आगीमध्ये मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आर्थिक देवाण-घेवाणीतून अथवा पूर्व वैमनस्यातून सदर प्रकार घडला असावा असा अंदाज स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
याप्रकरणी पाटील यांनी पोलिसात वर्दी दिली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.



विद्यार्थी बस स्थानकावर…
बसेस विवाहसमारंभा करता
शिवसेनेकडून अधिकारी धारेवर…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सायंकाळी पाच नंतर देऊळवाडी, आवंडी धनगरवाडा भागाकडे जाणाऱ्या बस फेऱ्या अचानक रद्द केल्याने विद्यार्थी वर्गाचे चांगलेच हाल झाले. शिवसेना उ.बा.ठा. गटाचे उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील व तालुकाप्रमुख युवराज पोवार यांनी बस स्थानक नियंत्रकांना चांगलेच धारेवर धरले. विवाहानिमित्त प्रासंगिक करारावर बसेस गेल्यामुळे सदर प्रकार घडल्याचे बस स्थानक नियंत्रकांनी सांगितले. अखेर रात्री उशिरा या मार्गावर बस फेरी सोडून विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात यश आले.
विटे, देऊळवाडी, आवंडी धनगरवाडा परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने आजरा येथे शिक्षणासाठी येत असतात. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास परतीच्या बसेस असल्याने विद्यार्थ्यांनी बस स्थानकावर मोठी गर्दी केली होती. परंतु सात वाजले तरी या मार्गावर बस नसल्याने व अंधार पडल्याने व पर्यायी व्यवस्था नसल्याने विद्यार्थी वर्ग गोंधळून गेला.
सदर प्रकार संभाजी पाटील व युवराज पोवार यांना समजल्यावर त्यांनी तातडीने बस स्थानकावर जाऊन बस स्थानक नियंत्रकांना याचा जाब विचारला. विवाह समारंभानिमित्त बसेस बाहेरगावी गेल्याने फेऱ्या रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. अखेर पाटील व पोवार यांचा आक्रमक पवित्रा बघून सायंकाळी सात वाजले नंतर या मार्गावर बसफेरी सोडण्यात आली.
लांबच्या टप्प्याच्या अचानकपणे रद्द करू नयेत अशा सूचना पाटील व पोवार यांनी बस स्थानक नियंत्रकांना दिल्या. विद्यार्थी वर्गाचे मात्र चांगलेच हाल झाले.



ऊसतोड मजुरांच्या मुलांना शालेय प्रवाहात आणणार : आजरा कारखान्यावर बैठक शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षण हमी कायद्यानुसार शालेय प्रवाहात आणून शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार करण्यात आला. याबाबत आज येथील स्व. वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यावर शिक्षण विभाग, कारखाना प्रशासन व महसुल विभाग याच्यामार्फत बैठक झाली. तालुक्यात प्रत्येक गावातील शाळेत ऊसतोड मजुरांना शिक्षण देण्याचे ठरले.
शिक्षणाचे महत्व त्याचप्रमाणे स्थलांतरीत मजुरांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात का आणलं पाहिजे, त्याचबरोबर त्यांना देण्यात येणाऱ्या सेवा सवलती बाबत माहिती देवून जास्तीत जास्त मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या अडचणी सोडवण्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. स्वागत कामगार कल्याण अधिकारी सुभाष भादवणकर यानी केले. तर प्रास्ताविक करताना मुख्य शेती अधिकारी युवराज पाटील यानी पर राज्यातून व पर जिल्ह्यातून आलेल्या ऊसतोडणी मजुरांची माहिती सादर केली. त्याचप्रमाणे कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक व्यंकटेश ज्योती यांनी म्हणाले, कारखाना शासनाच्या विविध सेवाभावी योजनाना नेहमीच सहकार्य करीत आलेला आहे. यापूर्हीवीही साखर शाळेसारखे उपक्रम कारखान्याने राबवले आहेत. शासन दरबारी या स्थलांतरित मजूराच्या मुलांच्या शिक्षणाचा मुद्दा घेवून या मुलांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात सामील करून घेण्याचा शासनाचा हा प्रयत्न खरोखरच प्रशंसनीय आहे
नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांनीही शासनाच्या या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली.


संविधान दिन उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
बुरूडे …
बुरूडे ता.आजरा येथे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष मारूतीराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. संविधानाच्या उद्देशिका याचे वाचन देशमुख यांनी केले.
यावेळी बोलताना देशमुख यांनी संविधानातील घटना कलम १७ ची माहिती दिली. यानंतर सुरेश कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. येथील ब्लू स्टार युवामंच बुरूडे येथील तरूण मंडळाने विशेष परिश्रम घेतले. यावेळी उपसरपंच संजय कांबळे, ब्लू स्टारचे अध्यक्ष अनिल कांबळे, रमेश कांबळे, भगवान कांबळे, दौलती कांबळे, शरद कांबळे, नारायण कांबळे, युवराज देशमुख, थळू कांबळे, विजय कांबळे उपस्थित होते.
आजरा हायस्कूल…
आजरा हायस्कूलमध्ये २६ नोव्हेंबर रोजी मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना
श्रद्धाजंली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, संविधान प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक एस. पी. होलम,उपमुख्याध्यापक तोडकर तसेच पर्यवेक्षिका कामत उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी संविधानाविषयी जी. डी. कांबळे यांनी संविधानाविषयी सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. एम. एस. गोरे यांनी आभार मानले.


निधन वार्ता
वैशाली बिल्ले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिवाजीनगर, आजरा येथील वैशाली पुरुषोत्तम बिल्ले ( वय ७५ वर्षे ) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली,मुलगा, सून,नातवंडे असा परिवार आहे.छ. शिवाजीनगर तरुण मंडळाचे कार्यकर्ते विनोद बिल्ले यांच्या त्या आई होत.
अंत्यसंस्कार गुरुवारी सकाळी १० वाजता शिवाजीनगर स्मशानभूमी येथे करण्यात येणार आहेत.
महादेव पाटील

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
चिमणे, तालुका आजरा येथील माजी पंचायत समिती सदस्य महादेव आनंदा पाटील (वय ७५ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुन नातवंडे असा परिवार आहे .
रक्षाविसर्जन आज गुरुवारी सकाळी ९ वाजता आहे .






