फड सांभाळ तुऱ्याला ग आला… आता असा फड सांभाळायचा कसा…?
ज्योतिप्रसाद सावंत
सुलोचना चव्हाणबाई म्हणाल्या , फड सांभाळ तुऱ्याला ग आला… पण नेमका फड कुठला ??? याच्याबाबत आम्ही गोंधळात होतो. सुरुवातीला कुस्तीचा फड, निवडणुकीचा फड की ऊसाचा फड? असं आमचंदेखील थोडं कन्फ्युजन झालं. कारण कुस्ती म्हटलं तर तो भाग आता राजकारणी लोकं सांभाळत आहेत. आखाडे बदलले , पैलवान बदलले , पण कुस्त्या चालूूच आहेत. आता दुसरा फड म्हणाल तर त्याच्याशी आमचं काही देण -घेण नाही . लॉकडाउनमुळे जत्रा -यात्रा बंद असल्यामुळे या फडापासून आम्ही आता दुरावलो आहोत. शेवटी
तु-याला आला म्हटल्यावर तो नक्कीच उसाचा फड असणार याबाबत खात्रीही झाली. आता निसर्गनियमानुसार एकदा ऊस जोमान वाढला की उसाला तुरा हा येणारच . आणि अशा तुर्र्रेदार उसावर कोल्ह्यांच लक्षही राहणारच. पण आता कोल्हयांची कोल्हेकुई क्वचितच ऐकायला मिळते.कोल्हयांची जागा आता दोन पायांच्या लांडग्यांनी घेतले. आणी फडाच म्हणाल तर कोल्ह्यांपेक्षा हत्ती, गवे यांनीच उभ्या फडात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे . त्या विज कंपनीनेही आम्हाला ऊसाला पाणी पाजण्यासाठी रात्रीची वेळ ठरवून दिले.एकीकडे रात्रभर जागून ऊसाला पाणी पाजवायचं आणि दुसरीकडे पहाटे जरा कुठे झोप लागते तोपर्यंत गव्यांनी आणि हत्तीनी या पिकाचा फडशा पाडायचा असे जणू समीकरणच बनले आहे. वन विभागाकडून पंचनाम्याचे सोपस्कार पूर्ण पाडले जातात. पण मिळणारी नुकसान भरपाई पाहिली तर रुपयातील दहा पैसे पण भरपाई मिळत नाही. मिळणारी भरपाई खरोखरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते का..? हा देखील संशोधनाचा विषय आहे .कारण इथेदेखील लांडगे आहेतच. या सगळ्यातून उरलासुरला ऊस कारखान्यापर्यंत पोहचवायचा म्हटलं तर त्या फडक-यांचा ताप वेगळाच. तोड मिळवण्यापासून ते प्रत्यक्ष कारखान्यापर्यंत ऊस जाऊन बिले जमा होईपर्यंत करावी लागणारी कसरत ही वेगळीच. फड तुऱ्याला तर आला आहेच पण तो सांभाळायचं कुणाकुणापासून ? याबाबत संभ्रमावस्था निर्माण होऊ लागली आहे… कारण पुढे सुलोचनाबाई म्हटलेलच आहे ..पेरा -पेरात साखर भरली…







