बेकायदेशीररित्या बंदूक बाळगल्या प्रकरणी चौघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी : एक जण फरार
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग, कोल्हापूर यांनी आजरा तालुक्यातील धामणे व उत्तूर येथे छापे टाकून बेकायदेशीररित्या खरेदी-विक्री करण्यात आलेल्या चार बंदुका ताब्यात घेतल्या. सदर प्रकरणाची कुणकुण लागताच राधानगरी येथील संदीप पार्टे हा फरार झाला असून पोलिसांनी बाबुराव विठ्ठल लोकरे, सुनील आण्णा लोहार, कृष्णा शिवराम धामणकर, (तिघेही रा. धामणे) व विजय दिनकर घोरपडे (रा.उत्तूर) या संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. शिकारीच्या उद्देशाने सदर बंदुका जवळ बाळगण्यात येत होत्या असे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. या बंदुका तयार करण्याचे काम सुनील लोहार हा करत असे. एकूण चार बंदुका व काडतुसे असे साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले. यातील काही साहित्य हे संदीप पार्टे यांच्याकडून खरेदी केल्याचे समजते. पोलिसांनी छापासत्र सुरू केल्याचे लक्षात येतात पार्टे हा फरारी झाला आहे. पोलिसांनी चौघा संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. संदीप पार्टे याचीही शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यापूर्वीही आजरा तालुक्याच्या पश्चिम भागात बंदुका तयार करून विकणारी टोळी सक्रिय असल्याचे उघडकीस आले होते.

कर्नाटक मधील घटनेचा
आज-यात निषेध
बंगळूर येथे छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर आजरा शहरात त्याचे संतप्त पडसाद उमटले असून आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या नजीक एकत्र येऊन विविध संघटनांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील तालुका प्रमुख राजेंद्र सावंत, युवराज पवार, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष मारुती मोरे, संभाजीराव इंजल , गणपतराव डोंगरे, शिवाजीराव गुडूळकर, महेश दळवी, नगरसेवक विलास नाईक, रमेश दळवी, निवृत्ती कांबळे, संजय येसादे, नारायण कांबळे, हमीद बूडडेखान यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
शृंगारवाडी- शिरसंगी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे… नागरिकाकडून तक्रारीचा पाढा
आजरा तालुक्यातील आजरा-नेसरी मार्गावरील शृंगारवाडी पासून शिरसंगी पर्यंतच्या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे अशा तक्रारी सध्या नागरिकांकडून होऊ लागल्या आहेत. सुमारे दोन किलोमीटर व सातशे मीटर इतक्या सुमारे लांबीच्या अंदाजे दोन कोटी रुपये खर्चाच्या या कामांमध्ये दर्जाचा कोणताच पत्ता नाही. जेथे खुदाई करणे आवश्यक आहे तिथे आवश्यक त्या नियमानुसार खुदाई तर नाहीच परंतु त्याच बरोबर दर्जेदार साहित्य ही वापरलेले नाही. खर टाकून सदर काम सुरू आहे. खडीकरण, कार्पेट यामध्येही दर्जाचा अभाव असल्याने हे काम किती दिवस टिकणार? असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे. पावसाळ्यापूर्वी यातील ज्या भागाचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले होते सध्या त्या रस्त्यावर खड्डे पडले असून रस्त्याची डागडुजी सुरू आहे मुळातच हा रस्ता दर्जेदार असता तर डागडुजीचा प्रश्नच निर्माण झाला नसता असेही आता बोलले जाऊ लागले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे गांभीर्याने लक्ष देणार का ? की डांबरीकरणाच्या नावावर नागरिकांची फसवणूक सुरूच राहणार.? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आरदाळ येथे दिव्यांग मार्गदर्शन शिबीर
आरदाळ येथील भैरीदेव मंदिरासमोरील सभागृहात अपंग बांधवांना मार्गदर्शन करुन योजनांची माहीती देण्याचा कार्यक्रम पार पडला. दिव्यांग सेना कोल्हापूर प्रतिष्ठान व ग्रा.पं.आरदाळच्या वतीने शिबीर घेण्यात आले.
कोल्हापूर प्रतिष्ठानचे जिल्हा संपर्क प्रमुख विकी मल्होत्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत व राजाराम पोवार (धामणे) विभाग प्रमुख यांनी मार्गदर्शन केले. स्वागत व प्रास्तावीक कॉ. शिवाजी गुरव यांनी केले. प्रास्ताविकात शिवाजी गुरव म्हणाले, अंपग बांधवांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला पाहीजे.नुसलते मेळावे घवून चालत नाही, योजनांची माहिती ही प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला मिळाली पाहिजे, त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळाले पाहिजे. त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी दिव्यांग सेना कोल्हापूर प्रतिष्ठान यांनी घेतली आहे ही चांगली गोष्ट आहे. आम्ही लागेल ती मदत करण्यास तयार आहोत.
जिल्हा दिव्यांग सेना अध्यक्ष विकी मल्होत्रा यांनी यावेळी अपंगांना मार्गदर्शन करताना विनाअट घरकुल मिळणे, ग्रा.पं.कडील पाणीपट्टी ५०% सवलत, घरफाळा ५०% सवलत, रेशनवरील ३५ किलो धान्य, अपंगांच्या बचत गटांसाठी कर्ज पुरवठा,सामुहीक जागा २ गुंठे राखीव, सरकारी नोकरीत ३% आरक्षण, अपंगांना साहित्य, अपंग व्यक्तीच्या लग्नासाठी एका व्यक्तीला २५ हजार दोघे अपंग असल्यास ५० हजार रुपये मिळण्याची सोय इ.आर्थिक लाभाच्या योजनांबरोबरच अपंगाना कोणी चिडविले किंवा हिणविल्यास त्यांचेवर गुन्हा नोंद करणेची कायदयाची सोय असुन त्या विषयीच्या कायद्याची माहिती शिबीरामध्ये दिली.
यावेळी उपसरपंच अमोल बांबरे, विशाल गुरव, दत्तात्रय जाधव, शामराव कांबळे, सदाशिव शिवणे, बबन तोरस्कर यांचेसह दिव्यांग लाभार्थी उपस्थित होते. आभार दिलीप शिंत्रे यांनी मानले.



बेकायदेशीररित्या बंदूक बाळगल्या प्रकरणी चौघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी : एक जण फरार 