mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

गुरुवार दि.२७ फेब्रुवारी २०२५

आजरा येथे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न…

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       शिवाजीनगर, आजरा येथे आजरा – गडहिंग्लज मार्गावर असणारे महाराष्ट्र बँकेचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरने फोडण्याचा धाडसी प्रयत्न केला. परंतु त्यांना फारसे यश आले नाही. याबाबतची फिर्याद मल्लिकार्जुन मारुती निगनवर (वय ४७ रा. मिनर्वा कॉलनी, आजरा) यांनी दिली.

        बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी काळ्या रंगाच्या चार चाकी गाडीतून येऊन तू गाडीचा आडोसा तयार करून बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम मशीन गॅस कटर च्या साह्याने अर्धवट कट करून सेन्सर व सी. सी. टीव्ही सर्व्हेलर सिस्टमची तोडफोड करून अंदाजे १०,००० रुपयांचे नुकसान केले.पोलिसांनी  श्वानपथकालाही पाचरण केले होते.

एटीएम सुरक्षा रामभरोसे…

       सध्या शहरातील विविध बँकांची एटीएम सुरक्षा रामभरोसे आहे. कुठेही कोणत्याही एटीएमला सुरक्षारक्षक नाहीत. कांही एटीएम सेंटरला दरवाजे देखील नाहीत. यापूर्वीही एटीएम फोडण्याचे प्रकार घडले आहेत.

आजऱ्याजवळील रामतीर्थ यात्रेस उत्साहात प्रारंभ

आज यात्रेचा मुख्य दिवस  महाशिवरात्रीनिमित्त परिसर गजबजला


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा येथून जवळच असणा-या रामतीर्थ यात्रेला उत्साहात सुरुवात झाली आहे.आज गुरुवार दि. २७ रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे. प्रशासन यात्रा सुरळीत पार पाडण्याकरिता सज्ज झाले आहे. स्वच्छता, शांतता व सुव्यवस्थेसाठी पुरेशी यंत्रणा यात्रास्थळी तैनात ठेवण्यात आली आहे.

        गडहिंग्लज,संकेश्वर, आंबोली, कोल्हापूर, निपाणी, गारगोटी,कोकण आदी परिसरातील हजारो भाविक या यात्रेला हजेरी लावतात. काल बुधवारी सकाळी भाविकांनी हिरण्यकेशी नदीत स्नान करून महादेव व राम मंदिरातील देवतांचे दर्शन घेतले.

        नदीकाठावरील राम मंदिरात हरे राम, हरे राम…तर महादेव मंदिरात ‘ओम नमः शिवायचा जागर सुरु झाला आहे. रात्री जागरानिमित आजरा परिसरातील भजनी मंडळांचा कीर्तन व भजनाचा कार्यक्रम झाला.

        यात्रेनिमित बांगड्या, मिठाई, खेळणी,कोल्ड्रिंक्स, हॉटेल्स यांचे विविध स्टॉल लागलेले आहेत. दुपारी रवळनाथ मंदिरातून सवाद्य पालखी मिरवणुक निघणार आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस व गृहरक्षक दलाच्या जवानांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

खाजगी वाहने नकोच…

        यात्रेला जाण्याकरिता एसटी महामंडळाच्या वतीने बस फेऱ्यांचे दिवसभर आयोजन करण्यात आले आहे. खाजगी वाहनांना रामतीर्थ फाट्यापासून पुढे जाण्यास पूर्णपणे मज्जाव करण्यात आला असल्याने शक्यतो यात्रेकरूंनी एसटी बसलाच प्राधान्य देण्याची गरज आहे.

मिंगेल क्रुझ यांचे निधन

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      वाटंगी ता. आजरा येथील मिंगेल झेवियर क्रुझ यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ६४ वर्षे होते.

      मिंगेल  क्रुझ यांचा जन्म एक सामान्य कुटुंबात झाला, परंतु त्यांनी आपल्या मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने आयुष्याचा प्रवास केला. त्यांच्या जीवनाचा प्रारंभ एका गवळ्याच्या भूमिकेत झाला, जिथे त्यांनी अल्बर्ट यरमव यांच्याकडे गुराखी म्हणून काम केले. ही साधी सुरुवात त्यांना कधीच कमी वाटली नाही, उलट त्यांनी प्रामाणिकपणे काम करत आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या.

    नंतर ते पुण्यात स्थायिक झाले आणि तिथे एका पारशी कुटुंबासाठी काम करण्यास सुरुवात केली. आपल्या प्रामाणिक आणि निष्ठा या स्वभावामुळे त्यांनी त्या कुटुंबाचा विश्वास संपादन केला. त्यांनी केवळ उदरनिर्वाहासाठीच नाही, तर जीवनात स्थैर्य मिळवण्यासाठी मेहनत केली.

      क्रुझ हे धार्मिक आणि नम्र स्वभावाचे होते. देवावर त्यांची निस्सीम श्रद्धा होती, आणि त्यांनी आपल्या मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही. त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना उत्तम शिक्षण दिले आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्थिरतेकडे नेले. त्यांची ही दूरदृष्टी आणि शिक्षणाची जाणीव कौतुकास्पद आहे. अनेकांना त्यांनी मदतीचा हात दिला आहे.

      त्यांचे संपूर्ण आयुष्य मेहनतीने आणि सचोटीने व्यतीत झाले. शेजाऱ्यांशी, समाजातील अनेक घटकांशी त्यांचे अतिशय चांगले संबंध होते. मदतीचा हात पुढे करणे, इतरांना मार्गदर्शन करणे, आणि समाजाशी एकरूप होऊन जगणे हा त्यांचा स्वभाव होता.

       त्यांचे आदर्श, त्यांच्या आठवणी, आणि त्यांनी दिलेले संस्कार आजही त्यांच्या कुटुंबासाठी आणि ओळखीच्या लोकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.

       प्रामाणिकपणा, निस्वार्थ सेवा, आणि शिक्षण यांची सांगड घातली तर कोणतेही जीवन यशस्वी होऊ शकते याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे क्रुझ होते.

पेरणोली भावेश्वरी मंदिराचे कलशारोहण

महादेव मंदिरात नंदीची प्रतिष्ठापना : ग्रामस्थांचा उत्स्फुर्त सहभाग

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      पेरणोली येथील महादेव मंदिरात महाशिवरात्रीचा सोहळा उत्साहात झाला. ग्रामदैवत रवळनाथ मंदिराच्या प्रांगणातील भावेश्वरी मंदिराचा कलशारोहण झाले. तसेच महादेव मंदिरात नंदीची प्रतिष्ठापना झाली. या वेळी विविध धार्मिक कार्यक्रम झाले. महीलासह ग्रामस्थांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला होता.

       येथील भावेश्वरी देवीच्या मंदिराचे कलशारोहण व महादेव मंदिराच्या नंदीची प्रतिष्ठापना महाशिवरात्री निमित्त होती. नंदी व कलशाची गावातून वाद्याच्या निनादात मिरवणुक झाली. या वेळ डोक्यावर कलश घेतलेल्या महीलांचा मोठा सहभाग होता. रवळनाथ मंदिरापासून मिरवणुकीला सुरवात झाली. गावातील विविध चाक फिरून मिरवणुक महादेव मंदिराजवळ आली. महादेव मंदिराच्या प्रांगणात सांगता झाली. महादेव मंदिर रुद्राभिषेक व भावेश्वरी देवीच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. या वेळी उपवासाच्या प्रसादाचे वाटप झाले. पौराहित्य सोमनाथ भातखंडे व त्यांचे सहकारी यांनी केले.

मलिग्रे डोंगराच्या चाळोबाची आज यात्रा…

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      दर वर्षी प्रमाणे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी चाळोबा व महादेवाची भव्य यात्रा संपन्न होते

      मलिग्रेच्या पश्चिमेला दोन किलो मिटर अंतरावर चाळोबा डोंगर असून झाडे झुडपे यातून निसर्गाच्या सान्निध्यात होणारी ही यात्रा आपले वेगळेपण अधोरेखित करते.

      भाविक मोठ्या संख्येने ट्रॅक्टर व दुचाकीने डोंगरावर येतात .गेल्या वर्षी पासून मलिग्रे ग्रामपंचायत, देवस्थान कमिटी व ग्रामस्थ भाविक भक्तांच्या सहकार्याने, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे . सकाळी दहा वाजता मलिग्रे येथून गावातील देवांची पुजा झाल्यावर पालखी चाळोबा डोंगरकडे प्रस्थान होणार आहे. डोंगरावरील चाळोबा व महादेव मंदिराला प्रदक्षिणा घालून तेथील देवांची पुजा करण्याची परंपरा आहे.

      पंचक्रोशीतील आलेले भाविक साखर कापूर अगरबत्ती व तेल घेऊन देवाचं दर्शन घेतात . दुपारी देवाला गाऱ्ह्राणे व नैवेद्य दिल्यानंतर महाप्रसादाचे वाटप होईल. यात्रेला पंचक्रोशीतील भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन ग्रामपंचायत व देवस्थान कमिटीने केले आहे. 

सुरेश देशमुख नेट परीक्षा उत्तीर्ण


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      युजीसी डिसेंबर २०२४ मध्ये घेण्यात आलेली, नेट परीक्षा मराठी विषयातून, कोवाडे तालुका आजरा येथील सुरेश देशमुख हे पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले आहेत. ते सध्या विद्या मंदिर गणेशवाडी या शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
सदर परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.   

छायावृत्त…

      मडीलगे ता. आजरा येथे श्री संत बाळूमामा यांच्या पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

निवड…

      मुम्मेवाडी ता. आजरा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी श्रीमती आनंदी आनंदा परीट यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९  

निधन वार्ता
रत्नमाला कत्ती

           उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       उत्तूर येथील बाजारपेठेतील रत्नमाला प्रथमकुमार कत्ती (वय ५९ वर्ष) यांचे निधन झाले.

         त्यांच्या पश्चात पती,दोन मुली, मुलगा,सून असा परीवार आहे.बॅंक ऑफ महाराष्ट्र चे निवृत्त अधिकारी प्रथमकुमार कत्ती यांच्या पत्नी होत.

 

संबंधित पोस्ट

वाटंगी येथील अल्पवयीन मुलीचे आजऱ्यातून अपहरण… देशी दारू विक्री करताना मडिलगे येथे एकास ताब्यात

mrityunjay mahanews

Breaking News

mrityunjay mahanews

कोरीवडे सेवा संस्थेचे ९० सभासद अपात्र… आजऱ्यात ना. सतेज पाटील समर्थकांचा जल्‍लोष यासह आजरा स्थानिक बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

संजय कडोली यांचे निधन

mrityunjay mahanews
error: Content is protected !!