mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शुक्रवार दि.२८ फेब्रुवारी २०२५

नाद नाही करायचा भादवणकरांचा…

आता अविश्वास ठरावासाठीही प्रचार...

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      भादवण ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ. माधुरी गाडे यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर ५ मार्च रोजी मतदान होत असून या ठरावाच्या बाजूने मतदान व्हावे यासाठी गाडे यांचे विरोधक सज्ज झाले आहेत तर ठरावाच्या विरोधात मतदान व्हावे यासाठी गाडे समर्थक प्रयत्नशील आहेत. सोशल मीडियावर या अविश्वास ठरावाचे प्रचार नाट्य चांगलेच रंगले आहे. ‘अविश्वास ठरावाच्या’ या अजब प्रचाराची तालुक्यात चर्चा सुरू असून खाजगी विमान बुक करुन गावच्या यात्रेला येणाऱ्या भादवणकरांचा नाद नाही करायचा… असे तालुकावासीय म्हणत आहेत.

      ठरावाच्या बाजूने मतदान व्हावे आणि ठरावाच्या विरोधात मतदान व्हावे अशी परस्पर विरोधी भूमिका घेऊन दोन्ही गटाचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. तालुक्यामध्ये मात्र या अविश्वास ठरावाच्या नेटक्या प्रचाराची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. बाहेरगावी असणारा चाकरमानी मतदारही या ठरावाकरता मतदानासाठी दोन्ही बाजूने आणण्यात येणार असल्याचे समजते.

       पुन्हा एक वेळ लोक नियुक्त सरपंच निवडीप्रमाणे वातावरण तयार झाल्याने या ठरावाकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

रामतीर्थ यात्रा उत्साहात…
हजारो भाविकांची उपस्थिती

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आजऱ्यापासून जवळच असणाऱ्या हिरण्यकेशी नदीच्या काठावर असलेल्या रामतीर्थाची यात्रा उत्साहात व शांततेत झाली. हजारो भाविकांनी यात्रेदरम्यान अंतिम परिसराला भेट दिली.

       राम मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. महादेव मंदिरात पालखी सोहळा झाला. राममंदिरात पहाटे काकड आरती व धार्मिक विधी झाला. मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. भाविकांनी सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. यात्रास्थळावर सायंकाळी उशिरापर्यंत गर्दी होती.

      आजऱ्यातील श्री. रवळनाथ मंदिरातून वा‌द्यांच्या निनादात पालखी निघाली. पालखी सोबत मानकरी होते. तहसीलदार कार्यालयाजवळ पालखी आल्यावर निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, महसुल नायब तहसीलदार विकास कोलते यांच्या हस्ते पुजन झाले. आजरा नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, रवळनाथ देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष आनंदा कुंभार, मंडल अधिकारी सुंदर जाधव, तलाठी समीर जाधव, सुधीर कुंभार,माजी नगरसेवक धनंजय पारपोलकर, संजय सावंत, गौरव देशपांडे, सागर देसाई, सचिन भोई यांच्यासह नागरीक उपस्थित होते. पालखीने रामतीर्थकडे प्रस्थान केले. महादेव मंदिरात पालखी सोहळा झाला.

      यात्रेनिमित्त मेवा-मिठाई, खेळणी यासह विविध वस्तूंची दु‌काने उभारली होती. यात्रेदरम्यान किरकोळ पाकीट व पर्स चोऱ्यांसारखे प्रकार वगळता कोणतेही अनुचित प्रकार घडले नाहीत.

संवेदना फाउंडेशनकडून पाणी…

      यात्रेदरम्यान संवेदना फाउंडेशन च्या वतीने पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. एस.टी. महामंडळाच्या विशेष बस फेऱ्यांनाही यात्रेकरूंकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

स्वारगेट प्रकरणी आजऱ्यात आज आंदोलन

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकावर अकलूजला जाणाऱ्या प्रवासी युवतीवर झालेल्या अत्याचा तवराची घटना निंदनीय आहे. या युवतीवर अत्याचार करणाऱ्या नराधम दत्तात्रेय गाडे याच्यावर कडक कारवाई होण्याची गरज आहे. या घटनेचा आजरा तालुका एसटी प्रवासी संघटनेच्या वतीने जाहीर  निषेध करण्यासाठी आजरा तालुका एसटी प्रवासी संघटनेच्या वतीने आजरा बस स्थानक येथे आज शुक्रवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.

      यासाठी आजरा तालुक्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळी, नागरिक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, एसटी प्रवासी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन आजरा तालुका प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

डॉ. प्रशांत कोरटकर यांचेवर कडक कारवाई करा
मराठा महासंघाची मागणी

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      भारताचे आराध्य दैवत, आमचे सर्वांचे श्रध्दास्थान व हिंदवी स्वराज्य संस्थापक ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्याबददल आक्षेपार्ह व बेताल वक्तव्य करुन कोल्हापूरचे इतिहास संशोधक, लेखक श्री. इंद्रजीत सावंत यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देवून मराठा व ब्राम्हण समाज यांचे संबध सलोख्याचे असून या दोन्ही समाजात भांडण लावण्याचे काम करणारे स्वतःला डॉक्टर म्हणवणारे श्री. प्रशांत कोरटकर यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करुन भारतीय संहिता २०२३ चे कलम १९६, १९७, २९९, ३०२, १५१ व ३५२ यानुसार यांचेवर गुन्हे दाखल करुन त्यांना तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी मराठा महासंघाच्या आजरा शाखेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे

         प्रशांत कोरटकर हे फेसबुक व इंन्टाग्राम वरुन श्री. इंद्रजीत सावंत यांची बदनामी करण्याचे कृत्य नियमित करत आहेत त्यांना तातडीने आवर घालावी.राहूल सोलापूरकर वर अजूनही कारवाई झालेली नाही. तोपर्यंत प्रशांत कोरटकर सारखे निच प्रवृतीची माणसे बाहेर आली, यामुळे समाजा- समाजामध्ये तेढ निर्माण झाले आणि त्यातून समाज भडकून दुर्घटना घडली तर याची सर्वश्री जबाबदारी राज्याचे प्रमुख म्हणून आपल्यावर राहील याची आपण गांभीर्य लक्षात घेवून योग्य ती पावले उचलावीत अशी विनंती करण्यात आली आहे.

      याबाबतचे लेखी निवेदन आजरा तहसीलदारांना देण्यात आले असून याप्रसंगी मारुती मोरे, बंडोपंत चव्हाण, प्रकाश देसाई, सि.डी. सरदेसाई, शिवाजी गुडुळकर यांच्यासह मराठा महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा येथे मराठी भाषा दिन उत्साहात


          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा येथे मराठी भाषा दिन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रंथालयाचे अध्यक्ष वामन सामंत यांच्या हस्ते कविवर्य कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

      मराठी भाषा दिनानिमित्त ग्रंथालयातील मराठी भाषाविषयक पुस्तकांचे व कुसुमाग्रजांच्या पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. यावेळी ग्रंथालयाच्या उपाध्यक्षा सौ. विद्या हरेर, कार्यवाह कुंडलिक नावलकर, सहकार्यवाह रविंद्र हुक्केरी, संचालक बंडोपंत चव्हाण, विनायक आमणगी, डॉ. अंजनी देशपांडे, गिता पोतदार, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर, महादेव पाटील, निखिल कळेकर, महादेव पोवार व शालेय विद्यार्थी उपस्थीत होते.

संकेश्वर बांदा महामार्ग नुकसान भरपाई पार्श्वभूमीवर आज बैठक 

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा तालुक्यातूनतून संकेश्वर बांदा महामार्ग क्र.५४८ बांधकाम करत असताना अनेक शेतक-यांचे नुकसान झाले आहे. त्याबाबत सदर नुकसानग्रस्त शेतक-यांचे शंकाचे निराकरण करणेसाठी व विविध मागणीबाबत चर्चा करणेसाठी मा. उपविभागीय अधिकारीसो आजरा-भुदरगड उपविभाग गारगोटी यांनी उपअधिक्षक भूमिअभिलेख आजरा यांचेसोबत नुकसान गस्त शेतकऱ्यांची बैठक आयोजित केलेली आहे.

      सदर बैठक तहसिलदार कार्यालय, आजरा येथे आज दिनांक २८ रोजी दुपारी १.०० वाजता होणार आहे.

      या कामी संबधीत ठेकेदारसह शेतकरी यांचे कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्र. २ कोल्हापूर यांनी प्राप्त तक्रारी संदर्भातील माहीतीसह सदर सभेस उपस्थीत रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

निषेध आंदोलन…

       शेतकऱ्यांना वीजमाफीच्या घोषणानंतरही वीज बिले दिली आहेत. या निषेधार्थ आज शुक्रवार दि. २८ रोजी सकाळी 11 वाजता येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात वीज बीलांची होळी करून शासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत.

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९  

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा सूतगिरणी वार्षिक सर्वसाधारण सभा

mrityunjay mahanews

शिंपी – चराटी गटातर्फे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचा आज सत्कार

mrityunjay mahanews

उत्तूर – मुमेवाडी जवळ विचित्र  अपघात एक जण जागीच ठार !२५जखमी…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!