रविवार दि.२५ मे २०२५


चर्चा वाटमारीची धावपळ पोलिसांची…
आजरा – महागाव मार्गावरील प्रकार
. आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा – महागाव मार्गावर वेताळ नगर (होनेवाडी)- मलिग्रे दरम्यान रस्त्यावर लाकडे टाकून रस्ता अडवण्याचा प्रयत्न सुरू आहे असा मेसेज सोशल मीडियावर शनिवारी रात्री विविध ग्रुप द्वारे सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास व्हायरल झाला.
हात्तीवडे येथील एका भाजीविक्रेत्याने हा मेसेज व्हायरल केला. भाजी विक्री करून महागाव येथून परतत असताना सदर अनुभव आल्याचे त्याने मेसेज मध्ये म्हटले आहे.
हा मेसेज पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर पोलिसांनी तातडीने दोन वाहने व पोलीस कर्मचाऱ्यांच्या ताफ्यासह ज्या ठिकाणी सदर प्रकार घडल्याचे सांगितले जात होते तेथे भेट दिली.
प्रत्यक्षात या मार्गावर कोणीही कोणाला अडवले नसल्याचे पुढे आले. रस्त्यावर लाकडे मात्र होती. रस्त्यावर पडलेली लाकडे ही लाकूड वाहतूक करणाऱ्या एखाद्या वाहनातून निसटून पडली असावीत अथवा एखाद्या मद्यपीने मद्यधुंद अवस्थेत सदर प्रकार केला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
मात्र यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली हे निश्चित…

पेरणोलीचे उपसरपंच संदीप नावलकर यांचा राजीनामा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली (ता .आजरा) येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच संदीप नावलकर यांनी सरपंच प्रियांका जाधव यांच्याकडे राजीनामा दिला आहे.
दीड वर्षापूर्वी ग्रामपंचायतीची निवडणुक झाली. युवा आघाडी सत्तेवर आली. सत्ताधारी आघाडी कडून नावलकर यांना दोन वर्षासाठी संधी देण्यात आली होती.परंतु नावलकर यांनी मुदतीपूर्वीच राजीनामा दिला आहे.
दरम्यान मासिक सभेत राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. सात दिवसानंतर नवीन उपसरपंच निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

प्रा.डॉ.सरोजनी दिवेकर यांचे निधन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भादवण ता. आजरा येथील (सध्या रा. गडहिंग्लज) प्राध्यापिका डॉ .सौ. सरोजनी भूपाल दिवेकर यांचे अल्पश: आजाराने काल शनिवारी निधन झाले. त्या चंदगड येथील र.भा. माडखोलकर महाविद्यालयात इंग्रजी विषयाच्या अधिव्याख्याता म्हणून काम करत होत्या.
प्रा. डॉ .भूपाल दिवेकर यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे.

रस्त्याचा चिखल…
पेरणोली रस्त्याची अवस्था…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सध्या सुरू असलेल्या पावसामुळे साळगाव ते पेरणोली रस्त्याची दुर्दशा झाली असून रस्त्यावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य तयार झाले आहे. साईड पट्ट्या बुजवण्यासाठी वापरलेली माती, टेलिफोन लाईन टाकण्यासाठी केलेली खुदाई यामुळे सर्वत्र चिखल झाला असून दुचाकी वाहने चालवणाऱ्यांची चांगलीच कसरत सुरू आहे.
काल शनिवारी दिवसभर गाड्या घसरून पडण्याचे प्रकारही या मार्गावर झाले . पावसाळाभर पेरणोली मार्गावरील वाहनधारकांना हा त्रास सहन करावा लागणार असे दिसत आहे.

वाटंगी हायस्कूलचा शंभर टक्के निकाल

वाटंगी हायस्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून यामध्ये पूजा रामचंद्र कुंभार हिने ९४.८०% हिने प्रथम क्रमांक पटकावला तर कु. पार्थ विजय पवार यांने ९२.४०% घेऊन द्वितीय तर पल्लवी तुळसिदास आगलावे हिने ९०.४०% गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकावला.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष श्री. अल्बर्ट डिसोजा, मुख्याध्यापक श्री. अनिल देसाई व शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ यांचे मार्गदर्शन लाभले.
उत्तुर येथे आज वधू-वर मेळावा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर उत्तूर येथील महादेव मंदिरामध्ये आज रविवार दिनांक २५ मे रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वधू – वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संयोजकांनी दिली.
पाऊस पाणी
काल शनिवारी दिवसभर पावसाळी वातावरण होते. पावसाच्या तुरळक सरी शहर व परिसरात पडल्या.
फोटो गॅलरी



