शनिवार दि.२४ मे २०२५


सुशांत महाराज गुरवच्या पोलीस कोठडीत वाढ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मडिलगे (ता आजरा) येथील पत्नी पूजा गुरव हिच्या खूनप्रकरणी आरोपी पती सुशांत महाराज गुरव याला काल शुक्रवारी पुन्हा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सोमवार (ता.२६) पर्यंत तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली. यापूर्वी त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी दिली होती. त्याची मुदत काल संपली. पोलीसानी गुरव याला आज येथील न्यायालयात हजर केले होते. गुरव याने पत्नी पुजा हीचा खून करून दरोड्याचा बनाव केला. पोलीस तपासानंतर फिर्यादी गुरव यानेच पत्नीचा खून केल्याचे उघड झाले होते.
पोलिसांनी अत्यंत कौशल्यतेने या प्रकरणाचा ३६ तासात तपास लावला होता.

ना रस्ते झाले…
ना पाणी मिळाले…
पहिल्याच पावसात आश्वासने वाहून गेली

ज्योतिप्रसाद सावंत
स्वच्छ व निसर्गरम्य आजरा आजरा शहरांमध्ये सध्या सर्वत्र खड्डे, पाण्याची डबकी , तुंबलेली गटर्स व चिखल असे चित्र दिसत असून पहिल्याच पावसात नगरपंचायत प्रशासनाने दिलेली आश्वासने वाहून गेल्याचे दिसत आहे.
पूर्व मोसमी पावसाने शहराची दुर्दशा करून टाकली आहे. शहरात खड्डे , चिखल, डबकी नाहीत अशी एकही वस्ती राहिली नाही. नळ पाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला स्थानिक पुढाऱ्यांनी दिलेले अभय त्यामुळे रेंगाळलेली योजना, योजना पूर्णत्वास जाण्यासाठी केलेली खुदाई,या खुदाईचे सुरुवातीला चिखलात व त्यानंतर डबक्यात झालेले रूपांतर शहरवासीयांच्या मुळावर येऊ लागले आहे. पाणीपुरवठा योजना तर पूर्ण झालेली नाहीच पण ठेकेदाराला दिलेली सवलत आता शहरवासीयांना पूर्ण पावसाळभर अडचणीत आणणारी ठरणार असे दिसत आहे.
शहरातील कचऱ्याची अवस्था फारशी वेगळी नाही. वर्षभराकरता लाखोंचे टेंडर दिले पण प्रत्यक्षात किती दिवस कचरा उचलला जातो हा संशोधनाचा विषय आहे. पाणीपुरवठा योजना व कचरा याबाबत काही मंडळींनी आता जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतल्याचे समजते. पावसाळ्यापूर्वी नव्या वस्त्यांमधील गटर्सची साफसफाई करणे आवश्यक होते तेही न झाल्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये गटर्स तुम्बून पाणी आजूबाजूला पसरू लागले आहे परिणामी रोगराईत वाढ होण्याची शक्यता आहे.
एकंदर हा पावसाळा आजरा शहरवासियांच्या दृष्टीने कसोटीचा ठरणार हे निश्चित…

के.पी. बॅक टू ‘राष्ट्रवादी’
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा भुदरगडचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी समारंभपूर्वक पुन्हा राष्ट्रवादीत (अजित पवार) प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी के.पी. यांनी मशाल हाती घेतली होती. तात्पुरती तडजोड म्हणून हाती घेतलेली मशाल त्यांनी विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर अखेर खाली ठेवली असून पुन्हा एकदा ‘अजितदादा जिंदाबाद’ म्हणत राष्ट्रवादीमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे.
अजितदादांनीही काल मुधाळ झालेल्या कार्यक्रमात ‘ के.पीं.नी कितीही मशाली हाती घेतल्या तरी त्यांच्या काळजात राष्ट्रवादी आहे…’ असे म्हणत पक्षात स्वागत केले.
राष्ट्रवादी (शरद पवार) त्यानंतर राष्ट्रवादी (अजित पवार) विधानसभेला शिवसेना (उ्बाठा) व पुन्हा राष्ट्रवादी (अजित पवार )असे वर्तुळ ८३ वर्षीय के.पीं.नी वर्षभरात पूर्ण केले आहे.

पाऊस सुरू…
बंधारे खुले…
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यासह तालुक्याच्या पश्चिम भागात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस पडत असल्याने ठिकठिकाणच्या कोल्हापुर पद्धतीच्या बंधाऱ्यातील बरगे काढण्यास सुरुवात झाली आहे. हिरण्यकेशी, चित्री नदीवरील बंधाऱ्यावर काम गतीने सुरु आहे. पावसामुळे नदीपात्रात पाणी वाढल्यास बंधाऱ्यांना धोका तयार होवू शकतो. त्यामुळे पाटबंधारे विभागाची धावपळ उडाली असून तातडीने बंधारे रिकामे करण्यासाठी त्यांची घाई उडाली आहे.
उन्हाळ्यात शेतीसाठी पाण्याची सोय व्हावी यासाठी कोल्हापुरी बंधाऱ्याद्वारे पाणी अडवले जाते. यंदा देखील तालुक्यातील बंधाऱ्यात पाणीसाठा करण्यात आला आहे. सर्फनाला, आंबेओहोळ प्रकल्प पूर्ण झाल्याने बंधारे तुंडुंब राहीले हिरण्यकेशी नदीवर धनगरमोळा, सुळेरान, शेळप, दाभिल, देवर्डे, साळगाव, सोहाळे, हाजगोळी, भादवण, ऐनापुर बंधारे आहेत. त्याचबरोबर चित्री प्रकल्पाच्या पाण्यावर परोली बंधारा आहे. गेले दोन दिवसापासून तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस जोरात पडत आहे. परिणामी हिरण्यकेशी, चित्री नदीपात्रामध्ये पाण्याचा साठा वाटू लागला आहे. जोरदार पावसात पाणी वाढले तर बंधा-याला धोका पोहचू शकतो. त्याचबरोबर नदीकाठावरील शेती पाण्याखाली जावू शकते. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून बरगे काढून बंधारे रिकामे करण्यावर जोर दिला आहे.
नियोजनाने शेतकरी सुखावला…
यावर्षी पाटबंधारे विभागाने पाणी प्रकल्पातील पाण्याचे उत्तम नियोजन केल्यामुळे शेतीला पाणीपुरवठ्याची समस्या फारशी भेडसावली नाही. यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

शिरसंगी येथील आदर्श हायस्कूलचा निकाल शंभर टक्के

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिरसंगी ता.आजरा येथील आदर्श हायस्कूलचा निकाल शंभर टक्के लागला असून कुमारी सायली रमेश वांजोळे हिने ८९.८०% घेऊन प्रथम क्रमांक पटकावला तर कुमारी समृद्धी किशोर देसाई हिने ८८ टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक पटकावला व स्नेहल जानबा कांबळे हिने ८६.४० टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकावला.
या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन जयवंतराव शिंपी मुख्याध्यापक एम. नागुर्डेकर व सर्व शिक्षक वर्गाचे मार्गदर्शन लाभले.
पाऊस पाणी
आजरा तालुक्यात गेले चार-पाच दिवस सुरू असलेल्या वळीव पावसाने काल आठवडा बाजारात दिवशीही आजरा शहर व परिसरात हजेरी लावली. पावसाचा जोर मात्र फारसा नव्हता.


