

पांडुरंग पाटील व वसंत ढवळ यांचे निधन
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील जनता सहकारी बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी/ सुरक्षा रक्षक पांडुरंग नारायण पाटील ( वय ७८ वर्षे ) रा. चाफे गल्ली यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, विवाहित मुलगा, सून, जावई , नातवंडे असा परिवार आहे.
येथील उद्योजक भिकाजी पाटील यांचे ते चुलते होत. रक्षाविसर्जन गुरुवार दिनांक ८ रोजी सकाळी नऊ वाजता आहे.
रवळनाथ कॉलनी येथील रहिवासी व आजरा येथील ज्येष्ठ कापड व्यापारी वसंत दत्ताराम ढवळ (वय ७८ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात मुलगा, दोन विवाहित मुली, सुना, जावई ,नातवंडे असा परिवार आहे. आजरा येथील प्राथमिक शिक्षिका अनुष्का गोवेकर व आसावरी मुननकर यांचे ते वडील होत.
ढवळ यांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला होता. त्यांच्या इच्छेप्रमाणे नेत्रदान करण्यात आले.

मंत्र्यांनी एक महिन्यात निर्णय करावा
इ पी एस – ९५ पेन्शन प्रश्नी समन्वय समितीचा इशारा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
“मंत्र्यांनी एक महिन्यात इ पी एस ९५ पेन्शन चा निर्णय करावा असे आवाहन इ पी एफ पेन्शनर संघांच्या अखिल भारतीय समन्वय समितीने केले आहे. श्रम व रोजगार मंत्री श्री मनसुख मांडविया यांची समन्वय समितीचे उपाध्यक्ष कनगराज यांच्या नेतृत्वाखाली शिष्ट मंडळाने भेट घेतली त्यावेळी त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली.
तत्पूर्वी दिल्ली येथील जंतर मंतर येथे हजारो इ पी एस ९५ पेन्शनरानी घोषणा देत धरणे धरले. त्यावेळी “पी एम मोदी जागे व्हा पेन्शनरांचे म्हणणे ऐका” “संविधान झिंदाबाद अशा घोषणा दिल्या.
देशभरातून मोठ्या संख्येने पेन्शनर धरण्यात सामील होण्यासाठी आले होते. यात केरळ, तामिळनाडू, आंध्र, महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा, बंगाल, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली येथील पेन्शनर सहभागी झाले होते.
धरणे कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मान्यवरांनी भेटी दिल्या. यामध्ये लोकसभा सदस्य षण्मुगम, गिरी राजन, जॉन ब्रीटास, डॉ शिवदास, अप्पाल नायडू, मल्ली रवी, तसेच सी बी टी मेंबर करुमालीयन यांनी भेटी दिल्या. याच सुमारास खासदार श्री शाहू महाराज यांनी लोकसभेमध्ये या प्रश्नाची चर्चा मांडली.
यानंतर झालेल्या समन्वय समितीच्या मीटिंग मध्ये या सर्वाचा आढावा घेऊन आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय केला आहे. एक महिन्यात हा निर्णय न झाल्यास भाजपा विरोधात मतदानाची भूमिका समन्वय समिती पार पाडेल असे समन्वय समिती ने ठरवले आहे.
धरणे कार्यक्रमाचे नेतृत्व कार्यकारी अध्यक्ष डी. मोहनन महासचिव अतुल दिघे, महाराष्ट्र कमिटीचे अनंत कुलकर्णी, तानाजी पाटील, राजाराम पाटील, गोपाळ गावडे, शांताराम पाटील, चंद्रकांत बागडी, हणमंत खामकर कोल्हापूर, गोपाळ पाटील, भाऊसाहेब यादव, आनंदराव नलवडे,सांगली, दिगंबर जोशी, नाशिक यांचेसह विविध राज्य कमिटी सदस्यांनी केले.

आजरा महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या वतीने ‘एक दिवसीय शिक्षक प्रशिक्षण’ कार्यशाळा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, व अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, आजरा महाविद्यालयामध्ये ‘एक दिवसीय शिक्षक प्रशिक्षण’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते करण्यात आले.
एकदिवसीय कार्यशाळेचे बीजभाषक प्रा. डॉ. जे. एस. इंगळे, प्रभारी प्राचार्य, प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालय, मलकापूर, अध्यक्ष, अर्थशास्त्र अभ्यास मंडळ, शिवजी विद्यापीठ, कोल्हापूर हे उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
बी. ए. भाग ३ मध्ये एन. ई. पी नुसार नवीन अभ्यासक्रम शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या मार्फत लागू करण्यात आले आहे. विद्यार्थी हे विषय शिकून पुढील भविष्यात येणाऱ्या अडचणीना समोर जातील याची मला खात्री आहे असे यावेळी प्राध्यापक डॉ. एन. डी. पाटील यांनी स्पष्ट केले.
पहिल्या सत्रामध्ये डॉ. संतोष यादव, देवचंद कॉलेज, अर्जुननगर, सदस्य, अर्थशास्त्र अभ्यास मंडळ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र ची सविस्तर मांडणी केली. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र विषय शिकवत असताना विद्यार्थांना सोप्या भाषेमध्ये विषय समजून सांगावे असे मत शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये व्यक्त केले.
दुसऱ्या सत्रामध्ये डॉ. मनोहर कोरे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, विलिंगडन कॉलेज, सांगली, सदस्य, अर्थशास्त्र अभ्यास मंडळ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, अर्थशास्त्र विषय हे आपल्या जीवनासी निगडित आहे. प्रत्येक व्यक्तीला आपण जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत अर्थशास्त्राची उपयोग आपल्या जीवनामध्ये होत असतो. त्यामुळे जगातील प्रत्येक व्यक्तीला अर्थशास्त्राची जाणीव असणे गरजेचे आहे.
या कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य प्रा. डॉ. ए. एन. सादळे यांनी ही उपस्थित शिक्षकाना मार्गदर्शन केले. तसेच कार्यालयीन अधीक्षक, योगेश पाटील हे उपस्थित होते. या कार्यशाळेचे समन्वयक डॉ. संजय चव्हाण यांनी उपस्थितांचे व मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे आभार डॉ. महेंद्र जाधव यांनी मांडले. सूत्रसंचालन प्रा. सौ. दीपाली कांबळे यांनी केली.


