mrityunjaymahanews
अन्य

राजकीय घडामोडी


यावेळीही उमेदवार नाहीच..

                  ज्योतिप्रसाद सावंत …

     विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत. महायुती व महाविकास आघाडीने एकमेकांच्या विरोधात ताकदीने उभारण्याच्या दृष्टीने जोरदार  हालचाली सुरू केलेल्या आहेत. आजरा तालुका भुदरगड – राधानगरी, चंदगड व कागल या तीन विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. गेली दहा वर्षे तालुक्यातील भाजपाने चांगलीच मशागत केली . परंतु गेल्या दोनही निवडणुकांमध्ये केंद्रात व राज्यात सत्तेत असतानाही भाजपाच्या अधिकृत चिन्हावर स्थानिक विधानसभा मतदारसंघात उमेदवारच नसल्याने भाजपा कार्यकर्त्यांना बंडखोर उमेदवाराच्या पाठीशी राहण्याची वेळ आली होती. त्याचीच पुनरावृत्ती या निवडणुकीतही होणार असल्याचे स्पष्ट झाले .

      महायुतीतील तडजोडीनुसार ज्या पक्षाचा विद्यमान आमदार आहे त्या मतदारसंघात त्याच पक्षाला निवडणूक लढवण्याची संधी दिली जाणार आहे. आजरा तालुक्याशी संबंधित तीनही विद्यमान आमदार हे महायुती व घटक पक्षांचे आहेत. यामध्ये भाजपाचा एकही विद्यमान आमदार  नाही. राहुल देसाई , समरजीतसिंह घाटगे व शिवाजीराव पाटील असे सक्षम उमेदवार असतानाही ते यावेळीही वेटिंग लिस्ट मध्ये गेले आहेत. कार्यकर्त्यांना या तीनही उमेदवारांच्या उमेदवारीबद्दल आशा आहे. समरजीतसिंह घाटगेंसह शिवाजीराव पाटलांनी तर मतदारसंघ पिंजून काढून गेली दहा वर्षे मोठा संपर्क ठेवला आहे.दोघांनाही गत विधानसभा निवडणुकीत अल्प मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले. कमी पडलेल्या मतांची जोडणा करण्यासाठी त्यांनी गेली पाच वर्षे बरीच मेहनत घेतली आहे. असे असतानाही चंदगड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांची तर कागल विधानसभा मतदारसंघातून पालकमंत्री व अजित दादा गटाचेच समर्थक हसन मुश्रीफ यांची उमेदवारी निश्चित आहे.

      हीच अवस्था पलीकडे राधानगरी मतदारसंघाची आहे भुदरगड – राधानगरी मतदारसंघातून काँग्रेसचे मूळ असणारे परंतु भाजपाचे समर्थक राहूल देसाई यांनीही वेळोवेळी विधानसभेसाठी प्रयत्न केले. परंतु अपक्ष उमेदवारीचे लेबल घेऊन जाताना येणाऱ्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना अधिकृत पक्षीय बलाची गरज आहे. या मतदारसंघात विद्यमान आमदार शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर यांनी आपले चांगलेच बस्तान बसवले आहे. त्यामुळे यावेळीही त्यांची उमेदवारी निश्चित आहे. या सर्व घडामोडीमध्ये आजरा तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांची फार मोठी गोची होऊ लागली आहे.

      सोशल मीडियाच्या माध्यमातून समरजीतसिंह घाटगेंसह शिवाजीराव पाटलांच्या कार्यकर्त्यांनी मोठे रान उठवले आहे. विशेषत:  यामध्ये भाजपा कार्यकर्त्यांचा समावेश मोठा आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारीमध्ये समर्थकांची वर्णी लागण्याची शक्यता दुरावली असल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी करायचे काय ? असा सवाल निर्माण होऊ लागला आहे. वरिष्ठ पातळीवर महायुतीच्या माध्यमातून सर्व पक्ष एकत्र असले तरीही भाजपा कार्यकर्त्यांना स्वतःच्या हक्काचा व पक्षाचा उमेदवार हवा आहे. परंतु ते सध्या तरी शक्य दिसत नाही.

     ज्यांच्या विरोधात गत विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचार यंत्रणा राबवली त्यांचीच तळी या निवडणुकीत उचलण्याची परिस्थिती भाजपा कार्यकर्त्यांवर येण्याची शक्यता आहे. भाजपा कार्यकर्त्यांमधील ही खदखद आता लपून राहिलेली नाही. समरजीतसिह घाटगे यांना आमदार करावयाचे आहे परंतु मंत्री मुश्रीफ यांचा अडथळा तर इकडे शिवाजीरावांनी चांगली मोट बांधली आहे परंतु अधिकृत संधीची शक्यताच नाही अशा विचित्र परिस्थितीमध्ये खुद्द उमेदवारच अडकल्याने कार्यकर्त्यांची समजूत काढताना पक्षश्रेष्ठींची चांगलीच दमछाक होणार आहे.

      हे जर असेच होत राहणार असेल तर कार्यकर्त्यांनीही नेते मंडळींना आता तुमचा निर्णय तुम्ही घ्या तुमच्या पाठीशी आम्ही आहोत असा अप्रत्यक्ष सल्ला देण्यास सुरुवात केली आहे.

समरजीतसिंह राष्ट्रवादीच्या तर राहुल देसाई काँग्रेसच्या वाटेवर…?

      महायुतीतून उमेदवारीची संधी नसल्याने समरजीतसिंह घाटगे हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करत असून राधानगरी-भुदरगड मतदारसंघातील राहुल देसाई यांनी काँग्रेसमध्ये जाण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. चंदगड मधून शिवाजीराव पाटील हे मात्र यावेळीही अपक्ष म्हणूनच रिंगणात राहण्याची शक्यता आहे.

केपींनी महायुतीची संगत सोडली …?

      महायुतीतील प्रमुख नेत्यांची एकंदर भूमिका व उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने माजी आमदार के.पी . पाटील यांनी महायुतीपासून अंतर ठेवले आहे . सध्या लोकसभेपासून ते महाविकास आघाडीच्या परिवारात वावरताना दिसत आहेत .त्यामुळे भुदरगड मतदार संघात आमदार प्रकाश आबिटकर विरुद्ध माजी आमदार के. पी. पाटील अशीच लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.



 

संबंधित पोस्ट

राष्ट्रवादी आजरा कारखान्याच्या रिंगणातून बाहेर…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!