
१८ लाखांची दारू बेकायदेशीररित्या वहातूक करताना पकडली

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गोवा बनावटीची ट्रकभर दारू बेकायदेशीररित्या विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करताना १७ लाख ८० हजार रुपयांच्या दारूसह ४१ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमालासह याप्रकरणी राजस्थान येथील एकाला आजरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सदर कारवाई करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की बहिरेवाडी तपासणी नाक्यावर पोलिसांना संशयास्पद रितीत जाताना अशोक लेलंड कपंनीचा ट्रक (एच.आर क्र. ३८ एबी-३६६८) आढळून आला. पोलिसांनी सदर ट्रक अडवून त्याची झडती घेतली असता त्यामध्ये १७ लाख ८० हजार रुपयांची गोवा बनावटीची विविध कंपन्यांची दारू आढळून आली.१० लाख २७ हजार ३५५ रुपये किंमतीचे आयएफबी इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचे स्पेअर पार्टही आढळून आले. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल ताब्यात घेऊन वाहन चालक दिनेश भिकाराम बैरवा ( वय ३९, रा. विशनपुरा, पोस्ट नांगल लट, ता. टोडाभिम, जि. करौली /गंगापूर, राज्य राजस्थान याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील पुढील तपास करीत आहेत.

पण मागे हटणार नाही ! …
शिवसेना उपनेते संजय पवार यांची ग्वाही

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
अन्यायाविरोधात आक्रमकपणे लढा देणे हे शिवसेनेच्या रक्तात भिनले आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना मूळचा आक्रमकपणा कदापि सोडणार नाही. जनतेच्या प्रश्नांसाठी प्रसंगी तुरुंगात जावे लागले तरी चालेल परंतु मागे हटणार नाही. अशी ग्वाही शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) उपनेते संजय पवार यांनी दिली.
आजरा येथे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी उपनेते श्री. पवार बोलत होते. या बैठकीस जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांची उपस्थिती होती. प्रारंभी आजरा तालुकाप्रमुख युवराज पवार यांनी स्वागत केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल संभाजी पाटील यांचा सत्कार उपनेते संजय पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना उपनेते संजय पवार म्हणाले, गेली ३४ वर्षे मी शिवसेनेत प्रामाणिक काम केलो आहे. एवढ्या वर्षांच्या कारकिर्दीत मी कधीच आत बाहेर केलो नाही, पक्षाशी एकनिष्ठ राहिलो आहे. त्यामुळे माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी राज्यसभेची उमेदवारी, उपनेतेपद यासह विविध पदांची जबाबदरी सांभाळण्याची संधी दिली आहे. त्यामुळे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या मदतीने कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेची मजबूत बांधणी करून पक्षप्रमुखांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवेन असेही ठामपणे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातून शिवसेनेला मोठी ताकद देऊ : प्रा. शिंत्रे
जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले, शिवसेना हे एक कुटुंब आहे. शिवसैनिक कुटुंबातले घटक आहेत. प्रत्येक शिवसैनिकाच्या अडीअडचणीत पदाधिकारी धावून जातात यामुळे शिवसैनिकांना लढण्याचे बळ मिळते. या बळाच्या जोरावरच आज शिवसेना टिकून आहे. लोकसभेसह आगामी सर्वच निवडणुका लढविण्यासाठी जिल्हा पातळीवरून मोठी ताकद उभी करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
बैठकीस उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, सुरेश पोवार, सुरेश चौगुले, संभाजी भोकरे, आजरा तालुकाप्रमुख युवराज पोवार, गडहिंग्लज तालुका प्रमुख दिलीप माने, अजित खोत, राधानगरी तालुकाप्रमुख बाबासाहेब पाटील, कागल तालुका प्रमुख जयसिंग टिकले, चंदगड तालुका प्रमुख लक्ष्मण मनवाडकर, अनिल दळवी, रणजीत पाटील, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अवधूत पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. आभार दयानंद भोपळे यांनी मानले.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत पं. दीनदयाळ हायस्कूल तालुक्यात द्वितीय

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महाराष्ट्र शासनाच्या शालेय विभागामार्फत घेण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये स्वामी विवेकानंद शिक्षण व संस्कृती प्रसारक मंडळ,आजरा च्या पंडित दीनदयाळ हायस्कूल ने आजरा तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवला. पंडित दीनदयाळ हायस्कूल दोन लाख रुपयांच्या पारितोषिकाचे मानकरी ठरले आहे. पंडित दीनदयाळ हायस्कूलने अल्पावधीतच आजरा तालुक्यामध्ये एक अग्रणी प्रशाला म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात. शाळेचा परिसर निसर्गरम्य व शैक्षणिक वातावरणास अनुकूल आहे.
शाळेचे अनेक विद्यार्थी कला तसेच क्रीडा क्षेत्रातील विविध स्पर्धांमधून तालुका, जिल्हा तसेच विभागीय स्तरावरती उल्लेखनीय कामगिरी करत आहेत शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच कला, क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून या विद्यालयाची वाटचाल चालू आहे.

दावणे बंधूंचा सत्कार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्याम गुरव यांच्या संकल्पनेतून गजरगाव येथील श्री लकमेश्वर मंदिर परिसर सुशोभिकरण, बागकाम, भक्तांच्या पायावर सहज पाय धुण्यासाठी पाण्याची सुंदर व्यवस्था , नारळाच्या बागेची रचना या सर्व कामाचे आर्किटेक्चरल डिझाईन व ते पूर्णत्वास नेण्यासाठी कष्ट घेतलेले गजरगावचे सुपुत्र आर्किटेक्ट श्रीधर कृष्णा दावणे व आर्किटेक्ट मुरलीधर कृष्णा दावणे या दोन बंधूंचा मंदिराची प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी माजी सैनिक श्री कुलकर्णी , श्याम गुरव यांच्यासह भक्तमंडळी उपस्थित होती.

निवड…
प्रदीप तुप्पट

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
किणे ता.आजरा येथील प्रदीप महादेव तुप्पट यांची राज्यसेवा मधून उपशिक्षण अधिकारी पदी निवड झाली आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण किणे येथे तर माध्यमिक शिक्षण शिरसंगी हायस्कूलमध्ये झाले आहे.



