शुक्रवार ७ फेब्रुवारी २०२५



नगरपंचायतीची शहरवासीयांना काविळीची भेट
संयुक्त बैठकीत शहरवासीयांचा थेट आरोप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शहरभरातील सांडपाणी चित्रा नदीमध्ये मिसळल्यामुळे आजरा शहरासह पटेल कॉलनी, बुरूडे परिसरात काविळ, विषमज्वरचे रुग्ण वाढले असून ही नगरपंचायतीने शहरवासीयांना दिलेली भेट आहे. नगरपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाणी प्रदूषित झाल्याचा आरोप करत शहरातील नागरीकांनी संताप व्यक्त केला. यावेळी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.
सांडपाणी नदीत मिसळू नये यासाठी शोष खड्डे काढले जातील. नदीत चित्रीचे पाणी सोडून दुषीत पाणी वहाते केले जाईल अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली.
पटेल कॉलनी, बुरुडे परिसरातील नागरीकांचे शिष्टमंडळाच्या सोबत आज येथील तहसीलदार कार्यालयात बैठक झाली. नागरीकांनी काविळ, विषमज्वर रुग्णांचा प्रश्न लावून धरला. तहसीलदार समीर माने, आजरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज सुर्वे, निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, स्वच्छता व आरोग्य विभागाचे अमर कांबळे, संजय यादव प्रमुख उपस्थित होते.
लेंडओहळ व वडाचा गोंड येथून येणारे शहरातील सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याने शहरात काविळ, विषमज्वर रुग्णांची संख्या वाढली आहे. पटेल कॉलनीत घराघरात रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे नगरपंचायतीने योग्य ती खबरदारी घेण्याची गरज यावेळी शहरवासीयांनी बोलून दाखवली.
पटेल कॉलनीला बुरुडेच्या जॅकवेलमधून पाणी पुरवठा होतो. जॅकवेलमध्ये शेवाळ पसरले आहे यामुळेही साथ पसरण्यास हातभार लागत असल्याचे उपस्थितांनी सांगितले.यावेळी परशराम बामणे, आरोग्य निरीक्षक अमर कांबळे, नवीद पटेल, समिर तकीलदार, असिफ पटेल, मोहीन माणगावकर यांनी चर्चेत भाग घेतला. आरोग्य विभागाचे युनुस सय्यद, सिद्दीक वंटमुरे, मौलाना तोफिक काकतीतकर, संजय कांबळे, सुनील बागवे, जोतिबा आजगेकर यासह नागरीक उपस्थित होते.

कोरीवडे सरपंच अविश्वास ठराव पार्श्वभूमीवर ११ फेब्रुवारी रोजी विशेष ग्रामसभा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोरीवडे ता. आजरा येथील लोकनियुक्त सरपंच शिवाजी गणपती पाटील यांच्यावरील ग्रामपंचायत सदस्यांच्या विशेष सभेत संमत झालेल्या अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर गटविकास अधिकारी संजय ढमाळ यांच्या अध्यक्षतेखाली आता ११ फेब्रुवारी रोजी विशेष ग्रामसभा होणार आहे.
या सभेमध्ये जनतेच्या दरबारात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव ठेवण्यात येणार असून बहुमतावर या ठरावाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

डीपीची ठिणगी…?
काजूची झाडे भस्मसात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मुरुडे – हरेरवाडी येथे गुरुवारी दुपारी लागलेल्या आगीमध्ये अर्जुन भादवणकर यांच्या ३० व चंद्रकांत भादवणकर यांच्या ५० झाडाचे नुकसान झाले.
इलेक्ट्रीक बोर्डाचे डिपीवरुन दुपारी ठीणगी पडून आग लागुन शेजारी असलेल्या अर्जुन भादवणकर व चंद्रकांत भादवणकर यांचे काजुच्या झाडांचे नुकसान झाले आहे अशी माहिती भादवणकर बंधूंनी दिली आहे

भयमुक्त व कॉपीमुक्त परीक्षा पार पडाव्यात : पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षण हा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे. आगामी दहावी व बारावीच्या परीक्षांच्या काळात निर्धास्त, आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे परीक्षेस सामोरे जावे, यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. भयमुक्त कॉपीमुक्त परीक्षा या संकल्पनेला बळ देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. शिक्षण हे केवळ गुणांसाठी नसून, ते ज्ञानवृध्दी आणि जीवन घडविण्याचे साधन आहे. समाजाच्या उज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवून आणि प्रामाणिक प्रयत्नांमधून यश संपादन करावे असे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांना सकारात्मक वातावरण मिळावे तसेच त्यांच्यात आत्मविश्वास वाढेल यासाठी पालक व शिक्षकांनी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांची मानसिक तयारी करावी.
आगामी परीक्षा काळात कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी जिल्हयातील सर्व परीक्षा केंद्रे भयमुक्त व कॉपीमुक्त राहतील यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी कटीबध्द आहे. परीक्षांच्या धर्तीवर राज्यामध्ये कॉपी प्रकरणास पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी व विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त आणि पारदर्शक परीक्षा प्रक्रीयेसाठी जिल्हा प्रशासनाव्दारे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रामाणिकतेने आणि न्याय मार्गाने शिक्षणाला पुढे नेऊयात असेही या आवाहन प्रसंगी म्हटले आहे.

आजरा शहरातील महामार्गावर पथदिवे लावा
शिवसेनेची मागणी नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरातून संकेश्वर – बांदा महामार्ग जातो. या महामार्गावर पथदिवे लावून उजळून टाकावा अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले असून कर निरीक्षक निहाल नायकवडी यांनी निवेदन स्विकारले.
शहरातून संकेश्वर- बांदा महामार्ग जात आहे. या मार्गावर दुतर्फा पथदिवे उभारण्यात आले आहेत. दिव्यांचे खांब उभा करून सहा महीन्यांचा काळ लोटला आहे. त्यामुळे महामार्ग अंधारलेला आहे. महामार्ग प्रशासन व नगरपंचायत प्रशासनाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. अन्यथा (ता.१३) ला येथील संभाजी चौकात आजरा तालुका शिवसेनेच्यावतीने चक्काजाम आंदोलन केले जाईल. असा इशारा दिला आहे. निवेदनावर शिवसेना शहर प्रमुख ओमकार माद्याळकर, समीर चाॅंद,अनपाल तकिलदार, सागर नाईक, महेश पाटील, डॉ. सागर पारपोलकर आदींच्या सह्या आहेत.

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९

मोतीबिंदू रुग्णावर मिरज येथे शस्त्रक्रिया

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्री गुंडू दादु हरेर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त सामाजिक भावनेतून
निरामय क्लिनिक आजरा येथे नेत्र तपासणी शिबीर आयोजित केले होते. त्यातील मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांवर, नॅब नेत्र रुग्णालय, मिरज येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
यावेळी कार्यक्रमास डॉ. विल्फ्रेड डिसोझा, डाॅ. आर.पी. डिसोझा, डाॅ. अनिता डिसोझा, डाॅ. सुदाम हारेर, काॅ. शांताराम पाटील, काॅ. संजय घाटगे, महादेव होडगे, मनप्पा बोलके, प्रेमा शिवणगेकर, हिंदूराव कांबळे,गणपती ढोणूक्ष रझाक भडगावकर, शोभा पाटील, शिवाजी भगुत्रे, नरसू शिंदे, आनंदा सुतार याच्या सह गिरणीकामगार, जेष्ठ नागरिक, वारकरी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

निधन वार्ता
पार्वती पारळे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गांधीनगर, आजरा येथील पार्वती बाळासाहेब पारळे (वय ८५ वर्ष) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या पश्चात
दोन विवाहित मुले, एक मुलगी, सुना व नातंवंडे असा परिवार आहे. संदीप पारळे व रवी पारळे यांच्या त्या आई होत.
काळू हरेर

हात्तिवडे ता . आजरा येथील काळू विठू हरेर (वय ८६ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात मुलगा,दोन मुली,पत्नी असा परिवार आहे.येथील गंगामाई वाचन मंदिराच्या उपाध्यक्षा विद्या हरेर यांचे ते सासरे होत.
आज तालुक्यात…
♦ मडिलगे ता. आजरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व विविध संस्था समूह, मुंबई, पुणे, इचलकरंजी स्थित ग्रामस्थ यांच्या वतीने वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ यांचा जाहीर सत्कार कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता होणार आहे.
♦ श्री दत्त व्हिलेज विकास सेवा संस्थेचा अमृत महोत्सवी समारंभ व नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा वैद्यकीय शिक्षण मंत्री नाम. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जुनी पोस्ट गल्ली, स्टेट बँकेच्या आजरा शाखेच्या शेजारी दुपारी बारा वाजता होणार आहे.


