
शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२५



नदीकाठी दम…
दोघांवर गुन्हा नोंद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सोहाळे (ता. आजरा) येथील श्रेयस सूर्यकांत दोरूगडे (वय १९) व सोहाळे बाची कुलदीप मारुती कोंडूसकर (वय २२) या दोघांवर गांजासदृश्य अंमली पदार्थाच्या सेवन प्रकरणी आजरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, दोरूगडे व कोंडूसकर हे दोघे सोहाळे गावच्या स्मशानभूमीच्या पाठीमागील बाजूस नदीच्या काठावर उघड्यावर सिगरेटमध्ये गांजा सदृश्य अंमली पदार्थ भरून सेवन करताना आढळून आले. त्यामुळे या दोघांवर आजरा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गांजासदृश्य पदार्थाच्या सेवन प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून गांजा पुरवठा करणाऱ्याचा शोध सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांनी दिली.

मसोलीत आग…
८ एकर क्षेत्रावरील काजू झाडांसह गवत व इतर पिकांचे नुकसान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मसोली येथे काल शुक्रवारी दुपारी लागलेल्या आगीमध्ये ज्ञानदेव रामू तेजम, शिवाजी आप्पा गुरव, तानाजी आप्पा गुरव, दत्तात्रय तुकाराम भोसले आदींचे मोठे नुकसान झाले आहे.
१० एकर क्षेत्रातील काजूची झाडे,गवत, लाकूड, तुर आणि अन्य झाडे भक्षस्थानी पडली आहेत.
शॉर्टसर्किटने सदर आग लागली असावी असा अंदाज संबंधित नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडून वर्तवला जात आहे.

आजरा कारखान्यास बोगस चेक देणा-यास शिक्षा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यास सन २०१६-१७ या गळीत हंगामात ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा पुरविणेसाठी घेतलेल्या ॲडव्हान्स रक्कमेतील थकीत रक्कमेच्या फेडीपोटी भुदरगड तालुक्यातील श्री. युवराज मारूती ढेकळे, रा.टिक्केवाडी यांनी कारखान्यास सन २०२१ मध्ये थकीत रक्कम फेडण्यासाठी आठ लाख रुपये इतक्या रक्कमेचा चेक दिला होता. सदरचा चेक न वटलेने त्यांचे विरूध्द मे. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, आजरा यांचे कोर्टात फिर्याद दाखल केली होती. सदर केस मे. न्यायालयासमोर चालून त्यावर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आजरा श्री.आर.पी.थोरे यांनी आरोपींला तीन महिने कैदेची शिक्षा व रू.अकरा लाख इतकी रक्कम फिर्यादी साखर कारखान्यास नुकसान भरपाई म्हणून तीन महिन्याचे आत अदा करावी असा आदेश केला आहे.
फिर्यादी कारखान्याच्या वतीने वकिल म्हणून ॲड.बी.के. देसाई यांनी काम पाहिले तर फिर्यादी म्हणून श्री. अनिल देसाई यांनी फिर्याद दाखल केली होती.

महाराजांच्या बदनामी प्रकरणी सोलापूरकर वर गुन्हा दाखल करा… मराठा महासंघाची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र आणि भारत देशाचे आरध्य दैवत आहे. महाराजांनी बारा बलेतुदार आणि अठरा पगड जातीचे रयतेचे राज्य स्थापन केले. त्यामुळेच ते सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान आहेत.राहुल सोलापूरकर यांनी शिवचरित्राविषयी वादग्रस्त वक्तव्य करून लोकांना भ्रमिष्ट करण्याचे उद्योग बंद करावेत.महाराजांच्या बदनामी प्रकरणी सोलापूरकर वर गुन्हा दाखल करावा अशी मागणी मराठा महासंघाच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
याबाबत दिलेल्या लेखी निवेदनात चित्रपट सृष्टीत नट झाले म्हणजे कोणी इतिहास संशोधक होत नाही. छत्रपती शिवाजी महाराज तुम्हा आम्हा सर्वांचे स्वाभिमान, अभिमान आणि श्रध्दा स्थान आहेत परंतु शिवचरित्र विषयी कोणताही अभ्यास नसताना जणू इतिहासाचा गाढा अभ्यासक आहोत या अविर्भावात राहुल सोलापूरकर हे शिवचरित्राविषयी बरळत असून शिवभक्तांच्या भावनेला ठेच पोहचवत आहेत.
आग्र्याहून सुटका हि शिवरायांच्या जीवनातील नाटयपूर्ण, बलाढय व क्रुर औरंगजेबाला जेरीस आणणारी ऐतिहासिक घटना आहे. याविषयी अनेक समकालीन बखरी, कागदपत्रांचा व नोंदींचा जेष्ठ इतिहासकारांनी अभ्यास केला आहे. असे असताना सवंग विधाने करून चूकीचा इतिहास मांडण्याचा पायंडा पाडत असून अश्या खोटया इतिहास मांडणीमुळे शिवभक्तांच्या भावनेचा उद्रेक होत आहे.
अशा व्यक्ती आणि प्रवृतींना ठेचण्याची वेळ आली आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांबददल चुकीची वक्तव्ये करणाऱ्या राहुल सोलापूरकर वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी तसेच त्यांनी शिवभक्तांची तातडीने माफी मागावी अन्यथा त्यांचा कोल्हापूरी पध्दतीने योग्य समाचार घेतला जाईल असेही म्हटले आहे.
या निवेदनावर संघटनेचे मारुती मोरे, तालुकाध्यक्ष बंडोपंत चव्हाण, शिवाजीराव पाटील ,संभाजी इंजल प्रकाश देसाई, सि.डी. सरदेसाई आदींच्या सह्या आहेत.


भादवण सरपंच माधुरी गाडे यांचे विरोधात अविश्वास ठराव दाखल

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भादवण (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतीच्या दहा सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. या अविश्वास ठरावाबाबत विशेष सभा बुधवार दि.१२ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
भादवण ग्रामपंचायती मध्ये लोकनियुक्त सरपंच आपल्या अधिकार पदाचा दुरुपयोग करून कर्तव्यात कसूर करत आहेत. ग्रामपंचायतीच्या विकासकामांच्या ठरावाची अंमलबजावणी करत नाहीत. ग्रामपंचायत कारभारामध्ये सदस्यांना विश्वासात न घेता सरपंच मनमानी पद्धतीने कारभार करीत असल्याचा ठपका ११ पैकी १० सदस्यांनी ठेवला आहे. अविश्वास ठराव उपसरपंच संजय पाटील, सदस्य अर्जुन कुंभार, बाळकृष्ण सुतार, प्रमोद घाटगे, तानुबाई देवकर, सुनंदा पाटील, नीलम देवलकर, शितल केसरकर, अश्विनी पाटील, संगीता देसाई या दहा सदस्यांनी दाखल केला आहे.
तालुक्यात अविश्वास ठरावांचे लोण
कोरिवडे सरपंचांपाठोपाठ भादवण येथील लोकनियुक्त सरपंचांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकानंतर बदललेल्या राजकीय पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींचे राजकारणही बदलू लागले असून तालुक्यामध्ये आता अविश्वास ठरावाचे लोण पसरू लागले आहे.

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९

तालुक्यातील सहा गावात अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा पंचायत समिती अंतर्गत एकात्मिक बालविकास प्रकल्पामार्फत आजरा तालुक्यातील पारपोली अंगणवाडी.क्र. ४, पेठेवाडी (वेळवट्टी) क्र. आहे ५, वेळवट्टी क्रशर (वेळवट्टी) क्र. ९, धनगरमोळा (सुळेरान) क्र. ११६ कासार कांडगाव क्र. १९५, चितळे क्र. ४६ या ६ महसुली गावातील अंगणवाडी मदतनीस पद भरती आहे.
तरी इच्छुकांनी आपले अर्ज अर्ज दिनांक १०/०२/२०२५ ते २४/०२/२०२५ अखेर कार्यालयीन वेळेत जमा करावेत अंगणवाडी मदतनीस मानधनी पदावर नेमणुक करण्यात येणार आहे अर्जाचा नमुना एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय आजरा येथे उपलब्ध असुन अटी व शर्ती अर्जात नमुद आहे. तरी इच्छुकांनी आपले अर्ज या कार्यालयाकडे सादर करावेत असे आवाहन एकात्मिक बाल विकास प्रकल्प सेवा, आजरा यांनी केले आहे.



