

नाथाजी आले… आजऱ्यातील जुने कार्यकर्ते रिचार्ज झाले…

ज्योतिप्रसाद सावंत
भाजपाच्या जिल्हा ग्रामीण तालुकाध्यक्षपदाचा राहुल देसाई यांनी राजीनामा दिल्यानंतर तातडीने नाथाजी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीने आजरा तालुक्यातील जुने भाजपा कार्यकर्ते रिचार्ज झाले असून पुन्हा एकदा ते फाॅर्मात आले आहेत. ठिकठिकाणी नाथाजींच्या अभिनंदनचे फलक झळकत असले तरीही त्या फलकावरून भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक अण्णा चराटी व विद्यमान तालुकाध्यक्ष बाळ केसरकर यांचे फोटो मात्र गायब झाले असून याबाबत आता उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.
गेले काही दिवस आजरा तालुका भाजपामध्ये जुने विरुद्ध नवे कार्यकर्ते असा संघर्ष सुरू असून हा संघर्ष जगजाहीर आहे. जिल्हाध्यक्षपदी समरजीतसिंह घाटगे होते तोपर्यंत हा संघर्ष चार भिंतीच्या आत होता त्यानंतर मात्र समरजीतसिंह घाटगे यांच्या जागी राहुल देसाई यांची नियुक्ती झाली आणि त्याचे पडसाद तालुका भाजपाच्या एकंदर बांधणीत उमटू लागले. तालुका अध्यक्षपदी अनिरुद्ध केसरकर यांना संधी देण्यात आली यामुळे भाजपाचे जुने कार्यकर्ते दुखावले गेले.स्वर्गीय बाबुरावजी कुंभार यांचे चिरंजीव सुधीर कुंभार यांच्याकडून अध्यक्ष पदाचा पदभार केसरकर यांच्याकडे सोपवण्यात आला.
मुळातच राहुल देसाई यांना मानणारे जुने भाजपा कार्यकर्ते किती होते ? हा संशोधनाचा विषय आहे त्यामुळे जुने भाजपा कार्यकर्ते आणि नवे भाजपा कार्यकर्ते यांच्यातील दरी रुंदावतच गेली. तालुका खरेदी विक्री संघासह आजरा साखर कारखाना निवडणुकीत याच रागापोटी भाजपा कार्यकर्त्यांनी उलट सुलट भूमिका घेतली. परिणामी भाजपाचे पाठिंबा दिलेले उमेदवार पराभूत झाले.
केंद्रात व राज्यात भाजपाचा सत्तेत सहभाग असतानाही वरिष्ठ नेत्यांनी या अंतर्गत कलहाकडे फारसे लक्ष दिले नाही. परिणामी अंतर्गत कुरबुरी चालूच राहिल्या जिल्ह्यामध्ये आजरा तालुक्यात भाजपाचे कट्टर कार्यकर्ते असूनही गेली वीस वर्षे भाजपाच्या अधिकृत कमळ या चिन्हावर कोणतीही निवडणूक लढवली गेली नाही याचे शल्यही अनेक भाजपा कार्यकर्त्यांना आहे व ते शल्य वारंवार बोलून दाखवले जाते.
समोर विधानसभा निवडणुका असताना आजारा तालुक्यातील तीनही जिल्हा परिषद मतदार संघाची संबंधित महायुतीचे उमेदवार हे भाजपेतर असल्याने या निवडणुकीत भाजपा कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे
आजही समरजीतसिंह घाटगे यांच्या भूमिकेबद्दल भाजपाचे काही कार्यकर्ते समर्थन करताना दिसतात तर चंदगड विधानसभा मतदारसंघातून शिवाजी पाटील हेच भाजपाचे उमेदवार असे चित्र तयार झाले आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेश पाटील असले तरीही भाजपा कार्यकर्ते शिवाजीरावांपासून बाजूला होतील असे दिसत नाही. आमदार प्रकाश आबिटकर यांनी भुदरगड- राधानगरीसह आजरा तालुक्यामध्ये मात्र भाजपाच्या नेत्यांऐवजी कार्यकर्त्यांशी थेट संपर्क ठेवला आहे याचा फायदा निश्चितच आबिटकर यांना होणार हे देखील स्पष्ट आहे.
राहुल देसाई यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असणारे सध्याचे भाजपा तालुका अध्यक्ष अनिरुद्ध केसरकर यांची ओळख आहे राहुल देसाई यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या भूमिकेशी बांधील राहून केसरकर यांचे पुढचे निर्णय राहतील अशी शक्यता दिसत आहे. त्यामुळे तालुका भाजपामध्ये येत्या पंधरवडाभरात पदाधिकारी बदलाचे संकेतही मिळत आहेत. एकंदर नाथाजी पाटील यांच्या भूमिकेमुळे .निवडीमुळे भाजपा कार्यकर्ते भाजपाचे जुने कार्यकर्ते सुखावले आहेत असे म्हणण्यास हरकत नाही.

संघर्ष ग्रुपने फोडली
आज-यातील दहीहंडी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संघर्ष ग्रुप गडहिंग्लज या संघाने ग्रुपच्या वतीने बांधण्यात आलेली दहीहंडी फोडली. या संघाने पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांचे बक्षिस पटकावले. या संघाने सहा थरांचे रचलेले मानवी मनोरे उपस्थितांच्या ह्रदयाचा ठाव घेणारे होते. दहीहंडीचा थरार पहाण्यासाठी तालुक्यातून नागरीक, गोविंदा दाखल झाले होते. मान्यवरांच्या उपस्थित बक्षिस वितरण झाले.
दरवर्षी स्वराज्य तालीम मंडळाच्यावतीने दहीहंडीचे आयोजन केले जाते. यंदा देखील मोठ्या उत्साहात आयोजन केले होते. स्वराज तालीमचे संस्थापक अध्यक्ष अनिरुध्द केसरकर यांनी स्वागत केले.
बोल बजरंग बली की जय… यासह विविध मराठी हिंदी गीतांनी वातावरणात उत्साह संचारला होता. संघर्ष व राजर्षी शाहू व्यायमशाळा होनेवाडी या संघांनी सलामी दिली. संघर्ष गडहिंग्लज संघाच्या गोविंदानी सहा थर रचत हंडी फोडली. राजर्षी शाहू व्यायामशाळा होनेवाडी (ता. आजरा) यांनी आजरा तालुका मर्यादीत पाच थराची सलामी दिली. याबाबत त्यांना पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयांचे बक्षिस देण्यात आले. या वेळी बाल गिर्यारोहक अन्वी घाटगे हीचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला. माथाडी कामगार संघ (भाजपचे) अध्यक्ष शिवाजी पाटील, गोकुळचे माजी संचालक धैर्यशिल देसाई, बाळ केसरकर, रील स्टार फेम खटावकर ,भाजपा युवा मोर्चा जिल्हा अधक्ष्य धीरज करळकर, डॉ.दीपक सातोस्कर, विजय पाटील, जनार्दन टोपले, दशरथ अमृते, गारगोटी सरपंच प्रकाश वास्कार प्रमुख उपस्थित होते.


आनंदराव नादवडेकर पतसंस्थेची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आनंदराव नादवडेकर प्राथमिक शिक्षक पतसंस्था आजरा ची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली.
सदर सभेची सुरुवात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. आनंदराव नादवडेकर गुरुजी यांच्या प्रतिमापूजनाने व दीपप्रज्वलनाने सदर सभेची सुरुवात झाली. स्वागत सदाशिव दिवेकर यांनी केले.
यावेळी सेवानिवृत्त झालेल्या सभासदांचा व विविध शासकीय परीक्षेत यश संपादन केलेल्या सभासदांच्या पाल्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करणेत आला . माजी शिक्षणाधिकारी आनंद जोशीलकर जेष्ठ शिक्षणविस्तार अधिकारी सुनीत चंद्रमणी,शिवाजी पंडित , शिक्षक समितीचे पुणे विभागीय संपर्क प्रमुख सुनिल शिंदे ,शिक्षक बँक संचालक शिवाजी बोलके, शिवाजी नांदवडेकर , बळवंत शिंत्रे , सुभाष विभूते , शिक्षक समिती अध्यक्ष एकनाथ आजगेकर , सरचिटणीस सुभाष नाईक, यांच्यासह संचालकांच्या हस्ते करण्यात आला.

प्रास्ताविक संस्थेचे विद्यमान चेअरमन श्री. तुकाराम तरडेकर यांनी केले. अहवालवाचन संस्थेचे सचिव तुकाराम प्रभू व जेष्ठ संचालक आनंद भादवणकर यांनी केले.
संजय भोसले , राजाराम नेवरेकर, सुधाकर आजगेकर, विनायक आमनगी, बजरंग पुंडपळ या सर्वांनी विविध विषयाच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित केले. त्यावरती सर्व सभासदांमध्ये चर्चा घडवून आणली आणि सभेला योग्य दिशेने घेत जात सर्व सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्यामध्ये संचालक मंडळाला सहकार्य केले.
आभार व्हा.चेअरमन अनिल गोवेकर यांनी मानले.
संचालक एकनाथ गिलबिले ,आनंदा पेंडसे,सुभाष आजगेकर, मनोहर कांबळे ,धनाजी चौगुले ,श्रीमती शुभांगी पेडणेकर,सौ. भारती चव्हाण , सौ. सुरेखा नाईक , सर्व मार्गदर्शक मंडळ व सन्माननीय सभासद उपस्थित होते.

फोटो क्लिक

पंडित दिनदयाळ विद्यालयात गोकुळ अष्टमीनिमित्त ‘राधाकृष्ण वेशभूषा’ स्पर्धेचे आयोजन करण्याआले होते. यावेळी सहभागी विद्यार्थी….



