


योग्य वेळी योग्य निर्णय घेणार…अशोकण्णा चराटी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
विधानसभा निवडणुकीला अजून बराच अवधी असल्यामुळे व बऱ्याच राजकीय घडामोडी होत असल्यामुळे याबाबत घाईघाईने निर्णय घेणे योग्य होणार नाही पण योग्य वेळी पक्षाचे आदेश व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे प्रतिपादन अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांनी केले. उत्तूर येथे चराटी गटाचा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशोक अण्णा चराटी गट आजरा तालुक्यामध्ये सक्रिय झाला असून या गटाचा उत्तुर जिल्हा परिषद मतदार संघाचा कार्यकर्त्यांचा मेळावा आजरा अर्बन बँकेच्या सभागृहात संपन्न झाला. याप्रसंगी उत्तूर परिसरातील कार्यकर्ते उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंदार हळवणकर यांनी केले तर कार्यक्रमाची रूपरेषा व प्रयोजन भाजपा तालुका सरचिटणीस श्री अतिशकुमार देसाई यांनी सांगितले. त्यानंतर सूर्यकांत पाटील सरपंच आरदाळ,कृष्णा येसणे, शैलेश मुळीक, विठ्ठल उत्तूरकर , प्रवीण लोकरे बहिरेवाडीचे सुहास चौगुले यांनी विचार मांडले.
अध्यक्षीय भाषणात अशोक चराटी म्हणाले ,प्रथम आपला गट मजबूत करण्याबाबत सर्वांनी एकसंघ प्रयत्न करण्याची गरज आहे.

आजरा तालुका तीन मतदारसंघात विभागला गेला असल्यामुळे अशाच प्रकारचे दोन मेळावे अन्य जिल्हा परिषद मतदार संघात घेतले असल्याचे सांगितले.
येणाऱ्या विधानसभेकरीता कोणती भूमिका घ्यावयाची याबाबत कार्यकर्त्यांकडून चौकशी केली जात आहे. अजून बराच अवधी असल्यामुळे व बऱ्याच राजकीय घडामोडी होत असल्यामुळे याबाबत घाईघाईने निर्णय घेणे योग्य होणार नाही. योग्य वेळी पक्षाचे आदेश व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास तालुका भाजपा अध्यक्ष अनिरुद्ध केसरकर, विलास नाईक, सरपंच संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजू पोतनीस, भाजपा तालुका उपाध्यक्ष भास्कर भाईंगडे, विलास नाईक,दशरथ अमृते, विजयकुमार पाटील, संदीप पाटील उपस्थित होते.

नगरपंचायत क्षेत्रातील विविध प्रश्नावर अन्याय निवारण समितीची बैठक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा नगरपंचायतीमध्ये अन्याय निवारण समितीची मुख्याधिकारी सूरज सुर्वे यांच्याबरोबर बैठक झाली.
बैठकीमध्ये नगरपंचायत क्षेत्रातील विविध प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
आजरा पाणी फिल्टर हाऊस परिसरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बांधलेल्या स्वातंत्र्य सैनिक स्मारकाची होत असलेली दुर्दशा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली व त्याची ताबडतोब स्वच्छता करून कायमस्वरूपी तो परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नियोजन लावण्याची विनंती केली.
पावसाळ्यात पडलेल्या घरांच्या भिंतीचा पंचनामे करून संबंधितांना ताबडतोब नुकसान भरपाई देण्याचीही विनंती केली. त्यावेळी मुख्याधिकारी सुर्वे यांनी स्पष्ट केले की सर्व फाइल्स त्याचवेळी क्लिअर करून संबंधित अधिकाऱ्याकडे पाठवलेल्या आहेत. तसेच कांही दिवसावर आलेल्या गणेशोत्सवा निमित्त गांधीनगर व संपूर्ण आजरा शहरातील खड्डे मुरूम टाकून ताबडतोब भरून घ्यावेत अशी मागणी केली.
लिंगायत गल्लीतील बऱ्याच वेळेपासून प्रलंबित असलेला गटरीचा प्रश्न सुर्वे यांनी संबंधित कॉन्ट्रॅक्टरशी संपर्क साधून ताबडतोब काम चालू करण्यासाठी सूचना केल्या. बेशिस्त कामगारांना काढून टाकून त्या ठिकाणी नवीन कामगार नेमण्यात यावेत अशी सुचना केली.
या बैठकीला अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, गौरव देशपांडे, पांडुरंग सावरतकर, वाय.बी. चव्हाण, दिनकर जाधव, जोतिबा आजगेकर, सी. डी. सरदेसाई, जावेद पठाण, अभिजीत संकपाळ, संतोष बांदिवडेकर व सदस्य उपस्थित होते.


जनता सहकारी बँकेचा आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून गौरव

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मराठा समाजातील तरुण उद्योजकांना कर्जाच्या व्याजाचा परतावा देवून बिनव्याजी कर्ज देवून मराठा समाजातील तरुणांना उद्योग व्यवसाय करणेसाठी हातभार लावलेला आहे. जनता बँक आजराने कोल्हापूर जिल्हयामध्ये मराठा समाज उद्योजकांना जिल्हयातील अर्बन बँकापैकी दोन नंबरचा फायनांन्स करुन म्हणजेच ८५० कर्जदारांना रु. ९४ कोटी इतके कर्ज देवून त्यांच्या उद्योगाला उभारणी देणेचे काम केले आहे.
कोल्हापूर जिल्हयात अतिशय चांगल्या पद्धतीने ही योजना राबवुन बँकेने उत्कृष्ट पद्धतीचे काम केलेने कै. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष खासदार नरेंद्र पाटील, राज्य सभेचे खासदार धनंजय महाडिक, कोल्हापूर जिल्हयाचे उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, कोल्हापूर जिल्हयाचे डी डी आर श्री करे व कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या कोल्हापूर विभागाचे अधिकारी सौ.संगीता खिंडारे यांचे मार्फत आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या जिल्हास्तरीय मेळाव्यामध्ये बँकेला गौरवण्यात आले.
यावेळी बँकेचे चेअरमन मुकुंददादा देसाई, सीईओ एम. बी. पाटील, संचालक रणजित देसाई, शिवाजी पाटील, जयवंत कोडक व एकनाथ शेटके उपस्थित होते.

वाळूचा अनधिकृत उपसा…
रस्त्याचा सत्यानाश

आजरा ; मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
परोली त्या.आजरा बंधाऱ्याजवळ अवैध वाळू उपसा चालू आहे. वाळू उपसा करणाऱ्या वाहनांमुळे रस्त्याची दुर्दशा होतं आहे. पूर येऊन गेल्या नंतर प्रत्येकवेळी वाळू उपसा होतो तरी यावर प्रशासनाने पायबंद घालावा अशी परोली ग्रामस्थांकडून मागणी होतं आहे.

निधन वार्ता
साक्षी भोईटे

सरंबळवाडी विकास सेवा सोसायटीच्या माजी संचालिका सौ.साक्षी संदीप भोईटे (वय ३८ वर्षे) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात सासू, पती, दोन मुली असा परिवार आहे.

भोवताल…
गडहिंग्लज साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. शहापूरकर यांचा राजीनामा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आप्पासाहेब नलवडे तालुका सहकारी गडहिंग्लज साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ.प्रकाश शहापूरकर यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने गडहिंग्लजसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
ऐन गळीत हंगामाच्या तोंडावर गड. साखर मधील राजकारण उफाळून आले आहे.
अंतर्गत राजकारण व आरोप- प्रत्यारोपांमुळे डॉक्टर शहापूरकर यांनी राजीनामा दिल्याचे सर्वश्रुत आहे.
महत्वाचे…
‘लाडकी बहीण’च्या नोंदणीला मुदतवाढ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संपूर्ण राज्यभरामध्ये लोकप्रिय ठरलेल्या व महिला वर्गाकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असलेल्या राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांना ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येईल. महिला आणि बालविकास विभागाने सोमवारी याबाबत आदेश जारी केला.



