mrityunjaymahanews
अन्य

झेप ॲकॅडमीचे मंगळवारी आजरा शाखा उद्घाटन

शनिवार  दि. २१  डिसेंबर २०२४              

‘झेप’ ॲकॅडमीच्या आजरा शाखेचे मंगळवारी उद्घाटन

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      गडहिग्लज येथील ‘ ज्ञानदीप प्रबोधिनी ‘ च्या वतीने चालवण्यात येणाऱ्या ‘ झेप ॲकॅडमी ‘ या अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या आजरा शाखेचे उद्घाटन मंगळवार दिनांक २४ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी दिली.

     कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण टोकाला असणारे गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड हे डोंगराळ व दुर्गम तालुके विकासाच्या बाबतीत नेहमीच वंचित राहीले आहेत. या भागातील जनतेला विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आधार देण्यासाठी तसेच त्यांचे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रबोधन करण्याच्या उद्देशाने ०३ नोव्हेंबर, २०१७ रोजी समविचारी मंडळींनी एकत्र येवुन ज्ञानदीप प्रबोधिनी या संस्थेची स्थापना केली. या ट्रस्टमार्फत गडहिग्लज येथे झेप ॲकॅडमी ही अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु केले आहे. या ॲकॅडमीची आजरा शहरात मंगळवार दि. २४ डिसेंबर २०२४ रोजी विदेश मंत्रालयाचे माजी राजदुत व सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे, यांच्या शुभहस्ते शाखा सुरु होत आहे. याप्रसंगी जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. अशोक चराटी, आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी, आजरा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री एम.एल. चौगुले यांनी दिली.

      ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडेही गुणवत्ता आहे. केवळ योग्य मार्गदर्शन आणि शैक्षणिक सुविधांचा अभाव असल्यामुळे ग्रामीण विद्यार्थी प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी आम्ही ज्ञानदीप प्रबोधिनी संचलित झेप अकॅडमी सुरु केली. कोल्हापूर, पुणे सारख्या मोठ्या शहरातील संस्थांमध्ये ज्या सुविधा दिल्या जातात. त्या धर्तीवर किंबहुना त्याहून अधिक चांगल्या सुविधा आम्ही उपलब्ध करुन दिल्या आहेत. समाजातील गरीब होतकरु विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. दैनंदीन अध्यापनासह वेळोवेळी तज्ञ मार्गदर्शक, यशस्वी प्रशासकीय अधिकारी यांची व्याख्याने आयोजित केली जातात. एकुण १०० विद्यार्थी आमच्या सुसज्ज अभ्यासिकेचा लाभ घेत आहेत.

       गेल्या ७ वर्षात ग्रामीण भागातील ४५ विद्यार्थी प्रशासकीय सेवेत रुजु झाले आहेत.शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक कर्तव्य भावनेने गुणवंतांचा गौरव, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण, स्वच्छता मोहिम, रस्ते बांधकाम कामगारांना दिवाळी फराळ वाटप, रक्तदान शिबीर, थोर महात्म्यांच्या जयंती, पुण्यतिथी कार्यक्रमांचे आयोजन व त्यातून वैचारीक प्रबोधन असे विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. संस्थेचे हे सर्व उपक्रम राबविण्यासाठी समाजातील अनेक दानशुरांकडुन रुपये ६५ लाखाहून अधिक देणगी मिळाली आहे. त्यांच्या सहकार्यातून या संस्थेचे रोपटे विस्तारत आहे. सर्व हितचिंतकांचा विश्वास आणि मार्गदर्शन यामुळेच संस्थेने यशस्वी वाटचाल करुन समाजात वेगळे स्थान निर्माण केले आहे असेही चौगुले यांनी यावेळी स्पष्ट केले.

यमेकोंडमध्ये हत्तीचा धुडगूस
आंबा,फणस, केळींसह ऊस पिकाचे मोठे नुकसान

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा तालुक्यातील यमेकोंड येथे हत्तीने धुमाकूळ घालत विलास होडगे यांच्या आंबा कलमांसह केळी, फणस, ऊस यांचे मोठे नुकसान केले आहे. येथील बैलगाडी पलटी करून आजूबाजूच्या परिसरातील लाकडी ओंडकेही पायाने खेळवत सर्वत्र पसरून टाकले आहेत. ऊस पिकामध्ये वावरण्याने ऊस पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे.

      गुरुवारी रात्रभर धुमाकूळ घातल्यानंतर पहाटेच्या दरम्यान होडगे कुटुंबीयांनी हत्तीला मलीग्रे येथील चाळोबा डोंगराच्या दिशेने हुसकावून लावले. बरेच दिवस हत्ती याच परिसरात वावरत आहे.

पूर्वेला हत्ती… पश्चिमेला वाघ… इतरत्र गवे

      आजरा तालुक्यामध्ये वन्य प्राण्यांची संख्या झपाट्याने वाढत असून तालुक्याच्या पूर्व भागामध्ये हत्तीचा उपद्रव, पश्चिम भागामध्ये दोन वाघांचे असणारे अस्तित्व तर इतरत्र गव्यांचे दिवसाढवळ्या दिसणारे कळप अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे वनविभाग वन्य प्राण्यांवर नेमके नियंत्रण ठेवणार कसे ? हा प्रश्न आता निर्माण होत आहे.

स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्याच्या निर्णयाला महाविकास आघाडी तीव्र विरोध करणार

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      महाराष्ट्र शासनाने महावितरणच्या जुन्या मीटर ऐवजी स्मार्ट आणि प्रीपेड मीटर अदानी उद्योग समूहाला ठेका देऊन बसविण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याला जनतेचा तीव्र विरोध असून आजरा तालुक्यातील कोणत्याही ग्राहकाला हे मीटर न देण्याची मागणी आजरा तालुका महाविकास आघाडी व मित्र पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन आजरा तहसिलदार समीर माने यांना देण्यात आले आहे.

     अदानी उद्योग समूहासोबत स्मार्ट मीटर आणि प्रीपेड मीटर बसवण्यासाठी जो करार केला आहे त्याची मराठी भाषेत प्रत प्रत्येक गावचावडीवर लावून त्यानंतर याबाबत तालुका स्तरावर जनसुनावणी घेऊन जनतेचे मत जाणून घ्यावे असे या निवेदनात म्हटले आहे. साडे सात हॉर्स पॉवरच्या आतील वीज पंपाचे कनेक्शन मिळण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केला आहे त्यांना सोलर सिस्टीमची सक्ती करून विद्युत कनेक्शन नाकारले जात ते तात्काळ थांबवून सर्व मागणीदारांना कनेक्शन तातडीने देण्यात यावे. महारष्ट्र शासनाने अदानी उद्योग समूहासोबत करार करून महावितरणाच्या जुन्या मीटर ऐवजी नवी मीटर बसविण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी अदांनी उद्योग समूहाने नोकरभरतीही केली असल्याचे समजते. प्रायोगिक तत्वावर शासकीय कार्यलयात अशी मीटर बसवली जात आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ आणि महावितरण ही शासनाची अधिकृत कंपनी असतांना अदानी उद्योग समूहासोबत असा करार करून स्मार्ट व प्रीपेड मीटरची सक्ती का? असा आमचा सवाल आहे. राज्य विद्युत मंडळ आणि महावितरण कंपनीने प्रस्थापित केलेली सर्व यंत्रणा, पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर अदानी कंपनीला आंदन देण्याचाच हा प्रकार आहे. त्यामुळे महावितरण आणि राज्य विद्युत मंडळ अदानीच्या घशात घातले जाणार आहे. यात नेमके कोणाचे हित साधले जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेलाच आमचा तीव्र विरोध आहे. याबरोबरच एकीकडे निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राज्य सरकारने सात अश्वशक्ती वीज पंपाना संपूर्ण वीज बिल माफ करण्याची घोषणा केली होती, ही घोषणा फक्त कागदावरच राहणार आहे का ? कारण सात हॉर्स पॉवरच्या वीज पंपाना विद्युत कनेक्शन ऐवजी सोलर सक्ती केली जात आहे. आजरा तालुक्यासारख्या डोंगराळ आणि अति पावसाच्या भागात सोलर सक्ती ही शेतक-यांवर अन्याय करणारी आहे. तरी ही सक्ती मागे घेऊन मागेल त्या शेतकऱ्याला बीज कनेक्शन मिळाले पाहिजे,

      त्यातूनही स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही तो हाणून पाडू याबाबत सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास शासनाला जनतेच्या तीव्र असंतोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.

या निवेदनावर कॉ. संपत देसाई, संजय सावंत, युवराज पोवार, रवींद्र भाटले, कॉ. शांताराम पाटील, डॉ रोहन जाधव, प्रकाश मोरुस्कर, काशिनाथ मोरे, दत्ता कांबळे, भाई संजय सावंत, सुरेश दिवेकर यांच्या सह्या आहेत,

टीम अन्याय निवारण ने लावली आठवडा बाजाराला शिस्त…

            आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      बेशिस्त पद्धतीने आजरा शहरांमध्ये भरणारा आठवडा बाजार व त्यामुळे आठवडा बाजारासाठी येणाऱ्या महिलांसह इतर सर्वांचे होणारे हाल लक्षात घेऊन अन्याय निवारण समितीच्या पुढाकाराने काल शुक्रवारच्या आठवडा बाजाराला शिस्त लावण्यात आली.

      आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती तर्फे दिनांक १६/१२/२०२४ रोजी आठवडा बाजार कसा बसवण्यात यावा या बाबत मुख्याधिकारी सूरज सुर्वे यांच्याशी चर्चा झाली. त्या बाबतची कार्यवाही शुक्रवार पासून करणेची ग्वाही दिली होती. अन्याय निवारण समिती नगरपंचायतीचे कर्मचारी व बाजार ठेकेदारामार्फत योग्य नियोजन करून काल बाजारात व्यापाऱ्यांना व्यवस्थित बसवून बाजारासाठी आलेले तालुकावाशीय, प्रवासी यांना रहदारीसाठी कांहीही अडचण न होता बाजार सुव्यवस्थीत पार पडला.

     यावेळी समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, उपाध्यक्ष गौरव देशपांडे, विजय थोरवत, मदन तानावडे, वाय.बी. चव्हाण, ज्योतिबा आजगेकर, बंडोपंत चव्हाण, दिनकर जाधव, दयानंद भोपळे व संजय यादव हे उपस्थित होते.

दर्गा गल्लीत वाहनांची प्रचंड गर्दी…

      वाहतूक कोंडीचे मुख्य ठिकाण असणाऱ्या दर्गा गल्लीत काल दिवसभर वारंवार वाहतुकीची प्रचंड कोंडी होत होती. यामुळे दुचाकी व चारचाकी घेऊन बाजारहाटीसाठी आलेल्या नागरिकांचे प्रचंड हाल झाले. आता या वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे.

गवसे आरोग्य केंद्रावर वैद्यकीय सोयी- सुविधा देण्याची मागणी

आजरा तालुका उ.बा.ठा. गटाचे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आजरा तालुक्यातील गवसे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची २५ कोटी खर्च करून इमारत बांधण्यात आली आहे. या आरोग्य केंद्राअंतर्गत जवळपास १५ ते १६ गावे आहेत. पण आरोग्य केंद्र उभारून सहा महिने झाले तरीही अधिकारी, कर्मचारी तसेच इतर आरोग्य सेवा मिळत नसल्याने आरोग्य केंद्रावर अधिकाऱ्यांसह इतर सोयी-सुविधा मिळाव्यात अशी मागणी आजरा तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

      या आरोग्य केंद्राअंतर्गत किटवडे, घाटकरवाडी, लिंगवाडी, आंबाडे, सुळेरान, धनगरमोळा, गवसे, देवर्डे, दाभिल, शेळप, वेळवट्टी अशी अनेक ग्रामीण भागातील गावे आहेत. सहा महिने झाले तरी अजूनही या आरोग्य केंद्रावर आरोग्य सेविका, लॅब टेक्नीशिअन, फार्मासिस्ट, एक्स रे ऑपरेटर, डॉक्टर यासारखा पुर्ण वेळ राहणारा कर्मचारी वर्ग नाही. त्याच बरोबर रूग्णांना लागणारे इंजेक्शन व औषधाचा मुबलक साठा नसलेमुळे येथे येणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहेत. तात्काळ वरील मागण्यांचा विचार व्हावा अन्यथा शिवसेनेच्या वतीने आपल्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर तालुकाप्रमुख युवराज पोवार, जिल्हा उपप्रमुख संभाजी पाटील, दिनेश कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

‘आजरा ‘चा एक लाख मेट्रिक टन गाळपाचा टप्पा पूर्ण

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा साखर कारखान्याच्या चालू हंगामातील एक लाख मे. टन गाळपाचा टप्पा नुकताच पूर्ण झाला आहे.

      ३२ दिवसांमध्ये हा टप्पा गाठला आहे.१८ डिसेंबर अखेर एकूण एक लाख ३३० मे.टन उसाचे गाळप झाले असून एक लाख ३५९० क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. १०.८६ इतका सरासरी उतारा आहे.

मंत्री आबिटकर व मंत्री मुश्रीफ यांचे आज जंगी स्वागत…

 

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाल्यानंतर आज प्रथमच नूतन मंत्री प्रकाश आबिटकर व हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत असून त्यांच्या स्वागताची जंगी तयारी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

      आज शनिवारी त्यांचे कोल्हापूर येथे सकाळी आगमन होणार आहे. त्यानंतर कोल्हापूर येथील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन दुपारनंतर ते गारगोटी व कागलच्या दिशेने रवाना होतील.

 

संबंधित पोस्ट

कारखान्याची निवडणूक दणक्यात होणार… आजरा साखर कारखाना वार्षिक सभेत गोंधळ…

mrityunjay mahanews

BREAKING…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!