mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

रवीवार  दि. २२  डिसेंबर २०२४              

विठ्ठल टोपले यांचे निधन

 

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा येथील ज्येष्ठ व्यापारी विठ्ठल गोपाळ टोपले यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ९४ वर्षे होते.

     त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुली, दोन मुले, पत्नी, जावई, सूना, नातवंडे असा परिवार आहे. माजी सरपंच व आजरा साखर कारखान्याचे माजी संचालक जनार्दन टोपले व ज्येष्ठ शिक्षिका सुचिता लाड यांचे ते वडील होत.

     शिवाजीनगर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर रविवार दिनांक २२ रोजी सकाळी सात वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

रवळनाथ पतसंस्थेच्या जिल्हा कार्यक्षेत्रवाढीला मंजुरी : चेअरमन अभिषेक शिंपी

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा येथील श्री. रवळनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्रवाढीला मंजुरी मिळाली आहे. याबाबतच्या आदेशाचे पत्र कोल्हापूर जिल्हा सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी संस्थेला प्रदान केले असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन अभिषेक शिंपी यांनी पत्रकार बैठकीत दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक, मार्गदर्शक व माजी जि.प. उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी होते.

      स्वागत संस्थेचे व्हा. चेअरमन समीर गुंजाटी यांनी केले. प्रास्ताविकात व्यवस्थापक विश्वास हरेर यांनी संस्थेच्या सांपत्तिक स्थितीचा आढावा घेतला. यावेळी बोलताना संस्थेचे चेअरमन शिंपी म्हणाले, संस्थेची विश्वासहर्ता पाहून सभासदांचे ठेवी ठेवण्याचे प्रमाण वाढले आहे. या वाढलेल्या ठेवीतून कर्जपुरवठा करून संस्थेचा व्यवसाय वाढविणेचा आपला मानस आहे. याशिवाय आपल्या तालुक्याच्या आसपासच्या लोकांकडूनही कर्ज मागणी होत आहे. आजरा येथून बाहेरील तालुक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या लोकांकडूनही कर्ज मागणी होत होती. पण आपल्या संस्थेचे कार्यक्षेत्र तालुका असल्याने यावर मर्यादा येत होत्या. तसेच आपल्या संस्थेच्या सभासदांकडूनही कार्यक्षेत्र वाढीची मागणी होत होती.

      या सर्व गोष्टींचा विचार करून सर्वसाधारण सभेत तसा ठराव करून जिल्हा कार्यक्षेत्र वाढीचा प्रस्ताव सहकारी संस्था कोल्हापूर यांचेकडे सादर केला होता. सदरच्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. या कार्यक्षेत्र वाढीमूळे संस्थेचा व्यवसाय वाढविणे आता सोईचे होणार आहे. तसेच बाहेरील तालुक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या आजरावासियांनाही आता सुलभरित्या व्यवहार करता येणार असल्याचे स्पष्ट केले.

      याकामी आजरा तालुका सहाय्यक निबंधक सुजयकुमार येजरे व वरिष्ठ लिपीक प्रमोद फडणीस यांचे विशेष सहकार्य मिळाले .यावेळी संचालक मजीद मुराद, युसूफ गवसेकर, विक्रम पटेकर, इब्राहीम इंचनाळकर, विलास कुंभार, विश्वास जाधव, सुधीर नार्वेकर, सौ अर्चना मराठे, सौ. माधुरी पाचवडेकर यांच्यासह ज्येष्ठ सभासद के. जी. पटेकर, सदानंद नार्वेकर, बाबासो नाईक, अशोक पोवार आदी उपस्थित होते आभार किरण कांबळे यांनी मानले.

मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना सेवेत कायम करा
प्रशिक्षणार्थींचे तहसीलदारांना निवेदन

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना अंतर्गत निवड झालेल्या प्रशिक्षणार्थिना प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याच ठिकाणी शैक्षणिक पात्रतेनुसार पदावर कायमस्वरूपी रुजू करून घेणेबाबत मुख्यमंत्री यांना आवाहन करणारे निवेदन आजरा तहसीलदार यांना देण्यात आले.

      मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्र राज्य पातळीवर सुरु केलेल्या मा. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झालेली आहे व निवड झालेल्या आस्थापनेवर योजनेच्या प्रशिक्षण कालावधीकरिता सर्व प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. या कालावधीत शासकीय कामकाजाच्या विविध बाबींचे सखोल मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून शासनाची कार्यप्रणाली जवळून समजून घेण्याची संधी मिळाली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत दिलेले प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर शैक्षणिक पात्रतेनुसार कायम स्वरूपी शासकीय सेवेत रुजू करून घ्यावे त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात आम्ही राज्याच्या प्रगतीत योगदान देऊ असे आश्वासनही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

      आदित्य मारुती गुरव (महागोंड ), गायत्री सागर देसाई (भादवण ), शैलेश हरी कांबळे (पेरणोली ), पूजा इंद्रजित पाटील (गवसे ), स्नेहल संजय भोसले (कानोली ), श्रेयश मारुती गुरव (दाभील ), संदीप भैरू कुंभार (शिरसंगी), अदिती राजेंद्र पाटील (इटे )आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.

नाताळपूर्व पर्वाला आज-यात सुरुवात

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      दरवर्षी आजरा तालुक्यात ख्रिश्चन बांधव नाताळ उत्साहात साजरा करतात. यंदाही मोठ्या उत्साहात नाताळ साजरा केला जाणार आहे. येथील रोजरी चर्चमध्ये नाताळपूर्व पर्वाला सुरवात झाली आहे.

     यानिमित्ताने आजरा तालुक्यातील गवसे, दाभिल, शेळप, धनगरमोळा, वाटंगी, मोरेवाडी, शाहू वसाहत, खानापुर, पेरणोली व साळगाव येथे घरोघरी जावून कॅरल सिंगींग (धार्मिक गाणी) सादर केली जात आहेत. या बरोबर अन्य धार्मिक कार्यक्रम होत आहेत. फादर पॅरिस प्रिस्ट, फादर मेल्विन पायस, फादर विल्सन गोन्सालवीस, फादर अँथनी डिसोझा, सिस्टर रोजाना, सिस्टर मरिअम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

        नाताळच्या सप्ताहानिमित्ताने फनी गेम्स, रेकार्ड डान्स स्पर्धा, स्टार व कार्ड स्पर्धा यांच्यासारख्या विविध स्पर्धाचे आयोजन केले आहे. नाताळच्या मुख्य भागाची प्रार्थना मंगळवार (ता. २४) रात्री ११ वाजता होणार आहे. यामध्ये आजरा पॅरीश मधील सदस्य, गायनवृंद, खिश्चन बांधवाचा समावेश असेल.

मंत्री मुश्रीफ व मंत्री आबिटकर यांचे जंगी स्वागत

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ व आरोग्य मंत्री आमदार प्रकाश आबिटकर यांचे जिल्ह्यात जंगी स्वागत करण्यात आले. राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर प्रथमच जिल्ह्यात येणाऱ्या या दोन्ही मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर येथील कावळा नाक्यावर प्रचंड गर्दी केली होती.

      दोघांचे आगमन होताच प्रचंड आतशबाजीह जल्लोष करण्यात आला. उघड्या गाडीतून त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टीही करण्यात आली. यावेळी जिल्हाभरातील महाविकास आघाडीचे नेतेही उपस्थित होते.

आजऱ्यात महिलांकरीता विमा सखी योजनेचा शुभारंभ

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखा गडहिंग्लज यांच्या वतीने योजनेअंतर्गत समृद्धी विमा विक्री व सेवा केंद्र,आजरा  येथे महिला करिअर एजन्सी चे शाखा व्यवस्थापक किरण अवचिते यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

      यावेळी बोलताना अवचिते म्हणाले, महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारकडून ज्या विविध योजना राबवल्या जात आहेत त्यामध्ये  महिला करियर एजन्सी हा भारतीय आयुर्विमा महामंडळाचा उपक्रमही आहे या उपक्रमांतर्गत प्रशिक्षणार्थी महिलांना प्रथम वर्षाकरिता सात हजार रुपये प्रति महिना द्वितीय वर्षाकरिता सहा हजार रुपये प्रतिमा नाहीत तर तृतीय वर्षाकरिता पाच हजार रुपये प्रति महिना देण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त त्यांना त्यांच्या कामाच्या क्षमतेनुसार मानधन कमिशन व इतर कंपनीचे सर्व लाभ मिळणार असल्याचेही सांगितले.

      यावेळी समृद्धी विमा विक्री व सेवा केंद्राचे प्रमुख रमेश पाटील, पत्रकार ज्योतिप्रसाद सावंत प्रा. जनार्दन दळवी सुधीर कुंभार अशोक महाजन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

 

संबंधित पोस्ट

नारायण उर्फ बाबूराव देसाई यांचे निधन स्व. अमृतकाका देसाई कुटुंबीयांवर सहा महिन्यात चौथा आघात

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

पोळगाव येथील महाविद्यालयीन तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी महागाव येथील तरुणाविरोधात गुन्हा नोंद ….

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा कारखान्याची धाव सव्वा तीन लाख मे. टनापर्यंतच

mrityunjay mahanews
error: Content is protected !!