
सोमवार दि. २३ डिसेंबर २०२४



विकास कामांचा धुरळा…?
खोद काम, धुरळा आणि पाण्याचा शिमगा…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरामध्ये रेंगाळलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनचे पाईप घालण्याचे काम अद्याप सुरूच असून यामुळे शहरभर खुदाई करण्यात आली आहे. भरीस भर म्हणून गटर्सचे काम सुरू आहे. याचाच परिणाम म्हणून शहरभर सर्वत्र धुळीचे साम्राज्य दिसत असून घसा दुखी, खोकला यासह विविध आजाराच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. नळ पाणीपुरवठ्याबाबत तर ‘ आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास ‘ अशी अवस्था झालेली दिसत आहे.
मुळातच आजरा नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामात प्रचंड दिरंगाई सुरू आहे. नळ पाणीपुरवठा योजना मार्गी लागल्याशिवाय शहरातील रस्त्यांची व गटर्सची कामे मार्गी लागणे अडचणीची आहे.
गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या भागात पाईपलाईन टाकण्याच्या नावाखाली खुदाई सुरूच आहे यामुळे अलीकडेच केलेले रस्तेही धुळीने माखून गेले आहेत. केलेल्या खुदाईमुळे ठिकठिकाणी जुन्या पाणीपुरवठा योजनेला गळत्या लागल्या आहेत. या गळत्या काढण्यासाठी नगरपंचायतीचे प्रचंड मनुष्यबळ दररोज वापरावे लागत आहे.
शहरभर सर्वत्र धुळ आणि धूळच झाली असून घरादारात धूळ आणि घरात पाण्याचा पत्ता नाही अशा विचित्र परिस्थितीतून सध्या शहरवासीय जात असून या परिस्थितीत सुधारणा होणार तरी कधी ? असं संतप्त सवाल शहरवासीय उपस्थित करत आहेत.
दवाखाने हाऊसफुल्ल…
थंडीचा वाढलेला कडाका शहरभर धुळीचे साम्राज्य यामुळे सर्दी, खोकला, घशातील खवखव या रुग्णांमध्ये विक्रमी वाढ झाली असून आजरा ग्रामीण रुग्णालयासह खाजगी रुग्णालये हाऊसफुल्ल झालेली दिसत आहेत.

जगण्याची नवी दृष्टी आणि उमेद देण्याचे काम साहित्य करते : डॉ.तृप्ती करेकट्टी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
साहित्याला भाषेची वा प्रांताची कुठलीच सीमा नसते. सर्व सीमा पार करण्याचं, जगण्याची नवी दृष्टी आणि उमेद साहित्य देतं. माणसां-माणसांमध्ये सेतु म्हणून कार्य करते. त्यातील विश्वकल्याणाची भावना नवसमाजाची बांधणीसाठी उपयुक्त आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी विभागाच्या प्रभारी प्रमुख प्रो. (डॉ.) तृप्ती करेकट्टी यांनी केले. त्या आजरा महाविद्यालयामध्ये केंद्रीय हिंदी निदेशालय, नवी दिल्लीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाचदिवसीय हिंदीतर भाषी हिंदी नवलेखक शिबिराच्या समारोप समारंभामध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जनता एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल देशपांडे होते.
या शिबिराचे समन्वयक आजरा महाविद्यालयातील हिंदी विभागाचे प्रमुख प्रो. (डॉ.) अशोक बाचुळकर यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले.
नवी दिल्ली येथील केंद्रीय हिंदी निदेशालयाचे सहायक निदेशक रत्नेश मिश्र आपल्या मनोगतात म्हणाले की या पाच दिवसीय शिबिराने एक नवीन मानदंड घालून दिलेला आहे. सर्व भारतीयांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने, बंधुभाव जोपासला जावा, अशाप्रकारचे प्रयत्न केंद्रीय हिंदी निदेशालयाचे नेहमीच असतात.
महात्मा गांधी केंद्रीय विद्यापीठ, चंपारण (बिहार) येथील हिंदीचे प्रो. (डॉ.) शामनंदन म्हणाले की इथल्या निसर्गाप्रमाणेच इथली माणसे सुद्धा साधी-भोळी आणि सरळ आहेत. या शिबिराच्या यशस्वी आयोजनामध्ये केवळ हिंदी विभागच नव्हे तर संस्थेपासून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी पर्यंत सर्वांची एकजूट पाहायला मिळाली, जी इतरत्र दुर्मिळ आहे.
केरळची अपर्णा एस एस आपल्या मनोगतात म्हणाली की गुरुकुल शिक्षण पद्धतीची आठवण करून देणारं हे शिबिर होतं. तर मेघा तोडकर हिने सांगितलं की लेखणीलाच नव्हे तर जीवनाला नवीन दिशा देणारं हे शिबिर आहे. गोव्याच्या आकांक्षा रायकरने सांगितलं की इथल्या व्यवस्थेमुळे सोईमुळे आम्हाला घरची सुद्धा आठवण आली नाही. इकडे उत्कृष्ट व्यवस्थेबद्दल महाविद्यालय आणि संयोजकांचे आभार व्यक्त केले त्याचबरोबर सौ. वैशाली रगडे (इचलकरंजी) यांनी स्वतःला ओळखण्याची संधी या शिबिराने दिली असं सांगितलं. तबस्सूम पठाण, संस्कृती राऊत यानी संधी सोयी दिल्याबद्दल महाविद्यालयाचे आभार मानले. नवोदित लेखकाने आपल्या लेखणीतून समाजाला नेहमी नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन अध्यक्षीय मनोगतात डॉ. अनिल देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी पाटील यांनी केले.
एज्युकेशन सोसायटीचे संचालक कृष्णा येसणे, माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी – पाटील, युवा नेते अनिकेत चराटी, कार्यालय अधीक्षक योगेश पाटील, यासह केरळ, गोवा, महाराष्ट्र, बिहार या राज्यातून आलेले नवलेखक विद्यार्थी उपस्थित होते. आभार प्रो. अशोक सादळे यांनी मानले.

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरातर्फे व्याख्यानमाला सुरू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करीत असलेल्या श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरातर्फे दिनांक २२ ते दिनांक २४ डिसेंबर २०२४ पर्यंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.काल रविवारी डिसेंबर रोजी सुप्रसिध्द आयुर्वेद तज्ञ डॉ. सी. वी देसाई यादगुड (कर्नाटक) यांच्या आयुर्वेद जीवनाची विविध अंगे या व्याख्यानाने व्याख्यानमालेची सुरुवात झाली आहे.
आज सोमवार दिनांक २३ डिसेंबर रोजी प्रसिध्द मानसतज्ञ श्री कपिल लळीत सांगली यांचे ‘आमच्या वेळी असं व्हवतं अर्थात जनरेशन गॅप’ या विषयावर व्याख्यान तर मंगळवार दिनांक २४ डिसेंबर रोजी इतिहास अभ्यासक श्री राम यादव कोल्हापूर यांचे ‘छत्रपती शिवरायांची युध्दनिती’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. बुधवार दिनांक २५ डिसेंबर रोजी ग्रंथालयातर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार व अन्य पुरस्कारांचे वितरण होणार आहे. या कार्यक्रमासाठी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक कृष्णात खोत पन्हाळा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत राहणार आहेत. सर्व कार्यक्रम ‘मृत्युंजय ‘कार शिवाजीराव सावंत स्मृतीदालन, जूनी पोष्ट गल्ली आजरा येथे दररोज सायंकाळी ५.३० वाजता होणार आहेत या व्याख्यानमालेचा व पुरस्कार वितरण सोहळयाचा रसिक श्रोत्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन वाचन मंदिराचे अध्यक्ष वामन सामंत, उपाध्यक्षा विद्या हरेर, कार्यवाह कुंडलिक नावलकर व सहकार्यवाह रवींद्र हुक्केरी यांनी केले आहे.


मधुरा दळवी ची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
लक्ष्मी स्पोर्ट्स क्लब, आजरा ची खेळाडू व आजरा महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी मधुरा प्रकाश दळवी (रा.सिरसंगी) हिची राज्यस्तरीय कुमारी गट कबड्डी स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघात निवड झाली. सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक पी. आर. तेरसे यांचे तिला मार्गदर्शन लाभले.

महसूल व नगरपंचायत प्रशासनाकडून नामदार आबिटकर यांना शुभेच्छा…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुका महसूल विभाग व आजरा नगरपंचायत प्रशासनाकडून राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांची महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी तहसीलदार समीर माने, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज सुर्वे व त्यांचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता.






