mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

रविवार  दि. ८ मार्च २०२६

सिरसंगीत हत्तीचा धुमाकूळ
दोन चारचाकींची मोडतोड


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

सिरसंगी ता.आजरा येथे हत्तीने धुमाकूळ घातला असून शुक्रवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास बोलेरो पीक अप व आल्टो गाडीची मोडतोड करून संपूर्ण गाडीचे नुकसान केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून भीतीचे वातावरण पसरले आहे. शिरसंगी येथील परशराम दत्तू माटले यांची पोल्ट्री पक्षी ने आण करणारी बोलेरो पीकअप ही गाडी गोटणदेव परिसरात उभी होती, सदर गाडी १० फुट फरफटत नेत गाडीच्या बोनेटवर पाय देऊन पूर्ण चक्काचूर केली आहे. त्यानंतर हत्तीने शेवंता निंगू सावंत यांच्या दारात उभी केलेली पुंडलीक मलगोंडकर यांची आल्टो गाडी दहा फूट फरफटत नेत मोडतोड केली यामध्ये दोन्ही गाडींचे अंदाजे तीन लाखांचे नुकसान झाले आहे . त्यानंतर हत्तीने दिलीप पाटील यांच्या दारातील स्प्लेंडर दुचाकी धक्का देऊन पाडली.

गुरुवारी रात्री कृष्ण टकेकर यांच्या घोलाकडील शेतातील पत्र्याचे शेड पूर्णपणे मोडतोड केली तर आनंदा टकेकर व शांताराम पाटील यांच्या ऊस लागण केलेल्या शिवारात धुमाकूळ घातला आहे, सि आर देसाई, मनोहर देसाई यांच्या काजू आंबा झाडांची मोडतोड तर पांडुरंग कानडे यांच्या केळीच्या बागेची नासधूस यामुळे हत्तीकडून दररोज लाखों रुपयांचे नुकसान सुरू आहे , वन्य प्राण्याकडून शेतीचे दररोजचे नुकसान व वनविभागाकडून मिळणारी तुटपुंजी नुकसानभरपाई यामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे.

खोतवाडी, वझरे परिसरात पट्टेरी वाघाचे दर्शन…?
वनविभाग अलर्ट मोडवर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

काल शनिवारी दुपारी वझरे येथील खोतवाडी परिसरामध्येज्ञ स्थानिक ग्रामसेवकासह ग्रामपंचायत शिपायाला पट्टेरी वाघाने दर्शन दिल्याची चर्चा वझरे परिसरात सुरू असून याची खातरजमा वनविभागाकडून केली जात आहे. वनविभाग अलर्ट मोडवर गेला आहे.

काल शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास स्थानिक ग्रामसेवक सुहास देसाई व ग्रामपंचायत शिपाई खोतवाडी परिसरात झऱ्याची साफसफाई करण्याकरता गेले असता तेथे झुडपातून पट्टेरी वाघ बाहेर आल्याचे दिसले. वाघाला पाहताच त्यांनी तिथून धूम ठोकली व ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली.

वन विभागाला याबाबत कळवण्यात आल्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी संबंधित ठिकाणाला भेट देऊन अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला.

या भागामध्ये पट्टेरी वाघाच्या अस्तित्वाची यापूर्वीही चर्चा होती. त्यामुळे वन खात्याकडून याबाबत ठामपणे सांगितले जात नसले तरीही येथे पट्टेरी वाघाचा वावर असल्याचे ग्रामस्थ मात्र सांगत आहेत.

महिला जखमी…

चार दिवसापूर्वी शेताकडे गेलेल्या काही महिलांना वाघाच्या गुरगुरण्याचा आवाज आल्याने त्यांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला यामध्ये एक स्थानिक महिला पळताना पडून जखमी झाली आहे.

कहानी मे ट्विस्ट…?
कारखाना उपाध्यक्ष पदासाठी काशिनाथ तेली देखील इच्छुक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा साखर कारखाना उपाध्यक्षपदाची निवड मंगळवारी होत असून या पदाकरिता ज्येष्ठ संचालक व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अनिल फडके यांचे नाव आघाडीवर असतानाच माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ तेली यांनी आपणही या पदाकरिता इच्छुक आहोत असे सांगत तशी इच्छा स्थानिक नेत्यांसह सत्तारूढ आघाडीचे प्रमुख नेते मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे व्यक्त केली आहे. यामुळे उपाध्यक्ष निवडीमध्ये ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे.

काल शनिवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ हे उत्तूर दौऱ्यावर आले असता तेली यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह त्यांची भेट घेऊन सदर इच्छा व्यक्त केली.

मंत्री मुश्रीफ यांनी सायंकाळी कारखान्याच्या सर्व संचालकांना एकत्र बोलावून या निवडीबाबत अध्यक्ष मुकुंदराव देसाई, जि प सदस्य सुधीर देसाई यांच्यासह संचालक,कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. उद्या सोमवारी याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. गत वेळी उपाध्यक्ष पदाची फडके यांची हुकलेली संधी यावेळीही चकवा देणार की पदरात पडणार ? याचे उत्तर उद्या सोमवारी मिळेल असे दिसते.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियानाचा शुभारंभ


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा मंडल अंतर्गत महसूल विभागाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान’ कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्या सौ. यशोदा पोवार, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सिंघम, तहसीलदार समीर माने, दुय्यम निबंधक शैलजा चव्हाण, गटविकास अधिकारी सुभाष सावंत, उपाधीक्षक भूमिलेख खडकवले या मान्यवरांच्या उपस्थितीत अण्णाभाऊ सांस्कृतिक हॉल येथे करण्यात आला .

या अभियानाच्या माध्यमातून शेतकरी व नागरिकांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्न तातडीने निकाली काढण्यावर भर देण्यात येणार आहे. मार्च ते मे या कालावधीत मंडळ व तलाठी कार्यालय स्तरावर हे अभियान राबवले जाणार असून डिजिटल सेवांच्या माध्यमातून नागरिकांना एका दिवसात आवश्यक कागदपत्रे मिळण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती तहसीलदार समीर माने यांनी दिली.

या अंतर्गत भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये रूपांतरित करून शेतकऱ्यांना सातबारा देणे, जिवंत सातबारा मोहिमेतील अर्जांची छाननी, लक्ष्मी मुक्ती यांसारख्या विविध सामाजिक योजनांचा व दाखल्यांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, प्रलंबित फेरफार प्रकरणे मार्गी लावणे तसेच डिजिटल ७/१२, ८-अ आणि उत्पन्न, रहिवासी, जात, नॉन-क्रीमीलेअर यांसारखी प्रमाणपत्रे तातडीने उपलब्ध करून देण्याचे काम करण्यात येणार आहे.

तसेच संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, आधार अपडेट, मुलांना जन्म प्रमाणपत्र, गरोदर मातांना किट, दिव्यांगांना प्रमाणपत्र यांसारख्या सेवा नागरिकांना जवळच्या स्तरावर उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना छोट्या-छोट्या कामांसाठी तालुका कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. ग्रामीण भागातील शेतरस्ते व पानंद रस्ते खुले करण्याबाबत येणाऱ्या तक्रारी तातडीने मार्गी लावून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, यासाठी तहसीलदार व भूमी अभिलेख विभागाने समन्वयाने काम करावे अशा सूचनाही दिल्या.

शासनाचे हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, अशी विनंती यावेळी केली.

यावेळी निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, विकास कोलते, मंडल अधिकारी सुंदर जाधव, तलाठी समीर जाधव,सौ. भारती डेळेकर, रवींद्र तळेवाडीकर, बटकडली तसेच विविध विभागांचे अधिकारी, तलाठी वर्ग, सरपंच, उमेद अभियान व बचत गटांच्या कार्यकर्त्या व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निधन वार्ता

हौसाबाई कोरगावकर

चाफे गल्ली आजरा येथील हौसाबाई कृष्णा कोरगावकर ( वय ८८ वर्षे ) वर्षे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पाच विवाहित मुली, मुलगा, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

उद्या सोमवारी रक्षाविसर्जन आहे.

राजाराम चव्हाण

बहिरेवाडी ता.आजरा येथील राजाराम (बापू) काळू चव्हाण ( वय ८२ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

बहिरेवाडी विकास सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष व माजी सरपंच अनिल चव्हाण यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना, नातवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे.

 

छाया वृत्त…


दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि. कोल्हापूर या बँकेच्या चेअरमन पदी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना राज्याध्यक्ष सौ. वर्षा शरद केनवडे यांची निवड झाले बद्दल व सेवानिवृत्ती बद्दल शिक्षण विस्तार अधिकारी श्री.सुभाष विभूते यांचा सत्कार करणेत आला. यावेळी श्री.सुनील शिंदे , संचालक श्री. शिवाजी बोलके, श्री.बळवंत शिंत्रे, तालुका अध्यक्ष एकनाथ गिलबिले , सुभाष आजगेकर व मान्यवर उपस्थित होते.

क्रिकेट विश्व युद्धाचा आज निकाल….


भारत व न्यूझीलंड मध्ये अंतिम लढत
स्थळ : नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद
सामन्याची वेळ : सायंकाळी सात वाजता


पाककला स्पर्धेत माही टोपले प्रथम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

रवळनाथ कॉलनी येथे होळी उत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त असा भरघोस प्रतिसाद मिळाला.  स्पर्धेत माही मनीष टोपले यांनी प्रथम क्रमांक मिळवला. 

या स्पर्धेत खालील स्पर्धक विजयी झाले आहेत:-
१)माही टोपले
२)सुरेखा बचुटे
३)मनिषा बुधवंत

विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.

 

आजचे पंचांग

♦ दिनांक : ८ मार्च २०२६
♦ वार : रविवार
♦ माह (अमावस्यांत) : फाल्गुन
♦ माह (पूर्णिमांत) : चैत्र
♦ ऋतु : वसंत
♦ आयन : उत्तरायण
♦ पक्ष : कृष्ण पक्ष
♦ तिथी : पंचमी तिथी (रात्री ०९.१० पर्यंत) त्यानंतर षष्ठी तिथी
♦ नक्षत्र : स्वाती नक्षत्र (दुपारी ०१.३१ पर्यंत) त्यानंतर विशाखा नक्षत्र
♦ योग : ध्रुव योग (सकाळी ०७.०३ पर्यंत) त्यानंतर व्याघात योग
♦ करण : कौलव करण (सकाळी ०८.१० पर्यंत) तैतुला करण
♦ चंद्र राशी : तूळ राशी
♦ सूर्य राशी : कुंभ राशी
♦ अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सायंकाळी ०५.१६ ते सायंकाळी ०६.४५ पर्यंत
♦ शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.२६ ते दुपारी ०१.१३
♦ सूर्योदय : सकाळी ०६.५४
♦ सूर्यास्त : सायंकाळी ०६.४५
♦ संवत्सर : विश्वावसु
♦ संवत्सर(उत्तर) : सिद्धार्थी
♦ विक्रम संवत: २०८२ विक्रम संवत
♦ शक संवत: १९४७ शक संवत

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

पवित्र क्षेत्र श्री रामतीर्थ आजरा येथे धबधब्याशेजारी लघुशंका , अश्लील चाळे

mrityunjay mahanews
error: Content is protected !!