शुक्रवार
१० जुलै २०२६


डोंबिवलीतील डॉक्टरवरील हल्ल्याचा मेडिकल असोसिएशन ऑफ आजरा कडून तीव्र निषेध
काळी फीत लावून काम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
डोंबिवलीच्या शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयात महिला डॉक्टर आणि परिचारिकेवर स्थानिक लोकप्रतिनिधींकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचा मेडिकल असोसिएशन ऑफ आजराने तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. ही घटना अत्यंत निंदनीय असून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
निषेध म्हणून काल गुरुवारी सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी काळी फीत लावून काम केले. यावेळी तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि संचालक उपस्थित होते. यामध्ये अध्यक्ष डॉ. कुलदीप देसाई, उपाध्यक्ष डॉ. बळीराम पाटील, सचिव डॉ. इंद्रजित देसाई, खजिनदार डॉ. अनिकेत मगदूम यांच्यासह संचालक डॉ. दीपक सातोस्कर, डॉ. अनिल देशपांडे, डॉ. स्मिता फर्नांडिस, डॉ. संदीप देशपांडे, डॉ. भारत मोहिते, डॉ. दीपक हरमळकर, डॉ. प्रवीण निंबाळकर, डॉ. गौतम नाईक, डॉ. युवराज मोरे, डॉ. स्वप्नील कटकर आणि डॉ. सागर पारपोलकर, डॉ. गौरी भोसले, डॉ. अंजनी देशपांडे, डॉ. रोहन जाधव, डॉ. सुरजित पांडव यांनी उपस्थित राहून आपल्या भावना मांडल्या.
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदा आणि तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी करत, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन आणि OPD-IPD सेवा बंद करण्याचा इशारा संघटने दिला आहे.

पिंजरा लागला…
चांदेवाडीत बिबट्या की तरस..?

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
चांदेवाडी परिसरात पुन्हा एक वेळ बिबट्या सदृश्य प्राण्याने दर्शन दिल्याने या भागात बिबट्यासदृश्य वन्यप्राण्याचा वावर असल्याच्या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या पथकाने या परिसराची पाहाणी केली व ग्रामस्थाशी चर्चा करून माहीती घेतली. आता या प्राण्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे. पायाचे ठसेही मिळवण्यात वन विभागाला यश आले आहे
चांदेवाडी, सुलगाव परिसरात बिबट्यासदृश्य प्राण्याचा वावर असून त्यांनी गुंजकर यांच्या शेतात रखवालीला असलेले कुत्रेही पळवल्याचे ग्रामस्थांनी वनपाल कृष्णा डेळेकर यांना कळवीले. आजरा परिक्षेत्र वनाधिकारी सचिन सावंत यांच्य मार्गदर्शनाखाली वनपाल डेळेकर यांनी वनरक्षक प्रियांका पाटील व त्यांच्यासोबत अक्षय पाटील, सौरभ कोंडूस्कर, प्रवीण कांबळे, रुपेश गवळी, साहिल डेळेकर यांची टीम घटनास्थळी पाठवली. त्यांनी बिबट्या सदृश्य प्राण्याच्या पायाचे ठसे मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्याचबरोबर ग्रामस्थांशी चर्चा करून माहीती घेतली.
बिबट्या किंवा तरस असण्याची शक्यता
सदरचा प्राणी बिबट्या किंवा तरस असण्याची शक्यता आहे. पायाचे ठसे पाहता तो बिबट्या असावा असा प्राथमिक अंदाज आहे.

किटवडे येथे अद्याप निम्माच पाऊस..
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यांतील किटवडे हे गाव पावसाचे माहेरघर. या गावाला प्रतिचेरापूंजी म्हणून आलेळखले जाते. यंदा येथील पावसाची टक्केवारी घसरली आहे. गतवर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत किटवडे येथे २६०६ मिलीमीटर पाऊस झाला होता. यंदा १३३४ मिलीमीटर इतका पाऊस नोंदवला आहे. त्यामुळे यंदा पन्नास टक्के कमी पाऊस झाला आहे.
कोकणातून मान्सून जसा पुढे जाईल तसे पाऊस घेवून येणारे बाष्पयुक्त वारे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर येतात. पर्वत रांगा, उपरांगात अडवले जातात. आणि येथील घाटमाथा पावसाच्या संततधाराने ओलाचिंब होतो. आंबोलीजवळील कावळेसाद या दरीतून निघालेले ढग आजरा तालुक्याच्या पश्चिमेकडील शेवटचे टोक असलेल्या किटवडे गावात येवून धडकतात व येथे मुसळधार पाऊस पडतो. आंबाडे, किटवडे या गावातील घनदाट जंगल आणि अनकूल भौगोलिक परिस्थिती यामुळे या परिसरात सलग चार महीने धो धो पाऊस पडत असतो. दरवर्षी सरासरी सहा ते सात हजार मीलीमिटर पाऊस पडतो, पण यंदा अल निनोच्या प्रभावामुळे मान्सून सरासरीपेक्षा कमीच झाला आहे. किटवडेत क्वचित पावसाच्या सरी कोसळल्या जून बहुतांश कोरडाच गेला. पण गेल्या आठ दिवसात हवामान बदलामुळे पावसाने गिअर बदलला आहे. या परिसरात धुवांधार पाऊस कोसळतो आहे. गत आठवडाभरात चांगला पाऊस झाला आहे. जवळ, एक हजार मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. गतवर्षी ७ जुलै अखेर २६०६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. तर यंदा जुलेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत १३३४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षीपेक्षा सरासरीच्या पन्नास टक्केच पाऊस झाला आहे.

तुफान पाऊस जोरदार वारे.. वर्गातच पेटतात शेकोट्या..
लिंगवाडी येथे शिक्षणाचा आणि संघर्षाचा प्रवास…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यापासून अवघ्या १५ ते २० किलोमीटर अंतरावर असलेला लिंगवाडी हा दुर्गम डोंगराळ परिसर… पण प्रत्यक्षात हा प्रवास फक्त अंतराचा नसून. तो निसर्गाशी रोज दोन हात करणाऱ्या माणसांच्या संघर्षाचा आहे.अतिवृष्टी हा या भागाचा जणू नित्यक्रमच. मुसळधार पाऊस ओसंडून वाहणारे ओढे पाण्याखाली जाणारे रस्ते..आणि दिवसन् दिवस तुटणारा संपर्क.त्यामुळे येथील नागरिक पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आवश्यक जीवनावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवतात कारण पाऊस सुरू झाला की बाहेरील जगाशी संपर्क कधी तुटेल याचा नेम नसतो.
या भागात ना दुकाने.,ना दवाखाने,ना मोबाईल नेटवर्क, ना इतर मूलभूत सुविधा..अनेक ठिकाणी वीजदेखील अनियमित..अत्यल्प लोकवस्ती.. शेतीवरच संपूर्ण उदरनिर्वाह आणि निसर्गावर अवलंबून असलेले जीवन. शेतीकामात देखील शाळेची मुले सराईत आहेत.
तेथील विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील शिकण्याची जिद्द आणि शिक्षकांची निस्वार्थ सेवा कौतुकास्पद आहे.एक शिक्षिका तर आपल्या संपूर्ण कुटुंबासह त्या दुर्गम वस्तीमध्येच राहतात. विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊ नये म्हणून अशा कठीण परिस्थितीतही ते हार मानत नाहीत.
अतिवृष्टीमुळे शिक्षकांना दिवसातून तीन वेळा कपडे बदलावे लागतात… पावसामुळे वर्गात गारठा वाढला की विद्यार्थ्यांना थंडी लागू नये म्हणून वर्गातच शेकोटी पेटवून शिक्षण दिले जाते.
शिकण्यासाठी मुलांची व शिकवण्यासाठी शिक्षकांची असणारी तळमळ निश्चितच कौतुकास्पद आहे.

तालुक्यातील वारकरी आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्या करिता रवाना

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा आळंदी ते पंढरपूर अशा पायी होणाऱ्या दिंडी सोहळ्यामध्ये आजरा तालुका व परिसरातील वारकरी दिंडी सहभागी होते. याकरिता वारकरी बांधव नुकतेच आळंदी कडे रवाना झाले आहेत. आजरेकर दिंडीचे मालक संदीप कोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी होतात.
आळंदी-पंढरपूर पायी पालखी सोहळ्याला अनेक वर्षांची मोठी परंपरा आहे. या परंपरेत आजरा तालुका व परिसरातील वारकरी सहभागी होत असतात. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्यात मुख्य रथाच्या मागे २३ नंबर वर दिंडी आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात वारकरी या दिंडीत असतात. यंदाही आजरा शहरासह साळगाव, पेरणोली, कोरीवडे, देवकांडगाव, वेळवटी, उचंगी, आजरा गांधीनगर, भादवन यासह गडहिंग्लज व चंदगड तालुक्यातील विविध गावातील वारकरी या दिंडीत सहभागी होतात. सलग अठरा दिवस पायी चालत वारकरी दिंडीचा प्रवास आळंदी ते पंढरपूर पूर्ण करतात. पंढरपूरात आषाढी एकादशीचा सोहळा करूनच हे वारकरी गावी परततात. यंदाही या वारीत सहभागी होण्यासाठी आता मागील दिंडी क्रमांक २३ चे वारकरी नुकतेच आजऱ्याहून आळंदी कडे रवाना झाले आहेत. यावर्षी संदीप दादा कोंडकर, तानाजी पाटील (कोरिवडे), नामदेव सुतार (भादवण), चंद्रकांत शिंदे (आजरा गांधीनगर), डॉ. शंकर पारपोलकर (आजरा), बाळकृष्ण पाटील (साळगाव), धनाजी शिंदे (उचंगी), विनायक पताडे (हुनगीनाळ), दौलती तानवडे (देवर्डे), भीमराव जाधव (इंगळी), अंकुश पाटील (साळगाव) यांच्यासह वारकरी बांधव सहभागी झाले आहेत.

अभिनंदनीय…

देवर्डे येथील श्री रवळनाथ हायस्कूलचा विद्यार्थी अथर्व धनाजी चाळके पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती इयत्ता आठवीचा शिष्यवृत्तीधारक ठरला. या विद्यार्थ्याला संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी सर्व संचालक मंडळ यांचे प्रोत्साहन तर माजी मुख्याध्यापक सुभाष सावंत चंद्रकांत घुरे महेश नावलगी देवेंद्र शिखरे राजेंद्र पाटील या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

फोटो क्लिक...

पे अँड युज स्वरूपात बांधलेले आमराई गल्ली येथील शौचालयावर वापरापूर्वीच झाड कोसळून शौचालयाचे नुकसान झाले आहे. मुळात हे शौचालय का बांधले होते. त्याचा वापर का होत नव्हता? हा संशोधनाचा विषय आहे. शहरात इतरत्र असणाऱ्या शौचालयांची परिस्थितीही अशीच आहे.

आजचे पंचांग
दिनांक : १० जुलै २०२६
वार : शुक्रवार
माह (अमावस्यांत) : ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : आषाढ
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : दशमी तिथी (सकाळी ०८.१६ पर्यंत) त्यानंतर एकादशी तिथी
नक्षत्र : भरणी नक्षत्र (दुपारी ०१.१४ पर्यंत) त्यानंतर कृत्तिका नक्षत्र
योग : धृति योग (सकाळी ०७.१४ पर्यंत) त्यानंतर शूल योग
करण : विस्ती भद्रा करण (सकाळी ०८.१६ पर्यंत) त्यानंतर भाव करण
चंद्र राशी : मेष राशी (सायंकाळी ०६.४४) त्यानंतर वृषभ राशी
सूर्य राशी : मिथुन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ११.०५ ते दुपारी १२.४४ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१८ ते दुपारी १.१०
सूर्योदय : सकाळी ०६.०९
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१९
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत


