शनिवार
११ जुलै २०२६


उत्तूरमध्ये भरदिवसा घरफोडी.. साडेचार लाखाचा मुद्देमाल लंपास

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील वांजोळेवाडीतील तुरंबेकर वसाहतीत भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. भरदिवसा झालेल्या या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आजरा पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे.
आजरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनाजी दत्तू तुरंबेकर यांचे घर मुम्मेवाडी मार्गावर वांजोळेवाडी येथील रस्त्यालगत असून घराशेजारीच त्यांची शेती आहे. शुक्रवारी सकाळी कुटुंबीयांनी शेतातील काम आटोपल्यानंतर दुपारी घरी येऊन जेवण केले. त्यानंतर सर्वजण पुन्हा शेतात कामासाठी गेले असता अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला.
चोरट्यांनी कुदळीच्या सहाय्याने तिजोरीचे हँडल तोडून त्यामधील गंठण बोरमाळ नेकलेस असे चार तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम एक लाख दहा हजार असा अंदाजे ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
सायंकाळी कुटुंबीय घरी परतल्यानंतर घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तातडीने उत्तूर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब सरवदे, पोलीस कॉन्स्टेबल सुदर्शन कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. फॉरेन्सिक लॅबचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथकास पाचारण करण्यात येणार असून आजरा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

‘तो ‘ बिबट्याच…
वन विभागाला चकवा देत बिबट्याने दिले दर्शन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
चांदेवाडी (ता. आजरा) येथील परिसरात गेले आठवडाभर वावरत असलेला वन्यप्राणी बिबट्या असून त्यांने आज वनविभागाच्या पथकाला चकवा दिला. सर्वांना हुल देत तो रामतीर्थ जंगलाकडे पळाला आहे. संकेश्वर- बांदा महामार्गावरील सुलगाव रोपवाटीकेतील वनविभागाच्या कार्यालयाजवळ पोलीस अमंलदाराला त्याचे दर्शन झाले. दरम्यान त्याने शेतावरील कुत्रे पळवले आहे.
चांदेवाडी परिसरातील योगेश गुंजकर यांच्या ऊसाच्या शेतावर वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी काल गुरुवार सायंकाळी पिंजरा लावला आहे. या पिंजऱ्यात कुत्रे बांधले आहे. पण बिबट्या तिकडे फिरकला नाही. त्यांने खेडे येथील समीर देशपांडे यांच्या शेतातील कुत्रे पळवले. तो पिंजऱ्याकडे फिरकला नाही. दिवसभर तो चांदेवाडीकडील जंगलात होता. सायंकाळी पावणे सहाच्या सुमाराला तो वनविभागाच्या कार्यालयासमोरील संकेश्वर- बांदा महामार्ग आलांडून रामतीर्थ जंगलाकडे निघून गेला. याच दरम्यान आजरा पोलीस ठाण्याचे अमलदार संदिप म्हसवेकर चारचाकीने उत्तूरकडे निघाले होते. त्यांच्या गाडीच्या आडवा तो आला. त्याला पाहताच म्हसेवकरांची भितीने गाळण उडाली. तो वेगाने रामतीर्थ जंगलाकडे गेल्याचे त्यांनी सांगीतले.
दरम्यान वनविभागाचे पथक त्याच्या मागावर आहे. आज शुक्रवार आजऱ्याचा बाजार असल्याने रस्त्यावर वहानांची रहदारी आहेः त्यामुळे त्याला या परिसरात हसकावून लावण्यासाठी पथक त्याच्या मागावर आहे.
देशपांडेच्या शेतातील कुटुंब भितीच्या छायेत
देशपांडे यांच्या शेतात एक कुटुंब शेतीकामासाठी आहे. त्यांनी जनावरे व शेळ्या पाळल्या आहेत. रखवालीसाठी कुत्री ठेवली आहेत परंतु ही कुत्रीच बिबट्याने पळवण्याचा सपाटा लावला आहे.

विवाहिता व मुलीसह एक जण बेपत्ता
आजरा पोलिसांकडून शोध सुरू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथून २५ जून २०२६ पासून सौ. अनिता संतोष पवार व ३३ वर्षे कु. मोनिका संतोष पवार व ४ वर्षे या मायलेकी राहत्या घरातून बेपत्ता झालेल्या आहेत. याच दरम्यान येथील सरदार बापू चव्हाण ही ४० वर्षीय व्यक्तीही बेपत्ता झाल्याने पोलिसांकडून या तिघांचाही शोध सुरू आहे.
प्राथमिक माहितीमध्ये हे तिघेही कर्नाटक राज्यात असल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला असून यापैकी कोणीही आढळल्यास आजरा पोलीस स्टेशनशी/ ०२३२३ २४६१३३ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हत्ती नुकसान भरपाई पोटी गतवर्षी ३ कोटी ४० लाखांची भरपाई
पं.स. सभेत माहिती
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दोन जंगली हत्तीकडून तालुक्यात ७० लाखांचे नुकसान झाले आहे. वनविभागाने पंचनामे केले असून नुकसान भरपाईचे प्रस्ताव दिले आहेत. गतवर्षी हत्तीकडून झालेल्या नुकसानीची ३ कोटी ४० लाखांची भरपाई शेतकऱ्यांना दिली आहे अशी माहीती आजरा परिक्षेत्र वनाधिकारी सचिन सावंत यांनी दिली.
आजरा पंचायत समितीची मासिक सभापती सौ.जयश्री गाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपसभापती सौ.यशोदा पोवार, जिल्हा परिषद सदस्य शिरीष देसाई, सदस्य विकास चोथे, समीर पारदे, गटविकास अधिकारी सुभाष सावंत उपस्थित होते.
संकेश्वर- बांदा रुंदीकरणात तोडलेली झाडे कुठे लावली याची पाहणी करणार असल्याचे उपसभापती सौ. पोवार यांनी सांगीतले.
वनाधिकारी श्री. सावंत म्हणाले, जंगली हत्तींचा उपद्रव वाढला आहे. त्यांनी केलेल्या नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. यावर सदस्य शिरीष देसाई म्हणाले, गेले दहा वर्ष हेच ऐकत आहोत. जंगली हत्तींच्यावर ठोस उपाययोजना करण्याचे काय झाले. श्री. सावंत यांनी हत्ती संगोपनाचा प्रस्ताव दिल्याचे सांगीतले. हत्तींच्या उपद्रवामुळे शेतकरी हैराण झाला आहे. याबाबत ठोस उपाययोजना वनविभागाने करावी असे श्री. देसाई यांनी सांगीतले. सौ. पोवार यांनी वनविभागाकडे नागीतलेल्या माहीतीबाबत विचारणा केली. संकेश्वर- बांदा, चंदगड हलकर्णी रस्ता रुंदीकरणात तोडलेल्या झाडांच्या लागवडीचे काय ? झाडे कुठे लावली असली तर त्याची पहाणी करणार असल्याचे सौ. पोवार यांनी सांगीतले.
गटशिक्षणाधिकारी बसवराज गुरव यांनी शिक्षण विभागाचा अहवाल मांडला.त्यांनी शिक्षक प्रशिक्षणाचा विषय काढल्यावर समीर पारदे म्हणाले, शाळा सुरु असलेल्या काळात कोणतेही प्रशिक्षण ठेवू नका. शाळेत शिक्षक नसतील तर पालक मुले पाठवणार नाहीत. यामुळे शाळांची पटसंख्या घसरेल.विकास चोथे म्हणाले, प्रत्येक विभागाच्या रिक्त जागा भरण्याचे अधिकार आमच्याकडे नाहीत. त्यामुळे विभागप्रमुखांनी याची माहीती सभागृहाला देवून वेळ वाया घालवू नये. अडचणी व समस्या मांडाव्यात.
आरोग्य विभागाच्या वतीने तालुक्यातील ३७ ग्रामपंचायत टीबी मुक्त झाल्या असून अद्यापही अपवादात्मक असे सहा कुष्ठरोगी तालुक्यात असल्याचे सांगितले.
भूमिअभिलेखच्या अधिकाऱ्यांना मासिक सभेला उपस्थित राहण्याच्या सूचना देवून देखील ते हजर राहत नसतील तर आम्हीच आढावा घ्यायला कार्यालयात येतो. असा उपरोधिक टोला उपसभापती सौ.यशोदा पोवार यांनी मारला.
कृषी, बांधकाम, पाटबंधारे, आरोग्य यासह विविध विषयावर चर्चा झाली. गटविकास अधिकारी सावंत यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली.

डॉक्टरांवरील हल्ल्याप्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी महिला वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर केलेल्या कथित हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कॉ. संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली आजरा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचा-यांवरील वाढत्या हल्ल्यांमुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे अशा घटनांवर आळा घालण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई करण्याबरोबरच डॉक्टर व आरोग्य कर्मचा-यांवरील हल्ले दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा घोषित करून त्यांना कायदेशीर संरक्षण देणारा स्वतंत्र कायदा करण्यात यावा. यासोबतच राज्याचे आरोग्यमंत्री यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात आणि पावसाळी अधिवेशनात यासंदर्भातील कायदा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनावर कॉ. संपत देसाई, कॉ. शांताराम पाटील, रवींद्र भाटले, अंबाजी सुतार, म-याप्पा बोलके, प्रकाश मोरुस्कर, बाबुराव सावंत आदींच्या सह्या आहेत.

शिवा काशीद पुण्यतिथी सोहळा सरकारी कार्यालयामध्ये साजरा करावा…
नाभिक समाज संघटनेची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सतराव्या शतकात महाराष्ट्राच्या मातीमध्ये पाच शाह्यांना मात देत मराठी मातीमध्ये स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्याचे स्वप्न साकार करत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळ्याच्या मातीतील नेबापूर गावचा नाभिक समाजातील मावळा शिवा काशिद याने आपल्याला मरण पत्करावे लागणार हे माहीत असूनही केवळ स्वराज्यासाठी आणि आपल्या राजासाठी बलिदान पत्करले.
वीर शिवा काशिद यांची पुण्यतिथी १३ जुलै रोजी संपन्न होते. या दिवशी स्वराज्याला व छत्रपती शिवरायांना वंदन आणि या वीर मावळ्याची आठवण म्हणून विविध शासकीय कार्यालयामध्ये वीर शिवा काशिद पुण्यतिथी सोहळा संपन्न व्हावा व स्वराज्याच्या या मावळ्याची आणि त्याच्या बलिदानाची आठवण सर्वांच्या मनामध्ये पेरावी अशा आशयाचे निवेदन आजरा तहसीलदार, आजरा नगराध्यक्ष, आजरा मुख्याधिकारी, आजरा गटशिक्षणाधिकारी, आजरा सरपंच परिषद अध्यक्ष यांना देण्यात आले आहे.
निवेदन देताना आजरा तालुका नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष श्री . आकाश नंदकुमार शिंदे, उपाध्यक्ष श्री. गौतम बाबुराव भोसले व श्री. निलेश साळोखे व माजी उपाध्यक्ष श्री. देव पाचवडेकर उपस्थित होते.

विजेचा धक्का बसून गवसे येथे म्हैस दगावली

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पशुवैद्यकीय चिकित्सालय, गवसे अंतर्गत गवसे गायरान येथे विजेचा धक्का लागून लक्ष्मण भीमराव सोले यांची म्हैस मृत पावली.
मृत म्हैशीचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी गोकुळ दूध संघाचे डॉ पी एम जालकर साहेब तसेच पशुवैद्यकीय चिकित्सालय,गवसे पशुसंवर्धन विभाग, आजरा मार्फत डॉ. निखिल यादव, श्री अजय गोरुले, श्री रुपेश भालेकर व वीज वितरण चअ धिकारी कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

आजरा येथे कृत्रिम अवयव वाटप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
ना.प्रकाश आबिटकर मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा पालकमंत्री कोल्हापूर याच्या संकल्पनेतून दिव्यांग बांधवांना सक्षम करण्यासाठी मोफत कृत्रिम अवयव पोलिओ कॅलिपर्स यांच्या दिव्यांग तपासणी करून ऑन द स्पॉट कृत्रिम पाय पोलिओ कॅलिपर्स कृत्रिम हात वाटप करणे बाबत शिबिराचे आयोजन अण्णाभाऊ हॉल आजरा हायस्कूल येथे करण्यात आले होते.
यावेळी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र भाऊ सावंत, शिवसेना तालुका प्रमुख संजय पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र गुरव गुरव डिके पाटील व कौस्तुभ पाटील एस आर ट्रस्टचे शाहरुख शहा किरण भरत व सर्व स्टाफ शहरप्रमुख विजय थोरवत, नगरसेवक महेश खेडेकर,राजेंद्र पोतनीस, रणजीत सरदेसाई, इंद्रजीत देसाई, धनंजय पाटील, सुनील दिवेकर, महेश दळवी, दयानंद निऊंगरे कार्यकर्ते उपस्थित होते.

आजचे पंचांग
दिनांक : ११ जुलै २०२६
वार : शनिवार
माह (अमावस्यांत) : ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : आषाढ
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : द्वादशी तिथी (१२ जुलै पहाटे ०२.०४ पर्यंत) त्यानंतर त्रयोदशी तिथी
नक्षत्र : कृत्तिका नक्षत्र (सकाळी ११.०३ पर्यंत) त्यानंतर रोहिणी नक्षत्र
योग : गण्ड योग (१२ जुलै रात्री १२.०४ पर्यंत) त्यानंतर वृद्धि योग
करण : कौलव करण (दुपारी ०३.४५ पर्यंत) त्यानंतर तैतुला करण
चंद्र राशी : वृषभ राशी
सूर्य राशी : मिथुन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०९.२७ ते सकाळी ११.०५ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१८ ते दुपारी ०१.१०
सूर्योदय : सकाळी ०६.०९
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१९
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत
आजचे पंचांग


