रविवार
१२ जुलै २०२६


आजरा शहरात बिबट्याचा वावर ; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गेल्या चार दिवसांपासून चांदेवाडी परिसरात वास्तव्याला असलेला बिबट्या आता थेट आजरा शहरात पोहोचला आहे. आजरा विश्रांतीगृहाजवळील झुडपात तो निवांत बसलेला असताना स्थानिक नागरिक राहूल नेवरेकर यांना दिसला. त्याने यावेळी एका कुत्र्याला ठार केल्याचेही दिसून आले. शहरातील कमल कुंज अपार्टमेंट परिसर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परिसरामध्ये बिबट्या आढळल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
आज सायंकाळी राहुल नेवरेकर आणि त्यांचे मित्र फिरण्यासाठी रामतीर्थकडे गेले असता झुडपातून कुत्र्याच्या विव्हळण्याचा आवाज आला. काही क्षणात आवाज बंद झाला आणि त्यांच्या डोळ्यासमोरच बिबट्या वेगाने रामतीर्थ-साळगाव मार्गावरील जंगलात निघून गेला. पुढे तो पुन्हा कमल कुंज अपार्टमेंट लागत व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र परिसरातील तळ्याच्या माळाजवळ आढळून आला.
बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे पथक सज्ज झाले आहे. चांदेवाडीतील एका शेतात पिंजरा ठेवून त्यात कुत्रा बांधण्यात आला आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून बिबट्या पिंजऱ्याजवळ फिरकलेला नाही. तो वनविभागाच्या पथकाला चकवा देत असल्याचे दिसते.
वनविभागाने नागरिकांना विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पहाटे-संध्याकाळी एकट्याने बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. शहरातील कचरा डेपोमध्ये वाढ झाल्याने भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळेच भक्ष्याच्या शोधात बिबट्या वस्तीकडे येत असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
बिबट्याचा शहराजवळचा वावर हा शहरवासीयांसाठी धोक्याची घंटा असून वनविभाग बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहे.
हत्ती गवे व रानडुकरानंतर आता बिबट्या…
आजरा शहरांमध्ये यापूर्वी हत्ती येऊन गेला आहे. गवे येताना दिसतात. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण परिसर व विद्यानगर कॉलनीतून रानडुकरे जाताना दिसतात. तरसही दिसले आहे. आता कहर म्हणजे बिबट्याचे शहरात येणे. मॉर्निंग वॉकला जाणारी मात्र यामुळे चांगलीच गोची झाली आहे.

“माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” उपक्रम उद्या आजरा तालुक्यात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शेतकऱ्यांच्या अडचणी प्रशासनाने प्रत्यक्ष समजून घ्याव्यात यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री मा. ना. प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” हा उपक्रम उद्या दि. १३ रोजी कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, कृषी विद्यापीठांचे शास्त्रज्ञ, खासदार, आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक दिवस शेतकऱ्यांसोबत राहून त्यांच्या दैनंदिन कामात सहभागी होतील. शेतीचा खर्च, उत्पादन, अनुदान योजना, CROPSAP व Mahavistar AI नोंदणी यावर चर्चा होणार आहे.
आजरा तालुक्यातील मसोली येथे पालकमंत्री उपस्थित राहतील तर पेरणोली येथे जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष भेट देणार आहेत.

विठोबा पाटील यांचे निधन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दाभिल तालुका आजरा येथील शंभू महादेव दूध संस्थेचे विद्यमान अध्यक्ष व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विठोबा तुकाराम पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ७० वर्षे होते .
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले , विवाहित मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
आज रविवारी सकाळी दाभिल येथे रक्षाविसर्जन आहे.

आजरा महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात साजरा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा महाविद्यालय, आजरा येथील भूगोल व अर्थशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. रणजित पवार यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. त्यांनी जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्त्व, लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणारी आव्हाने आणि त्यावर उपाययोजनांची आवश्यकता यावर प्रकाश टाकला.
यावेळी प्रमुख व्याख्याते डॉ. राम मधाळे यांनी “लोकसंख्या वाढ, संसाधनांचे व्यवस्थापन आणि शाश्वत विकास” या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी वाढती लोकसंख्या, नैसर्गिक संसाधनांवरील वाढता ताण, नागरीकरण, पर्यावरणीय समस्या तसेच कुटुंब नियोजन, महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि आरोग्य यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना उदाहरणांसह समजावून सांगितले.
विद्यार्थ्यांनीही व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रश्न विचारले.कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. जिज्ञासा उपराटे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. महेंद्र जाधव यांनी केले.या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

निधन वार्ता
राजाराम सासुलकर

पेरणोली तालुका आजरा येथील राजाराम महादेव सासुलकर ( वय ८० वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पक्षात पत्नी मुलगा मुलगी नातवंडे असा परिवार आहे.
वारकरी असणाऱ्या सासूलकर यांची तबला व मृदंग वादक अशी ख्याती होती.
अनुबाई घेवडे
धामणे तालुका आजरा येथील अनुबाई रामू घेवडे ( वय ९७ वर्षे ) यांची वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार विवाहित मुले, एक विवाहित मुलगी, सुना, जावई, नातवंडे,नात सुना असा मोठा परिवार आहे.

फोटो क्लिक…

ऐनापुर बंधाऱ्यावर काल दुपारच्या दरम्यान पेट्रोल वाहतूक करणारा टँकर पाण्यात पडण्यापासून थोडक्यात बचावला….
छाया : सुभाष पाटील /कानोली


आजचे पंचांग
दिनांक : १२ जुलै २०२६
वार : रविवार
माह (अमावस्यांत) : ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : आषाढ
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : त्रयोदशी तिथी (रात्री १०.२९ पर्यंत) त्यानंतर चतुर्दशी तिथी
नक्षत्र : रोहिणी नक्षत्र (सकाळी ०८.२८ पर्यंत) त्यानंतर मृगशीर्ष नक्षत्र
योग : वृद्धि योग (रात्री ०८.०५ पर्यंत) त्यानंतर ध्रुव योग
करण : गराजा करण (दुपारी १२.१८पर्यंत) त्यानंतर वाणीजा करण
चंद्र राशी : वृषभ राशी (सायंकाळी ०७.०५ पर्यंत) त्यानंतर मिथुन राशी
सूर्य राशी : मिथुन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सायंकाळी ०५.४० ते सायंकाळी ०७.१९ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१८ ते दुपारी ०१.१०
सूर्योदय : सकाळी ०६.०९
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१९
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत


