पंधराव्या वित्त आयोगाचे या बिलाचा गोंधळ थांबवा व तातडीने बिले अदा करा…
पंचायत समिती सभेत सदस्यांच्या सूचना
पंधराव्या वित्त आयोगातील बिले अध्याप अदा करण्यात आली नाहीत. बिलामध्ये सावळा गोंधळ असल्याने विलंब होत आहे. तातडीने अदा करावीत अशा सूचना पंचायत समिती सभेमध्ये सदस्यांनी केल्या.सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती उदय पवार होते. सभेच्या सुरुवातीस ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सभांमध्ये बोलताना सदस्य शिरीष देसाई यांनी शेतकऱ्यांना आलेली विज बिले कमी करून द्यावीत व त्यांचा वीजपुरवठा खंडित करू नये अशी सूचना केली. सलग दोन महिने एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने आजरा आगाराचे सुमारे एक कोटी सहासष्ट लाख बत्तीस हजार इतके उत्पन्न बुडाले आहे अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. तालुक्यातील ९९ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी बसवराज गुरव यांनी दिली जिल्ह्यामध्ये तालुक्याचा चौथा क्रमांक असल्याचे सांगितले मार्गदर्शक शिक्षकांसह शिक्षण विभागाच्या अभिनंदनाचा ठराव सभेमध्ये करण्यात आला. रब्बी हंगामाकरिता पुरेसा खतसाठा असल्याचे अधिकारी खोराटे यांनी सांगितले. खतांमध्ये कोणत्याही प्रकारचे लिंकिंग नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. वनविभागाकडून हत्तींच्या बंदोबस्तासाठी कायमस्वरूपी उपाय योजना केली जावी अशी मागणी सदस्य रचना होलम यांनी केली. यावेळी झालेल्या चर्चेत गटविकास अधिकारी बी.डी. वाघ, उपसभापती सौ.वर्षा कांबळे, सदस्या सौ. वर्षा बागडी,सभापती उदय पवार यांनी भाग घेतला.
सुधीर देसाई यांचा सत्कार

सभेमध्ये जिल्हा बँकेचे नूतन संचालक सुधीर देसाई यांचा पंचायत समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती उदय पवार यांनी बचत गटांच्या कर्जासंदर्भात मागितल्या जाणाऱ्या क्लिष्ट कागदपत्रांची यादी कमी करून सुलभतेने कर्ज देण्याची व्यवस्था व्हावी अशी मागणी केली तर याकरीता आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन संचालक सुधीर देसाई यांनी दिले.



किटवडे येथे तीन टीएमसी चा पाणी प्रकल्प उभारण्याच्या हालचाली
महाराष्ट्र व कर्नाटक यांच्या संयुक्त योगदानातून किटवडे तालुका आजरा येथे तीन टीएमसी चा पाणी प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संकेश्वर येथे कर्नाटक व महाराष्ट्रातील आमदार मंत्र्यांची बैठक पार पडली आहे. प्रकल्पाकरिता खाजगी व वन विभागाच्या सुमारे एक हजार एकर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे तर किटवडे गाव पूर्णपणे विस्थापित होणार असल्याची माहिती बैठकीस हजर असणारे अभियंता शरद पाटील यांनी दिली. याबाबत चर्चा करण्यासाठी पुन्हा एक वेळ फेब्रुवारी महिन्यात व्यापक बैठक बोलवण्यात आले याचीही त्यांनी स्पष्ट केले.



बोली भाषेचा सन्मान केला पाहिजे.- प्रा. डॉ. नंदकुमार मोरे
एखाद्या प्रदेशात बोलली जाणारी भाषा हीच खरी जीवन व्यवहाराची भाषा असते. आपल्या जीवन व्यवहाराला अर्थपूर्ण करणाऱ्या या बोली टिकल्या पाहिजेत, वाढल्या पाहिजेत, त्यासाठी बोलीभाषेचे असणारे भाषिक न्यूनगंड बाजूला सारून आपल्या बोलीत व्यक्त झाले पाहिजे, बोली भाषांचा सन्मान केला पाहिजे, असे मत शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाचे प्रमुख प्रा.डॉ. नंदकुमार मोरे यांनी येथे व्यक्त केले.
आजरा महाविद्यालय आजरा येथे मराठी विभाग आणि शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त आयोजित केलेल्या विविध उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. मोरे बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अशोक सादळे अध्यक्षस्थानी होते. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. राजीव टोपले, श्री योगेश पाटील प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा.डॉ. नंदकुमार मोरे पुढे म्हणाले की, मराठी भाषेचा इतिहास हा सुमारे अडीच हजार वर्षे जुना आहे. तरीही आपल्याला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी अजूनही लढा द्यावा लागतो आहे, ही खेदाची बाब आहे. त्यामुळे आपणच आपल्या भाषेचे संवर्धन करणे गरजेचे आहे. मराठी भाषा टिकली तरच मराठी संस्कृती टिकेल. नवीन लिहणा-या लेखकांनी आपल्या बोलीभाषेचा वापर लेखनात केला पाहिजे. केवळ मराठीच नव्हे तर सर्वच विषयाच्या शिक्षकांनी मराठी भाषेकडे गांभीर्याने पहिले पाहिजे. अलीकडे सोशल मीडियावरून वापरली जाणारी भाषेतील शब्दांची संक्षिप्त रूपे भाषेच्या दृष्टीने घातक आहेत. भाषेचा वैज्ञानिक आणि सामाजिक अंगाने विचार होणे गरजेचे आहे. भाषाशुद्धीचा विचार करीत असताना भाषेच्या बोली टिकणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण बोलीच प्रमाण भाषेला समृद्ध करीत असतात. भाषेतील शब्दभांडार वाढवत असतात.
यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. अशोक सादळे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित केलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. विनायक चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.सुवर्णा धामणेकर यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय प्रा. सुषमा नलवडे यांनी करून दिला.आभार डॉ. आप्पासाहेब बुडके यांनी मानले. यावेळी मराठी विभाग प्रमुख डॉ.आनंद बल्लाळ, प्रा. बाळासाहेब कांबळे, प्रा. संदीप देसाई,डॉ.रणजित पवार, प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे, प्रा.डॉ. श्रीनिवास नाईक, प्रा.अनिल निर्मळे व महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.


निधन वार्ता……
शहाजी देसाई यांचे निधन…

निंगुडगे (ता.आजरा)येथील प्राथमिक शिक्षक व सरस्वती विद्यामंदिर सरोळी या शाळेचे मुख्याध्यापक शहाजी मधुकरराव देसाई(वय५५)यांचे हृदयविकाराचे झटक्याने आकस्मिक निधन झाले.त्यांच्या पश्चात शिक्षक पत्नी,विवाहित मुलगी मुलगा असा परिवार आहे.त्याच्या आकस्मिक निधनाने हळहळ व्यक्त होत आहे..






